प्रेषित मुहम्मद सल्ललाहु अलैही व सल्लम यांनी सांगितले की, मुस्लिमांच्या घरांमध्ये सर्वात अधिक चांगले घर ते आहे ज्यात एखादे अनाथ बालक असावे आणि त्याच्याशी चांगले वर्तन केले जात असावे आणि मुस्लिमांचे सर्वाधिक वाईट घर ते आहे ज्यात एखादा अनाथ असावा आणि त्याच्याशी वाईट वर्तन केले जात असावे (संदर्भ: अबुल हुरैरा (र). इब्ने माजा)
कोरोनाच्या महामारीने अनेकांना अनाथ व्हायला भाग पाडले आहे. देशात कोरोनाच्या दोन्ही लाटेत आतापर्यंत सरकारी आकड्यानुसार 4.03 लाख जणांचा मृत्यू झाला असून, एकट्या महाराष्ट्रात 1.23 लाख लोक मृत्यूमुखी पडले आहेत. प्रत्यक्षात हा आकडा यापेक्षा कितीतरी जास्त असावा! अचानक आलेल्या या कोरोनाच्या दुहेरी लाटेमुळे अनेकांच्या घरातील कर्तेधर्ते पालक मरण पावल्यामुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. अनेकांचे आई-वडिल दोन्हीही गेल्याने मुले अनाथ झाली आहेत. तसेच पती गेल्याने महिला विधवा झाल्या आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथच्या सर्व्हेक्षणानुसार 63.10 टक्के पुरूष तर 36.90 टक्के स्त्रियांचा मृत्यू झाला आहे. याचा अर्थ पुरूषांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अनाथ आणि विधवा होण्याचे प्रमाणही चिंताजनक आहे. या कारणास्तव अनाथ व विधवा महिलांच्या पुनर्वसनासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे. नुकतेच राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे की, ‘कोरोना’ने अनेक कुटुंबांवर झालेले परिणाम हे भयंकर आहेत. ज्यांच्या मागे आर्थिक पाठबळ नाही अशा अनाथ मुलांचा आणि विधवांचा प्रश्न त्यामुळे गंभीर झाला आहे. त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारनं काही उपाय योजले असले, तरी तळागाळातल्या व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी समाजाने संघटित प्रयत्न करणे आवश्यक आहे. विधवा स्त्रियांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी राज्यभरात स्थानिक पातळीवर त्यांच्यासाठी ‘कम्युनिटी सपोर्ट ग्रुप्स’ (समूह आधार केंद्र) तयार करणं, व्यावसायिक कौशल्यांचं प्रशिक्षण देत त्यांना अर्थसाक्षर करणं आणि त्यांचं समुपदेशन करणं या त्रिसूत्रीचा अवलंब करणं अत्यंत गरजेचं आहे असे त्या म्हणाल्या.
मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस फॉर वेलफेर आणि आयटा शिक्षक संघटनेने लातूर जिल्ह्यात अनाथांची संख्या जमा करण्याचा प्रयत्न सुरू केला असून, त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. लातूर व औसा शहरात 116 अनाथ बालके आढळून आली आहेत. अजून पूर्ण जिल्ह्याचा डाटा जमा झाला नाही. फक्त दोन शहरातून 116 बालके आढळली असली तरी हा आकडा फार मोठा असल्याचे सामाजिक कार्यकर्तेर् रजाऊल्लाह खान म्हणाले. बालसंगोपन योजनेतून अनाथांना महिनाकाठी 1100 रूपये मिळतात. त्यासाठी जिल्हा महिला बालविकास विभाग येथे अनाथांचे फार्म भरून नोंद करणे गरजेचे आहे. ज्यांना याबद्दल अधिक माहिती व फॉर्म हवे आहेत त्यांनी 9326080740 या व्हॉटस्अॅप नंबरवर मॅसेजद्वारे संपर्क करावा. खान म्हणाले, अनेक योजना आहेत मात्र आम्ही सध्या बालसंगोपन या योजनेवर काम करत आहोत. ज्याचा फायदा आम्ही अनाथांना पोहोचवित आहोत. असे कार्य राज्यभरात प्रत्येक ठिकाणी व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मंत्री यशोमती ठाकूर यांनी सूचविलेले उपाय हे देखील फार महत्त्वपूर्ण आहेत. ’’त्या म्हणतात, 21 व्या शतकातील गरजेच्या असलेल्या व्यावसायिक कौशल्यांचं प्रशिक्षण देणं हे अनिवार्य ठरतं. जेणेकरून या स्त्रियांना दीर्घकालीन आर्थिक घडी बसवण्यात यश मिळेल आणि एकदा त्यांची आर्थिक घडी नीट बसली की मग हळूहळू त्यांची कौटुंबिक घडीदेखील बसायला मदत होईल. म्हणून समाजातील कौशल्यविकासात काम करणाऱ्या विविध घटकांनी एकत्र येऊन यावर उपाययोजना केल्यास त्याचा नक्की फायदा होईल. अचानक खांद्यावर पडलेली जबाबदारी पेलण्याची तयारी किंवा तेवढी ताकद प्रत्येक स्त्रीमध्ये असेलच असंही नाही. त्यांना या गोष्टीचा प्रचंड मानसिक ताण येऊ शकतो. त्यामुळे या स्त्रियांचं समुपदेशन करणं अतिशय गरजेचं आहे. योग्य समुपदेशन आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्या निश्चित त्यांच्यासमोर उभ्या राहिलेल्या या पहाडासामान समस्येवर योग्य तोडगा काढून यशस्वीरीत्या मार्गक्रमण करत राहातील. याचबरोबर तरुण मुलामुलींनी एकत्र येऊन महाराष्ट्रात ठिकठिकाणी स्थानिक पातळीवर या स्त्रियांसाठी ‘कम्युनिटी सपोर्ट ग्रुप्स’ (समूह आधार केंद्र) तयार केले पाहिजेत. या केंद्रांमधील वेगवेगळ्या क्रियाकल्पांमुळे या स्त्रियांचा आत्मविश्वास आणि मनोबल वाढेल. या केंद्रांद्वारे त्यांना एकमेकींशी संवाद साधून एकमेकींचे प्रश्न समजून घेता येतील व आपापल्या वैयक्तिक अनुभवांवरून त्यावर एकमेकींना उपाय सुचवणं सोपं होईल, तसंच या केंद्रांद्वारे त्यांना योग्य ते प्रशिक्षणदेखील दिलं जाऊ शकेल. तरुण-तरुणींबरोबर राज्यातील महिला बचत गटांनी पुढे येऊन हा आधार गटांचा उपक्रम राबवल्यास त्याची परिणामकारकता वाढीस लागेल. बचत गटातील स्त्रियांना आर्थिक, कौशल्यविषयक व इतर अनेक महत्त्वाच्या विषयांवर आपल्या अनुभवांद्वारे आधार गटातील स्त्रियांना मार्गदर्शन करून उत्तम प्रकारे सहाय्य करता येऊ शकेल.
या समस्यांमधून चांगला तोडगा हवा असेल तर आज गांधीजींनी शिकवलेल्या विकेंद्रीकरणाच्या तत्त्वांचं पालन करणं गरजेचं आहे. एकाच मोठ्या उपक्रमापेक्षा आपण सर्वांनी जर ‘हायब्रीड’ पद्धतीनं काही छोटे- मोठे उपक्रम राबविण्याचे धोरण अवलंबविले तर नक्कीच आपल्याला समाजात आमूलाग्र बदल घडवून आणून या स्त्रियांना व त्यांच्या कुटुंबाला सहाय्य करणं सोपं जाईल. सामाजिक बदल घडवायचा असेल तर मोठ्या मोठ्या गोष्टीच केल्या पाहिजेत असं नाही. आपण आपल्या शेजारी राहाणाऱ्या किंवा आपल्या जवळपास राहणाऱ्या कोरोनाग्रस्त कुटुंबांना जरी आपापल्या परीनं मदत केली तरी त्यामुळे समाजात मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल घडवून आणता येतील, असेही श्रीमती ठाकूर म्हणाल्या.’’
अनाथाबद्दल प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी अनुयायांना आवाहन करताना म्हटले आहे की, ’’मी आणि अनाथांचा पालक तसेच इतर गरजवंतांचा पालक आम्ही दोघे जन्नतमध्ये अशा प्रकारे असू’’ हे सांगून प्रेषित (सल्ल.) यांनी मधले बोट आणि तर्जनीच्या बोटाद्वारे इशारा केला आणि या दोन्ही बोटांच्या दरम्यान थोडेसे अंतर राखले (बुखारी, सुहैल बिन सईद (र.),
प्रेषित (सल्ल.) यांनी सांगितले, मुस्लिमांच्या घरामध्ये सर्वात अधिक चांगले घर ते आहे, ज्यात एखादे अनाथ बालक असावे आणि त्याच्याशी चांगले वर्तन केले जात असावे. (इब्ने माजा अबु हुरैरा र.)
एका माणसाने प्रेषित सल्ल. यांच्या जवळ आपल्या हृदयाची कठोरता व सक्तीचा उल्लेख केला. तेव्हा प्रेषित (सल्ल.) यांनी सांगितले की, अनाथाच्या डोक्यावर स्नेह, प्रेमाचा हात फिरवा आणि दीन दुबळ्यांना खाऊ घाला.’’ (मिश्कात, अबु हुरैरा रजि.)
प्रेषित सल्ल. यांनी असेही सांगितले की, ’’हे माझ्या अल्लाह ! मी दोन कमजोर स्वरूपाच्या लोकांच्या ह्नकास आदरणीय ठरवतो. म्हणजे अनाथ आणि पत्नीच्या हक्कास.’’ (निसाई खालीद बिन उमर (र.))
पैगंबर मुहम्मद सल्ल. यांच्या वरील वचनांनी कळते की, अनाथांची सेवा करण्यास प्रत्येकाने प्राधान्य दिले पाहिजे. अनेक महाभुती अशाही असतात की त्या अनाथांचे संगोपन करतात मात्र त्यांच्यापासून अधिक लाभ उकळण्याचा प्रयत्न करतात. त्याबद्दल कुरआनमध्ये आले आहे की, ’’आणि अनाथांचे धन व्यर्थ खर्चासह खाऊ नका आणि घाई माजवित त्यांच्या तरूण होण्याच्या भयाने आणि जो श्रीमंत असेल तर त्याने अनाथाचा माल खाण्यापासून फार अलिप्त राहिले पाहिजे, आणि जो गरीब असेल तर त्याने अनाथांच्या धनातून नियमानुसार खाल्ले पाहिजे.’’
एकंदर आजची परिस्थिती पाहता अनाथ होणाऱ्या मुलांची संख्या वाढली आहे. विधवांची संख्या वाढली आहे. अशा परिस्थितीत दोघांचेही पुनर्वसन होणे गरजेचे आहे. तसेच ज्या महिला विधवा झाल्या आहेत. ज्यांच्या कुटुंबात त्यांची देखभाल करणारे कोणी नाहीत, अशांसाठी पुनर्विवाहासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. जेणेकरून त्यांचे आयुष्य सुखी जाईल. आजही समाजात विधवा महिलांना नीट वागविले जात नाही. माहेरकडील मंडळीही काही दिवस त्यांच्याशी नीट वागतात मात्र काही वर्षानंतर त्यांच्याशी अबोला धरतात. परिणामी, अशा महिला आत्महत्या करण्याकडे वळतात व आपले आयुष्य संपवून टाकतात. त्यामुळे सामाजिक संघटनांनी विधवा महिलांसाठी वधू-वर मेळावे आयोजित करून त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे.
इस्लाममध्ये शारीरिक आणि आर्थिक ऐपत असणाऱ्या पुरूषांना एकापेक्षा जास्त आणि चार पर्यंत लग्न करण्याची जी तरतूद केलेली आहे, त्याची अंमलबजावणी करण्याचीही खरी वेळ आली. हिंदू बांधवांचा पुनर्विवाह टाळण्याकडे कल असतो. त्यासाठी त्यांची धार्मिक मान्यता आडवी येते. भारतात मुस्लिम समाज अल्पसंख्यांक असून, बहुसंख्यांच्या चालीरितीचा त्यांच्यावर नकळत परिणाम होत असतो. विधवांचा पुनर्विवाह हा एक असाच विषय आहे, जरी वर्जित नसला तरी दुर्लक्षित जरूर आहे. एरव्हीही समाजामध्ये अनेक कारणांमुळे महिलांची संख्या ही पुरूषांच्या संख्येपेक्षा नेहमीच जास्त असते. अशा परिस्थितीत ज्या अतिरिक्त स्त्रिया असतात त्यांच्या लैंगिक आणि आर्थिक गरजा वैधरित्या पूर्ण करून त्यांना समाजामध्ये सन्मानाचा दर्जा पुन्हा बहाल करण्यासाठी विधवाच नव्हे तर परित्नत्या आणि घटस्फोटित महिलांच्या पुनर्विचाराचा गांभीर्याने विचार करूनच जमणार नाही तर क्षमताधारी सर्व पुरूषांनी पुनर्विवाह करण्याचा निश्चय केला पाहिजे. यात दोन प्रमुख अडचणी आहेत. एक दोन बायका असलेल्या पुरूषाकडे समाजामध्ये थोड्या कलुषित दृष्टीने पाहिले जाते व विवाहित महिलाच आपल्या घरात सवत आणण्यास कधीच तयार होत नाहीत.
पहिल्या अडचणीकडे सपशेल दुर्लक्ष करून दुसरा विवाह केला जावू शकतो. मात्र सवतीचा प्रश्न सोडविणे थोडेसे अडचणीचे आहे. मात्र या संदर्भात इस्लामच्या उपदेशांसंबंधी समुपदेशन केले गेल्यास व विधवांच्या प्रश्नाचेे गांभीर्य विवाहित महिलांना समजावून सांगितल्यास व दूसरी स्त्री जरी घरात आली तरी त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याचा विश्वास पतीने दिल्यास हा प्रश्नही मार्गी लागण्यास वेळ लागणार नाही.
- बशीर शेख
Post a Comment