Halloween Costume ideas 2015

विवाहसंस्था बळकट करण्याची गरज

मलाला युसूफजईच्या विवाहविषयक विलक्षण विचारांनी समाजमाध्यमात माजले काहूर


‘‘जेव्हा तुमच्यापैकी कोणी पुरूष कोण्या स्त्रीला पाहील आणि तिच्या सौंदर्याने प्रभावित होईल तेव्हा त्याने सरळ आपल्या पत्नीकडे जावे कारण तिच्याकडेही तीच गोष्ट आहे जी त्या स्त्रीकडे होती.’’ (हदीस : तिर्मिजी)

मुळात स्त्री स्वातंत्र्य एक नाजूक विषय आहे. तिच्या स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी बुरख्याची सक्ती बंदुकीच्या जोरावर करण्याची तालीबान्यांची सक्ती जेवढी निषेधार्ह आहे तेवढीच मलालाची मुक्त लैंगिकतेची दारं उघडणारी विचारसरणी निषेधार्ह आहे. संतुलन या दोहोंच्या मध्ये आहे.

मलाला युसूफजईचा औपचारिक परिचय करून देण्याची गरज नाही. ती एक आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त व्यक्ती आहे. तिला मुलींच्या शैक्षणिक हक्कांसाठी लढणारी लढवय्यी मुलगी मानले जाते. अशा या निरागस मुलीवर तालीबान्यांनी गोळ्या झाडण्याचा निर्दयीपणा केला होता म्हणून जागतिक स्तरावर तालिबान्यांचा निषेध केला गेला. या हल्ल्यामुळे मलालाला  जागतिक स्तरावर जी सहानुभूती मिळाली ती आजतागायत कायम आहे. तिची स्त्री शिक्षणासंबंधीची झुंज अपयशी ठरू नये म्हणून तिला जागतिक समर्थन मिळाले. ब्रिटन, कॅनडासारख्या अनेक देशांच्या संसदेमध्येच नव्हे तर संयुक्त राष्ट्राच्या जनरल असेम्बलीमध्ये तिला भाषण करण्याची संधी मिळाली. सर्वात कडी म्हणजे तिला जगात प्रतिष्ठित मानला जाणारा नोबल पुरस्कारही मिळाला. इतक्या कमी वयात नोबेल पटकाविणारी ती एकमेव व्यक्ती ठरली. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे तिच्या मायदेशासह जगभरात तिचे कोण कौतूक झाले. ती बघता-बघता आंतरराष्ट्रीय सेलिबे्रटी बनली. गोळ्या झाडल्यामुळे जखमी झाल्यावर तिच्यावर लंडनच्या पंचतारांकित रूग्णालयात मोफत उपचार झाले. यानंतर ती ब्रिटनमध्येच राहू लागली. तिचे पुढील शिक्षणही सरकारी खर्चावर ब्रिटननेच केले.  साहजिकच आहे पाकिस्तानच्या एका मागास युसूफजई कबिल्यामधून उठून थेट लंडन गाठल्यावर व तिथे कायम वास्तव मिळाल्यावर तिच्यात कमालीचे बदल झाले यात आश्चर्य कसले. नाहीतरी तिची प्रवृत्ती सुरूवातीपासूनच पाश्चिमात्य मुल्यांकडे झुकणारी होती. पाकिस्तानमध्ये असतानाच, ’’गुलमकाई’’ या खोट्या नावाने ती ब्लॉग लिहित होती. त्यात ती पाश्चात्य संगीत, फॅशन आणि इतर मुल्यांवर आपले विचार व्यक्त करीत असे. अशात तिला लंडनमध्ये वास्तव्य करण्याची संधी मिळाल्यामुळे तिच्या आशा-आकांक्षाना भरारी मिळाली. यात आश्चर्य ते काय? 

अशा या निरागस मुलीने नुकतीच ’व्होग’ या ब्रिटनमधून निघणाऱ्या फॅशन मॅग्झीनला मुलाखत दिली. ती जून 2021 च्या ताज्या अंकामध्ये तिच्या छायाचित्रासह प्रकाशित झाली. तसे पाहता मुलाखत व्यवस्थित झाली पण मुलाखतकार सीरियनने जेव्हा तिला तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला तेव्हा तिने जे उत्तर दिले ते जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरले. मलालाने उत्तर दिले की, ’’मला कळत नाही की लोक लग्न का करतात? जर तुम्हाला लग्न करावयाचे असेल तर एका करारनाम्यावर स्वाक्षरी का करावी लागते? तुम्हाला जो आवडेल त्याच्यासोबत तुम्ही पार्टनर म्हणून का राहू शकत नाही?’’ मलालाचे हे विलक्षण विचार प्रकाशित होताच जागतिक स्तरावर तिला प्रचंड समर्थन मिळाले. मुस्लिम जगतामध्ये मात्र यामुळे उभी वैचारिक फूट पडली. अनेक लोकांनी विशेषतः मुस्लिम तरूणांनी तिच्या या विचाराचे स्वागत केले तर श्रद्धावान मुस्लिमांनी तिच्या या विचाराचा तीव्र निषेध केला.

मलालाचे हे पुरोगामी विचार इस्लामी विवाह व्यवस्थेलाच आव्हान देणारे आहेत यात शंका नाही. ही ती व्यवस्था आहे जिला जगात सर्वोत्कृष्ट मानले जाते. नोबल पारितोषिक विजेती असल्याकारणाने तिच्या या विचारांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. तिच्या या उज्ज्वल विचारांचे स्वागत करणाऱ्यांची संख्या तिच्या मायदेशीही कमी नव्हती. तिच्या या ताज्या विचारानंतर तिच्याशी पार्टनरशिप करू इच्छिणाऱ्या तरूणांनी तिच्या ई-मेल आयडीवर विनंतीचा पाऊस पाडला. अनेकांनी तिच्या वडिलांच्या ई-मेल आयडीवरही विनंतीवजा ई-मेल केले, अशा अर्थाच्या बातम्या समाज माध्यमातून वेगात पसरत आहेत. या हिनकस प्रवृत्तीचा निषेध करावा तेवढा कमीच परंतु मलालाने आपल्या मलीन विचाराने जी घाण जगभर पसरविलेली आहे ती साफ करण्याची जबाबदारी इस्लामी विवाह व्यवस्थेच्या समर्थकांची आहे.    

मुळात स्त्री स्वातंत्र्य एक नाजूक विषय आहे. तिच्या स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी बुरख्याची सक्ती बंदुकीच्या जोरावर करण्याची तालीबान्यांची सक्ती जेवढी निषेधार्ह आहे तेवढीच मलालाची मुक्त लैंगिकतेची दारं उघडणारी विचारसरणी निषेधार्ह आहे. संतुलन या दोहोंच्या मध्ये आहे. ते काय व कसे आहे हे जाणून घेण्यासाठी इस्लाममध्ये लग्न व्यवस्था कशी आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. 

मुदलात इस्लाममध्ये आचरण स्वातंत्र्य आहे. इस्लामने शरियतच्या माध्यमातून चांगल्या आणि वाईट कृतींची स्पष्ट व्याख्या करून दिलेली आहे. दोन मार्ग सुचविलेले आहेत. एक सदाचाराकडे नेणारा दूसरा दुराचाराकडे नेणारा. दोन्हीपैकी कोणत्याही मार्गावर चालण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य इस्लामने दिलेले आहे. म्हणूनच कुरआनमध्ये फरमाविले आहे की, ’’धर्माच्या बाबतीत बळजबरी नाही.’’ (संदर्भ : सुरे बकरा आयत नं.256). त्यामुळे मलाला व तिच्यासारख्या लग्न संस्थेचा इन्कार करणाऱ्यांना लग्न न करता पार्टनरशिपमध्ये जीवन जगण्याची मोकळीक आहे.  

इस्लाममध्ये विवाह व्यवस्था

इस्लाममध्ये विवाह अत्यंत सोपा करण्यात आलेली आहे. इजाब (पुरूषाने लग्नाची घातलेली मागणी), कुबूल (स्त्रीने तिचा केलेला स्वीकार), महेर, एक वकील, दोन साक्षीदार आणि खुदबा-ए-निकाह बस्स. याशिवाय, कुठलाही खर्च शरियतला मान्य नाही. लग्न हा इस्लाममध्ये सोहळा नाही. त्यामुळे लग्न करणे कमी आर्थिक परिस्थिती असणाऱ्या पुरूषालाही सहज शक्य करण्यात आलेले आहे. लग्न करता येत नाही म्हणून इतर मार्गाने लैंगिक भूक भागवितो असे कोणाला म्हणण्याची सोय नाही.

’’मानव सभ्यतेसमोर नेहमीच दोन यक्ष प्रश्न उभे राहिलेले आहेत ज्यांच्यावर मानव कल्याण आणि प्रगती अवलंबून आहे आणि हे दोन प्रश्न निकाली काढण्यामध्ये प्राचीन काळापासून आजपर्यंत जगातले सर्वच बुद्धीवादी प्रयत्नशील आहेत. पहिली समस्या ही आहे की, सामुहिक जीवनामध्ये स्त्री आणि पुरूषांममधील संबंध कसे स्थापित करण्यात यावेत? कारण वास्तविक पाहता याच संबंधावर संस्कृतीची आधारशिला ठेवली जाते. ही आधारशिला ठेवताना त्याच्यात थोडासा जरी बाक आला तर मग आकाशापर्यंत जरी भींत चढवली तरी ती वाकडीच जाणार. दुसरी समस्या व्यक्ती आणि समाजामधील संबंध कसे असावेत ही आहे. जीच्या संतुलनामध्ये जरासुद्धा फरक पडला तरी शेकडो वर्षापर्यंत जगाला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात.’’-सय्यद अबुल आला मौदूदी (परदा, पेज नं. 7.)

या दोन्ही प्रश्नांपैकी पहिल्या प्रश्नाचे उत्तर आज आपण पाहू. लैंगिक संबंध दोन प्रकारे स्थापन करता येतात. एक विवाहच्या माध्यमातून व दूसरे बिगर वैवाहिक पद्धतीने. शरियतने व्याभिचाराचा खालील शब्दात निषेध केलेला आहे. 

1. ’’व्याभिचाराच्या जवळपासही फटकू नका ते फार वाईट कृत्य आहे आणि अत्यंत वाईट मार्ग.’’ (संदर्भ : बनी इसराईल आयत नं.32). यात व्याभिचारापासून दूर रहा असेही म्हणता आले असता परंतु, ’’ त्याच्या जवळपासही फटकू नका’’ अशी वाक्यरचना केलेली आहे. यावरून व्याभिचारामुळे होणाऱ्या सामाजिक हानीची तीव्रता अधोरेखित होते. 

2.  ’’आणि त्या स्त्रीया देखील तुमच्याकरिता निषिद्ध आहेत. ज्या इतर कोणाच्या विवाहबंधनात असतील.’’ (सुरे निसा आयत नं.24)

येणेप्रमाणे स्वैराचाराचा मार्ग बंद केल्यानंतर पुरूषांच्या लैंगिक प्रवृत्तीचा सहानुभूतीपूर्वक विचार ईश्वराने केलेला आहे. ईश्वराला माहित आहे की, पुरूष हे प्रवृत्तीनेच पॉलीगामस असतात. तसेच समाजामध्ये परित्नत्या आणि विधवाच्या पुनर्विवाहाची सोय व्हावी म्हणून एकापेक्षा जास्त लग्न करण्याची परवानगी ईश्वराने पुरूषाला दिलेली आहे. म्हणूनच कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’’ ज्या स्त्रिया तुम्हाला पसंत पडतील त्यांच्यापैकी दोन-दोन, तीन-तीन, चार-चारशी विवाह करा. परंतु तुम्हाला भय असेल की तुम्ही त्यांच्याशी न्याय करू शकत नाहीत. तर मग एकाच स्त्रीशी विवाह करा. अन्यायापासून वाचण्यासाठी हे अधिक जवळचे आहे.’’ (सुरे निसा आयत नं.3).

मात्र ही सवलत देऊन पुरूषांवर इतर सर्व स्त्रीया हराम  (अवैध घोषित) करण्यात आलेल्या आहेत. विवाहबाह्य संबंध स्थापित करणाऱ्यांना दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा शरियतने फरमाविलेली आहे. 

लैंगिक प्रवृत्तीचे नियंत्रण

लैंगिक प्रवृत्तीची किती सुंदर व्यवस्था केलेली आहे पहा. एकच कृती जी विवाहाच्या परिघात असेल तर ती मान्यच नव्हे तर सन्माननीय समजली जाते आणि तीच विवाहाच्या परिघाच्या बाहेर असेल तर तिरस्कारणीय मानली जाते. लैंगिक संबंध लग्नाच्या परिघात असतील तर पुण्य आणि लग्नाच्या परिघाबाहेर असतील तर पाप मानले जाते.  प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी विवाहाच्या संदर्भात म्हटलेले आहे की,

1. ’’ तुम्ही विवाह करावा कारण तो तुम्हाला परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहण्यापासून रोखतो तसेच तुमच्या गुप्तांगाचे संरक्षण करण्याचा तो उत्कृष्ट उपाय आहे आणि तुमच्यापैकी जो विवाह करण्याचे सामर्थ्य ठेवत नसेल त्याने रोजे (उपवास) ठेवावेत. कारण की रोजा वासनेला दाबून टाकतो’’. (संदर्भ : तिर्मिजी, बुखारी)

2. ’’ जेव्हा तुमच्यापैकी कोणी पुरूष कोण्या स्त्रीला पाहील आणि तिच्या सौंदर्याने प्रभावित होईल तेव्हा त्याने सरळ आपल्या पत्नीकडे जावे कारण तिच्याकडेही तीच गोष्ट आहे जी त्या स्त्रीकडे होती.’’ (हदीस : तिर्मिजी)

मलाला युसूफजई ने पार्टनरशिपबद्दल जे विचार व्यक्त केले त्याची वस्तुस्थिती काय आहे हे समजण्यासाठी पार्टनरशिपमध्ये राहणाऱ्या दाम्पत्यांची किती दुरवस्था होते हे पाहणे गरजेचे आहे. पार्टनरशिपमध्ये कुठलेही सामाजिक बंधन नसल्यामुळे छोट्या-छोट्या कारणामुळे किंवा बऱ्याचदा विनाकारणही अशा भागीदाऱ्या भंग पावतात आणि या भागीदाऱ्यांमधून जन्माला आलेल्या मुलांची किती भयानक अवस्था होते, याची कल्पनाच केलेली बरी. पाश्चिमात्य देशांमध्ये ही एक मोठी सामाजिक समस्या मानली जाते. अशा संबंधातून जन्मलेल्या मुलांची जबाबदारी नैसर्गिकरित्या आईकडे जात असल्यामुळे व ती सिंगल मदर जॉब करत असल्यामुळे मुलांची रवानगी थेट शिशूगृहापासून ते होस्टेलपर्यंत होते. तेथे ही मुलं आई-वडिलांच्या नैसर्गिक प्रेमाला मुकतात व मोठी होऊन आई- वडिलांशीच नव्हे तर समाजाचे उभे वैरी बनतात. ज्युवेनाईल क्राईम (बाल गुन्हेगारी) यातूनच फोफावत जाते. अमेरिकेमध्ये दर दिवसाआड कुठे ना कुठे अशी कोवळी मुले अग्नीशस्त्राचा वापर करून आपली कुंठा इतरांना ठार मारून व्यक्त करतात. पार्टनरने अचानक पार्टनरशिप भंग केल्यामुळे त्याचा वाईट परिणाम, दोघांच्या मानसिकतेवरही होतो. ज्याने पार्टनरशिप तोडली तो अधिक स्वैराचारी बनतो आणि विनाकारण पार्टनरशिप तुटल्यामुळे दुसरा भागीदार तणावग्रस्त होतो. यातून अनेक मानसिक समस्या उद्भवतात. डिप्रेशन पासून सिझोफ्रेनिया पर्यंतचे आजार यातून उद्भवतात. यातूनच व्यसनाधिनता वाढते. बाहेरख्यालीपणा वाढतो. घर तुटल्यामध्ये हॉटेलमध्ये जेवण्याची सवय जडते. पब आणि डिस्कोथेकमध्ये रात्र व्यतित होत जाते. थोडक्यात कुटुंब व्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था उद्ध्वस्त होते व समाज एवढा पोकळ होवून जातो की, कोविडसारख्या आजारामध्ये अशा देशामध्ये जगातील सर्वाधिक मृत्यू नोंदविले जातात. या देशांमध्ये कोविडमध्ये किड्यामुंग्यासारख्या मृत्यू पावणाऱ्या नागरिकांकडे पाहून एक गोष्ट सूर्याप्रमाणे स्पष्ट होते ती ही की, त्यांची जीवनशैली चुकीची आहे. त्यांच्या जीवनशैलीची आधारशिलाच लैंगिक पार्टनरशिपवर ठेवलेली आहे. म्हणायला तिथे लग्न होतात पण फार कमी टिकतात. एकंदरित सामाजिक वातावरण असे आहे की, त्यात सर्वसाधारणपणे लग्न टिकूच शकत नाहीत. लग्नात असतांनासुद्धा विवाहबाह्य संबंधांना सामाजिक मान्यता आहे. ब्रिटनसारख्या देशात राहून मलालावर देखील तेथील या वातावरणाचा परिणाम झालेला आहे हे स्पष्ट आहे. 

वास्तविक पाहता अशा पार्टनरशिपमुळे अंतिम नुकसान महिला आणि मुलांचे होते. शिवाय महिलांची मुलं जन्माला घालण्याची इच्छाच मरून जाते. म्हणूनच युरोप आणि अमेरिकेमध्ये जन्मदर उणेमध्ये गेलेला आहे. त्या ठिकाणी काम करण्यासाठी इतर देशांतून लोक बोलवावे लागतात. बाहेरून आलेले लोक आमच्या संस्कृतीला धोका निर्माण करत आहेत, अशी पुन्हा ओरड सुरू होते. 

लैंगिक शक्तीचे नियंत्रण

लैंगिक शक्ती ही पाण्याच्या प्रचंड साठ्यासारखी असते. तिचा उपयोग कालवे करून नियंत्रित पद्धतीने केल्यास समाज सुजलाम सुफलाम होतो आणि त्याच साठ्याला अनियंत्रित सोडून दिल्यास तो बांध फुटतो आणि समाजाला उध्वस्त करून टाकतो. पाश्चिमात्य समाजात हेच होत आहे. अनियंत्रित लैंगिक संबंधांनी तो समाज उध्वस्त होत आहे. म्हणून त्यांची भौतिक प्रगती सुद्धा त्यांना वाचवू शकत नाही हे कोविडमुळे झालेल्या अनियंत्रित मृत्यूमुळे सिद्ध झालेले आहे. 

स्त्री-पुरूषांचे कार्यक्षेत्र

स्त्री-पुरूषांच्या नैसर्गिक क्षेत्रांचा इन्कार केल्यामुळे समाजामध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी याबाबतीत म्हटलेले आहे की, ’’महिला आपल्या परिघामध्ये घराची राणी आहे. आणि ती आपल्या हुकूमतीच्या परिघामध्ये आपल्या कामासाठी जबाबदार आहे.’’ (हदीस : बुखारी). स्त्री-पुरूषांच्या नैसर्गिक कार्यवाटपाचा इन्कार केल्यास अनेक गुंतागुंतीच्या सामाजिक समस्या निर्माण होतात. जन्मदर कमी होतो, वृद्धांची संख्या वाढते. ह्या समस्या युरोपच नव्हे तर चीन, जापान आणि रशियासारख्या एशियन देशांमध्ये सुद्धा निर्माण झालेल्या आहेत. 

स्त्रीला पुन्हा-पुन्हा आई होण्याच्या तिच्या नैसर्गिक अधिकाराचा संकोच केल्यास हे जग विनाअनुबॉम्बचेच नष्ट होऊन जाईल, असे प्रा.डॉ. फातिमा मुजावर यांनी पनवेलमध्ये आयोजित अखिल भारतीय मुस्लिम साहित्य संमेलनात म्हटलेले होते ते खरे आहे. लेखाची सुरूवात मलालाच्या मलीन विचाराने केली होती. ते विचार फक्त पोकळच नव्हे तर किती घातक आहेत हे वरील विवेचनामधून सुज्ञ वाचकांच्या लक्षात आलेलेच असेल. जाता-जाता एक गोष्ट सांगतो, भारतीय मुस्लिम समाजाचेच उदाहरण घ्या हा समाज गरीब जरूर आहे परंतु कुटुंब व्यवस्था मजबूत असल्यामुळे पोकळ नाही आणि मजबूत कुटुंब व्यवस्था मजबूत विवाह व्यवस्थेमुळेच टिकून आहे. हे अमान्य करता येणार नाही. मात्र मुक्त समाजाचा परिणाम म्हणून आता मुस्लिम समाजावरही त्याचा वाईट परिणाम हळू हळू का होईना होत आहे. 

’’मला कळत नाही की लोक लग्न का करतात? जर तुम्हाला लग्न करावयाचे असेल तर एका करारनाम्यावर स्वाक्षरी का करावी लागते? तुम्हाला जो आवडेल त्याच्यासोबत तुम्ही पार्टनर म्हणून का राहू शकत नाही?’’ 

- मलाला.


- एम.आय.शेख


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget