मुंबई (प्रतिनिधी)-
भारतात सर्वाधिक शेतकऱ्याच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. शेतकऱ्याच्या कर्जमाफी योजनेनुसार, राज्य सरकार जोपर्यंत बँकेत पैसे भरणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्याना वास्तविक दिलासा मिळणार नाही. ‘‘जो किसान मर नहीं रहा (आत्महत्या करीत नाही) क्या वह अच्छा जी रहा है?’’ असा जळजळीत बॉम्बगोळा शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विजय जावेंधिया यांनी टाकला आहे.
शुक्रवार दि. ६ ऑक्टोबर २०१७ रोजी मुंबई प्रेस क्लब येथे शेतकऱ्याच्या समस्या यावर मूव्हमेंट फॉर पीस अॅण्ड जस्टीस फॉर वेलफेअर (एम.पी.जे.), महाराष्ट्र शाखेद्वारे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी मुख्य वक्ते म्हणून जावेंधिया बोलत होते. एमपीजेचे सचीव हुसैन खान यांनी आपल्या प्रास्ताविकेत सांगितले की, सबंध देशात शेतकऱ्याची समस्या एक ज्वलंत समस्या झाली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी हा शुद्ध धोका असून याद्वारे केवळ २० टक्क्यांहून अधिक लोकांना फायदा होणार नाही. केवळ कर्जमाफी ही समस्येवरील समाधान नसून इरीगेशन, विजेची पूर्तता यासुद्धा प्रमुख समस्या असल्याचे खान यांनी सांगितले. एमपीजे प्रदेश सरचिटणीस अफसर उस्मानी म्हणाले की, ग्रामीण भागात ना शाळा आहेत, ना रस्ते आहेत. सिंचन योजनासुद्धा अपूर्ण अवस्थेतच आहेत. देशाची वाटचाल सुपर पॉवरकडे चाललेली आहे. शेतकरी आत्महत्या करण्यास मजबूर झालेला आहे.
गेल्या ४० वर्षांपासून शेतकरी आंदोलनात सक्रिय असलेले शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विजय जावेंधिया यांनी केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या योजनांची लक्तरे वेशीवर टांगताना सांगितले की, गेल्या वर्षी राज्य सरकारने कापसाचे आधारभाव मूल्य रु. ५५०० प्रति क्विंटल दिले होते. पण यावर्षी मात्र सरकार रु. ४४०० चा हमीभाव देत आहे? शेतकऱ्याना जगवायचे की मारायचे आहे सरकारला? असा खणखणीत इशारा देऊन जावेंधिया यांनी स्पष्ट केले की जगात एकही सरकार, विकसित देश असो अविकसित देश, असे नाही जे शेतकऱ्याना मदत करीत नाही. जर बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेनला सबसिडी मिळत असेल तर शेतकऱ्याना शेती उत्पादनावर सबसिडी का देत नाही? असा रोखठोक सवाल करीत ‘‘माणसाला माणूस म्हणून इज्जत सन्मान मिळावा,’’ असे विचार म. गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल्याची आठवण करून देत ते पुढे म्हणाले की देशात पराकोटीला पोहोचलेला जातियवाद तसेच जागतिकीकरण यामुळेही शेतकरी आंदोलनाला खीळ बसली. ‘गेट करार’ शेतकऱ्याच्या मुळावर उठला होता, त्याविरूद्ध प्रखर आंदोलन, विरोध होऊ नये म्हणून जातियवादी शक्तींनी व भांडवलदारांनी बाबरी मस्जिद उद्ध्वस्त केली, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. ०जावेंधिया यांनी पुढे सांगितले की, खेडी आणि शेतकरी यांची उपेक्षा करूनही निवडणूक जिंकता येते, असे केंद्रशासित पक्ष आणि त्याच्या वैचारिक पीठांना वाटत आहे, तेव्हा एमपीजे बरोबर, शेतकरी संघटना प्रत्येक आंदोलनात सहभागी होईल, अशी ग्वाही दिली. एम.पी.जे. मीडिया प्रमुख गजनफर हक यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Post a Comment