Halloween Costume ideas 2015

चांगले संस्कार

ये शहादतगाह-ए-उल्फत में कदम रखना है.
लोग आसान समझते हैं मुसलमां होना
मित्रांनों! आपल्या सगळ्यांना माहिती आहे कि, दारू, सीगारेट, गुटखा, जुगार आदीचे व्यसन त्या घरातील मुलांना अधिक लवकर लागतात, ज्या घरातील संस्कार कच्चे असतात. अशा मुलांच्या तुलनेत सुसंस्कारित मुलांमध्ये वाईट गोष्टींशी लढण्याची शक्ति अधिक असते. उदा. जैदच्या घरात खुले वातावरण आहे. आई-वडिल दोघेही सोशलाईट (आधुनिक) आहेत. दोघेही फॅशनेबल कपडे घालतात. आई केस मोकळे सोडते, ब्युटिपार्लरला नियमित जाते, सारखी या कार्यक्रमातून त्या कार्यक्रमात फिरत राहते, मित्र-मैत्रिणींच्या गराड्यात राहते.  वडील दारू पितात. बँकेचे कर्ज बुडवितात. देशाचे टॅक्स बुडवितात. दोघांनी मिळून मोठे घर बांधलेले आहे. घरात सगळे ‘डेज साजरे केले जातात’ त्यानिमित्त घरी पार्ट्या केल्या जातात.  मित्र-मैत्रीनींना घरी बोलविले जाते. पार्ट्या केल्या जातात. त्यात स्त्री-पुरूष मुक्तपणे एकमेकांशी बोलत असतात. सॉफ्ट ड्रिंक्स मधून नकळत बीयर / हिस्की सर्व्ह केली जाते. घरात सतत संगीत सुरू असते. प्रत्येकाच्या खोलीत फ्लॅट टीव्ही आहे. त्यावर प्रत्येक जण आपल्या मर्जीने मालिका पाहत असतो. मुलां-मुलींना व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली बरेच अधिकार मिळालेले आहेत. रात्री उशीरा आल्यास कोणी विचारत नाही किंवा विचारले तरी मारलेल्या प्रत्येक थापेवर डोळे झाकून विश्वास केला जातो. रात्री उशीरा पर्यंत जागरण करणे, दिवसा उशीरा उठणे, बाहेर हॉटेलमध्ये खाणे याला वाईट समजले जात नाही. उलट या सगळ्या गोष्टींना नकळत प्रोत्साहित केले जाते कारण यालाच मॉडर्न लाईफ माणण्यात येते. या उलट बकरच्या घरचे वातावरण आहे. आई-वडील दोघेही भल्या पहाटे फजरच्या अजानच्या आवाजाने उठतात, घरातील सर्व सदस्यांना उठवतात. आई नमाजनंतर घर कामाला लागते. वडील तिलावत झाल्यावर तयार होवून कामावर जातात. आईच्या डोक्यावरचा पदर कधी ढळत नाही. घरातील सगळे सदस्य नियमितपणे दिवसातून पाच वेळा नमाज अदा करतात. घरात संगीत वाजत नाही. एक टीव्ही आहे तो ही मुख्य हॉलमध्ये आहे. त्यात ही चॉइल्ड लॉक टाकलेला आहे. म्हणून त्यावर कुठलेच अनावश्यक कार्यक्रम पाहण्याची सोय नाही. रोज रात्री त्याचा उपयोग इशानंतर तासभर बातम्यांसाठी वडील करतात. घरात सतत तिलावते कुरआन होते. संध्याकाळी सगळे एकत्र बसून जेवण करतात. त्यानंतर हदीसची तालीम होते व रात्री दहाच्या आसपास सगळे झोपतात. घरात कधीच कोणतेच डेज साजरे केले जात नाहीत. कोणी येत नाही. कोणी आले तरी शरियतच्या निर्देशांचे पालन करून त्यांचे आदरआतिथ्य केले जाते. घरात परद्याची व्यवस्था अतिशय कडक पद्धतीने लागू केलेली आहे. घरातील कोणतीही महिला घरी आलेल्या कोणत्याही परपुरूषाशी बोलत नाही. घरात कायम शांतता असते. जोरात ओरडून कोणीही बोलत नाही. आई-वडिल प्रत्येकाचा अभ्यास तपासतात, मुलांच्या वर्तनावर नजर ठेवतात, दीनी तालीमची व्यवस्था केलेली आहे. वडील निर्व्यसनी व नेक आहेत. त्यांच्या या दीनदारीमुळे समाजात त्यांचा दबदबा आहे. लोक आदराने त्यांच्याकडे पाहतात. सगळे घर आईच्या भोवती फिरते. घराचे नेतृत्व वडील करतात. प्रत्येक निर्णय वडील आईला विचारून घेतात. मीत्र हो! आपण स्वत: अंदाज लावा भविष्यात कोण सुसंस्कृत होईल? जैद का बकर?
आता आपल्या घराकडे पहा. आपले घर यापैकी कोणत्या गटात मोडते. जर बकरच्या गटात मोडत असेल तर आपले अभिनंदन. आपण चांगले पालक आहात. आपली मुलं/मुली धोक्याच्या रेषेच्या खूप खाली आहेत. परंतु जैदच्या   गटात आपले घर मोडत असेल तर आपली मुलं/मुली धोक्याच्या रेषेच्या वर आहेत. ते कधी ही आपल्याला मानखाली घालावी लागेल असे कृत्य करू शकतात. म्हणून मित्रांनो सावध व्हा! मुलांना चांगले संस्कार द्या.
चांगले संस्कार कसे द्यावेत?
चांगले संस्कार द्या! असे म्हणणे फारच सोपे आहे. परंतु प्रत्यक्षात चांगले संस्कार कसे द्यावेत, हे फारच कमी लोकांना समजते. हे काम एका व्यवस्थेच्या माध्यमातून करावे लागते. इस्लामी कुटुंब व्यवस्थेच्या माध्यमातून चांगले संस्कार अत्यंत प्रभावीपणे करता येतात. अनायासे रमजानचा महिना चालू आहे. या महिन्याच्या माध्यमातून आपल्या घरातील मुलांवर चांगले संस्कार करण्याची आपल्याकडे सुवर्ण संधी आहे. अतिशय सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे रमजान हा सर्व मुस्लिमांसाठी अ‍ॅन्युअल मेंटेनन्सचा महिना आहे. या महिन्यात स्वत:चे मेंटेनन्स व्यवस्थित केले तर पुढील रमजानपर्यंत एक मुस्लिम म्हणून प्रत्येक व्यक्ति अतिशय चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकते.
ज्याप्रमाणे गाडीला मेंटेनन्सची गरज असते त्याचप्रमाणे माणसालाही मेंटेनन्सची गरज असते. मनुष्य ही एक बायलॉजिकल (जीवशास्त्रीय) मशीन आहे. त्यालाही अ‍ॅन्युअल मेंटेनन्सची गरज आहे. त्यासाठी सर्वश्रेष्ठ अल्लाहने रमजानचा महिना दिलेला आहे. या महिन्यात तजकिया-ए-नफ्सच्या माध्यमातून आपण आपले मेंटेनन्स करू शकतो. तजकिया हा अरबी शब्द आहे. ज्याचा अर्थ सफाई/मेंटेनन्स असा आहे. ज्या पद्धतीने गाडी गॅरेजमध्ये आल्यानंतर त्यातील जुने ऑईल काढून नवीन ऑईल टाकले जाते, तीचे एअर फिल्टर बदलले जातात, छोटी-मोठी तूट-फूट दुरूस्त केली जाते. अगदी त्याचप्रमाणे रमजानमध्ये प्रत्येक मुस्लिमाला गॅरेज (मस्जिदीमध्ये) एरव्हीपेक्षा जास्त वेळेस बोलविले जाते. तरावीहची अतिरिक्त नमाज त्याच्याकडून पठण करून घेतली जाते, एहतेकाफच्या माध्यमातून 10 दिवस बाहेरच्या दुषित वातावरणापासून दूर मस्जिदीमध्ये राहण्यासाठी बोलाविले जाते, दिवसभर उपाशी ठेवले जाते हेच त्याचे मेंटेनन्स आहे. ज्याप्रमाणे गॅरेजमधून गाडी मेंटेनन्स झाल्यावर बाहेर पडते, तेव्हा ती अधिक दमदार होते, तिचा अ‍ॅवरेजही वाढतो, त्याचप्रमाणे महिनाभरचे रोजे, तरावीह, एहतेकाफच्या माध्यमातून प्रत्येक मुस्लिमाचे मन, बुद्धी, पोट, आत्मा या सगळ्यांचे मेंटेनन्स केले जाते व रमजान संपल्यानंतर जेव्हा एक मुस्लिम बाहेर पडतो तेव्हा त्याचा नैतिक स्तर उंच झालेला असतो. तो नेकी (पुण्या)कडे जास्त झुकलेला असतो. वाईटापासून लांब जाण्याची त्याच्यामध्ये क्षमता निर्माण झालेली असते. तो समाजासाठी उपयोगी बनतो.
ज्याप्रमाणे मेंटेनन्स न करता गाडी वापरली तर ती खराब होवून जाते. त्याचप्रमाणे रमजानमध्ये मेंटेनन्स केले नाही तर माणूस शराबी, कबाबी, अश्लील, व्याभिचारी, विश्वासघाती, स्वार्थी बनू शकतो. अर्थात तो खराब होवून जातो.
कुरआनमध्ये निर्देश देण्यात आलेले आहेत कि, “निश्चितपणे यशस्वी झाला तो व्यक्ति ज्याने स्वत:च्या नफ्स मनाचा तजकिया केला.“ (संदर्भ : सुरे शम्स आयत नं.9). या आयातीमध्ये यशस्वी होण्याची गुरूकिल्ली दिलेली आहे. रमजानमध्ये दिलेल्या अतिरिक्त इबादती केल्यामुळे माणसाच्या मनाची सफाई होते अर्थात त्याचे मेंटेनन्स होते. रोजामुळे त्याचे पोट साफ होते. तरावीह आणि ऐतेकाफमुळे त्याची आत्मा शुद्ध होते. मित्रानों! हे मन जे आहे ना! तेे अत्यंत चलाख असते. ते आपल्याला नेहमी वाईट गोष्टींकडे ओढत असतो. करोडो रूपये कमविल्यानंतरही ते आपल्याला शांतपणे झोपू देत नाही.प्रत्येक वाईट इच्छा ही अगोदर मनामध्ये निर्माण होते. मग माणूस त्या वाईट इच्छेला पूर्ण करण्याच्या मागे लागतो. म्हणून या मनावर नियंत्रण म्हणजे सर्व शरीरावर नियंत्रण. आतापर्यंत चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेले असेलच की मन हे वाईट गोष्टींचे माहेरघर आहे. त्याच्यावर विजय प्राप्त केला तर मनुष्य वाईट गोष्टींपासून दूर राहतो. यासाठी वर नमूद आयातीचा आधार घ्यावा लागतो. पण या आयातीत नमूद काम करण्यासाठी अगोदर प्रामाणिकपणे सर्वश्रेष्ठ अल्लाहकडे तशी दुआ करावी लागते जशी इब्राहीम अलै. यांनी केली होती. ती दुआ म्हणजे “ऐ अल्लाह! आम्हा दोघांना (ह.इब्राहीम/ह.इस्माईल अलै.) आपला मुस्लिम (अज्ञाधारक) बनव. आमच्या वंशामधून असे लोक निर्माण कर की जे तुझे मुस्लिम (आज्ञाधारक)असतील. आम्हाला तुझी इबादत कशी करावी? त्याची रीत शिकव. आमच्या चुकांकडे दुर्लक्ष कर, तू फार मोठा क्षमा आणि दया करणारा आहेस.“ (संदर्भ: सुरे बकरा आयत नं. 127/128). या आयातीमध्ये तजकिया-ए-नफ्स अर्थात मनाचे मेंटेनन्स कसे करावे? त्यासाठी कशी दुआ करावी? या संबंधीचे मार्गदर्शन केलेले आहे. इब्राहीम अलै. सलाम यांनी मुस्लिम (आज्ञाधारक) होण्यासाठीची दुआ मागितलेली आहे. आपल्याला हेच करावे लागेल. तेव्हा कुठे सर्वश्रेष्ठ अल्लाह आपल्यावर दया आणि कृपा करेल. वाईट गोष्टींपासून दूर राहण्याची शक्ती आपल्याला या दुआच्या माध्यमातून मिळेल.
मुस्लिमांमध्ये कुरआनला न समजता वाचण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. जोपर्यंत कुरआनला समजून वाचण्याची नवीन परंपरा सर्वसामान्य लोकांमध्ये प्रस्थापित होणार नाही, तोपर्यंत अल्लाहचे मार्गदर्शन नेमके काय आहे? हे आपल्याला समजणार नाही. ज्याप्रमाणे ताप आल्यावर पॅरासीटमोल या शब्दाचा हजार वेळेस उच्चार केला तरी ताप कमी होत नाही. त्यासाठी पॅरासीटमलची गोळी खावीच लागते. त्याचप्रमाणे फक्त कुरआन पठण (तिलावत) केल्याने त्यातील मार्गदर्शनाचा लाभ होत नाही. त्यासाठी कुरआन समजूनच वाचावे लागते. कुरआनमध्ये एवढी वैचारिक उर्जा नक्कीच आहे कि, एखाद्याने श्रद्धेविनाही फक्त समजून घेण्यासाठी त्याचे वाचन केले तर तो नक्कीच चांगला व्यक्ति बनू शकतो. तर मित्रानों उठा ! आणि कुरआनला समजून वाचा. रमजानचे रोजे ठेवा. तरावीह अदा करा. एहतेकाफ करण्याचा प्रयत्न करा. अल्लाह करो या महिन्याच्या या विशेष इबादतींमुळे आपल्यामध्ये इतकी उर्जा निर्माण होवो कि, पुढील अकरा महिने आपण एक अत्यंत प्रभावशाली आणि चांगले व्यक्ती म्हणून नावारूपाला येवो. ज्याची की देशाला आज गरज आहे. आमीन.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget