Halloween Costume ideas 2015

सोलापूरचा हुतात्मा कुर्बान हुसेन


सोलापूरचा कुर्बान हुसेन यांच्याएवढी उपेक्षा स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात कोणाच्याच वाट्याला आलेली नसेल ! वीस-एकवीस वर्षांच्या आयुष्यात कुर्बान हुसेन सातत्याने ‘रयतेचे कोतवाल व वकील’ राहिले. लोकमान्यांचा वसा घेतलेला हा तरुण संपादक. त्याने लोकमान्यांच्याच अपेक्षेप्रमाणे ‘रयतेचे वकीलपद’ स्वीकारले होते. परंतु  निर्भीड राष्ट्रीय वृत्तीचा तो मुसलमान संपादक 'साधा खुनी' म्हणून फासावर जाण्याची वेळ आली तरी महाराष्ट्रातील कोणत्याही वृत्तपत्राने त्याची दखल घेतली नाही. केसरीकारांनीदेखील त्यांचे शब्द खर्ची घातले नाही. असे का झाले असावे हे कोडे अनाकलनीय आहे. कुर्बान हुसेन यांनी सोलापूरमधील कापड गिरण्यांमधून विखुरलेल्या अठरापगड जातींचा गिरणी कामगार सर्वप्रथम ‘कामगार संघा’च्या माध्यमातून एकत्र आणला. त्या गिरणी कामगाराला अंत्रोळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय चळवळीशी जोडून घेतले. हजारोंच्या संख्येमध्ये असणारे सोलापूरचे गिरणी कामगार राष्ट्रीय चळवळीत सामील झाल्याने राष्ट्रीय चळवळीची ताकद कमालीची वाढली. कुर्बान हुसेन यांचे ते कार्य साम्राज्यशाहीच्या नजरेत खुपेल असेच होते. कुर्बान हुसेन यांना लेखणीएवढीच प्रभावी वाणी लाभली होती. सोलापुरात युवक संघाचा कोणताही कार्यक्रम असा झाला नाही, की ज्यामध्ये कुर्बान हुसेन यांचे भाषण झाले नाही.

ब्रिटिश सरकारने कुर्बान हुसेन यांना खोट्या खटल्यात अडकावले आणि त्यांना मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडा, जगन्नाथ शिंदे यांच्याबरोबर फाशी दिले. सोलापूरचे ते चार सुपुत्र 12 जानेवारी 1931 रोजी फासावर गेले. निदर्शने व हरताळ पाळून त्या अत्याचाराचा निषेध देशभरात केला गेला. मुंबई काँग्रेसने 17 जानेवारी हा दिवस 'सोलापूर दिन' म्हणून पाळण्याचा कार्यक्रम जाहीर केला. कुर्बान हुसेन यांचा आत्मत्याग बहुसंख्य मुसलमानांच्या गावीदेखील नव्हता. स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात कुर्बान हुसेन यांच्याएवढी उपेक्षा कोणाच्याच वाट्याला आलेली नसेल!    

अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांचा जीवनपट अवघ्या एकवीस वर्षांचा, पण अत्यंत विस्मयकारी असा. ते फ्रेममेकरच्या कुटुंबातील गिरणी कामगार तरुण, वयाच्या सतराव्या वर्षी एका साप्ताहिकाची सुरुवात करतात आणि अल्पावधीत साम्राज्यशाहीच्या रोषाचा धनी होत हौतात्म्य पत्करतात हे सारे रोमांचकारी आहे. लोकमान्य टिळक यांच्या विचारांचा प्रभाव कुर्बान हुसेन यांच्यावर होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या साप्ताहिकाचे नाव 'गजनफर' म्हणजेच सिंह असे ठेवले होते. मुसलमान समाजात विचार जागृती करणे हा ‘गजनफर’चा उद्देश होता. ते ‘गजनफर’च्या शीर्षस्थानी ‘समतावादी आणि ऐक्यप्रवर्तक साप्ताहिक’ असा उल्लेख करत असत. कुर्बान हुसेन यांची भाषा शिवरामपंत परांजपे यांच्याशी नाते सांगणारी होती. त्यामुळे साम्राज्यशाहीच्या हस्तकांनी त्यांचा धसका घ्यावा यात नवल नव्हते. कुर्बान हुसेन स्वतः कापड गिरणी कामगार असल्याने कामगारांचे प्रश्‍न त्यांना नवे नव्हते आणि कामगारांना संघटनेची जाण नसल्याने मालकवर्ग त्यांची कशी अडवणूक करतो हे त्यांनी अनुभवलेले होते. कामगार संघटना बांधण्यात सक्रिय असल्याने खुद्द कुर्बान हुसेन यांना नोकरी गमावावी लागली होती. त्यामुळे आर्थिक आपत्ती तर नित्याचीच. ‘गजनफर’च्या प्रकाशनातही विलंब व खंड होत असे.

'गजनफर' साप्ताहिकाचा अंक

कुर्बान हुसेन यांनी ‘गजनफर’चे सुमारे शंभर अंक प्रसिद्ध केले. त्यांपैकी थोडे उपलब्ध आहेत, पण तेवढे वाचल्यानंतरही ‘गजनफर’कारांना फाशी देण्याची आवश्यकता सरकारला का भासली असावी याचा स्पष्ट अंदाज येतो. मागासलेल्या मुसलमान समाजाला राष्ट्रीय चळवळीकडे ओढणे हे काम अवघड होते. कारण त्याला विरोध होता तो स्वत:चे पुढारीपण टिकवणाऱ्या खानबहादूर आणि खानसाहेबांचा ! कुर्बान हुसेन यांना अशा धर्मबंधूंशी झगडावे लागले. त्यांनी म्हटले आहे, की “आमच्या समाजातील झब्बुशाही पुढारीवर्ग म्हणजे शुद्ध फद्दी किंमतीचा ढब्बू आहे. नुसत्या शाब्दिक चलाखीवर लोकांना झुलवून पुढारीपण कायम टिकवण्याचीच त्यांच्या रक्‍ताला सवय आहे. त्यामुळे तो निष्क्रियतेचा मूर्तिमंत पुतळा बनला आहे... त्यांचा पुढारीपणा कायम ठेवण्यासाठी तो नाही नाही ते वाममार्ग योजत असतो. त्यांचा कार्य करण्याचा वकूब नाही, त्यांना कष्ट करण्याची हिंमत नाही आणि कर्तृत्वशाली समाजसेवेची तोंडओळखही नाही ! पण त्यांना पुढारीपणाची हौस, मोठेपणाचा हव्यास आणि त्यांच्या रक्‍तात श्रेष्ठपणाची फाजील महत्त्वाकांक्षा... त्यामुळे त्यांनी किती कर्त्या नवजवानांना कारस्थानाच्या खड्ड्यात गारद केले आहे याचा समग्र इतिहास लिहिल्यास तो एक प्रचंड ग्रंथ होईल. एखादा तरुण त्याच्या तडफदार कर्तृत्वाने पुढे सरकत आहे, मुसलमान जनता त्याच्याकडे वळत आहे असे दिसून येताच या झब्बूढब्बूशाही पुढारीवर्गाने चमकत्या नवतरुणाला त्याच्याच माणसाकडून त्याच्याच मालकीच्या घराबाहेर काढवून, शहरत्याग करण्यास भाग पाडून देशोधडीला लावले आहे. अशा दुष्टबुद्धिप्रधान ढब्बूशाहीला ‘गजनफर’चा जन्म आणि त्याची अव्याहत गर्जना कशी खपणार?"  

‘गजनफर’कारांना पहिला लढा असा धर्मबंधूंशी द्यावा लागला. तो अग्रलेख हे खरे तर त्यांचे आत्मकथनच होय. साम्राज्यशाहीने हिंदू-मुसलमान अशी तेढ निर्माण करून राष्ट्रीय चळवळीला गालबोट लावण्याचा प्रयत्न चार दशकांहून अधिक काळापासून चालवलेला होता. हिदुस्थानात वेळोवेळी होणारे जातीय दंगे हे राष्ट्रीय चळवळीला मारक होत होते. हिंदू-मुसलमान ऐक्याची आवश्यकता प्रकर्षाने जाणवत होती. साम्राज्यशाहीच्या प्रेरणेमधून पॅन इस्लामसारख्या चळवळी देशात मूळ धरत होत्या, त्यापासून राष्ट्रीय चळवळीला धोका आहे हे कुर्बान हुसेन जाणून होते. म्हणूनच “हिदु-मुसलमानांची अत्यल्पशी तेढसुद्धा होत असलेल्या राजकीय उलाढालीचा सत्यानाश करण्यास पुरेशी आहे. असली तेढ निर्माण करणाऱ्या आगलाव्यांचा आणि त्यांना उचलून धरणाऱ्या जात्यभिमानी प्रतिष्ठितांचा प्रत्येक राष्ट्रीयाने खरपूस समाचार घेण्यासाठी कंबर कसणे हे त्याचे आद्य कर्तव्य आहे" असे विचार त्यांच्या लेखनातून प्रकटले.

हिंदू-मुसलमानांना चिथावण्याचा जो आरोप सरकारवर येतो त्याचे निराकरण सरकारने करण्याची आवश्यकता आहे अशी सूचनादेखील ‘गजनफर’कार करताना दिसतात. मुसलमान समाजामधील जे प्रस्थापित नेतृत्व त्या काळी सोलापुरात होते त्यांनी कुर्बान हुसेन यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले. दुसरीकडे, हिंदुहिताचा बेगडी कळवळा दाखवत मुसलमानांविषयी विकृत लिखाण करणाऱ्यांनादेखील त्यांनी वेळोवेळी फटकारले. त्यामुळे सोलापुरातील हिंदुत्वनिष्ठांचीदेखील त्यांच्यावर गैरमर्जी झाली. घनश्यामदास बिर्ला हे हिंदुसभेचे पाठीराखे होते. त्यांना मानपत्र देण्याचा घाट सोलापूरच्या हिंदुत्वनिष्ठ म्युनिसिपल मेंबरांनी घातला. तेव्हा सोलापूरचे मानपत्र म्हणजे 'मजुरांचे मानपत्र' ते बिर्ला शेठजींसारख्या भांडवलवाल्याला देणे म्हणजे फाजील भाटगिरी आहे असे कुर्बान हुसेन यांनी सुनावले. त्यावर बिर्ला शेठजींना ते असेंब्लीचे सभासद असल्याने मानपत्र द्यावे असा बचाव हिंदुत्वनिष्ठांनी केला. त्यावर ‘गजनफर’कारांनी असेंब्लीचे सभासद असणाऱ्या, देशभक्त तात्यासाहेब केळकर यांना ते मानपत्र का देण्यात येत नाही असा बिनतोड सवाल हिंदुत्वनिष्ठांना केला.

कुर्बान हुसेन यांनी गिरणी कामगार संघाची सोलापुरातील शाखा बांधली. त्यांच्याकडे संघाचे सेक्रेटरीपद होते. त्यामुळे त्यांचे गिरणी मालकांशी वाद हे नित्य होत. काटकसरीच्या नावाखाली वीस-पंचवीस वर्षांपेक्षा जास्त सेवा केलेल्या कामगारांना ‘लक्ष्मी मिल’मधून काढून टाकले होते. मालकांची ती कारवाई म्हणजे 'सेवकद्रोह' होय असे कुर्बान हुसेन म्हणतात. त्यांनी ती नवी व्याख्याच केली ! ते म्हणतात, “तारुण्याचा काळ ज्यांनी गिरणीच्या नोकरीत खर्ची घातला म्हणजे तारुण्याच्या उसळत्या रक्‍ताचे पाणी करून ज्या नोकरीत या इमानी जीवांनी गिरणीचे हित चिंतले, त्यांनाच आता तारुण्य ओसरल्यावर बडतर्फीची गोळी घालणे हा शुद्ध बेईमानपणा नव्हे काय? पोटाला पुरत नाही म्हणून नोकराने अधिक मागितले तर तो स्वामिद्रोह, शुद्ध बेईमानपणा समजणाऱ्या या गिरणीवाल्यांचा हा शुद्ध गळेकापूपणा नव्हे काय? नोकराच्या जोमदार उत्साहाचा पूर्ण उपयोग करून घेतल्यावर आयुष्याच्या उतरणीला लागलेल्या नोकरांना असे बडतर्फ करणे म्हणजे सेवकद्रोह नाही का होत?" कुर्बान हुसेन यांनी जगभरातील कामगार चळवळीला ‘सेवकद्रोहा’ची ही नवीनच संकल्पना भेट दिली !

सोलापूरच्या युवक संघाचे अध्वर्यू होते कृ.भी. अंत्रोळीकर. योगायोग असा, की अंत्रोळीकर यांच्याच नेतृत्वाखाली सोलापूरच्या मजूर संघाचे कार्यदेखील चालत असे आणि त्याला जोड होती ती तालीम संघाच्या कार्याची ! अशा विविध संघटनांच्या माध्यमातून सोलापूरचे तरुण राष्ट्रीय चळवळीच्या प्रवाहात कार्यरत होते. सामाजिक जाणिवेचा एक प्रवाह सोलापूरच्या युवकांत निर्माण झालेला होता. त्यातूनच अनेक नवे कार्यकर्ते घडले. अब्दुल रसूल कुर्बान हुसेन हा त्यांच्यापैकीच एक !

सविनय कायदेभंगाच्या चळवळीत येणारा प्रत्येक सण, उत्सव याचा उपयोग लोकांचे लक्ष राष्ट्रीय चळवळीकडे वेधण्यासाठी करायचा अशी युवक संघाची कार्यपद्धत होती. त्याप्रमाणे सिद्धरामेश्वराची यात्रा, होलिकोत्सव आणि शिवजयंती यांचा उपयोग केला जाई. कुर्बान हुसेन यांनी रमजान ईदचादेखील त्यासाठी उपयोग करावा असे ठरवले. त्या निमित्ताने त्यांनी 'स्वदेशी' या विषयावर लेखन केले. ते वाचल्यावर या कोवळ्या युवकाच्या लेखणीचे भय साम्राज्यसत्तेला का वाटले याची कल्पना येते. कुर्बान हुसेन यांच्या लेखनातील जहालता काही और आहे. त्यांनी रमजान शरीफचा पवित्र महिना आत्मशुद्धीसाठीचा आहे हे सांगून 'खैरात' या विषयावर अन्नदान करण्यासाठी व ते करून पुण्याई मिळवण्याचे आवाहन केलेले आहे. ते राष्ट्रीय चळवळीशी निगडित आहे आणि उपाशीपोटी मरत असणाऱ्या देशी कामगारांची आठवण करून देणारे आहे. ते असे -  'रमजान शरीफची आनंदी 'ईद' साजरी करताना आपल्या शेजारी उपाशी-अर्धपोटी राहणाऱ्या बांधवांची आठवण झाली नाही तर सबंध महिन्याच्या उपासतापासादी उपायांनी मिळवलेली आत्मशुद्धी फोलच होईल ! परदेशी कपडा खरेदी करताना एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की रमजाने शरीफच्या उपासतापासाने पवित्र झालेल्या आपल्या शरीरावर तो चढवला जाणार आहे. आपल्या कोट्यवधी देशबांधवांच्या मुख्यत: विणकर वर्गाच्या सोन्यासारख्या संसाराला मातीत मिळवणाऱ्या, त्यांच्या अन्नात माती कालवणाऱ्या परदेशी कपड्यांची खरेदी करताना हेही लक्षात घेतले पाहिजे की डाक्का, कालिकत वगैरे प्रसिद्ध ठिकाणच्या विणकर वर्गाच्या तोडलेल्या अंगठ्यांतून वाहणाऱ्या रक्‍तात परदेशी कापडाची पैदास आहे ! दीनदुबळ्या विणकरांच्या पवित्र रक्‍ताने विटाळलेला कपडा अंगावर घालून 'ईद' साजरी केल्यास सबंध महिन्यात केलेली आत्मशुद्धी फोलच होणार नाही का?”

‘गजनफर’कार कुर्बान हुसेन यांचे शिक्षण फारसे झालेले नव्हते. तरी त्यांचे भाषेवरील प्रभुत्व डोळ्यांत भरावे असे आहे. स्वदेशीचा पुरस्कार करताना तर त्यांच्या लेखणीला आगळेच तेज चढते. ते सांगतात, “मुसलमान बंधूंनो! निदान ईदच्या पाक दिवशी तरी 'नापाक’ परदेशी कपडा अंगावर घालू नका! या आपल्या अर्धपोटी मोमीन बंधूला पोटभर अन्न घाला, म्हणजे त्यांनी विणलेला कपडा खरेदी करा आणि त्या रूपाने मिळणारे अन्नदानाचे पुण्य लाथाडू नका ! हातमागावरील कपडा घेण्याने तुमच्या खिशातून जाणारा पैसा परदेशात जात नाही तर तो या उद्‌योगधंद्यात फिरता फिरता वाढीस लागतो आणि बेकार झालेल्या आपल्या असंख्य बांधवांना भरपूर अन्न देतो हे विसरू नका. मुसलमान बंधूनो ! रमजाने शरीफच्या पवित्र महिन्याचा पवित्रपणा राखण्यासाठी स्वदेशी कपडाच खरेदी करा...”

देशप्रेमाचा तो रमजान पार पडला खरा, पण त्यानंतर काही महिन्यांतच ‘गजनफर’कार अटकेत पडले. आणि पुढे फाशी गेले !

- अनिरुद्ध बिडवे

मो.: 9423333912

महेन्द्रनगर करमाळा, (सोलापूर)

(साभार : thinkmaharashtra.com)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget