Halloween Costume ideas 2015

पितृभू आणि पुण्यभूचा सिद्धांत आणि मुस्लिम

‘’हिंदूंचा जातीयवाद सुद्धा नीट समजून घेतला पाहिजे. जनसंघ, आरएसएस, हिंदू महासभा असल्या प्रकारच्या पक्षातच जातीयवाद असतो असे नाही. तसे असते तर फार बरे झाले  असते! भारतीय निवडणुकीत सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांना मिळून 70 टक्केच्या आसपास मतदान होत असते. हिंदू जातीयवादांचे सर्वात मोठे समूह निधर्मपणाचा बुरखा पांघरून धर्मनिरपेक्ष  पक्षातच ठाण मांडून बसलेले आहेत. - प्रा. नरहर कुरूंदकर. (जागर : पान क्र. 177).


सेहरा सेहरा गम के बगुले बस्ती बस्ती दर्द की आग
जीने का माहौल नहीं है लेकिन फिर भी जीत हैं

राष्ट्रवाद एक अशी भावना आहे की, जी पराकोटीचे प्रेम तर पराकोटीचा द्वेष शिकविते. भारतीय मुस्लिम हे अस्सल भारतीय असून त्यांच्या पूर्वजांनी धर्मांतर का केले? याचे   आत्मचिंतन न करताच काही लोक त्यांचा द्वेष करतात. वास्तविक पाहता मुस्लिमांनी आपली राष्ट्रनिष्ठा संधी मिळेल तेव्हा आणि मिळेल त्या ठिकाणी सिद्ध केलेली आहे. तरी सुद्धा  मोठ्या प्रमाणात त्यांचा द्वेष का केला जातो? हा प्रश्न विचार करण्यालायक आहे. बरे अज्ञानी लोक तसे करत असावेत, असेही नाही, अनेक उच्चशिक्षित लोकही जेव्हा मुस्लिमांचा  द्वेष करतात, तेव्हा त्यांच्या मानसिकतेविषयी चिंता करावीशी वाटते.
जम्मू आणि काश्मीरमधील अनुच्छेद 370 व 35 ए, काढून टाकल्यानंतर ज्या ट्रकभर प्रतिक्रिया समाजमाध्यमांतून आल्या, त्यांच्याकडे लक्षपूर्वक पाहिले असता काश्मीरी मुस्लिमांबरोबरच उर्वरित मुस्लिमांबद्दलचाही द्वेष उफाळून आला होता हे बुद्धिजीवी लोकांच्या लक्षात आलेच असेल. बरे ! या प्रतिक्रिया अपवादात्मक असत्या तरीही काळजी करण्यासारखी बाब नव्हती, परंतु मोठ्या प्रमाणात नकारात्मक प्रतिक्रिया पाहून मन खिन्न झाले. काश्मीरच्या गोऱ्या मुलींबद्दल तर इतक्या विचित्र कॉमेंट्स आल्यात की त्या  करणाऱ्यांच्या मानसिकतेची जेवढी कीव करावी तेवढी कमी. त्या प्रतिक्रिया पुनर्लिखित करण्याच्या धाडस सुद्धा माझ्या लेखणीत नाही.
भारताच्या 99 टक्के मुस्लिमांना काश्मीरचा इतिहास व भूगोल माहित नाही. अनुच्छेद 370 व 35 ए तर त्यांच्या गावीच नव्हते. अशा परिस्थितीत ते काढून टाकल्यामुळे समस्त  मुस्लिम समाजाला वेदना झाल्या व ते सरकारच्या या कृतीच्या विरोधात आहेत, असे गृहित धरून त्यांच्यावर शेलक्या शब्दात शिव्यांची लाखोळी वाहण्यात आली. अशा परिस्थितीत  राष्ट्रवाद आणि राष्ट्रप्रेमासंबंधी इस्लामची शिकवण ती कोणती? याबाबतची माहिती करून घेणे अप्रस्तुत ठरणार नाही.

हिंदू कोण?
’‘ वि.दा.सावरकारांनी ’पितृभूः पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिती स्मृतः’ या प्रसिद्ध श्लोकाच्या आधारे हिंदुत्वाची परिभाषा केलेली आहे. 1923 साली प्रसिद्ध झालेल्या ’हिंदूत्व’ या प्रबंधात त्यांनी  म्हटलेले आहे की, आर्यानी स्वतः ला सप्तसिंधू म्हणून घेतले. म्हणून ऋग्वेदात वैदिक भारताचा निर्देश सप्तसिंधू असा झालेला आहे. याच सिंधूचे रूपांतर हिंदूत झाले. कारण संस्कृत  भाषेतील ’स’चा भारतीय व अभारतीय भाषांमध्ये, ’ह’ झालेला आढळतो. म्हणून हिंदू हा शब्द ऋग्वेदाएवढा इतका जुना आहे.
याच प्रबंधात ’हिंदूत्वाचे घटक - एक राष्ट्र’ या शिर्षकाखाली सावरकर लिहितात, हिंदुस्थान म्हणजे हिंदूंची भूमी आणि म्हणून हिंदुत्वाच्या घटकात विशिष्ट भूभागाचा समावेश होतो.  हिंदुस्थान या नावाने जी भूमी निर्दिशीली जाते तिचा कधी संकोच झाला असेल तर कधी विस्तार झाला असेल. एखादा लोकसमूह एकत्र येण्यासाठी त्यांच्यात आत्मीयता, आपलेपणा, ऐक्य निर्माण होण्यासाठी भौगोलिक एकता हा घटक मदत करतो. त्या दृष्टीने अंतर्गत प्रदेश परस्परांशी जोडलेली असलेली आणि इतरांपासून वेगळेपणा ठेवणारी रेखीव भूमी हिंदूंना  प्राप्त झालेली आहे. म्हणून सिंधूपासून ते सागरापर्यंत पसरलेल्या या भूमीवर जो निवास करतो हिंदुस्तान ही त्याची मातृभूमी आहे. नव्हे सावरकारांच्या भाषेत पितृभू आहे. या ठिकाणी   राहणारा हिंदू होय. समान पितृभू किंवा राष्ट्र सावरकरांच्या हिंदुत्वाचा पहिला आवश्यक घटक आहे. या शिवाय, स्वतःकडून किंवा पूर्वजांकडून या प्रदेशाचा निवासी असणे म्हणजेच  समान पितृभू हा आवश्यक घटक असला तरी तो एकमेव नाही. एखादा अमेरिकन नागरिक आपल्या मूळ नागरिकत्वाचा त्याग करून ’भारतीय’ होऊ शकेल. परंतु तो ’हिंदू’ होऊ  शकणार नाही. कारण हिंदुत्वाला भौगोलिक अर्थापेक्षा व्यापक अर्थ आहे. हिंदूंची भूमी केवळ समान नाही तर त्यांचे रक्त देखील समान आहे. सावरकरांच्या भाषेत बोलायचे म्हणजे हिंदू  हे केवळ एक ’राष्ट्र’ नाही तर एक ’जाती’ देखील आहे. जाती याचा अर्थ बंधूता. ज्यांचे रक्त एक आहे.’’ - सुधाकर भालेराव (सावरकरांचे हिंदूत्व,पान क्र. 39-40).
या विवेचनामध्ये पितृभू हा शब्द वारंवार वापरण्यात आलेला आहे. वर नमूद केल्याप्रमाणे सावरकरांच्या हिंदूत्व पुस्तकामधील विवेचनामधील त्यांचा म्हणण्याचा सार असा की, भारतीय  हिंदूंची पितृभूमी आणि पुण्यभूमी (चार धाम) दोन्ही भारतातच असल्याने त्यांची राष्ट्रनिष्ठा वादातित आहे. याउलट ख्रिश्चन आणि मुस्लिमांची पितृभूमी जरी भारत असली तरी त्यांची  पुण्यभूमी अनुक्रमे व्हॅटीकन आणि मक्का-मदीना ही आहे. म्हणजे विदेशात आहे. म्हणून त्यांच्या राष्ट्रनिष्ठेवर डोळे झाकून विश्वास ठेवता येणार नाही. हा सिद्धांत मांडून त्यांनी लष्कर  आणि प्रशासनाचे हिंदूकरण करणे हा उपाय सुचविलेला होता.
1923 पासून या सिद्धांताची अघोषित अंमलबजावणी (सन्माननीय अपवाद वगळून) प्रत्येक क्षेत्रात करण्यात आलेली आहे. केंद्र आणि राज्यात सर्वाधिक काळ शासन करण्याची ज्यांना संधी मिळाली, त्या काँग्रेसनेही या सिद्धांताची काळजीपूर्वक अंमलबजावणी केली आहे. जे लोक विशेषतः मुस्लिम असे समजतात की काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, तो कसा काय या  सिद्धांताची अंमलबजावणी करू शकेल? तर असे लोक एक तर अत्यंत भोळे असावेत किंवा ढोंगी तरी असावेत.
सांप्रदायिक विचारसरणी असलेले लोक कमी अधिक प्रमाणात प्रत्येक राजकीय पक्षात होते आणि आहेत. या संबंधी एका प्रसिद्ध विचारवंताच्या विचारांचा दाखला खालीलप्रमाणे नमूद आहे. ‘’हिंदूंचा जातीयवाद सुद्धा नीट समजून घेतला पाहिजे. जनसंघ, आरएसएस, हिंदू महासभा असल्या प्रकारच्या पक्षातच जातीयवाद असतो असे नाही. तसे असते तर फार बरे झाले  असते! भारतीय निवडणुकीत सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांना मिळून 70 टक्केच्या आसपास मतदान होत असते. हिंदू जातीयवादांचे सर्वात मोठे समूह निधर्मपणाचा बुरखा पांघरून धर्मनिरपेक्ष  पक्षातच ठाण मांडून बसलेले आहेत. - प्रा. नरहर कुरूंदकर. (जागर : पान क्र. 177).
प्राचार्य नरहर कुरूंदकर सारख्या श्रेष्ठ विचारवंताचा हा विचार खोडून काढणे कोणालाही शक्य होणार नाही. त्यांनी धर्मनिरपेक्ष पक्षातील कार्यकर्त्यांचे जे वर्णन केलेले आहे, त्याची पुढची  आवृत्ती म्हणजे हिंदुत्वातील पक्षाचे कार्यकर्ते अशी मांडणी केल्याशिवाय गत्यंतर नाही. याच मानसिकतेतून मुस्लिम द्वेष निर्माण होतो. त्यातूनच मग कोणत्याही राष्ट्रीय स्तरावरील  घडलेल्या भल्या-बुऱ्या घटनेच्या वेळी तो उफाळून सुद्धा येतो. मग तो भारत-पाकिस्तान दरम्यानचा क्रीकेटचा सामना असो की अनुच्छेद 370 मधील तरतुदी काढून टाकण्याची घटना   असो. मुस्लिम हे कायम विद्वेषी राजकारणाचे बळी ठरत आलेले आहेत.हेच आता पावेतोचे भारतीय मुस्लिमांचे प्राक्तन आहे, असे दुर्देवाने म्हणावे लागते.
असे असले तरीही शेकडो वर्षाच्या आक्रमक मुस्लिम आणि इंग्रजांच्या शासनात राहूनही आपल्या अंगभूत गुणवैशिष्ट्यामुळे सनातन हिंदू धर्म टिकून राहिला आहे, यातच त्याच्या  शक्तीचा अंदाज येतो. सनातन वैदिक धर्माची सर्वात मोठी दोन बलस्थाने म्हणजे त्याचे सर्वसमावेशकत्व आणि सहिष्णुता हे होत.
गेल्या 96 वर्षात पितृभू आणि पुण्यभू सिद्धांताचे मौलिकत्व संपलेले आहे. अनेक ख्रिश्चन, पारसी आणि मुस्लिम नागरिकांनी शासन, प्रशासन ते लष्करापर्यंत अनेक मोक्याच्या ठिकाणी  राहून देशाच्या नवनिर्तीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. फिल्ड मार्शल मानेक शॉ पासून ते न्या. ए.एस. अहेमदीपर्यंत अनेक बिगर हिंदू अधिकाऱ्यांनी देशाची मान उंचावेल  अशी सेवा बजावलेली आहे. अबुल पाकिर जैनुल आबेदीन अब्दुल कलाम यांच्या देशसेवा आणि निष्ठेसमोर तर स्वतः भाजपा नतमस्तक आहे. ही झाली भारतीय उदाहरणे. अनेक हिंदू   भारतीयांनी अमेरिका आणि युरोपमातील अनेक देशांमध्ये उच्चपदे भूषवून त्या देशांशी असलेली त्यांची निष्ठा सिद्ध केलेली आहे. त्यातूनच रघुराम राजन सारख्या अर्थतज्ज्ञाचे नाव  इम्पेरियल बँक ऑफ इंग्लंड अर्थात ब्रिटनच्या रिझर्व्ह बँकेचा भविष्यातील गव्हर्नर म्हणून घेतले जात आहे. युरोप आणि अमेरिका त्यांची पितृभू कधीच राहिलेली नाही. तरीही त्यांनी   तेथे निष्ठेने काम केलेले आहे.
या उलट भारतीय लष्करातील अनेक हिंदू अधिकारी आणि कर्मचारी, मध्यप्रदेशातील भाजपा आयटी सेलमधील कार्यकर्ते, ज्यांची पितृभू आणि पुण्यभू दोन्ही भारतच आहे अशांना  पाकिस्तानसाठी हेरगिरी करताना पकडून तुरूंगात डांबले आहे. यावरून आजच्या आधुनिक युगामध्ये पितृभू व पुण्यभू या सिद्धांतातील फोलपणा उघडा पडलेला आहे.

होय इस्लाम राष्ट्रवाद शिकवतो !
कुरआनच्या विविध आयातींचा अभ्यास करता जी एक गोष्ट ठळकपणे लक्षात येते ती ही की इस्लाम हा एक ग्लोबल धर्म असून, रंग, जात, देश, प्रदेश, वंश या सर्वांवर मात करून सकल मानवजातीच्या कल्याणाचा सिद्धांत मांडतो. तरी सुद्धा मुस्लिम लोक जमीनीच्या ज्या भूभागावर राहतात, त्या भागाशी एकनिष्ठता, तेथील मुस्लिम्मेतरांची एकनिष्ठता, एवढेच  नव्हे तर त्या एकनिष्ठतेपोटी दुसऱ्या देशातील मुस्लिमांची साथ न देण्याची बाध्यता ह्या सर्व गोष्टींचा इस्लामच्या मुलभूत शिकवणीत समावेश आहे. हे वाचून अनेकांना आश्चर्य  वाटल्याशिवाय राहणार नाही. परंतु पुढच्या काही ओळी वाचताच सुज्ञ वाचकांची खात्री पटेल की, मी जे वर लिहिलेली आहे ते खरे आहे. कुरआनमध्ये म्हटलेले आहे की,
’’ज्या लोकांनी श्रद्धा स्वीकारली आणि स्थलांतर केले आणि अल्लाहच्या मार्गात आपले प्राण पणाला लावले व आपली मालमत्ता खर्च केली व ज्या लोकांनी स्थलांतर करणाऱ्या लोकांना  आश्रय दिला व त्यांना मदत केली; ते खरोखर एकमेकाचे वाली (मित्र) आहेत. उरले ते लोक ज्यांनी श्रद्धा तर ठेवली परंतु ज्यांनी स्थलांतर केले नाही त्यांच्याशी पालकत्वाचे तुमचे काहीही संबंध नाहीत, जोपर्यंत ते स्थलांतर करून येत नाहीत. परंतु जर ते धर्माच्या बाबतीत तुमच्याकडून मदत मागतील तर त्यांना मदत करणे तुमचे कर्तव्य होय; परंतु अशा  कोणत्याही जनसमुदायाच्याविरूद्ध नव्हे की ज्यांच्याशी तुमचा करार झालेला आहे. जे काही तुम्ही करता ते अल्लाह पाहतो. (संदर्भ : कुरआन 8:72).
शिवाय, इस्लामी कॅलेंडरनुसार 6 हिजरीमध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल. आणि मक्क्याच्या मुस्लिम्मेत्तर समुदायात झालेल्या तहामध्ये ठरल्याप्रमाणे अबुजुंदल इब्ने सुहैल रजि. यांना प्रेषित  सल्ल. यांनी मुस्लिम्मेतरांच्या ताब्यातून घेण्यास इन्कार केला. वर नमूद आयती आणि हदीसमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की, मुस्लिम्मतेरांच्या बरोबर झालेल्या कराराप्रमाणे केवळ मुस्लिम आहे म्हणून दुसऱ्या देशातील मुस्लिमांची साथ देता येत नाही. आज जगामधील सर्व देशांच्या सीमा कायम झालेल्या आहेत. त्यामुळे दुसऱ्या देशातील मुस्लिमांची केवळ  मुस्लिम आहेत म्हणून साथ देणे इस्लामच्या मुलभूत शिकवणीविरूद्ध आहे. म्हणून बहुसंख्यांक बंधूंनी मुस्लिमांच्या राष्ट्रनिष्ठेवर शंका घेणे उचित नाही.

- एम.आय.शेख
9764000737

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget