Halloween Costume ideas 2015

तिसऱ्या महायुद्धाची चाहूल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सभेत उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भाषणानंतर केलेल्या ट्विटला उत्तर कोरियाने प्रत्युत्तरात उत्तर कोरियाविरोधात डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध पुकारल्याचे म्हटले आहे. चाडसह उत्तर कोरियाच्या नागरिकांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत प्रवेश बंदीचा आदेश काढल्याने, उत्तर कोरियाचा संताप वाढला आहे. मात्र उत्तर कोरियाने युद्धाची घोषणेसंदर्भात केलेला दावा अमेरिकेने फेटाळला असला तरी युद्धाबाबतचा हा वाद-प्रतिवाद विकोपाला पोहोचला असून जणू आगामी काळातील तिसऱ्या महायुद्धाची ही ठिणगीच म्हणावी लागेल.
जगाच्या इतिहासात विसावे शतक अनेक कारणांनी महत्त्वाचे ठरते. या शतकात जगाने दोन महायुद्धे बघितली व त्यात झालेला अमानुष मानवी संहारसुद्धा बघितला. पहिले महायुद्ध १९१८ साली संपले. तेव्हा जागतिक नेत्यांना वाटले की यापुढे असा मानवीसंहार होणार नाही यासाठी एखादी आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन केली पाहिजे. याच हेतूने १० जानेवारी १९२० रोजी अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष वुड्रू विल्सन यांच्या पुढाकाराने `लिग ऑफ नेशन्स’ ही संघटना स्थापन झाली. दुर्दैवाने या संघटनेत अमेरिकेसारखा बलाढ्य देश नव्हता. या व इतर अनेक कारणांनी `लिग ऑफ नेशन्स’ ही संघटना फारशी यशस्वी होऊ शकली नाही व १९३९ साली दुसरे महायुद्ध सुरू झाले. दुसरे महायुद्ध १९४५ साली समाप्त झाले खरे, पण जाताजाता जगाला अणुशक्तीचे भयानक रूप दाखवून गेले. अमेरिकेने हिरोशीमा व नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकले. १९४५ मध्ये दुसरे महायुद्ध संपल्यानंतर पुन्हा एकदा भविष्यात अशी भयानक युद्धे होऊ नयेत म्हणून एखादी जागतिक संघटना असावी हा विचार बळावला. यातूनच २४ ऑक्टोबर १९४५ रोजी `संयुक्त राष्ट्रसंघ’ ही संस्था स्थापन करण्यात आली जी आजही कार्यरत आहे. मात्र, संयुक्त राष्ट्रसंघ निर्माण झाला म्हणजे जगातील युद्धे संपली असा नक्कीच नाही. आजही जगाच्या कोणत्या ना कोणत्या भागात युद्धे सुरूच आहेत. असे होण्याचे अतिशय महत्त्वाचे कारण म्हणजे जरी दुसरे महायुद्ध संपले तरी त्याबरोबरच शीतयुद्ध सुरू झाले. जगाच्या इतिहासात शीतयुद्ध हा वेगळा प्रकार होता. यात एका बाजूला अमेरिकाप्रणीत भांडवलशाही होती तर दुसरीकडे `सोव्हिएत युनियनप्रणित मार्क्सवाद’ होता. याचाच अर्थ असा की शीतयुद्ध हे प्रत्यक्षात तत्वज्ञानासाठीचे युद्ध होते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या काळी अमेरिका व रशिया आपापली तत्वज्ञानं जगभर नेण्यासाठी साम, दाम, दंड व भेद वगैरे सर्व प्रकारची हत्यारे वापरत होती. शीतयुद्धाचा आविष्कार संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत होत असे. रशियाने जर अमेरिकेच्या मित्रराष्ट्राच्या विरोधात ठराव आणला तर अमेरिका `नकाराधिकार’ वापरून हा ठराव निकामी करत असे. तसेच रशियाही करत असे. यामुळे सुरक्षा परिषदेत काहीही अर्थपूर्ण कामच होत नसे. यात मोठया प्रमाणात १९९१ साली बदल झाला जेव्हा सोव्हिएत युनियन रसातळाला गेले. थोडक्यात, म्हणजे १९९५ ते १९९१ दरम्यान संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे शीतयुद्धाची रणभूमी झालेले होते. आज अमेरिका व इतर युरोपियन देश मानवी हक्क किंवा अण्वस्त्र प्रसाराच्या मुद्द्याला तितकेसे महत्त्व देत नसून त्यांच्या दृष्टीने आर्थिक हितसंबंध जास्त महत्त्वाचे असतात. सध्या जागतिक राजकारणात उत्तर कोरिया एक महासंकट बनले आहे. संयुक्त राष्ट्र संघासह जगातील जवळपास सर्व महाशक्ती देशांनी घातलेली बंदी आणि चेतावणीकडे दुर्लक्ष करून हुकुमशाह किम जोंग यांच्या नेतृत्वातील हा इवलासा देश जगासाठी मोठे डोकेदुखी बनली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने घातलेल्या बंदीनंतरही घातक प्रक्षेपास्त्राच्या परीक्षणापासून ते अमेरिकेला उघड आव्हान देण्यापर्यंत उत्तर कोरियाची मजल गेली आहे. काही दिवसांपूर्वी जपानवरून क्षेपणास्त्रांचा मारा उ. कोरियाने केला होता. उ. कोरियाचे काय करायचे याचे उत्तर सध्या जगातील कोणत्याही महाशक्तीकडे नाही. जर लवकरात लवकर या घातक यक्षप्रश्नाचे उत्तर शोधण्यात आले नाही तर हे जगाला तिसऱ्या महायुद्धाकडे घेऊन जाईल, याची दाट शक्यता आहे. कारण गत दोन्ही महायुद्धांचा इतिहास आणि त्यांच्या पाश्र्वभूमीचे संक्षिप्त अवलोकन केल्यास आढळून येते की तत्कालीन परिस्थिती अगोदरपासून ज्वालामुखीसारखी निर्माण होऊ लागली होती. मग नंतर एका क्षुल्लक घटनेवरून दोन्ही जागतिक युद्धाच्या रूपात महाविस्फोट झाला. यूरोपीय देशांमध्ये आपसांतील मतभेद विकोपाला पोहोचले होते. ऑस्ट्रीयाच्या राजकुमारच्या हत्येच्या बहाण्याने पहिल्या महायुद्धाची सुरूवात झाली. १९१८ साली प्रथम जागतिक युद्धाच्यासमाप्तीनंतर राष्ट्रसंघाची स्थापना झाली आणि दुसरीकडे जर्मनीवर अनुचित प्रतिबंध लादण्यात आले. यातच दुसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडली ती १९३९ साली जर्मनीने पोलंडवर केलेल्या आक्रमणाच्या स्वरूपात. हे विश्वयुद्ध अतिशय भयानक होते. या युद्धाचा अंत होता होता अमेरिकेने जपानवर अणूबॉम्ब टाकले. आजही जागतिक वातावरण तणावपूर्ण आहे. अशात उत्तर कोरियाची वर्तणूक पाहता त्याने किंवा त्याच्याविरूद्ध कोणत्याही देशाने केलेली कारवाई तिसऱ्या महायुद्धाचे कारण बनू शकते. उ. कोरियाने अगोदरच अमेरिकेला हायड्रोजन बॉम्बची भीती दाखविली आहे. यावर जागतिक महाशक्ती राष्ट्रे आणि संयुक्त राष्ट्रसंघ यांनी तोडगा काढण्याची आवश्यकता आहे, अन्यथा जग बेचिराख झाल्याशिवाय राहणार नाही.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget