Halloween Costume ideas 2015

सूरह अत् तौबा: ईशवाणी (सुबोध कुरआन)


(७३) हे नबी (स.)!८१ अधर्मी आणि दांभिक दोघांचा सर्वशक्तिनिशी सामना करा आणि त्यांच्याशी कठोर व्यवहार करा.८२ सरतेशेवटी यांचे ठिकाण नरक आहे आणि ते अत्यंत वाईट निवासस्थान आहे.

(७४) हे लोक अल्लाहची शपथ घेऊन घेऊन सांगतात की आम्ही ती गोष्ट सांगितली नाही, वास्तविक पाहता त्यांनी जरूर ती विद्रोही (कुफ्र)गोष्ट सांगितली आहे.८३ त्यांनी इस्लाम स्वीकारल्यानंतर कुफ्र (इन्कार) केला आणि त्यांनी ते सर्वकाही करण्याचा निश्चय केला जे करू शकले नाहीत.८४ हा सर्व त्यांचा राग याच गोष्टीवर आहे ना की अल्लाह व त्याच्या पैगंबराने आपल्या कृपेने त्यांना श्रीमंत केले आहे!८५ आता जर हे आपल्या या वर्तनापासून परावृत्त झाले तर हे यांच्यासाठीच उत्तम आहे, आणि जर हे परावृत्त झाले नाहीत तर अल्लाह यांना अत्यंत दु:खदायक शिक्षा करील. या जगात व परलोकातसुद्धा. व पृथ्वीवर कोणीही नाही जो यांचा संरक्षक व सहाय्यक असेल.

(७५) यांच्यापैकी काहीजण असेही आहेत ज्यांनी अल्लाहशी प्रतिज्ञा केली होती की जर त्याने आपल्या कृपेने आम्हाला उपकृत केले तर आम्ही दानधर्म करू आणि सदाचारी बनून राहू.

(७६) पण जेव्हा अल्लाहने आपल्या कृपेने त्यांना धनवान केले तेव्हा हे कंजूषपणाला प्रवृत्त झाले. आणि आपल्या प्रतिज्ञेपासून असे फिरले की यांना त्याची पर्वासुद्धा नाही.८६

(७७) परिणाम असा झाला की त्यांच्या या प्रतिज्ञाभंगापायी जी त्यांनी अल्लाहशी केली व त्या असत्यामुळे जे ते बोलत राहिले, अल्लाहने यांच्या हृदयांत दंभ (निफाक)रुजविला जो त्याच्या ठायी हे हजर होण्याच्या दिवसापर्यंत यांचा पिच्छा सोडणार नाही.

(७८) या लोकांना माहीत नाही काय की अल्लाहला यांचे गुप्त रहस्य आणि यांच्या गुप्त कानगोष्टीसुद्धा माहीत आहेत आणि तो तमाम परोक्षांच्या गोष्टींचा चांगल्याप्रकारे जाणकार आहे?

(७९) (तो चांगल्या प्रकारे ओळखतो त्या कंजूष श्रीमंतांना) जे स्वेच्छेने आणि आवडीने देणाऱ्या श्रद्धावंतांच्या आर्थिक कुर्बानीवर बाता मारतात आणि त्या लोकांची थट्टा उडवितात ज्यांच्याजवळ (ईश्वराच्या मार्गात देण्यासाठी) त्याशिवाय काहीच नाही जे ते स्वत:वर कष्ट ओढवून देतात.८७ अल्लाह या थट्टा उडविणाऱ्यांचा उपहास करतो व त्यांच्यासाठी यातनादायक शिक्षा आहे.८१) येथून त्या आयती सुरु होतात ज्या तबुक युद्धानंतर अवतरित झालेल्या होत्या.

८२) आतापर्यंत दांभिकांबरोबर क्षमेचा व्यवहार होत होता आणि त्याची दोन कारण होती. एक म्हणजे मुस्लिमांची शक्ती इतकी मजबूत झाली नव्हती की बाह्य शत्रूशी लढतांना घरातील शत्रूशीसुद्धा लढत राहावे. दुसरे म्हणजे यांच्यापैकी जे लोक शंका व संदेहात होते त्यांना ईमान आणि विश्वास प्राप्त् करण्यासाठी पर्याप्त् समय देणेसुद्धा आवश्यक होते. आता ही दोन्ही कारणे शिल्लक राहिली नव्हती. मुस्लिमांच्या शक्तीने आता पूर्ण अरब देशावर आपली पकड मजबूत केली. अरबच्या बाहेरील शासनाशी त्यांचा संघर्ष सुरु झाला होता. अशा स्थितीत आंतरिक शत्रूंचे डोके पायदळी तुडविणे शक्य झाले होते आणि हे आवश्यक बनले होते. जेणेकरून यांनी बाहेरच्या शत्रूंशी साठगाठ करून देशात संकट उभे करू नये. तसेच या लोकांना पूर्ण नऊ वर्षे विचार व चिंतन-मनन करण्याची आणि सत्य धर्माला ओळखण्याची संधी दिली होती. या संधीचा हे दांभिक लोक फायदा घेऊ शकत होते. परंतु त्यांच्यामध्ये चांगुलपणाची जाण आणि इच्छा नव्हती. यानंतर त्यांना आणखीन सूट देण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. म्हणून आदेश दिला गेला की अधर्मियांसह या दांभिक लोकांविरुद्धसुद्धा जिहाद केला जावा. आतापर्यंत जी नरमाई त्यांच्याशी केली गेली त्याला समाप्त् करून आता यापुढे त्यांच्याशी कडक व्यवहार केला जावा. मुनाफिक (दांभिक) विरुद्ध जिहाद आणि कडक वागणुकीचा अर्थ त्यांच्याशी युद्ध करावे असा होत नाही. त्यांच्या कपटपूर्ण व्यवहाराला तुम्ही आजपर्यंत दुर्लक्षित केले होते. परिणामत: ते मुस्लिम समुदायात मिळून मिसळून राहिले होते आणि सर्वसामान्य मुस्लिम त्यांना आपल्या समाजाचाच एक घटक समजत होते. त्यांना (दांभिक) जमात (समुदाय) च्या मामल्यात हस्तक्षेप करण्याचा आणि समाजात त्यांना कपटपूर्ण नीतीचे विष कालवण्यास संधी मिळत होती. या त्यांच्या सर्व कारवाया यापुढे समाप्त् केल्या जाव्यात. आता जो कोणी मुस्लिम  समुदायात सामील होऊन दांभिकतेचे वर्तन स्वीकारील तसेच त्याच्या जीवनव्यवहारातून हे सिद्ध होत असेल की तो अल्लाह, त्याचे पैगंबर आणि ईमानधारकांशी निष्ठा ठेवून नाही, अशा माणसाला स्पष्टपणे उघडे पाडले जाईल. त्याची सार्वजनिकरित्या निंदा केली जाईल. समाजात त्याच्यासाठी आदर सन्मानाचे कोणतेच पद शिल्लक राहणार नाही. सामाजिक व्यवहारात त्याच्याशी संबंध ठेवले जाणार नाहीत. समाजाच्या सल्लामसलतीत त्याला भाग घेता येणार नाही, तसेच न्यायालयात त्याची साक्ष अमान्य केली जाईल. हुद्दे आणि पद देणे बंद केले जाईल. बैठकीत वाव दिला जाणार नाही. या दांभिकांशी प्रत्येक मुस्लिमाने अशाप्रकारे व्यवहार करावा म्हणजे त्याला माहीत होऊन जाईल की मुस्लिम समाजात त्याचा मानसम्मान अजिबात शिल्लक नाही. कोणाच्याही मनात त्याची प्रतिष्ठा तसूभर शिल्लक राहीली नाही. दांभिकांपैकी एखाद्याने जाहीरपणे विद्रोह केला तर सर्वांसमोर त्याच्यावर खटला चालविला जाईल, क्षमादान दिले जाणार नाही आणि योग्य शिक्षा त्याला दिली जाईल. हा एक महत्त्वपूर्ण असा आदेश होता ज्याला त्या स्थितीत मुस्लिमांना देेणे आवश्यक होते. याशिवाय इस्लामी समाजाला अध:पतनाच्या आंतरिक कारणांपासून वाचविणे शक्य नव्हते. एखादी जमात (समुदाय) आपल्या आत दांभिक आणि गद्दारांचे पालनपोषण करते. तसेच या घरातील सापांना मानसन्मान आणि सुरक्षेेने पाळले जाते तर नैतिक पतन आणि शेवटी त्या समाजाचा विनाश होतो. अधर्माची स्थिती प्लेग रोगासारखी असते आणि दांभिक तो उंदीर आहे जो या महामारीचे विषाणु घेऊन फिरतो. याला समाजात स्वतंत्रपूर्ण व्यवहार करण्यास सूट देणे म्हणजे सर्व समाजाला विनाशाच्या खाईत लोटण्यासारखे आहे. एका दांभिकाला मुस्लिम समाजात मानसन्मानाचे पद प्राप्त् होणे म्हणजे हजारो माणसांना विद्रोह आणि अधर्म करण्यास प्रोत्साहन देण्यासारखे आहे. यामुळे ही विचारसरणी प्रभावी ठरते की या समाजात मानसन्मान प्राप्त् करण्यासाठी निष्ठा आणि ईमानची आवश्यकता नाही. तर ईमानच्या खोट्या प्रदर्शनाने आणि धोकेबाजी करून येथे मनुष्य मोठा बनू शकतो. हेच सत्य पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या लहानशा तत्त्वदर्शीतापूर्ण वाक्यात वर्णन केले आहे, ''ज्या माणसाने एखाद्या 'बिदअती' (धर्मात एखादी नवीन गोष्ट दाखल करणारा) चा मानसन्मान केला तर तो वास्तवता इस्लामची इमारत तोडण्यात सहाय्यक ठरला.'' 

८३) ते काय आहे ज्याकडे हा संकेत केला गेला आहे, याविषयी निश्चित अशी माहिती आमच्यापर्यंत पोहचली नाही. परंतु कथनात अशा अनेक अधर्मिय गोष्टींचा उल्लेख आला  आहे ज्यांना त्या वेळी दांभिकांनी पार पाडले होते. एका दांभिकाने आपल्या नात्यातील एका नवयुवक मुस्लिम नातेवाईकाला सांंगितले, ''जर हे खरोखर सत्य आहे जे ही व्यक्ती (पैगंबर मुहम्मद (स.)) सांगत आहे तर आम्ही सर्वजण गाढवापेक्षाही वाईट आहोत.'' एका कथनात आले आहे की तबुक प्रवासात एके ठिकाणी पैगंबर मुहम्मद (स.) यांची सांडणी हरवली होती. मुस्लिम तिला शोधत फिरत होते. यावर दांभिकांनी खूप चेष्टा केली आणि परस्परांना सांगितले, ''हे महाशय, आकाशातील बातम्या तर भरपूर देतात पंरतु त्यांना आपल्या सांडणीविषयी काहीच खबर नाही की ती आता कोठे आहे.''

८४) हा संकेत आहे त्या षङ्यंत्राकडे जे दांभिकांनी तबुक युद्धाप्रसंगी रचले होेते. यापैकी पहिल्या षङ्यंत्राच्या घटनेचे वर्णन हदीस जाणकारांनी केले आहे. तबुक युद्धानंतर मुस्लिम सेना अशा ठिकाणी पोहचली जेथून डोंगरवाट होती. तिथे काही दांभिकांनी निश्चय केला की रात्री पैगंबर मुहम्मद (स.) या डोंगरातील पायवाटेने चालत असतांना त्यांना दरीत ढकलून देऊ. पैगंबर मुहम्मद (स.) यांना हे कळाले. त्यांनी सर्व सैन्याला आदेश दिला की घाटीच्या रस्त्यातून त्वरित निघून जावे. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी अम्मार बिन यासिर (रजि.) आणि हुजैफा बिन यमान (रजि.) यांनाबरोबर घेऊन घाटीपार करू लागले. रस्त्यात अचानक कळाले की मागे दहा-बारा दांभिक पाठलाग करीत आहेत. हे पाहून माननीय  हुजैफा  (रजि.)  त्यांच्याकडे  धावले. जेणेकरून  त्यांच्या  उंटांना  मारून  मारून  त्यांना  मागे वळवावे. परंतु ते लांबूनच माननीय हुजैफा (रजि.) यांना येताना पाहून घाबरले.आपण ओळखले जाऊ या भीतीने ते पळून गेले. दुसरे षङ्यंत्र म्हणजे रोमन सैन्याचा मुकाबला करून पैगंबर मुहम्मद (स.) आणि त्यांच्या साथीदारांचे सकुशल परत येण्याची दांभिकांना आशा नव्हती. म्हणून त्यांनी आपसात निश्चित केले होते की तिथे काही अघटित घडले तर त्वरित इकडे मदीना येथे अब्दुल्लाह बिन उबई (दांभिक) याचा राज्याभिषेक केला जावा.

८५) पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या हिजरत (प्रयाण) पूर्वी मदीना एक साधारण गाव होते आणि औस व खजरजचे कबिले धनसंपत्ती आणि पदाच्या दृष्टीने उच्च् स्थान प्राप्त् करून नव्हते. परंतु जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांचे तिथे आगमन झाले आणि अन्सार (मदीनेतील रहिवाशी) लोकांनी पैगंबर  मुहम्मद (स.) यांना साथ देऊन स्वत:ला धोक्यात टाकले होते. आठ-नऊ वर्षाच्या आत ही साधारण वस्ती (मदीना) पूर्ण अरब देशाची राजधानी बनली. तेच औस आणि खजरजचे शेतकरी राज्याचे कर्ताधर्ता बनले. चहुकडून विजय, युद्धसंपत्ती, व्यापारातील समृद्धी त्या केंद्रीय नगरावर वर्षाव करत गेली. अल्लाह यावरच त्यांना लज्जित करत आहे की आमच्या पैगंबरावर तुमचा हा क्रोध काय याच चुकीमुळे आहे की पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यामार्फत तुम्हाला ही समृद्धी प्रदान केली गेली?

८६) वरील आयतीत दांभिकांची कृतघ्नता, उपकाराची जाण नसणे याची निंदा केली आहे. दांभिकांच्या जीवनव्यवहारातूनच त्याचा पुरावा येथे देण्यात आला आहे. खरे तर हे लोक मूळचेच अपराधी आहेत. यांच्या नैतिक नियमात कृतज्ञता, उपकाराची जाण ठेवणे, वचनबद्धता इ. गुणांचा अभाव आहे

८७) तबुक युद्धासमयी जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मदतीसाठी अपील केले तेव्हा अतिश्रीमंत दांभिकांनी आपापले हात बांधून ठेवले होते. परंतु जेव्हा निष्ठावान ईमानधारक पुढे येऊन मदतीचा हात पुढे करू लागले तेव्हा या दांभिकांनी त्यांच्यावर टीका सुरु केली. एखादा सामर्थ्यवान मुस्लिम आपल्या कुवतीप्रमाणे किंवा त्याहून जास्त मदत करतो, तेव्हा त्याच्यावर हे दांभिक दिखावा करण्याचा आरोप करीत. एखादा गरीब मुस्लिम आपल्या स्वत:च्या आणि मुलाबाळाच्या पोटाला चिमटा घेवून आणि मोलमजुरी करून काही खारके मदतीत देतो, तेव्हा त्याची चेष्टा हे लोक करीत असत आणि म्हणत की रोमन साम्राज्यावर त्याच्या खारकांमुळे आता विजय प्राप्त् होईल.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget