निश्चितच रात्र आणि दिवसाच्या एकापाठोपाठ येणे अवकाश आणि पृथ्वीमध्ये जे काही निर्माण केले गेले आहे त्यामध्ये प्रामाणिक लोकांसाठी संकेत आहेत. (पवित्र कुरआन-१०:०६)
रात्र आणि दिवस हे सातत्याने आणि अविरतपणे चालू आहेत. यामध्ये फार मोठे बोध आहेत. रात्र विश्रांतीसाठी मानली जाते तर दिवस उद्योगशीलतेस चालना देतो. अंधकारांची तुलना संकटांशी केली जाते. त्यानंतर येणारा प्रकाशमान दिवस पुन्हा सुखसमृद्धीची चाहूल देतो. रात्र आणि दिवस यांमधील फेरबदल निराशेकडून आशेकडे स्थित्यंतर मानले जाते. त्याचबरोबर रात्र आणि दिवसाचे एकापाठोपाठ येत राहाणे हे पृथ्वी गोल असल्याचे वैज्ञानिक सत्य आहे. तसेच त्याच्या फेराफेरीने दिनगाणन करणे शक्य होतो. माणसाने उघड्या डोळ्यांनी जर निसर्गाचे अवलोकन केले तर अनेक अचंबित करणारी सत्ये उकलू शकतात. निसर्गामुळे माणसाचे जीवन सुखी-समाधानी व्हावे म्हणून अल्लाहने मुक्त हाताने देणग्या दिल्या आहेत, किंबहुना देणग्यांचा वर्षाव केला आहे.
तोच आपल्या कृपेची शुभवार्ता देणाऱ्यास पाठवतो. मग त्या ढगांच्या जड ओझ्यांनी भरले जातात. त्यांना मृत शहरांकडे (कोरड्या ओस पडलेल्या जमिनीकडे) पाठवतो. आणि त्या ढगांतून पाऊस वर्षवतो. त्याद्वारे सर्व प्रकारची पिके येतात. चांगल्या जमिनीतून चांगलीच पिके येतात आणि वाईट जमिनीतून निकृष्ट दर्जाची पिके निघतात. (पवित्र कुरआन-७:५७)
पाऊस पडण्याची प्रक्रिया आणि त्या पावसाने कोणत्या जमिनीत कसले पीक येते याचे उदाहरण देऊन अल्लाहच्या सांगण्याचा असा अर्थ आहे की त्याची कृपा प्रत्येक माणसाला लाभते, पण त्या कृत्यापासून जी माणसे चांगल्या वृत्तीची, सदाचारी असतात आणि जे दूरदृष्टीचे लोक असतात त्यांना अल्लाहच्या कृपेचा लाभ होत नसतो.
शिष्टाचाराचे महत्त्व
माणसाने धैर्याने वागावे. आपल्या वर्तणुकीत दृढता असावी. मनाची अस्थिरता नको. आपला स्वार्थ साधण्यासाठी खोटे-नाटे बोलू नये. अल्लाहच्या नावाने खोट्या शपथा घेऊ नये. भ्याड आणि मनाने कमकुवत असतात ती माणसे खोट्या शपथांचा आश्रय घेतात. सत्याने वागणाऱ्या माणसांच्या संगतीत राहाण्याने सत्याबद्दलची वृत्ती वाढते, चुकीच्या मार्गाने जाण्यास कुणी धजत नाही. अत्याचार आणि दुष्कृत्यांपासून तो आपोआप विभक्त होतो. या आदेशांचा कुरआनात ठिकठिकाणी उल्लेख आला आहे. “अल्लाह धैर्यवानांबरोबर असतो. त्याला दृढनिश्चयी लोक आवडतात. अल्लाहच्या नावाने खोटे बोलणारा अत्याचारी आहे. भुसभुशीत जमिनीवर बांधलेली इमारत टिकत नाही. अल्लाह न्यायाचा, भलाईचा आणि नातेवाईकांना देण्याचा आदेश देतो. निर्लज्जता, दुष्कृत्य आणि अत्याचारांपासून रोखतो. तुम्हाला बोध गृहण करण्याचे आदेश देतो. अल्लाह न्याय करणाऱ्यांना पसंत करतो. तुम्ही ज्या गोष्टी अमलात आणत नाहीत अशी गोष्ट इतरांना सांगावी हे अल्लाहला आवडत नाही. वाह्यात गोष्टीकडे लक्ष देऊ नका. असत्याचे साक्षी बनू नका. उत्पात माजवणाऱ्यांना अल्लाह पसंत करत नाही. जर सत्य गोष्ट तुमच्या जवळच्यांच्या विरोधात जात असेल तरी सत्याची कास सोडू नका. अल्लाह अत्याचारींना मार्गदर्शन करत नाही. त्यांना चांगल्या प्रकारे जाणतो. ज्या लोकांना धनसंपत्तीची लालसा असते त्यांचे अधःपतन होते.” (पवित्र कुरआन)
माणसाने दिलेला शब्द पाळावा. दिलेला शब्द मोडल्यास माणसाची विश्वासार्हता नष्ट होते. तात्पुरत्या फायद्यासाठी केव्हाही असत्याची बाजू घेऊ नये. अत्याचारी माणसांचे नैतिक अधःपतन अटळ असते. असा माणूस अल्लाहच्या नजरेतून खाली उतरतो. त्याला एक दिवस अल्लाहसमोर उभे राहायचे आहे याची त्याने जाण ठेवावी.
- सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment