Halloween Costume ideas 2015

73वा स्वातंत्र्य दिन

प्रगती, अडचणी, सुधारणा अन् विचारांचा पाठलाग


अलिकडेच 22 जुलैला चंद्रायान-2 अवकाशात पाठवून आपण त्या मोजक्याच देशात सामील झालो ज्यांनी चंद्रावर स्वारी करण्यामध्ये यश प्राप्त केलेले आहे. यापूर्वी आपण मंगळाच्या  कक्षेत सुद्धा यान पाठविण्यामध्ये यशस्वी झालो आहेत. विज्ञानाच्या क्षेत्रात उंच भरारी मारताना आपण अनेक किर्तीमान स्थापित केले आहेत. बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे.  मुंबईमध्ये भुयारी रेल्वेचे काम सुरू आहे. देशातील अनेक शहरांचा विकास झपाट्याने होत आहे. आय. टी. क्षेत्रात आपल्या देशाचा दबदबा युरोप आणि अमेरिकेमध्ये सुद्धा निर्माण  करण्यात आपल्या देशाच्या संगणक अभियंत्यांना यश आलेले आहे. काश्मीर संबंधी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्यावरही आंतरराष्ट्रीय बिरादरीकडून कुठल्याही प्रकारचा दबाव आलेला  नाही, हे आपण एक शक्तीशाली राष्ट्र असल्यामुळेच शक्य झाले आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये हिमा दास आणि मोहम्मद अनस यांनी सुवर्णपदकांना गवसनी घातली असून, केवळ नशीबाची  साथ न मिळाल्यामुळे एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये आपल्याला वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. उपांत्यफेरीपर्यंत आपल्या संघाची कामगिरी देखणी अशीच होती. संरक्षण  क्षेत्रामध्ये अपाचे हेलीकॉप्टर आणि रशियाकडून मिळविलेली अग्नीबाणविरोधी रक्षा उपकरणे यामुळे संरक्षण क्षेत्र मजबूत झालेले असून, लवकरच राफेल विमानांचा ताफा वायुसेनेमध्ये  दाखल होईल. तेव्हा आपण संरक्षण क्षेत्रात अधिक मजबूत होवू यात शंका नाही.
या सगळ्या उपलब्धी एकीकडे साध्य करत असताना दुसरीकडे अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागत असून, त्यात प्रामुख्याने अर्थव्यवस्थेचा वेगाने होत असलेला मंदीकडील  प्रवास, पिण्याच्या पाण्याचे दुर्भीक्ष, बेरोजगारी, वाढती जातीय भावना, त्यातून होणाऱ्या मॉबलिंचिंगच्या घटना, राजकीय नेत्यांचे पक्षांतर, दुबळा होता विरोध पक्ष, गरीबी, कुपोषण,  ग्रामीण भागातून शहराकडे होणारे पलायन, भ्रष्टाचार, शहरांचा बकालपणा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अधुन-मधून डोकेवर काढणारा नक्षलवाद, शिक्षणाचे होणारे औद्योगिकरण, आरोग्य  केंद्राची दुरवस्था इत्यादींचा समावेश आहे.
यावर्षी उन्हाळ्यामध्ये चेन्नईसारख्या संपन्न शहरात जेथे दोन वर्षापूर्वी मोठा पूर आला होता, तेथे 6 हजार रूपये दराने एक टँकर घ्यावा लागला. पिण्याच्या पाण्यासाठी  कित्येक  किलोमीटर लांब रांगा लावाव्या लागल्या. पाण्यासाठी एवढ्या मोठ्या शहरातील महिलांना कित्येक रात्री जागून काढाव्या लागल्या. ही नक्कीच चिंताजनक बाब आहे. स्कायमेटच्या  अहवालानुसार अनेक राज्यामध्ये येत्या काही वर्षात पाण्याचा प्रश्न मोठा होत जाणार असल्याची केलेली भविष्यवाणी ह्या चिंताजनक बाबी असून, दुर्दे व म्हणजे येणाऱ्या काळात  पाण्याच्या या दुर्भिक्षाला तोंड देण्यासाठी सरकारकडे कुठलीही ठोस अशी योजना नाही. अनेक प्रयत्न करूनसुद्धा सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यामध्ये आलेले अपयश ही सुद्धा  चिंतेची बाब आहे. कृषी क्षेत्राचे होणारे अंकुचन ही सुद्धा गंभीर आहे. शेतकऱ्यांची नवीन पिढी शेती करू इच्छित नाही, हा सुद्धा सरकारच्या विचाराधीन असायला हवा असा प्रश्न आहे.   परंतु शेतकऱ्यांच्या नव्या पिढीला शेतीमध्ये रस उत्पन्न होईल, अशी योजना तयार करण्यामध्ये अर्थात शेतीला लाभदायक बनविण्यामध्ये सरकारला अपयश आलेले आहे. येत्या काही  काळात अन्न उत्पादनामध्ये भयानक परिस्थिती उद्भवणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
घटनेतील धर्मनिरपेक्षतेच्या मुल्यांचा त्याग करून देशाला वन कन्ट्री, वन पार्टी, वन इलेक्शनकडे बळजबरीने ओढत नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याकरिता माध्यमांचा  विशेषतः  इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा दुरूपयोग घृणास्पद स्तरावर पोहोचलेला आहे.
अचानक केलेल्या नोटबंदीमुळे देशामध्ये कॅशक्रंच निर्माण झालेला असून, त्या धक्क्यातून देश पूर्णपणे सावरलेला नाही. नोटबंदी लागू करण्यासाठी देण्यात आलेली प्रमुख दोन उद्दीष्टे  भ्रष्टाचार बंद करणे आणि आतंकवाद समाप्त करणे साध्य करता आलेली नाहीत. दलित आणि अल्पसंख्यांकावरील अत्याचारांमध्ये फरक पडलेला नाही. अगदी अलिकडेच भारतीय  लष्करात काम करून निवृत्ती प्राप्त करणारे कॅप्टन अमानुल्लाह यांचा झुंडीने अमेठीसारख्या गावात खून केलेला आहे. त्यावर कोणीही काही बोललेले नाही. आसाम आणि बिहारमध्ये   दरवर्षी नियमितपणे पूर येतो. हे माहित असतानासुद्धा त्या पुराचा बंदोबस्त करण्यामध्ये राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारांना अपयश आलेले आहे. दरवर्षी या पुरांमुळे अनेक मुलांचे जीव  जात आहेत. एवढे असले तरी भारतात लोकशाही टिकलेली आहे हे ही समाधान कमी नाही. 73 व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

- बशीर शेख
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget