Halloween Costume ideas 2015

स्त्री-पुरूषांची बौद्धिक क्षमता वेगळी असते काय?


होय! स्त्री आणि पुरूषांची बौद्धिक क्षमता वेगळी असते हे आधुनिक विज्ञानाने सिद्ध केलेले आहे. मात्र सर्वसाधारण समाज असाच आहे की, स्त्री-पुरूषांची बौद्धिक क्षमता सारखीच असते, काही अज्ञानी लोक स्त्रीच्या बौद्धिक क्षमतेला पुरूषापेक्षा कमी समजतात. आपल्याला आश्चर्य वाटेल की हे दोन्ही विचार चुकीचे आहेत. ते कसे हे आज आपण पाहू. 

19 व्या शतकात ब्रिटनमध्ये एक बुद्धिजीवी होऊन गेला. त्याचे नाव एडवर्ड विल्यम लेन (1801 ते 1876) असे होते. तो एक लेखकच नव्हता तर तत्वज्ञानी, चिंतक, भाषांतरकार आणि शब्दकोषाचा रचनाकार होता. लेनने कुरआनचा सखोल अभ्यास केला होता. त्यासाठी त्यांनी इजिप्तमध्ये कित्येकवर्षे वास्तव्य केले होते. शब्दकोषासाठी लागणारा डेटा जमा करण्यासाठी त्याने अरबी भाषाही आत्मसात केली होती. कुरआनचे महात्म्य कमी करण्यासाठी त्याने एक पुस्तक लिहिले होते ज्याचे नाव ’’सिले्नशन्स फॉर्म द कुरआन’’ असे आहे. हे पुस्तक 1843 साली प्रसिद्ध झाले.  त्यात त्याने असा सिद्धांत मांडला की,’’द फॅटल पॉईंट इन इस्लाम इज द डिग्रेडेशन ऑफ वूमन’’ याचा अर्थ कुरआनची सर्वात मोठी (अल्लाह क्षमा करो) चूक ही आहे की, कुरआनने महिलांचा सन्मान कमी केला आहे. कुरआनमध्ये महिलांना बौद्धिकदृष्ट्या दुय्यम स्थान देण्यात आलेले आहे. (संदर्भ : पान क्र. 90). 

आपल्या या दाव्याच्या पुष्ट्यार्थ त्याने कुरआनच्या एका आयातीचा पुरावा म्हणून उपयोग केला. ती आयत म्हणजे, ’’ हे श्रद्धावानांनो! जेव्हा एखाद्या ठराविक मुदतीसाठी तुम्ही आपापसांत कर्जाची देवाणघेवाण कराल, तेव्हा ते लिहून घेत चला. उभयपक्षांमध्ये एका माणसाने न्यायाचे दस्तऐवज लिहावे. ज्याला अल्लाहने लिहिण्या-वाचण्याची क्षमता प्रदान केली आहे त्याने लिहिण्यास नकार देता कामा नये. त्याने लिहावे आणि दस्तऐवजाचा मजकूर त्याने सांगावा ज्याच्यावर जबाबदारी येते (अर्थात कर्ज घेणारा), आणि त्याने अल्लाहच्या क्रोधाचे भय बाळगले पाहिजे की जो करार झाला असेल त्यात काहीही कमी-जास्त करू नये. परंतु जर कर्ज घेणारा स्वतः नादान किंवा दुर्बल अथवा मजकूर सांगण्यालायक नसेल तर त्याच्या मुखत्याराने न्यायसंगतरीतीने मजकूर सांगावा. नंतर आपल्या पुरुषांपैकी दोघांची यावर साक्ष घ्या.    

जर दोन पुरुष नसतील तर एक पुरुष आणि दोन स्त्रिया असाव्यात म्हणजे जर एखादी विसरली तर दुसरीने तिला आठवण करून द्यावी.(संदर्भ : कुरआन सुरे बकरा: आयत नं. 282)

वरील आयातीचा आधार घेऊन त्याने असा सिद्धांत मांडला की, इस्लामिक इव्हिडन्स अ‍ॅ्नट (इस्लामचा पुराव्याविषयक कायदा) मध्ये दोन महिलांच्या साक्षीला एक पुरूषांची साक्षी समान समजले गेले आहे आणि ही महिलांच्या बौद्धिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारी गोष्ट आहे. कुरआनमध्ये महिलांच्या बौद्धिक क्षमतेचे आकलन दुय्यम दर्जाचे गणले गेलेले आहे. हा महिलांचा अपमान आहे. 

सकृतदर्शनी लेनचा हा दावा पटण्यासारखा आहे. त्यामुुळे पुस्तक बाजारात आल्यानंतर त्याच्यावर लोकांच्या उड्या पडणे स्वाभाविक होते आणि झालेही तसेच. हे पुस्तक त्या काळातील बेस्ट सेलर ठरले आणि समस्त युरोपने एकमताने हे ठरवून टाकले की, इस्लाम फक्त स्त्री विरोधीच धर्म नसून तो विज्ञान विरोधीही आहे. लोकांच्या अज्ञानात भर घालणारा आहे. लोकांनाही लेनचा हा दावा पटला. कारण त्यांना स्त्री आणि पुरूष यांच्यातील बौद्धिक क्षमतेत कुठलाच फरक आढळून येत नव्हता. अनेक महिला महत्त्वाच्या पदावर कार्यरत असल्याचे त्यांना अवतीभोवती दिसत होते. एवढेच नव्हे तर अनेक महिला अशा उच्चपदावर विराजमान होत्या जिथपर्यंत पोहोचणे पुरूषांनाही कठीण होते. अशा परिस्थितीत कुरआनचा हा आदेश की, आर्थिक व्यवहार करताना एका पुरूषाची साक्ष दोन स्त्रीयांच्या बराबर आहे, कोणालाही रूचणारा नव्हता, पचणारा तर नव्हताच नव्हता. अगदी दीडशे वर्षापर्यंत असेच समजले गेले की, अ‍ॅडवर्ड लेनचा दावा खरा आणि कुरआनचा आदेश चुकीचा आहे. 

तसे पहाता ब्रिटिश हे बऱ्याच अंशी प्रामाणिक वृत्तीचे असतात. कालौघात जेव्हा त्यांच्यापैकी काही प्रामाणिक लोकांच्या लक्षात ही बाब आली की, त्यांच्या समाजात घटस्फोटाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. या उलट मुस्लिम समाजामध्ये तोंडी घटस्फोट देण्याची परवानगी असतानासुद्धा त्यांच्यात त्याचे प्रमाण फार कमी आहे, असे का? ही बाब त्यांना बुचकाळ्यात टाकणारी होती. त्यांना हे ही माहित होते की, साधारणपणे ब्रिटिश तरूण-तरूणी लग्नाआधी डेटिंग करतात. एकमेकांना समजून घेतात व नंतर विवाह करतात. हा सरळ-सरळ प्रेमविवाह असतो. तरीसुद्धा लग्नानंतर काही वर्षातच नव्हे तर अनेक प्रकरणांत काही महिन्यातच घटस्फोट का होत आहेत? या मागे स्त्री पुरूषांचा बौद्धिक फरक तर कारणीभूत नाही ना? झाले! बोलून चालून ब्रिटिशच ते ! लागले कामाला. त्यांनी स्त्री-पुरूषांच्या बौद्धिक क्षमतेची नव्याने चिकित्सा करण्यास सुरूवात केली. अनेक विद्यापीठात हा विषय पीएचडीसाठी निवडला गेला आणि शेवटी त्यांच्या लक्षात आले की, स्त्री पुरूषांची बौद्धिक क्षमता बरोबर जरी असली तरी ती सारखी नसते. आणि त्या दोहोंमधील फरक ईश्वरीय (नैसर्गिक) असल्यामुळे त्यात बदलही करता येत नाही. या शोधाअंती त्यांच्या लक्षात आले की, पुरूष हा सिंगल ट्रॅक माईंडेड असतो. तर स्त्री ही मल्टिट्रॅक माईंडेड असते. या शोधाचा संदर्भ 29 ऑ्नटोबर 2013 साली सार्वजनिक करण्यात आला. जो की, बीबीसीच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. त्याचा मतितार्थ खालीलप्रमाणे, 

Women 'better at multitasking' than men, study finds It is not a myth- women really are better than men at multitasking, at least in certain cases, a study says... says co-author Dr Gijbert Stoet, of the University of Glasgow, "Multitasking is getting more and more important in the office, but it's very distracting, all these gadgets interrupting our workflow''

www.bcc.com/news/science-environment-24645100 (accessed on 07.04.2021)

या शोधाप्रमाणे पुरूष हा सिंगल ट्रॅक माईंडेड असल्यामुळे तो एका वेळी एकच काम करू शकतो मात्र स्त्री ही मल्टीट्रॅक माईंडेड असल्यामुळे एकाच वेळी अनेक कामे करू शकते. याचा अर्थ स्पष्ट आहे, पुरूष सिंगल ट्रॅक माईंडेड असल्यामुळे लिहून घेतलेला आर्थिक व्यवहार पूर्णपणे तो आत्मसात करू शकतो. म्हणून त्याची एकट्याची साक्ष पुरेशी असते. याउलट स्त्री मल्टिट्रॅक माईंडेड असल्याकारणाने एखाद्या वेळेस असेही होऊ शकते की, झालेला व्यवहार ज्याची तिला साक्ष द्यावयाची आहे, पूर्णपणे तिच्या लक्षात राहणार नाही. म्हणून दोन स्त्रियांची साक्ष अनिवार्य करण्यात आलेली आहे. ज्या योगे एकीला जर काही तपशीलाचा विसर पडला तर दूसरी तिची पूर्तता करू शकेल. या मागे स्त्रीला बौद्धिक दृष्ट्या कमी लेखण्याचा दुरान्वयेही संबंध नाही. आणि म्हणून स्त्रीची बौद्धिक क्षमता पुरूषापेक्षा कमी असते असे समजण्याचे ही काहीएक कारण नाही. उलट स्त्रीला तिच्या एकाच वेळी निभवाव्या लागणाऱ्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या नीट पार पाडता याव्यात म्हणून तिला ईश्वराने अष्टावधानी बनविलेले आहे. हा तर ईश्वराने स्त्रीला प्रदान केलेला सन्मान आहे. आणि ही बाब इतकी स्पष्ट आहे की, प्रत्येक घरात सहज अनुभवली जाऊ शकते. जरा सावध निरिक्षण करून पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की, समजा एखादा पुरूष घरात आपल्या आवडीचे पुस्तक वाचत बसलेला असेल तर त्याला दारावरची बेल कोणी वाजविली तरी त्याची त्याला जाणीव होत नाही. उलट स्त्री स्वयंपाक घरात स्वयंपाक करीत असेल तरी शयन कक्षात मूल झोपेतून उठल्याची चाहूल तिला सहजपणे लागते. 

सुबहानल्लाह ! (ईश्वर पवित्र आहे.) सर्वश्रेष्ठ रचनाकार आहे. अलहम्दुलिल्लाह (अल्लाहचे)  आभार की पुन्हा एकदा सिद्ध झाले की, कुरआन विज्ञान विरोधी नाही तर आपले सिद्धांत सिद्ध करण्यासाठी विज्ञानाला कुरआनाचा आधार घ्यावा लागतो. म्हणून कोणी मान्य करो अथवा न करो सत्य एकच आहे ते म्हणजे देअर इज नो वे बट इस्लाम.

(दुःख फक्त एकाच गोष्टीचे वाटते की स्त्रीयांच्या बौद्धीक क्षमतेसंबंधिचा प्रश्न इंग्रजांनाच पडला व त्याचे उत्तरही त्यांनीच शोधून काढले. मुस्लिमांपैकी कोणी नव्हे.)

- एम.आय.शेख


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget