अल्लाहने पवित्र कुरआनात म्हटले आहे की “तुम्हाला ज्या वस्तू पुरविलेल्या आहेत त्यातल्या शुद्ध वस्तुंचे सेवन करा.” तसेच दुसऱ्या ठिकाणी म्हटले आहे, “मेलेली जनावरे, डुकराचे मांस आणि अल्लाहशिवाय इतरांचे नाव घेऊन कापली गेलेली जनावरे अवैध ठरविली आहेत. पण जर कुणी भुकेने व्याकूळ झाला असेल आणि आपला जीव वाचवायला त्यास वैध आहार मिळतच नसेल तर अशा वेळी जे काही निषिद्ध केले गेले असेल ते खाऊन आपला जीव वाचवू शकतो.” एकदा त्याची गरज पूर्ण झाली की मग निषिद्ध आहाराचे सेवन करू नये. त्याचबरोबर अशा माणसाचे उद्दिष्ट अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादांचे उल्लंघन नसावे. फक्त जीव वाचविण्यासाठी एखादे वेळेस निषिद्ध वस्तूचे सेवन करण्याची त्याला परवनगी दिली गेली आहे. आणखी एके ठिकाणी म्हटले आहे की, “मृत प्राणी, रक्त, डुकराचे मांस, अल्लाहशिवाय कुणाचे नाव घेऊन प्राण्याचा वळी दिला असेल ते, गळा दाबल्याने मरण पावलेला प्राणी अथवा जोरात आदळल्याने मरण पावलेला प्राणी, खाली कोसळून मरण पावलेला, शिंग खुपसल्याने मारला गेलेला प्राणी किंवा एखाद्या वन्य प्राण्याने अर्धवट खाऊन सोडलेला प्राणी, तसेच ज्या प्राण्याचा वेदीवर वळी दिला गेला असेल असे सर्व मांस निषिद्ध आहे.” (पवित्र कुरआन-२:५) रक्त हिंस्र पशू पितात. माणसाने रक्त पिऊ नये. ते अशुद्ध असते. रक्त पिल्याने माणसाची वृत्ती हिंसक बनते आणि नैतिक अधःपतनाला कारण बनते. मुस्लिमांसाठी सोन्या-चांदीच्या प्लेट्स आणि भांडी निषिद्ध केली गेली आहेत. तसेच सोने आणि रेशमाची वस्त्रे मुस्लिम पुरुषांसाठी निषिद्ध ठरविली आहेत. स्त्रियांना मात्र त्याची परवानगी आहे. दारू, मग ती कोणात्याही प्रकारची का असेना, इस्लाममध्ये “हराम” (निषिद्ध) ठरविली गेली आहे. एवढेच नव्हे तर दारूविक्री, विक्रीसाठी दुकान भाड्याने देणे, दारूची हमाली करणे या सर्व गोष्टी अवैध ठरविल्या आहेत. जेव्हा दारू निषिद्ध असल्याचा आदेश अल्लाहने दिला तेव्हा त्या वेळी सर्व मुस्लिमांनी घरातली दारू गटारात टाकून दिली. तोंडात घेतलेली बाहेर काठून टाकली.
वैवाहिक जीवन
पवित्र कुरआनात म्हटले आहे की, “लोकहो, आपल्या विधात्याची भीती बाळगा, ज्याने तुम्हाला एकाच जीवापासून निर्माण केले. त्यापासून त्यांची जोडपी निर्माण केली आणि त्या उभयतांपासून असंख्य पुरुष व स्त्रिया विखुरल्या. अल्लाहचे भय बाळगा, ज्याच्या नावानं तुम्ही एकमेकांशी आपल्या हक्कांची मागणी करता. तसेच आपल्या नातेसंबंधांची जाण ठेवा. अल्लाह तुमच्यावर लक्ष ठेवून आहे.” (४:१) इस्लामपूर्व काळात लोक पत्नींना काहीच महत्त्व देत नव्हते. त्यांना क्षुल्लक कारणांनी मारझोड केली जायची. तलाक द्यायचे आणि पुन्हा परत घ्यायचे. त्यांना आईवडील असो की पती, मुले-मुली- कुणाच्याही वारसामध्ये हक्क दिला जात नव्हता. एका पत्नीशी विवाहसंबंध संपवायचा असेल तर तिला आई म्हणून जाहीर करायचे. म्हणजे स्त्रीला कोणताही मानवाधिकार नव्हता. इस्लामने जाहीर केले की पतीवर पत्नीचा तेवढाच अधिकार असेल जेवढा एका पतीचा त्याच्या पत्नीवर. पुढे जाऊन पवित्र कुरआनने स्त्रीला प्रत्येक नात्यात पती असो की त्याचे आईवडील, बहीण-भाऊ, तिची संतती, सर्वांच्या मालमत्तेत वारसाहक्क दिला. पती आणि पत्नींना आपल्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी एकमेकांचा आधार बनविला. ते एकमेकांचे सहचर आहेत. एकमेकांसाठी वस्त्र आहेत ज्यापासून त्यांच्या उणिवांचे रक्षण होते. वस्त्राद्वारे जसे सौंदर्य लाभते तसेच पतीपत्नी एकमेकांचे सौंदर्य आहेत. ते एकमेकांची पूर्तता करतात. पवित्र कुरआनने म्हटले आहे की, “त्या तुमची वस्त्रे आहेत आणि तुम्ही त्यांची वस्त्रे आहात.” वैवाहिक जीवनात पतीला कुटुंबाच्या प्रमुखपदी ठेवतो. कारण आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात तो व्यस्त असतो. पत्नी आपल्या पतीच्या मागे स्वतःचे रक्षण करते. त्याच्या परवानगीशिवाय इतर कोणा पुरुषाला घरी येऊ देत नाही. वैवाहिक जीवनासंबंधी कुरआनात म्हटले आहे की, “अल्लाहच्या संकेतांमधील हे एक संकेत आहे की त्याने तुमच्याच अस्तित्वातून तुमच्यासाठी पत्नींना जन्म दिला जेणेकरून तुम्ही त्यांच्यापासून सुखसमाधान प्राप्त करावे. तुमच्यामध्ये एकमेकांसाठी प्रेम आणि कृपा निर्माण केली.” (३०:२१)
- सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment