प्रत्येक संस्कृती-सभ्यतेत जनसमूहात आनंद साजरा करण्याचे प्रसंग येत असतात, सण साजरे केले जातात. हे प्रसंग मानवी स्वभावाचा अविभाज्य अंग आहे. प्रत्येक माणसाला आनंद लुटण्याची इच्छा असते आणि ती साहजिकच स्वाभाविक आहे. त्याचबरोबर माणसांना संकटांनी घेरले तर तो घाबरून जातो. कारण संकट येणे माणसाला पसंत नाही. पसंत नसले तरीदेखील सुख आणि दुःख हे जीवनाचे कालचक्र आहे. अल्लाह म्हणतो की आनंदाने भारावून जाऊ नका आणि दुःख कोसळल्यास घाबरून जाऊ नका. लोक दुःखासाठी नैसर्गिक, दैवी शक्तींना जबाबदार ठरवतात, तर आनंदाच्या प्रसन्नतेच्या प्रसंगांचे स्वतःला श्रेय देतात. पवित्र कुरआनात अल्लाहने म्हटले आहे, “जगातील जीवन खेळ करमणूक देखावा एकमेकांशी दुराभिमान, संतती व संपत्तीविषयी ऐश्वर्याच्या चुरशीशिवाय काही नाही, शेतात आलेल्या पिकामुळे शेतकरी आनंदित होतो. ती वाढत जाऊन पिवळी पडते आणि नंतर तिचा भुसा होऊन जातो.” असेच या जगातील माणसाचे जगणे आहे. सुख-दुःखाचे प्रसंग येत असतात आणि निघून जातात तेव्हा माणसाने प्रसन्नतेच्या वेळी घमेंड करू नये. एकमेकांशी दुराभिमान बाळगू नये. “तुमच्या हातातून निसटून जात त्यावर निराश होऊ नये आणि जे तुम्हाला देणगीने मिळेल त्यावर फुलून जाऊ नये.” तात्पर्य हे की माणसाला जेव्हा प्रसन्नता लाभते तेव्हा त्याने त्यासाठी अल्लाहचे आभार मानावे. जास्तच काही मिळाले असल्यास त्याने अल्लाहसमोर नतमस्तक व्हावे. प्रेषित मुहम्मद (स.) असेच करत होते. त्यांचे अनुयायी सुद्धा अशाच प्रकारे प्रेषितांचे पालन करायचे. आनंद साजरा करणे म्हणजे त्या दिवशी काहीही करण्याचा अधिकार प्राप्त होतो असे नाही. कुठल्याही प्रकारे नैतिक मर्यादा ओलांडण्याची अनुमती नाही. जुगार, दारू, इत्यादी करमणुकीची मुभा नाही. सामान्य दिवसांमध्ये ज्या मर्यादा घातलेल्या असतात त्या मर्यादा कितीही मोठा आनंद प्राप्त झाला तरी त्यांना ओलांडण्याचा प्रश्नच नाही. प्रेषित मुहम्मद (स.) काळात ईदच्या दिवशी प्रचलित परंपरा पाळल्या जात होत्या. डफ-वाजवून गीत गायले जाई, खेळांच्या स्पर्धा भरविल्या जात, परंतु कसल्याही प्रकारचा अनैतिक जल्लोष साजरा केला जात नव्हता. ईदचा मानवतेसाठी ‘पयाम’ म्हणजे सणासुदीच्या जल्लोषात गोरगरीब वंचितांना विसरून जाऊ नये.
माणसाला दिलेले वैभव
अल्लाहने श्रद्धावंतांना केवळ परलोकातील देणग्यांचीच हमी दिली नाही तर त्यांना या जगातदेखील वैभवाचे आणि या धरतीवर सत्ता देण्याचे वचन दिले आहे. पण यासाठी अल्लाहने जी अट ठेवली आहे ती महत्त्वाची आहे, “जे लोक श्रद्धा बाळगतात आणि चांगले कर्म करतात त्यांना अल्लाहने वचन दिले आहे की पूर्वी जशी इतर लोकांना धरतीवर सत्ता बहाल केली होती तशीच त्यांनाही देईल.” त्यांना अराजकतेपासून वाचवील. यासाठी माणसाने अल्लाहची उपासना करावी आणि कुणालाही त्याचा भागीदार बनवू नये. अल्लाहने माणसाला या धरतीवर मालक बनवलेले नाही तर माणसाला आपला उत्तराधिकारी बनवून पाठवलेले आहे. अशात त्यास सत्ता दिल्यावर माणसाने ईश्वराच्या आदेशांनुसार राज्य कारभार चालवावा. तसे केल्यास त्यांना या जगात आणि परलोकात देखील सर्व काही मिळेल. अल्लाहचे म्हणणे आहे की “ज्यांना या जगातच सर्व काही हवे असेल, धनसंपत्ती, ऐश्वर्य, वैभव, संतती – आम्ही सर्व काही त्यांना भरभरून देऊ, पण परलोकात त्यांना कसलाच वाटा नसेल.” पण ज्या लोकांना या जगात आणि परलोकात देखील अल्लाहच्या देणग्या हव्या असतील त्यांनी अल्लाहचे आदेश पाळले तर त्यांना दोन्ही ठिकाणी सर्व काही देण्याचे अल्लाहने वचन दिलेले आहे.
इस्लाममध्ये माणसाला बादशाह, अधिपती असे काहीच मानले गेले नाही. तो धरतीवर कशाचाही मालक नसून त्याला अल्लाहचा उत्तराधिकारी आणि विश्वस्त या भूमिकेतून आपली जबाबदारी पार पाडायची आहे. खऱ्या अर्थाने केवळ अल्लाहच साऱ्या चराचराचा अधिपती आहे. “तोच (अल्लाह) साऱ्या विश्वाचा स्वामी, साऱ्या मानवांचा अधिपती, त्यांचा ईश्वर.”
याचबरोबर माणसांना दिलेल्या वैभवांचे आणि आपल्या देणग्यांचे वर्णन करताना अल्लाह म्हणतो, “आम्ही मानवाला आमचा उत्तराधिकारी नेमलेले आहे. आणि हे कारे विश्व, पृथ्वी, आकाश, समुद्र, नद्या, शेती सर्व काही त्यांच्या सेवेसाठी निर्माण केले आहे.” या अर्थाने माणूस या धरतीवर माणसांच्या सेवेसाठी पाठवला गेला आहे. त्यांना सत्ता दिलेली आहे, मग कशा प्रकारे तो आपल्या सत्तेचा कारभार चालवतो, याबाबत त्याची विचारणा केली जाईल.
- सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment