माणसांच्या चुकांचे दोन प्रकार आहेत. एक असे कृत्य आणि चुका ज्या अल्लाहच्या अधिकारांविरूद्ध असतात. दुसऱ्या प्रकारच्या चुका म्हणजे ज्या अल्लाहच्या निर्मिती- माणूस असो की पशू-पक्षी, त्यांच्या हक्कांविरूद्ध केल्या जातात. इतर माणसे आणि सजीव निर्मितीच्या हक्कांविरूद्ध जे कृत्य माणसे करतात त्या गुन्ह्यांना अल्लाह क्षमा करत नाही. अशा अपराधांना माफ करण्याचा अधिकार ज्यांच्यावर अन्याय-अत्याचार केला गेला असेल त्यांना आहे. माणसाविरूद्ध आणि इतर सजीवांविरूद्ध अत्याचार करणे म्हणजे अल्लाहच्याही अधिकारांचे हनन करणे होय. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे की एका माणसाला फक्त या कारणावरून नरकात टाकले जाईल की त्याने एका मांजराला बांधून ठेवले होते. आणि त्याच्या खाण्यापिण्याची सोयदेखील केली नव्हती. एकेठिकाणी प्रेषितांनी असेही सांगितले आहे की जे पशुपक्ष्यांच्या खाण्यापिण्याची सोय करत नाहीत, प्राण्यांकडून त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करवून घेतात त्यांना भयंकर शिक्षा मिळेल. झाडांना विनाकारण तोडण्यासही प्रेषितांनी मनाई केली आहे. जर माणसाने कुणास त्रास दिला असेल तर त्याची माफी मागण्याने प्रकरण संपून जाते, मात्र जर कुण्या माणसाने इतरांच्या मालमत्तेवर कब्जा केला असेल, त्यांचे अधिकार त्यांना परत देत नसेल तर फक्त क्षमा मागणे पुरेसे नसून त्यांना त्यांची मालमत्ता परत करावी लागेल. एकमेकांवर रागावण्याचीही मनाई आहे. कुरआनात म्हटले आहे की “जे लोक टंचाईत असोत की त्यांना भरभराट लाभलेली असो, दोन्ही अपस्थांमध्ये अल्लाहच्या निर्मितीवर खर्च करतात, आपल्या रागावर नियंत्रण ठेवतात, लोकांना क्षमा करतात, असे लोक अल्लाहला आवडतात.” (कुरआन-३:१३४) श्रद्धावंतांना संबोधून अल्लाह म्हणतो की, “अल्लाहच्या बाजूने न्यायाची साक्ष देण्यास उभे राहा. एखाद्या जनसमूहाशी शत्रुत्व तुम्हाला त्याच्यावर अन्याय करण्यास प्रवृत्त करता कामा नये. न्याय करा, हा सदाचार आहे. अल्लाहची भीती बाळगा. तुम्ही जे काही करता अल्लाहला ते माहीत असते.” (कुरआन-५:८)
जकात
अल्लाहने धनवान मुस्लिम पुरुष व स्त्रियांवर दरवर्षी जकात देणे अनिवार्य कर्तव्य ठरवले आहे. ज्याच्याकडे साडेसात तोळे सोने किंवा साडेबावन तोळे चांदी किंवा तेवढ्याच किंतीची रोख रक्कम वर्षाखेरीस शिल्लक राहिल्यास त्या रकमेतून अडीच टक्के जकात अदा करायची आहे. साडेतास तोळे सोने किंवा साडेबावन तोळे चांदी किंवा तेवढ्याच किमतीची रक्कम म्हणजे या प्रमाणापेक्षा जितकी संपत्ती शिल्लक राहील त्या सर्व संपत्तीवर जकात द्यावी लागेल. संपत्तीमध्ये नुसती रोख रक्कम नसून व्यापारी माल, पशुधन असल्यास ते आणि शेतजमीन असेल तर त्यातील पिकांवर सुद्धा जकात द्यावी लागेल. व्यापारी मालामध्ये दुकानात, कारखान्यात वर्षाखेरीस जेवढ्या किंमतीचा माल शिल्लक राहील त्यावरसुद्धा जकात द्यावी लागते. या अर्थासंबंधी अल्लाहने जी योजना केली आहे त्याचे उद्दिष्ट असे की “जो माल अल्लाहने आपल्या प्रेषितांना (आणि त्यांच्यानंतर) मुस्लिमांना दिलेला आहे तो नातेवाईकांसाठी, अनाथांसाठी, वंचितांसाठी आणि प्रवाशांसाठी दिला जावा. कारण धनसंपत्ती फक्त धनवान लोकांमध्येच फिरत राहू नये.” (पवित्र कुरआन) जकात व्यवस्थापन आणि तिच्या वाटपासंबंधी असे म्हटले आहे की “जकात, गोरगरीबांसाठी, निराधारांसाठी आणि त्या्चया व्यवस्थापनावर जे कर्मचारी नियुक्त केले जातात त्यांच्यासाठी आणि ज्यांची दिलजमाई करावयाची आहे अशांसाठी तसेच जे गुलामगिरीत खितपत पडलेले आहेत त्यांना गुलामीतून मुक्त करण्यासाठी आणि प्रवाशांसाठी आहे.” (पवित्र कुरआन-९:६०) जकात तर अनिवार्य कर्तव्य आहे ती द्यावीच लागेल, जशी नमाज अदा करावी लागते, उपवास करावा लागतो तसेच त्याव्यतिरिक्त इतर दानधर्मही करावे लागतात. आणि किती दानधर्म करावा त्यास मर्यादा नाही. “ते विचारतात, काय खर्च करावा? याचे उत्तर अल्लाह देतो की आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करून जे काही शिल्लक राहील ते सर्व दानधर्मात खर्च करून टाकावे.” (पवित्र कुरआन) जकात आणि दानधर्म मानवाधिकार आहेत आणि उपासना, नमाज रोजा हे अल्लाहचे अधिकार आहेत. दोन्हींची पूर्तता करणे अनिवार्य आहे. दानधर्म इस्लामी व्यवस्थेचा मूळ गाभा आहे.
- सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment