(९२) अशाचप्रकारे त्या लोकांवरदेखील आक्षेपास कोणतेही स्थान नाही ज्यांनी स्वत: येऊन तुम्हाला विनंती केली होती की आम्हाला स्वारी उपलब्ध करून दिली जावी. आणि जेव्हा तुम्ही सांगितले की मी तुमच्यासाठी स्वारीची व्यवस्था करू शकत नाही तेव्हा ते निरुपाय होऊन परत गेले. आणि स्थिती अशी होती की त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहात होते व त्यांना या गोष्टीचे अतोनात दु:ख होते की ते स्वखर्चाने जिहाद प्रवेशाची ऐपत बाळगत नव्हते.९३
(९३) तथापि आक्षेप अशा लोकांवर आहे जे धनवान आहेत आणि तरीदेखील तुमच्यापाशी विनवणी करतात की त्यांना जिहादप्रवेशाची माफी देण्यात यावी, त्यांनी घरी बसून राहणाऱ्यांमध्ये सामील होणे पसंत केले व अल्लाहने त्यांची हृदये मुहर केली. म्हणून आता त्यांना काही समजत नाही (की अल्लाहजवळ त्यांच्या या वागणुकीचा काय परिणाम निघणार आहे.)
(९४) तुम्ही जेव्हा परतून त्यांच्याकडे पोहचाल तेव्हा ते निरनिराळी निमित्ते सादर करतील, परंतु तुम्ही स्पष्ट सांगून टाका, निमित्त पुढे करू नका! आम्ही तुमच्या कोणत्याही गोष्टीचा विश्वास ठेवणार नाही. अल्लाहने आम्हाला तुमच्या हकीगती दाखविल्या आहेत. आता अल्लाह आणि त्याचा पैगंबर तुमचे वर्तन पाहील. मग तुम्ही त्याच्याकडे परतविले जाल जो परोक्ष व अपरोक्ष सर्वकाही जाणणारा आहे. आणि तो तुम्हाला दाखवून देईल की तुम्ही काय करीत होता.
(९५) तुम्ही परतल्यावर ते तुमच्यासमोर शपथा वाहतील जेणेकरून तुम्ही त्यांच्याकडे कानाडोळा कराल. तर बेलाशक तुम्ही त्यांच्याकडे कानाडोळाच करा,९४ कारण हे अपवित्र आहेत व त्यांचे खरे ठिकाण नरक आहे. - जे त्यांच्या कमाईच्या मोबदल्यात त्यांच्या नशिबी येईल.
(९६) ते तुमच्यासमोर शपथा वाहतील जेणेकरून तुम्ही यांच्याशी प्रसन्न व्हावे. वास्तविकत: तुम्ही यांच्याशी प्रसन्न झाला तरी अल्लाह कदापि अशा अवज्ञाकारी लोकांशी प्रसन्न होणार नाही.
(९७) हे बदावी अरब द्रोह (कुप्रâ) व कपटाचार (निफाक) दांभिकतेत अधिक कठोर आहेत व यांच्याबाबतीत या गोष्टीची शक्यता जास्त आहे की त्या धर्माच्या मर्यादापासून अपरिचित असतील जो धर्म अल्लाहने आपल्या पैगंबरावर अवतरला आहे.९५ अल्लाह सर्वकाही जाणणारा व बुद्धिमान आहे.
(९८) या बदावींमध्ये असे असे लोक उपस्थित आहेत जे अल्लाहच्या मार्गात काही खर्च करतात तर त्याला आपल्यावर जबरदस्तीचा भुर्दंड समजतात९६ आणि तुमच्याबाबतीत आपत्तीची वाट पाहात आहेत (की तुम्ही एखाद्या चक्रात अडकावे तेव्हा त्यांनी आपल्या मानगुटीवरील या व्यवस्थेच्या ताबेदारीचे जू झुगारावे ज्यात तुम्ही त्यांना जखडले आहे.) वास्तविकपणे दुष्टतेचे चक्र खुद्द यांच्याच मानगुटीवर आहे. आणि अल्लाह सर्वकाही ऐकतो व जाणतो.
(९९) आणि याच बदावींमध्ये काही लोक असेसुद्धा आहेत जे अल्लाह व परलोकवर श्रद्धा ठेवतात, आणि जे काही ते खर्च करतात त्याला अल्लाहपाशी सान्निध्य व त्याच्या पैगंबराकडून कृपेची दुआ मिळविण्याचे साधन बनवितात. होय, ते अवश्य त्यांच्याकरिता जवळीकीचे साधन आहे. आणि अल्लाह अवश्य त्यांना आपल्या कृपेत दाखल करील. नि:संशय अल्लाह क्षमाशील व दया दाखविणारा आहे.
(१००) ते मुहाजिर व अन्सार ज्यांनी सर्वप्रथम ईमानचा संदेश स्वीकारण्यात पुढाकार घेतला व तसेच जे प्रांजळपणे नंतर त्यांच्या मागे आले, अल्लाह त्यांच्याशी प्रसन्न झाला व ते अल्लाहशी प्रसन्न झाले. अल्लाहने त्यांच्याकरिता अशा बागा उपलब्ध केल्या आहेत ज्यांच्या खालून कालवे वाहात असतील व ते त्यांच्यात सदैव राहतील, हेच महान यश आहे.
(१०१) तुमच्या सभोवती जे बदावी राहतात त्यांच्यापैकी बरेचसे दांभिक आहेत आणि याचप्रमाणे खुद्द मदीनावासियांतसुद्धा दांभिक आहेत जे दांभिकपणामध्ये पटाईत झालेले आहेत. तुम्ही त्यांना ओळखत नाही, आम्ही त्यांना ओळखतो.९७ जवळ आहे ती वेळ जेव्हा आम्ही त्यांना दुहेरी शिक्षा देऊ,९८ मग ते जास्त मोठ्या शिक्षेसाठी परत आणले जातील.
(१०२) आणखी काही लोक आहेत ज्यांनी आपल्या चुका कबूल केल्या आहेत. त्यांचे कृत्य मिश्रित आहे, काही चांगळे आहेत तर काही वाईट. अशक्य नव्हे की अल्लाह यांच्यावर पुन्हा मेहरबान होईल कारण अल्लाह क्षमाशील व दया दाखविणारा आहे. (१०३) हे पैगंबर (स.)! तुम्ही यांच्या मालमत्तेतून दान घेऊन यांना शुद्ध करा आणि (सद्वर्तनाच्या मार्गात) यांना प्रोत्साहित करा आणि यांच्यासाठी कृपेची दुआ करा कारण तुमची दुआ यांच्यासाठी समाधानकारक ठरेल, अल्लाह सर्वकाही ऐकतो व जाणतो.
९४) पहिल्या वाक्यात ``न पाहण्यासारखे करणे'' म्हणजे क्षमा करणे आहे आणि दुसऱ्या वाक्यात संबंध तोडणे असा आहे. ते तर इच्छितात की तुम्ही त्यांच्याशी संघर्ष करू नये परंतु चांगले आहे की तुम्ही त्यांना दुर्लक्षित करावे आणि समजावे की तुम्ही एकमेकांशी संबंध विच्छेद करुन आहात.
९५) जसे पूर्वी आम्ही उल्लेख केला आहे, येथे अरब `बदावी' म्हणजे अरब खेडूत आहेत जे मदीना शहरालगत चोहोबाजूला राहात होते. हे मदीना शहरात एका सुदृढ शक्तीचा उदय पाहून प्रथम प्रभावित झाले. नंतर इस्लाम आणि अनेकेश्वरत्वाच्या संघर्षात काही काळ अवसरवादी बनून राहिले आणि स्वार्थसिद्धी वर्तन स्वीकारून होते. नंतर इस्लामी राज्यसत्ता हिजाज आणि नज्दच्या मोठ्या भागात पसरली आणि विरोधी कबिल्यांची शक्ती कमी होत गेली. अशा स्थितीत या `बदावी' लोकांनी आपले हित यातच जाणले की इस्लामच्या छत्रछायेखाली यावे. परंतु यांच्यापैकी कमी लोक असे होते ज्यांनी इस्लामला सत्य जीवनपदध्ती म्हणून मनापासून स्वीकारले होते आणि इस्लामच्या निकडींची पूर्तता करण्यास तत्पर होते. अधिकतर `बदावी' इस्लाम स्वीकारण्यास निष्ठा आणि आस्थापूर्वक तयार नव्हते तर निव्वळ स्वार्थापोटी त्यांनी इस्लामचा स्वीकार केला होता. त्यांची प्रकट इच्छा हीच होती की त्यांच्या वाट्याला फक्त लाभ यावे जे सत्तेत असलेल्या सदस्यांना प्राप्त् होतात. परंतु इस्लामची नैतिक बंधन, नमाज, रोजे यांची बंधने तसेच जकात देणे, अनुशासन व व्यवस्थेत ते इतिहासात प्रथमत: कसले गेले होते. हे सारे त्यांना अत्यंत अप्रिय होते. तसेच तन, मन, धन अल्लाहच्या मार्गात अर्पण करणे इ.पासून वाचण्यासाठी अनेक बहाणेबाजी करीत होते. त्यांना सत्याशी काहीच घेणे देणे नव्हते. तसेच आपली खरी सफलता कशात आहे याची त्यांना पर्वा नव्हती. त्यांना आर्थिक लाभ, आराम, जमीनजुमला आणि उंट, शेळयामेंढ्या आणि संपत्तीशी अतिप्रेम होते. ते अशाप्रकारची श्रद्धा ठेवत होते जशी पीर फकिरांसाठी ठेवली जाते. त्यांच्यापुढे नजराणे, नैवेद्य व नियाज दिली जाते आणि याच्या मोबदल्यात पीर व संत त्यांच्या कमाईत बरकत, संकटापासून सुरक्षा तसेच इतर कामांसाठी गंड्डे, दोरे व ताविज (ताईत) देतात. आणि त्यांच्यासाठी दुवासुद्धा करतात. परंतु अशा ईमान व आस्था धारण करण्यासाठी पूर्ण जीवनव्यवहाराला नैतिकता आणि आदेशांच्या आधीन करून एका विश्वव्यापी सुधारात्मक मिशनसाठी तन, मन, धन अर्पण करण्यास ते तयार नव्हते. त्यांच्या या दशेचा येथे उल्लेख आला आहे. शहरवासीयांपेक्षा हे खेडूत अधिक धोकेबाज वर्तन ठेवून होते आणि सत्याला विरोध करण्याची अधिक शक्ती त्यांना प्राप्त् होती. याचे कारण म्हणजे शहरातील लोक ज्ञानी आणि सत्यवादी लोकांच्या सहवासात राहून इस्लामी जीवनपद्धतीच्या आदेशांना आणि सीमांना ओळखतात. परंतु हे खेडूत जीवनभर एक आर्थिक पशु म्हणून रात्रंदिवस उपजीविकेच्या चक्करमध्ये फसलेले असतात. आपल्या पशुवत जीवनावश्यकतेपेक्षा दुसरीकडे लक्ष देण्याची सवड त्यांना मिळत नाही. म्हणून इस्लामी जीवनपद्धतीशी अनभिज्ञ ते राहत होते. पुढे आयत १२२ मध्ये त्यांच्या या रोगावर उपाय सांगितला गेला आहे.
येथे या तथ्याकडे इशारा करणे अनुचित होणार नाही की या आयतींचे अवतरण झाल्यानंतर सुमारे दोन वर्षांनी माननीय अबू बकर (रजि.) यांच्या आरंभिक खिलाफत काळात इस्लामी जीवनपद्धतीपासून विमुख होणे आणि जकात न देण्याने तुफान उठले होते त्याचे महत्त्वाचे कारण या आयतमध्ये दिले आहे.
९६) म्हणजे जी जकात यांच्याकडून वसूल केली जाते त्याला ते एक दंड समजतात. प्रवाशांचा सत्कार आणि आदरातिथ्य जे दायित्व त्यांच्यावर टाकले गेले आहे ते त्यांना खटकते. एखाद्या युद्धाप्रसंगी ते मदत करतात तेव्हा आपल्या हार्दिक भावनेने आणि अल्लाहला प्रसन्न करण्यासाठी देत नाहीत तर अनास्थेने आणि आपल्या निष्ठेचा पुरावा देण्यासाठी देतात.
९७) आपल्या द्रोहाला लपविण्यासाठी ते इतके अभ्यस्त झाले होते की स्वत: पैगंबर मुहम्मद (स.) आपल्या उच्च् श्रेणीचा दूरदृष्टीपणा आणि विचार ठेवूनसुद्धा त्यांना ओळखू शकले नाहीत.
९८) दुप्पट शिक्षेने तात्पर्य म्हणजे एकीकडे जगाच्या प्रेमात पडून ईमान आणि निष्ठेच्या जागी धोकेबाजी आणि द्रोह त्यांनी स्वीकारले. हे जग त्यांच्या हातून निसटणारच आणि ही संपत्ती, प्रतिष्ठा व आदराच्या जागी उलटे अपमान आणि असफलता मिळेल. दुसरीकडे ज्या मिशनला हे विफल करू इच्छितात आणि त्याविरुद्ध चालबाजी करतात, त्यांच्या इच्छा आणि प्रयत्नाविरुद्ध त्यांच्या डोळयांसमोर ती चळवळ समृद्ध होईल.
Post a Comment