राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवतांनी एका पुस्तकाच्या विमोचन समारंभात हिंदुत्व आणि मुस्लिमांविषयी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. हे त्यांचे पहिले वक्तव्य नाही. यापूर्वीही त्यांनी मुस्लिम आणि भारत या विषयावर आपले विचार व्यक्ते केले आहेत. त्यांच्या मते भारताच्या प्रत्येक नागरिकाचा मग त्याचा धर्म, संस्कृती कोणतीही असो, डीएनए एकच आहे. या विषयावर बरेच जण त्यांच्याशी विचारणा करत आहेत. आजवर असे सांगण्यात येत होते की ब्राह्मण आणि क्षत्रिय आयात वंशज आहेत. ब्राह्मणांचा आणि युरोपियन लोकांचा डीएनए एकच आहे. पण सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे, असे आधी म्हटले नव्हते. मुस्लिमांचाच नव्हे तर भारतातील साऱ्या लोकांचा डीएनए एकच असेल तर मग जातीजमाती भेद कशाला? एससी-एसटींचा देखील डीएनए उच्चवर्णीयांच्या डीएनएसारखाच असेल तर मग शूद्र, दलित, इत्यादी लोक ज्यांना आपण सामाजिक मागास म्हणतो, सारे समानच ठरतील. मग धर्माच्या शिकवणीचे काय? ज्या धर्माने समाजाला विभिन्न वर्गात विभागले आणि त्यांचे हक्काधिकार वेगळे ठरवले ते कशाच्या आधारावर? डीएनए एकच असेल तर मग सारे मानव समानच. असो. आम्ही तर डीएनए समान असमानच्या भानगडीत न पडता भारतातीलच नाही तर साऱ्या जगातील मानवांना एकच मानतो. साऱ्या माणसांना अल्लाहने निर्माण केले असल्याने आणि या सर्वांचा स्वामी, निर्माता एकच असल्याने सारे मानव समान आहेत. कुणी स्पृश्य वा अस्पृश्य नाही की कुणी तुच्छ, कुणी श्रेष्ठ नाही. यातले जे सदाचारी असतील तेच मात्र अल्लाहला प्रिय असतील. लिंचिंगबाबत भागवतांचे म्हणणे आहे की जे हे कार्य करतात ते हिंदुत्वाच्या विरोधात जातात. त्यांच्याविरूद्ध कडक काराई केली जावी. जर खरेच त्यांना असे वाटत असेल की लिंचिंग करणारे हिंदुत्वविरोधी आहेत म्हणजेच ते हिंदू नाहीत, तर या गोष्टी एका समारंभात सांगण्यापेक्षा आपल्या संघाच्या वेगवेगळ्या बैठकीत सांगायला हव्यात. अशा लोकांना शिक्षा करण्यासाठी आपल्या पक्षाच्या सरकारला, शासनाला सांगायला हव्यात. एखाद्या सभेत सांगण्याने त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही. भाजप संघाच्या अजेंड्याला अंमलात आणत आहे. भाजपचे लोक हे पाशवी कर्म करत आहेत, पक्षाने त्यांना आवरायला हवे. जर पक्ष कोणतीच कारवाई करत नसेल तर याचा अर्थ खुद्द भाजपचा लिंचिंगला पाठिंबा असावा. त्यांनी हिंदू-मुस्लिम समानतेची, ऐक्याची गोष्टदेखील सांगितली. ते म्हणाले की, हिंदू असोत की मुस्लिम की इतर धर्मिय सगळे जण भारतीय आहेत आणि भारतीय असल्याने सर्वांचे अधिकार समान आहेत. दुसऱ्या बाजुला ज्या दिवशी भागवत या गोड गोड गोष्टी सांगत होते त्याच्या दुसऱ्याच दिवशी हरियाणातील भापचे प्रवक्ते सुरजपाल सिंह यांनी पटौदी येथे एका महापंचायतचे आयोजन केले आणि त्या महापंचायतमध्ये मुस्लिमांना या देशातून हाकलून देण्याचा प्रस्ताव पारित केला. भाजपचे धोरण वेगळे आणि सरसंघचालकांचे म्हणणे वेगळे कसे? कोण खरे आणि कोण खोटे बोलत आहे याचे स्पष्टीकरण भागवतांनी करायला हवे. भाजप संघाच्या नियंत्रणाखाली की संघ भाजपच्या नियंत्रणाखाली? संघाचे म्हणणे वेगळे आणि भागवतांचे म्हणणे वेगळे आहे काय? भागवत म्हणतात, मुस्लिम आणि हिंदू समानरित्या भारताचे नागरिक आहेत. भाजपचे प्रवक्ते म्हणतात मुस्लिमांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. याचा उलगडा सरसंघचालक आपल्या संघाच्या सभेत करतील काय? इतर कुठल्या ठिकाणी एखाद्या समारंभात असे वक्तव्य करण्यात काहीही अर्थ नाही. संघाच्या सरसंघचालकांनी आणखी एक विधान याच सभेत केले. ते म्हणजे मुस्लिमांनी असे समजू नये की भारतात इस्लामला धोका आहे. याबाबत हे स्पष्ट करावेसे वाटते की कोणत्याही धर्माला तो इस्लाम असो की हिंदू धर्म असो, की आणखीन कोणताही धर्म असो, बाहेरील शक्तींकडून कसलाच धोका नसतो. आणि इस्लामला तर मुळीच नाही. कोणत्याही धर्माला त्या त्या धर्माच्या अनुयायींपासून धोका असतो. प्रत्येक धर्मियाने आपल्या धर्माशी एकनिष्ठ होऊन त्याच्या शिकवणींचे पालन केल्यास त्या धर्माला बाहेरील कोणत्याही शक्तीपासून धोका नसतो. इस्लाम धर्माचे एक वैशिष्ट्य असे की त्या धर्माच्या अनुयायींनी इस्लामचे पालन केले नाही, रिझवीसारख्या लोकांनी धर्माविरूद्ध कर्तृत्व केले तरी इस्लामला या आंतरिक शक्तीपासून कधीच धोका होणार नाही. जोपर्यंत पवित्र कुरआन आणि प्रेषितांच्या शिकवणी सुरक्षित आहेत तोपर्यंत कधीही ‘इस्लाम खतरे में’ नसेल. पण जे इतर धर्मिय लोक आपल्या धर्माच्या शिकवणी बाजुला सारून लिंचिंगसारखे पाशवी कृत्य करतील त्यांच्यापासून त्यांच्याच धर्माला धोका असणार आहे. मुस्लिमांना याचा त्रास होणार, पण त्यांना अल्लाहने आधीच सांगितले आहे की त्यांचे प्राण, त्यांची मालमत्ता, त्यांच्या संततीला अशा परीक्षांचा सामना करावा लागणार! तेव्हा मुस्लिमांना हे सर्व सहन करावेच लागेल.
- सय्यद इफ्तिखार अहमद
(संपादक, मो.: ९८२०१२१२०७)
Post a Comment