आजची परिस्थिती पाहता अस वाटु लागल आहे की, निसर्ग एवढा निर्दयी का झाला आहे ? खरंतर निसर्गाच्या या क्रुरतेच्या पाठीमागे कुठे ना कुठे तरी मनुष्यच कारणीभुत राहिला आहे. मनुष्य निसर्गावर कधीच विजय मिळवु शकत नाही, मात्र निसर्गावर विजय मिळवण्याच्या प्रयत्नात जाणते-अजाणतेपणी तो निसर्गाशी वैर मात्र घेत राहिला आहे. म्हणूनच की काय या शत्रुत्वाचा परिणाम एवढा भयावह आहे की, आज मनुष्य स्वत:ला एका छोट्याश्या विषाणुपूढे एवढा लाचार, भयभीत व असाहय समजत आहे.
कोरोना महामारीचे तांडव पाहता मानवाचा सर्वश्रेष्ठ आणि सर्वशक्तीशाली होण्याचा गर्व कदाचित नष्ट झाला असेल आणि जर झाला नसेल तर त्याला भविष्यात याचे आणखिन गंभीर परिणाम भोगण्यासाठी तयार असल पाहिजे. आज मनुष्य निसर्गाशी छेडछाड केल्याबद्दल पश्चताप करत आहे, रडतो आहे मात्र ही आपत्ती संपल्यानंतर हा पश्चताप आणि अश्रु केवळ दिखावा तर ठरणार नाही ना ? जर मनुष्याच्या मनामध्ये आजही निसर्गाच्याप्रती कपट आहे, तर त्याने उज्वल भविष्याची कल्पना करणे व्यर्थ आहे. उज्वल भविष्यासाठी केवळ निसर्गप्रेमी बनण्याचा संकल्प करून काहीच साध्य होणार नाही तर त्याला मनातुन आणि कृतीतुन साध्य करणे गरजेचे आहे. माणुस या वाक्याला जेवढया लवकर आत्मसात करून घेईल तेवढं त्याच्यासाठी भल्याच आहे.
निसर्गाने मानवाला त्याच्याप्रती केली जाणारी क्रुरता सोडण्यासाठी कित्येकवेळा लहान-मोठ्या आपतींच्या रूपात चेतावणी दिली आणि मनुष्य काही काळासाठी कदाचित जागृतही झाला. मात्र मनुष्याने आपल्या विसरण्याच्या आणि चुका करण्याच्या स्वाभाविक प्रवृतीनुसार निसर्गाशी परत छेडछाड सुरू केली. निसर्गाचा द्वेष करण्याच्या परिणाम म्हणुनच त्सुनामी आणि केदारनाथ सारख्या आपत्ती आल्या, मनुष्य मात्र यातुन काहीच शिकला नाही. त्यामुळेच दुष्काळ, पूर, अतिवृष्टी, वादळ, भूकंप, महामारी सारख्या आपत्ती निसर्गाचा कोप बनुन मानवावर तुटुन पडत आहेत. इतिहासात नोंद असलेल्या नैसर्गिक आपतींबद्दल बोलायच झाल तर, १७७० मध्ये जवळपास १ कोटी लोकांचा मृत्यू बंगालच्या दुष्काळात झाला. उत्तर हिंदी महासागरात १९९९ मध्ये २५० किमी प्रतितास वेगाने आलेल्या वादळाने जवळपास १५ हजार लोकांचा जीव घेतला होता. २०१३ मध्ये केदारनाथ मध्ये निसर्गाने आपले एवढे रोद्ररूप दाखवले की, सतत झालेली अतीवृष्टी आणि भू-स्खलनामुळे ५० हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. एकतर ही आकडेवारी सरकारी आहे, प्रत्यक्षात जीवित हानी किती झाली ? हा संशोधनाचा विषय आहे. प्रत्येक वर्षी येणारे पूर, दुष्काळ, भूकंप, महामारी सारख्या कित्येक आपत्त्या मानवाच्या दृष्टीहिन विकासाला लागलेला निसर्गाचा शाप आहे. हे खरं आहे की, ७० टक्क्यांपेक्षा अधिक आजार आणि नैसर्गिक आपत्ती या मानवी चुकांच परिणाम आहेत.
आज मानवासाठी अभिशाप बनलेला कोरोना सुद्धा नकीच मनुष्याच्याच अशाच एका चूकीचा दुष्परिणाम आहे. केवळ आपला भारतच नाही तर जगातील प्रत्येक देश आज कोरोनाशी झुंजत आहेत. ज्या देशांना आपण जीडीपी, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धीमत्ता यासारख्या मानकांच्या आधारे विकसित मानतो तिथेही फारस वेगळ चित्र नाही. तिथेही मृत्यूच तांडव पहायला मिळाल जिथ विकासाच मानक बुलेट ट्रेन आणि रिअल टाइम कनेक्टिविटी आहे. अमेरिका, यूरोप सारखा विकसित भाग असो वा आफ्रिका आणि आशिया खंडातील मागासलेले देश, कोरोनासमोर सर्वच पस्त झाले. रस्त्यांवर फिरणारे रूग्ण, दवाखाण्यातील बेडची कमी, ऑक्सिजन आणि औषधांच्या अभावाने मरणारे लोक हे चित्र आपल्या विकासाच्या मानकावर गंभीर प्रश्नचिन्ह ऊभा करणारे आहे. आपण विकासाच्या नावावर आजपर्यंत जो प्रवास केला, ख्ररच तो आपल्या अनुकुल होता? कोरोना महामारीतुन बाहेर पडल्यानंतर मानवाला हे शिकायला हवं की, कसं निसर्गाच्याप्रती त्याचा द्वेष त्याच्या आकाशाला गवसणी घालणा-या विकासाला एका झटक्यात धारातिर्थी करतो. खरंतर, कोरोना बद्दल वेगवेगळ्या प्रकारची विधाने समोर येत आहेत. अगदी सुरवातीला याला चीनच जैविक अस्त्र सांगुन तो मानवनिर्मित असल्याच म्हटलं गेल. विशेषकरून अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया सरकारांनी यावर शिक्कामोर्तब केल आहे, मात्र हे खरं आहे का, हे येणारा काळच ठरवेल आणि जर का हे सत्य असेल तर हा मानवाचा निसर्गाच्या चक्रात सरळ-सरळ हस्तक्षेप असल्याने याचे परिणाम भविष्यातही घातक सिद्ध होतील.
मानवाच्या खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी, त्याची बदललेली जीवनशैली आणि परिसंस्थेत त्याने केलेल्या छेडछाडीने कोरोनाला जन्म दिला आहे. चीनच्या वुहान मध्ये वटवाघुळात आढळणा-या या विषाणूने संपूर्ण जगाला उद्वस्थ केल आहे. येथील प्रयोगशाळा संशयाच्या भोव-यात असल्याने, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो. बायडन यांनी कोरोनाचा बाप शोधण्याचा आदेश आपल्या गुप्तचरांना दिला आहे. केवळ ही प्रयोगशाळाच नाही तर येथील प्राणी बाजार सुद्धा संपूर्ण जगात मानवाच्या बिभत्सतेचे दर्शक आहे. जर, हा विषाणू प्राण्यांपासुन पसरला असेल तर निसर्गाचा हा कहर नजिकच्या काळात संपण्याची चिन्हे काही दिसत नाहीत.
लहानपणी आपण इतिहासाच्या पुस्तकात फ्लू आणि प्लेगच्या आपत्तीमुळे लाखो लोकांचा जीव कशा प्रकारे गेला हे वाचल होत. एकीकडे अशा आपत्तींविषयी मनात भीती वाटत असताना आपण स्वत:ला आश्वस्त करत होतो की, ही त्या काळातील गोष्ट आहे जेंव्हा मनुष्य मागासलेला होता. आपण या गोड गैरसमजुतीत होतो की, विकसित वैज्ञानिक तंत्रज्ञानामुळे अशी वेळ कधीच येणार नाही. मात्र कोरोना महामारी आली आणि आपला भ्रमाचा भोपळा फुटला. आज एका छोट्याश्या विषाणू पूढे गगनभरारी घेणा-या आरोग्य क्षेत्राने गुडघे टेकले आहेत तर विकासाच्या नावावर कापलेल्या झाडांनी मानवाला ऑक्सिजनसाठी त्याची जागा दाखवली आहे. विकासाच्या नावावर उभा केलेली सीमेंटची जंगलं आज कवडीमोल झाली आहेत. आपण आपली चूक लपवण्यासाठी हा दावा करत आहोत की, आपण एका वर्षाच्या आत कोरोनाची लस बनवली, जी यापूर्वी कधीच एवढया लवकर बनली नव्हती. मात्र सोबत कोरोना विषाणू सुद्धा म्युटंट होत आहे. आता या सर्व लसी या म्युटंटवर काम करतील का, हा संशय आहे. विषाणू मानवाच्या बुद्धीमत्तेची परीक्षा घेत आहे.
गोष्ट केवळ महामारीची नाही तर आपण अधिकाधिक उत्पादन घेण्याच्या प्रयत्नात पारंपारिक शेतीला नष्ट केल. आता परत सेंद्रीय शेतीला महत्व देतोय. पिण्याचे पाणी प्रदुषित करून बॉटल बंद मिनरल वॉटर बाजारात आणलय. हवा प्रदुषित करून शुद्ध हवा बाजारात विकतोय. या महामारीतुन बाहेर पडल्यानंतर मनुष्य परत त्याच विकासाच्या स्पर्धेत मशगुल होणार का? असे किती तरी प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं माणसाला स्वत: शोधायची आहेत. या महामारीपासुन शिकुन आपण थोडस थांबुन या विकासाच मूल्यांकन करायला हव. विकास हा आवश्यक आहेच, मात्र कोणत्या किमतीवर, आपल्याला या तथ्याला समजल पाहिजे. जर मनुष्य निसर्गाच्या विरोधात जावून आपल्या विकासाचा मार्ग बनवु पाहत असेल तर, हा मार्ग केवळ त्याला विनाशाकडेच घेऊन जातो हे त्याने कायम लक्षात ठेवायला हवं.
- सुरेश मंत्री
अंबाजोगाई
संपर्क- ९४०३६५०७२२
Post a Comment