Halloween Costume ideas 2015

पुन्हा झुंडबळींचे सत्र; वेळीच आवरणे गरजेचे


झुंडींद्वारे घेण्यात आलेल्या बळींच्या या सर्व घटनांमध्ये एक गोष्ट समान आहे ती ही की राज्य कोणतेही असो या हत्यांमध्ये कोणालाही शिक्षा झाली नाही. एवढेच नव्हे तर बहुतेक घटनांंमध्ये खटलेच उभे राहू शकलेले नाहीत. उलट तुरूंगामधून जमानतीवर आलेल्या आरोपींचे फुलांचे हार घालून खुले स्वागत करण्यात आले. यामुळे एक गोष्ट लक्षात येते की, झुंडींना राजकीय आणि शासकीय दोन्ही प्रकारचे समर्थन प्राप्त असून, पोलीस अशा घटनांमध्ये तपास करण्याच्या बाबतीत उदासीन आहे. मात्र सुज्ञ भारतीय नागरिकांनी एका गोष्टीची मनामध्ये खूनगाठ बांधून घ्यायला हवी की, झुंडी एकदा बेफाम झाल्या की त्या कोणालाच आवरत नाहीत आणि त्या कोणालाही सोडत नाहीत.

झुंडीकडून मुस्लिमांचा बळी घेण्याचा सिलसिला थांबण्याचे नाव घेत नाहीये. अधून मधून कुठल्या ना कुठल्या राज्यातून कुठल्या ना कुठल्या कारणावरून मुस्लिमांचा झुंडीकडून बळी घेतला जात असल्याच्या बातम्या येतच असतात. अशातच एका ताज्या घटनेमध्ये 20 जून 2021 रोजी त्रिपुरामध्ये झुंडीने तीन मुस्लिमांचा बळी घेतला. त्याचे झाले असे की, जायद हुसेन (30), बिलालमियाँ (28) आणि सैफुल इस्लाम (18) हे आपल्या ट्रकमध्ये पाच जनावरांची वाहतूक करत होते हे पाहून पित्त खवळलेल्या काही लोकांनी त्यांचा पिच्छा केला आणि ठेचून त्यांची हत्या केली. जिल्हा खोवोईचे पोलीस अधीक्षक किरण कुमार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, नमन जायपाडा येथे काही लोकांनी पाहिले की तीन लोक पाच जनावरांची वाहतूक करीत आहेत. तेव्हा त्यांनी त्यांचा पाठलाग केला आणि उत्तर महारानीपूर येथे पकडून त्यांना बेदम मारहाण करून त्यांची हत्या केली. लक्षणीय बाब अशी की, त्रिपुरामध्ये भाजपचे राज्य आहे.  

यापूर्वीही डिसेंबर 2020 मध्ये त्रिपुराच्याच ढलाई जिल्ह्याच्या छाछलेरी गावामध्ये जनावरे वाहतूक करण्याच्या कारणावरून एका मुस्लिमाची हत्या करण्यात आली मात्र त्याचे नाव प्रसार माध्यमामध्ये येणार नाही याची दक्षता घेण्यात आली. याशिवाय त्रिपुराची राजधानी आगरताळा येथे डिसेंबरमध्येच एका 21 वर्षीय मुस्लिम तरूणाची हत्या करण्यात आली. त्याचेही नाव जाहीर करण्यात आले नाही. हे हत्यासत्र फक्त त्रिपुरापर्यंत मर्यादित नाही तर बिहारमध्ये फुलवारीशरीफ येथे 32 वर्षीय मुहम्मद आलमगीर नावाच्या माणसाला 3 म्हशी घेऊन जात असताना झुंडीने बेदम मारहाण करून त्याला ठार मारले. तसेच ऑगस्ट 2020 मध्ये हरियाणाच्या गुरूग्राममध्ये गोरक्षकाच्या एका झुंडीने लुकमान नावाच्या एका मुस्लिम टेम्पो ड्रायव्हरची हत्या केली. तो आपल्या टेम्पोमध्ये म्हशीचे मांस घेवून जात होता. झुंडीने त्याला स्वतःच्या मनाने गोमांसचे नाव देवून ठार मारले.

2014 मध्ये केंद्रात भाजप सरकार सत्तेत येताच  जून 2014 मध्ये पुण्यामध्ये झुंडीने मोहसीन शेख याचा पहिला बळी घेतला. त्यातील आरोपी आजही मोकळे सुटलेले असून, मोहसीनच्या नातेवाईकांना अजून न्याय मिळालेला  नाही. त्यानंतर 2015 मध्ये दादरी येथे अख्लाक नामक एका वृद्ध मुस्लिम व्यक्तीला घरात घुसून फ्रिजमध्ये गोमांस ठेवले आहे असा संशय घेवून झुंडीने ठेचून हत्या केली. त्यानंतर तर झूंडीकडून बळी घेण्याची एक मालीकाच सुरू झाली. मजलूम अन्सारी, इम्तीयाज खान, शेख हलीम, सिराज खान, मोहम्मद सज्जाद, शेख नईम, अलीमोद्दीन अन्सारी, चिरागुद्दीन, मुर्तूजा अन्सारी, बबलू मुशहर, वकील खान यांच्या ओळीने हत्या करण्यात आल्या. या सगळ्या हत्या झारखंडमध्ये झाल्या. त्यातच राजस्थानच्या अल्वर येथील पहेलू खान तर  झारखंडमध्ये 24 वर्षीय तबरेज अन्सारीची हत्या विशेष गाजली. हाफिज जुनैद हा तर ईदसाठी शिरखुर्म्याचे सामान घेऊन दिल्ली येथून मेट्रोने घरी जात असताना केवळ त्याच्या मुस्लिम वेशभूषेवरून झुंडीने त्याची हत्या केली. डब्यामध्ये हजर असलेल्यापैकी कोणीही हे हत्याकांड रोखण्यासाठी पुढे आलेला नव्हता. जुनेदच्या या हत्येवरून एक गोष्ट स्पष्ट झाली की विशिष्ट मानसिकतेच्या हिंदुत्ववाद्यांना मुस्लिमांचा बळी घेण्यासाठी कारण लागत नाही. कारण इतर हत्यांमध्ये सकृतदर्शनी किमान मांस एक कारण म्हणून पुढे करण्यात आले पण जुनेदच्या बाबतीत तर तेही कारण उपलब्ध नव्हते तरीपण त्याची हत्या करण्यात आली.

तत्पूर्वी अ‍ॅड. गोविंद पानसरे, प्रा. एम.एम. कलबुर्गी, डॉ. दाभोळकर, पत्रकार गौरी लंकेश यांच्याही हत्या करण्यात आल्या. याशिवाय गौरव वर्मा, विकास वर्मा, गणेश गुप्ता, रामचंद्र देवी, रमेश मिंझ, प्रकाश लकडा यांच्याही हत्या झाल्या.  गोमांसचे कारण दाखवून मुस्लिमांच्या हत्या तर खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष असलेल्या हिंदूंच्या हत्या करण्याचा कट्टर दक्षिणपंथी विचार सरणीच्या लोकांचा उद्देश स्पष्ट आहे की ते आपल्या विचार सरणीशिवाय इतर विचारसरणीला त्यांची सहन करण्याची इच्छा नाही. 

झुंडींद्वारे घेण्यात आलेल्या बळींच्या या सर्व घटनांमध्ये एक गोष्ट समान आहे ती ही की राज्य कोणतेही असो या हत्यांमध्ये कोणालाही शिक्षा झाली नाही. एवढेच नव्हे तर बहुतेक घटनांंमध्ये खटलेच उभे राहू शकलेले नाहीत. उलट तुरूंगामधून जमानतीवर आलेल्या आरोपींचे फुलांचे हार घालून खुले स्वागत करण्यात आले. यामुळे एक गोष्ट लक्षात येते की, झुंडींना राजकीय आणि शासकीय दोन्ही प्रकारचे समर्थन प्राप्त असून, पोलीस अशा घटनांमध्ये तपास करण्याच्या बाबतीत उदासीन आहे. मात्र सुज्ञ भारतीय नागरिकांनी एका गोष्टीची मनामध्ये खूनगाठ बांधून घ्यायला हवी की, झुंडी एकदा बेफाम झाल्या की त्या कोणालाच आवरत नाहीत आणि त्या कोणालाही सोडत नाहीत. झूंडीचे मूकसमर्थन म्हणजे सिंहाची सवारी करणे आहे. या सर्व हत्या भारतीय नागरिकांच्या हत्या आहेत, असा व्यापक विचार करून कार्यवाही करणे अपेक्षित होते. परंतु, तसे झालेले नाही. दस्तुरखुद्द पंतप्रधान यांनी या हत्या करणाऱ्यांना गुंड म्हणून संबोधून असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, अशी सुभाषितवजा धमकी दिली होती. परंतु आज 7 वर्षे झाले त्यांच्या सल्ल्याचा ना त्यांच्या कार्यकर्त्यांवर परिणाम झाला ना पोलिसांवर परिणाम झाला. एवढेच नव्हे तर 17 व्या लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर नवनिर्वाचित खासदारांसमोर भाषण देण्यापूर्वी मोदींनी राज्यघटनेच्या लिखित प्रतिला नमून करून घोषणा केली होती की,’’ सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास’’ परंतु यानंतरही झुंडी ह्या बरोबर अधुनमधून बळी घेतच आहेत. या हत्या सत्रांमुळे भारतीय मुस्लिम समाजमन अत्यंत व्यथित झालेला असून, त्यांना सूचत नाहीये की काय करावे? पंतप्रधानांनी घटनेची शपथ घेवून जरी फरक पडत नसेल तर अल्पसंख्यांकांनी काय करावे? कुठे जावे? कुणाकडे दाद मागावी? कारण पावसाने झोडपले आणि राजाने मारले तर कुठेच दाद मागता येत नाही. 

कोविड काळात देशभरातील मुस्लिमांनी आपला प्लाझ्मा दिला, हिंदू बांधवाच्या प्रेतांवर सन्मानाने त्यांच्या धार्मिक विधीप्रमाणे अंत्यसंस्कार केले. त्यापूर्वी मार्च 2020 मध्ये अचानक घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे युपी, बिहारचे मजूर पायी घराकडे निघाले असतांना इतरांबरोबर मुस्लिम एनजीओजनी सुद्धा जाती-धर्माच्या वर जाऊन मजुरांची मदत केली. एवढे असूनही झुंडबळींच्या घटना थांबत नाहीत. तरीपण मुस्लिमांनी धीर सोडू नये, अत्यंत संयमाने वागावे, आज ना उद्या इन्शा अल्लाह फरक नक्कीच पडेल. खरोखरच फरक पडेल का? माझ्या मते या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे. यासंदर्भात केवळ भाबडा आशावाद न ठेवता मी ठोस असे निवेदन खालीलप्रमाणे करत आहेत. माणूस हा प्रवृत्तीने चांगला असतो. परिस्थिती व चुकीच्या चालीरितीमुळे त्याचा चांगुलपणा मागे पडतो पण याच्यावरही उपाय आहे. कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’’आणि हे पैगंबर (स.), भलाई आणि दुष्टता एकसमान नाहीत. तुम्ही दुष्टतेचे त्या भलाईद्वारे निरसन करा जी अत्युत्तम असेल. तुम्ही पाहाल की तुमच्याशी ज्याचे शत्रुत्व होते, तो जिवलग मित्र बनला आहे.’’  (कुरआन : हामीम सज्दा आयत नं. :34)

याशिवाय अधिक स्पष्टीकरणासाठी मी आपले लक्ष्य जमाअते इस्लामी संस्थापक सय्यद अबुल आला मौदूदी यांच्या एका भाषणाकडे वळवू इच्छितो ज्यात त्यांनी संयुक्त समाजामध्ये मुस्लिमांचे वर्तन कसे असावे, या संबंधीचे मौल्यवान मार्गदर्शन केलेले आहे. 

30 डिसेंबर 1946 रोजी अखंड भारताच्या सियाकलकोट शहराच्या गुरदासपूर येथे लाहोर आयुक्तालयातील जमाअत-ए-इस्लामीच्या सभेमध्ये जमाअत-ए- इस्लामीचे संस्थापक मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांनी एक उपाय सूचविलेला होता. तो त्या काळात जेवढा ’संयुक्तिक’ होता आजही तेवढाच संयुक्तिक आहे. त्यांनी मुस्लिमांच्या एका विशाल जनसमुदायाशी संवाद साधताना जे ऐतिहासिक भाषण केले होते, त्याला दिल्लीच्या मर्कजी मक्तबा या प्रकाशन संस्थेने पुस्तिकेच्या स्वरूपात प्रकाशित करून वाचकांसमोर आणलेले आहे.

’शहादत-ए-हक’ नावाच्या अवघ्या 36 पानाच्या या पुस्तिकेची किमत फक्त 14 रूपये असून, आजपावेतो या पुस्तिकेच्या लाखो प्रती खपलेल्या आहेत तर लाखो मुस्लिमांच्या विचारांना या पुस्तिकेने सकारात्मक दिशा देण्याचे काम केलेले आहे. मला विश्वास आहे या पुस्तिकेमध्ये जर का गांभीर्याने विचार केला गेला तर मॉबलिंचिंगच नव्हे तर जातीय दंगलीसुद्धा रोखण्यामध्ये मदत मिळेल.

          प्रत्येकाने आवर्जुन वाचावी अशी ही पुस्तिका आहे. त्यासाठी फारसे कष्ट घेण्याची गरज नाही.आपल्या जवळच्या जमाअते इस्लामी हिंदच्या कार्यालयात जावून आपण ही पुस्तिका घेवू शकता. आता हे पाहू की, असा कोणता उपाय आहे जो या पुस्तिकेमध्ये सुचविण्यात आलेला आहे?

          मुळात मुस्लिम समाज हा कुठल्याही देशाचा, कुठल्याही वंशाचा किंवा कुठल्याही रंगाचा असा विशिष्ट समाज नाही. तो प्रत्येक देशाच्या, प्रत्येक वंशाच्या आणि प्रत्येक रंगाच्या लोकांचा समाज आहे. या अर्थाने तो एक जागतिक समाज (ग्लोबल कम्युनिटी) आहे. या समाजाला जगामध्ये उभे करण्यात मागचा ईश्वरीय उद्देश कुरआनमध्ये खालीलप्रमाणे नमूद करण्यात आलेला असल्याचे मौलानांचे विश्लेषण आहे. 

 1.  आणि अशाच प्रकारे तर आम्ही तुम्हाला उत्तम समाज बनविले आहे. जेणेकरून जगांतील लोकांवर तुम्ही साक्षीदार व्हा आणि प्रेषित तुमच्यावर साक्षीदार असतील.

(संदर्भ : सुरह बकरा आयत नं. 143).

2. हे श्रद्धावंतांनो, अल्लाहसाठी सत्यावर अढळ राहणारे व न्यायाची ग्वाही देणारे बना. एखाद्या गटाच्या शत्रुत्वाने तुम्हाला इतके प्रक्षोभित करू नये की तुम्ही न्यायापासून विमुख व्हाल. न्याय करा. हे ईशपरायणतेपासून अधिक निकटवर्ती आहे. अल्लाहचे भय बाळगून कार्य करीत राहा. जे काही तुम्ही करता, अल्लाह त्याची पुरेपूर खबर ठेवणारा आहे. (सुरे अलमायदा आयत नं. 8).

3. त्या व्यक्तीपेक्षा अधिक अत्याचारी कोण असेल की ज्याने ती साक्ष लपविली जी अल्लाहकडून त्याच्याकडे आली होती आणि अल्लाह अनभिज्ञ नाही. (सुरे अलबकरा आयत नं. 140)

       वर नमूद तिन्ही आयातींचा हवाला देऊन मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांनी मुस्लिमांवर खरी-खरी साक्ष देण्याची जी ईश्वरीय जबाबदारी टाकण्यात आलेली आहे त्याबद्दल सविस्तर असे विवेचन केलेले आहे. यामध्ये ’साक्ष’ हा शब्द पुन्हा-पुन्हा आलेला आहे. ही साक्ष कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर असे की, अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी अल्लाहने जे काही मार्गदर्शन केलेले आहे ते मार्गदर्शन जसेच्या तसे त्या लोकांपर्यंत पोहोचविणे ज्यांना ते माहित नाही. आणि ही साक्ष देणे प्रत्येक पैगंबराचे कर्तव्य राहिलेले आहे. याच कामासाठी प्रेषितांना पाठविण्यात आले होते. यावरून या कामाचे महत्त्व वाचकांच्या लक्षात येईल. 

       कुरआनमध्ये अशा अनेक लोकसमुहांचा नावानीशी उल्लेख आहे ज्यांनी ही साक्ष दिलेली नाही तेव्हा ते नष्ट झाले आहेत. विशेष करून बनी इसराईल (ज्यू) बद्दल कुरआनमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की, त्यांनी ईश्वरीय मार्गदर्शनाची साक्ष जगासमोर दिली नाही. म्हणून त्यांना दंडित करण्यात आले. या संदर्भात स्वतः कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, सरतेशेवटी इतकी पाळी आली की त्यांच्यावर अपमान, अधोगती व दुर्दशा ओढवली. आणि ते अल्लाहच्या कोपाने वेढले गेले. हा परिणाम यामुळेच झाला की, अल्लाहच्या संकेताशी ते द्रोह करू लागले. हे ह्यामुळेच घडले की त्यांनी अवज्ञा केली आणि शरिअत कायद्याचे वारंवार उल्लंघन केले. 

(संदर्भ : सुरे बकरा आयत नं.61)

      थोडक्यात सांगायचे म्हणजे मुस्लिम समाज हा अल्लाहने त्याच्या प्रेषित (सल्ल.) मार्फत जे मार्गदर्शन जगातील समस्त मानवांसाठी अवतरित केले त्याची साक्ष जगाला पटविण्यासाठी जन्माला घातलेला आहे. ही ऐतिहासिक जबाबदारी अल्लाहने जागतिक मुस्लिम समाजावर टाकलेली आहे. दुर्दैवाने हा समाज ती जबाबदारी पूर्ण करत नाहीये म्हणून त्याला अशा प्रकारची प्रताडना सहन करावी लागत आहे जी बनी इस्राईल व इतर विद्रोही समाजांना करावी लागली होती. 

                   पुढे मौलाना म्हणतात, की ही साक्ष मुस्लिमांनी मुस्लिमेत्तरांसमोर दोन प्रकारे ठेवावी. एक माध्यमांद्वारे तर दूसरी स्वतःच्या वर्तनाने. मात्र बहुतेक मुस्लिमांची वागणूक ही नेमकी उलट आहे. ते अल्लाहने दिलेल्या मार्गदर्शनाचा लाभ इतरांनाही देत नाहीत व स्वतःही घेत नाहीत. गाफील मुस्लिम समाज हा इस्लामच्या प्रगतीमध्ये अडथळा बनलेला आहे. मौलाना म्हणतात, बनी इस्राईल हे काही अल्लाहचे शत्रू नव्हते किंवा मुस्लिम अल्लाहचे नातेवाईक नाहीत की त्यांच्यावर कर्तव्य न करताही दया दाखविली जाईल. मुळात जी साक्ष त्यांना द्यायला हवी ती तर ते देतच नाहीत उलट त्याच्या (इस्लामी मुल्यांच्या) विरूद्ध साक्ष देत आहेत. अशी कोणती गोष्ट आहे जी इस्लामने करण्यापासून प्रतिबंध केलेला आहे मात्र मुस्लिमांनी केलेली नाही.

भारतीय मुस्लिमांपुरते बोलायचे झाल्यास इस्लामने निषिद्ध केलेल्या संगीता पासून व्याजापर्यंत सगळ्याच गोष्टी बहुसंख्य मुस्लिमांनी स्वतःवर हलाल करून घेतलेल्या आहेत. बहुसंख्य मुस्लिमांनी कुरआन समजून वाचलेला नाही. त्यामुळे त्यांचे वर्तन कुरआनला अनुसरून नाही. म्हणजेच ते आपल्या वाणी आणि वर्तनाने कुरआनची साक्ष मुस्लिम्मेतरांसमोर देत नाहीत. म्हणून त्यांना अशा प्रताडनेला सामोरे जावे लागत आहे. 

      एका लेखामध्ये मौलानांनी दिलेल्या भाषणातील सर्वच मुद्यांशी न्याय करता येणे शक्य नाही. या ठिकाणी मी फक्त त्या पुस्तिकेमधील केंद्रीय विचार आपल्यासमोर ठेवलेला आहे. सविस्तर विवेचन समजून घेण्यासाठी वाचकांना पुनःश्च नम्र विनंती आहे की, त्यांनी सदरची पुस्तिका स्वतः हस्तगत करून अत्यंत गंभीरपणे वाचावी. 

     असे झाल्यास त्यांच्या वर्तनामध्ये नक्कीच सकारात्मक बदल होईल आणि परिणामी ते सुरक्षित व सुखी जीवन जगू शकतील. शेवटी अल्लाहकडे प्रार्थना करतो की, हे अल्लाह! आम्हा सर्वांना आपल्या वाणी आणि वर्तनाने इस्लामची साक्ष देण्याची समज दे. आमीन..

- एम.आय. शेख


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget