Halloween Costume ideas 2015

स्टीफन पॅडॉकः माथेफिरू की आतंकवादी?

तुम्हारी तहेजीब अपनेही खंजर से आप खुदकुशी करेगी, जो शाख़-ए-नाज़ूक पे आशियाँ बनेगा नापायेदार होगा
-एम.आय.शेख
पाश्चिमात्य पुरूष फार हुशार असतात पण तेवढेच स्वार्थी असतात. स्वतःच्या स्वार्थासाठी वाईट गोष्टींनाही चांगले म्हणून जगासमोर मांडण्यात त्यांचा हतखंडा असतो. उदाहरणार्थ वेश्येला पोर्नस्टार म्हणून महिमा मंडित करून ती करत असलेल्या वाईट कृत्याच्या घृणेची तीव्रता समाजातून कमी करण्यात त्यांना कमालीचे यश आलेले आहे.
त्याचा परिणाम असा झालेला आहे कि, आज युरोप आणि अमेरिकेमध्ये विद्यापीठातील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनेक मुलीसुद्धा स्वतःचा खर्च भागविण्यासाठी पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करत असल्याचे निःसंकोचपणे कबूल करतात.
    अल्लाहने पुरूषामध्ये स्वतःचा एक गुण ठेवलेला आहे तो म्हणजे शिर्क विषयी घृणा. ज्याप्रमाणे अल्लाह स्वतःच्या कोणत्याही प्रकारचा शिर्क (भागीदारी) सहन करत नाही. त्याचप्रमाणे त्याने पुरूष/नराच्या मनामध्ये आपल्या स्त्री (पत्नी)/मादी विषयी एकाधिकाराची भावना टाकलेली आहे. एखादा दुसरा पुरूष/नर आपल्या पत्नी//मादीकडे लैंगीक नजरेने पहात असेल तर ती गोष्ट तो कदापी सहन करू शकत नाही. पृथ्वीचा इतिहास साक्षी आहे की याच एका कारणावरून अनेक पुरूष/नरांनी एकमेकांचे मुडदे पाडलेले आहेत. मात्र पाश्चिमात्य पुरूषाने ही भावना गमावलेली आहे. मुक्त लैंगिक संबंधांना सामाजिक मान्यता मिळाल्याने अनेक पुरूषांना त्यांच्या पत्नीचे दुसऱ्या पुरूषाबरोबर संबंध असल्याचे माहिती असूनसुद्धा ते त्याकडे डोळेझाक करतात. कारण त्यांचेही अनेक महिलांबरोबर संबंध असतात. 
मुलांचा जन्म आणि संवर्धन यामध्ये होणारा त्रास सुसह्य व्हावा यासाठी अल्लाहने लैंगिक संबंधामध्ये अवर्णनीय असा आनंद ठेवलेला आहे. मात्र कुटुंब नियोजनाच्या गोंडस नावाखाली या लोकांनी स्त्रीला तिच्या पुन्हा-पुन्हा आई होण्याच्या अधिकारापासून वंचित करून लैंगिक संबंधांना मनोरंजनाचा दर्जा दिलेला आहे. मनोरंजन एक अशी गोष्ट आहे की, त्यात प्रत्येक वेळेस नाविण्याची अपेक्षा केली जाते. म्हणून आपल्या लैंगिक संबंधामध्ये नाविन्य आणण्यासाठी हे लोक अनेक किळसवाणे प्रयोग करीत असतात. स्त्रीच्या शरिराची रचना पुरूषासाठी आणि पुरूषाच्या शरिराची रचना स्त्रीसाठी एकमेकांना लैंगिक संबंधांपर्यंत घेवून जाण्यासाठी पर्याप्त असते. त्यात पुन्हा सुंदर निसर्ग, शुद्ध आणि थंड वारे, खळखळून वाहणारे झरे, आकर्षक फुले, मनमोहक सुगंध, नदीचे विस्तीर्ण पात्र, नीळया शार पाण्याचे समुद्रकिनारे हिरवीगार धरती, शुभ्र बर्फ वृष्टी, रिमझिम पाऊस, प्रसन्न सकाळ, मादक संध्याकाळ, सुंदर वस्त्रे या सगळया गोष्टीतून अल्लाहने स्त्री-पुरूषांच्या लैंगिक संबंधाना नैसर्गिकरित्या फुलविण्याची यथोचित व्यवस्था करून ठेवलेली आहे.
मात्र लैंगिक संबंधाचे जेव्हा मनोरंजनात रूपांतर झाले तेव्हा या सगळया गोष्टी कमी पडू लागल्या. अशा परिस्थितीत लैंगिक संबंधामध्ये उत्कटता आणण्यासाठी सीगारेट, बीअर, दारू, ड्रग्स, उन्मादक औषधी, अनैतिक संबंधांना प्रोत्साहन देणारे साहित्य व टी.व्ही. सिरीयल्स आणि चित्रपटांची निर्मिती झाली. नशा आणि मुक्त लैंगिक संबंध यांच्या संयोगातून जो समाज निर्माण झाला तो मोठ्या प्रमाणावर अनैतिक झाला. त्या समाजात राहणारे स्त्री-पुरूष वरून जरी छान आणि सुखवस्तू वाटत असले तरी आतून हे सगळे लोक पिसाळले गेले. त्यांचे चित्त अस्थीर झाले. या अस्थिरतेतूनच मग कनिटक्ट, वर्जीनिया, लॉस वेगास सारखे हत्याकांड घडत गेले व भविष्यातही घडतील यात शंका नाही. या लोकांनी आपल्या ऐहिक समाधानासाठी, स्त्री-पुरूष समानतेची व्याख्या एवढी रूंद करून ठेवली आहे की, त्यातून स्त्री-पुरूषांना सहज एकरूप होता येते. स्त्री-पुरूष लैंगिक संबंधांमधे उत्कटता आणण्याचे एक साधन संगीतही आहे. म्हणून पाश्चिमात्य देशामध्ये संगीताने आपल्या उत्कर्षाच्या साऱ्या सीमा ओलांडून विकृतीमध्ये प्रवेश केलेला आहे. अशाच एका संगीत रजनीचा कार्यक्रम अमेरिकेच्या लॉस वेगास शहरामध्ये मँडले बे हॉटेलच्या प्रांगणात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात आलेला होता. त्यात 15 ते 50 वयोगटातील एकंदरित 22 हजार लोक सामील झालेले होते. संगीताच्या ठेक्यावर बेभानपणे नाचणाऱ्या या लोकांच्या गर्दीमध्ये अचानक पावसासारखा गोळयांचा वर्षाव झाला आणि 59 लोक ठार तर 527 जखमी झाले. मँडले बे हॉटेलच्या 32 व्या मजल्यावरील आपल्या खोलीतून स्टीफन पैडॅक या व्यक्तीने हा अंधाधूंद गोळीबार केला होता. पोलीस जेव्हा त्याच्या खोलीत पोहोचले तेव्हा 19 स्वयंचलित रायफलीच्या गराड्यात स्टीफन मृत अवस्थेत मिळून आला. गोळया संपन्याआधी त्याने एक गोळी स्वतःसाठीही राखून ठेवली होती.

स्टीफन पैडॅक
स्टीफन पैडॅकचा जन्म 9 एप्रिल 1953 रोजी झाला. तो एक सेवानिवृत्त सांख्यिकी अधिकारी व मोठा जुगारी होता. त्याच्या मालकीचे अनेक फ्लॅट होते. ज्याच्या येणाऱ्या भाड्यावर तो आपली उपजीविका चालवित होता. त्याचे स्वतःचे राहते घर अतिशय सुंदर असे होते. त्याने दोन लग्ने केली होती. परंतु एकही मुलगा अथवा मुलगी होणार नाही, याची दक्षता घेतली होती. घटनेच्या वेळेस तो तिसऱ्या एका मारिलोऊ डैनली नावाच्या महिलेबरोबर लिव्ह इनमध्ये राहत होता. त्याच्याकडे बंदुकीचे लायसन्स होते. तो परवानाधारक वैमानिक सुद्धा होता. तो एक मितभाषी व्यक्ती होता. त्याला व्हीडीओ गेम्स आणि पोकर खेळणे आवडत होते. त्याला पर्यटनाचाही छंद होता. तो आपल्या आईसाठी स्वतःच्या हाताने तयार केेलेल्या कुकीज (बिस्कीटे) पाठवित होता. तो कुठल्याही दृष्टीकोनातून मनोरूग्ण वाटत नव्हता. लॉस वेगासचे शेरीफ (पोलीस प्रमुख) जोसेफ लोम्बार्डो यांनी पैडॅक संबंधी सांगितले की, ’’ माझ्या अजून लक्षात येत नाही की हा माणूस एकाएकी असा कसा वागला?’’ एफबीआयने चौकशीअंती घोषित केले की त्याचे कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध नव्हते. अमेरिकेचे लॉस वेगास शहर विलासी आणि जुगारी मनोवृत्तीच्या लोकांच्या पसंतीचे आंतरराष्ट्रीय केंद्र आहे. जगभरातून जुगारी, कबाबी प्रवृत्तीचे लोक लाखोंच्या संख्येने या शहरात ’एन्जॉय’ करण्यासाठी येतात. याचीच एक मिनी आवृत्ती दुबईमध्येही आकारास आलेली आहे.

इतर महत्वाच्या गोळीबाराच्या घटना
    लॉस वेगास गोळीबाराची ही ताजी घटना अपवाद म्हणून सोडून देता येण्यासारखी नाही. कारण यापूर्वीही ऑक्टोबर 1991 मध्ये अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील किलीन गावातील एका हॉटेलमध्ये एका ट्रक ड्रायव्हरने ज्याचे नाव जॉन हेनार्ड होते त्याने गर्दीमध्ये ट्रक घुसवून 23 लोकांना ठार केले होते व स्वतःही आत्महत्या केली होती. 20 एप्रिल 1999 मधे कोलोरॅडोच्या कोलंबायीन विद्यालयामध्ये 2 विद्यार्थ्यांनी केलेल्या अंदाधूंद गोळीबारामध्ये 13 लोक ठार झाले होते. यात गोळीबार करणाऱ्या दोन्ही विद्यार्थ्यांनी स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली होती. 16 एप्रिल 2007 मध्ये अमेरिकेच्या वर्जीनिया विद्यापीठामध्ये झालेल्या गोळीबारात 32 लोक ठार झाले होते. 3 एप्रिल 2009 मध्ये न्यूयॉर्कच्या बिंघमटन मधील सीविक इमीग्रेशन सेंटरमध्ये झालेल्या गोळीबारात 13 लोक ठार झाले होते. 14 डिसेंबर 2012 रोजी अमेरिकेच्याच कनेक्टिकटच्या विद्यालयामध्ये एका व्यक्तीने केलेल्या गोळीबारात 27 लोक ठार झाले होते. 2 डिसेंबर 2015 साली कॅलीफोर्निया राज्याच्या इनलँड रिजनल सेंटरवर बॉम्बफेक करून 14 लोकांना ठार करण्यात आले. होते. 12 जून 2016 रोजी फ्लोरिडा राज्याच्या ऑरलँडो गावातील एका समलैंगिक नाईट क्लबमध्ये गोळीबार करून 49 लोकांना ठार करण्यात आलेले होते.
    एकंदरित कुठल्या ना कुठल्या कारणावरून अमेरिकेमध्ये सामुहिक हत्या करण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झालेली आहे. या सर्व घटना माथेफिरू लोकांनी केल्या, असे सुलभीकरण करून जमनार नाही. याची सामाजिक कारणे काय आहेत? यासंबंधी चर्चा करणे अप्रस्तुत होणार नाही.

अनैतिकतेची सुरूवात कशी होते?

जैसे-जैसे जिंदगी पेचिदातर हो जाएगी
आदमी की और भी बेचारगी बढ जाएगी
    ज्या क्षणापासून माणसाच्या जीवनामध्ये अनैतिकतेचा शिरकाव होतो त्या क्षणापासून तणावाची सुरूवात होते. स्टिफन पैडॅकच्या आयुष्याची सुरूवातच अनैतिकतेतून झाली. म्हणून त्याचे जीवन शेवटपर्यंत अनैतिकतेतच व्यतीत झाले. आयुष्यात तीन बायका आल्या पण मुलबाळ होणार नाही, याची त्याने सुरूवातीपासूनच दक्षता घेतली होती. म्हणून तो मुलांमुळे माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या आनंदापासून वंचित झाला. मुलांच्या बाबतीत एक सत्य बऱ्याच लोकांना माहित नसते. ते म्हणजे कुटुंबाबरोबर फक्त मुलांचाच विकास होत नसतो तर आई वडिलांचा सुद्धा विकास होत असतो. मुलं जस-जशी मोठी होत जातात, तस-तसे आई-वडिलही प्रबुद्ध होत जातात. म्हणूनच ज्या कुटुंबात मुलं होत नाहीत ते कायम निराशेच्या छायेमध्ये जगतात अमेरिकेमध्ये तर चैनीचे जीवन जगण्यासाठी जाणून बुजून मुलं जन्माला घातली जात नाहीत. अशामुळे माणसांचे जीवन निरूद्देश होवून जाते. त्यांच्या आयुष्यात फक्त तीन गोष्टी उरतात. एक मनोरंजन, दोन मनोरंजन आणि तीन मनोरंजन. परंतु मनोरंजनाचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा विकृती निर्माण होते. म्हणूनच मनोरंजन क्षेत्रातील बहुतेक लोक अगदी तरूण वयात डिप्रेशनमध्ये जगत असतात किंवा आत्महत्या तरी करत असतात. अनैतिकतेतून तणाव, तणावातून विकृती आणि विकृतीतून अपराध या दुष्टचक्रातून लॉस वेगाससारख्या घटना घडतात. स्टीफनच्या जीवनामध्ये जे घडायला पाहिजे होते ते घडले असते तर कदाचित त्याचा विकास संतुलित झाला असता व त्याच्यामध्ये 59 तरूण लोकांना ठार मारण्याची विकृती निर्माण झाली नसती.

शरिर व आत्म्याचा संतुलित विकास
    अल्लाहने माणसाची निर्मिती शरीर आणि आत्मा या दोन घटकांपासून केलेली आहे. ज्याप्रमाणे शरिराला पोषणाची गरज असते, त्याप्रमाणे आत्म्यालाही पोषणाची गरज असते. ज्याप्रमाणे शरीर आजारी पडते त्याचप्रमाणे आत्मासुद्धा आजारी पडतो. लॉस वेगाससारख्या घटना आजारी आत्म्याच्या लोकांच्या हातून घडत असतात. शरिराच्या पोषणासाठी ज्याप्रमाणे अण्णाची गरज असते त्याचप्रमाणे आत्म्याच्या पोषणासाठी इबादती (प्रार्थना) ची गरज असते. ज्याप्रमाणे अन्नातून पोषक द्रव्य न मिळाल्यास शरीर आजारी पडते त्याचप्रमाणे इबादतीतून पोषक द्रव्य न मिळाल्यास आत्मा आजारी पडतो. जगातील सर्व धर्मामध्ये शरीर आणि आत्म्याच्या संकल्पनेला मान्यता दिलेली आहे. मात्र या दोहोंचा संतुलित विकास फक्त इस्लामी व्यवस्थेमधूनच शक्य आहे. इतर व्यवस्थांमध्ये शरीराच्या विकासावर जास्त लक्ष दिलेले आहे. पश्चिमी व्यवस्थेमध्ये फक्त शरीराच्याच विकासाकडे लक्ष दिलेले आहे हे ठळकपणे जाणवते. म्हणून त्या व्यवस्थेमध्ये राहणाऱ्या लोकांचे आत्मे आजारी आहेत. फरक फक्त एवढाच आहे कोणी कमी आजारी आहे कोणी जास्त आजारी आहे. मुस्लिमांमध्येसुद्धा आजारी आत्म्यांची संख्या कमी नाही. जे मुस्लिम इस्लामी इबादतींचा अव्हेर करतात ते आत्मीक आजाराला निमंत्रण देतात. आत्म्याचा आजार जेव्हा बळावतो तेव्हा हत्या, आत्महत्या, सामुहिक हत्या, बलात्कार, आतंकवाद, बेछूट गोळीबार सारख्या घटना होत असतात. स्टीफन पैडॅकला अमेरिकी मीडियाने आतंकवादी न म्हणता माथेफिरू म्हंटलेले आहे. मात्र आतंकवाद्याला माथेफिरू म्हटल्याने काहीच फरक पडत नाही. अशा लोकांनी केलेल्या हिंसा कुठल्याही आतंकवाद्याने केलेल्या हिंसेपेक्षा कमी त्रासदायक नसतात. म्हणून जगातून हिंसेचा नायनाट करावयाचा असेल तर शरीर व आत्म्याचा संतुलित विकास साधावयास हवा. तो साधण्यासाठी, कुटूंब व्यवस्था सदृढ करण्यासाठी, नैतिक जीवनाचा आनंद लुटण्यासाठी, लैंगिक स्वास्थ्य जोपासण्यासाठी इस्लामी व्यवस्थेशिवाय पर्याय नाही. देअर इज नो वे बट इस्लाम.
    जसे पाणी उकळू लागल्यावर गॅस कमी करून उपयोग होत नाही तसेच समस्या उग्र बनल्यानंतर उपाय करून उपयोग होत नाही. पाश्चिमात्य देशांकडून हीच चूक झालेली आहे. त्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःच्या समस्या उग्र करून घेतलेल्या आहेत. बायबलने त्यांना दारू पिण्याची, ड्रग्स घेण्याची, व्याज खाण्याची, व्याभिचार करण्याची, जुगार खेळण्याची व इतर काळे धंदे करण्याची परवानगी दिलेली नाही. या लोकांनी बायबलच्या शिकवणीच्या विरोधात जावून हे सर्व आपल्या मर्जीने केलेले आहे व त्याचीच ते शिक्षा भोगत आहेत. लॉस वेगासची घटना त्यांच्या या विकृतीचाच आविष्कार आहे. म्हणून धर्माला दोष देवून उपयोग नाही. तुम्हाला, आम्हाला आणि सर्वांना सुखाने जगायचे असेल तर ही अनैतिक व्यवस्था उलथून नैतिक व्यवस्था लागू करावी लागेल. सुदैवाने याची सुरूवात युरोप आणि अमेरिकेमध्ये झालेली आहे. रोज दोन चार लोक इस्लाम धर्माचा स्विकार करीत आहेत.
    9/11 च्या घटनेनंतर अमेरिकेमध्ये दरवर्षी 20 हजार अमेरिकन नागरिक इस्लाम धर्माचा स्विकार करीत आहेत. ज्यांना या गोष्टीवर विश्वास नाही त्यांनी यू ट्युबवर जावून इस्लाम इन युरोप एवढे टाईप केले तरी किती इस्लाम प्रवेशाच्या क्लिप्स येतात हे त्यांनीच स्वतःच्या डोळयांनी पहावे. प्रश्न इस्लाम स्विकारण्याचा नाही, नैतिक जीवन जगण्याचा आहे. पृथ्वीचा इतिहास साक्षी आहे की, इस्लाम एक आधुनिक सुरक्षित, नैतिक जीवन व्यवस्था आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget