Halloween Costume ideas 2015

मुस्लिम मराठी साहित्याचे साक्षेपी अभ्यासक : डॉ. अक्रम पठाण


कोरोनाच्या वैश्विक महामारीचा भारतावर प्रचंड आघात चालू आहे. सर्वच क्षेत्रे या महामारीने प्रभावित झाल्याचे दिसते. न्यूज चॅनल, फेसबुक व व्हॉटसअ‍ॅप चालू करताच कोरोना काळात भारताची उडालेली त्रेधातिरपीट दृष्टीस पडते. जळणाऱ्या चिता, ऑक्सिजनअभावी तडफडून मरणारे रुग्ण, गंगेत तरंगणारे मृतदेह, आप्त-स्वकीयांच्या टाहोने मन सुन्न झाले आहे. फेसबुक किंवा व्हॉटसअ‍ॅप उघडताच, निधनाच्या बातम्यांनी छातीमध्ये कळ उठते. अशीच एक बातमी फेससबुक व मित्रपरिवारातून कळाली, दिनांक ७ मे २०२१ रोजी नागपूर येथील साहित्यिक डॉ. अक्रम पठाण यांच्या निधनाची.

अक्रम पठाण व माझे जवळपास पंधरा वर्षांचे ऋणानुबंध होते. ६ फेब्रुवारी २०२० रोजी मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पीएच.डी. मौखिक परीक्षेला बहि:स्थ परीक्षक म्हणून उपस्थित होतो. पठाण यांना हे माहीत होताच ते माझ्या भेटीला आले. घरी घेऊन गेले. त्यांच्या परिवारासोबत आनंदाने घरी जेवू घातले. संपूर्ण नागपूर शहराचे दर्शन घडविले. जातेवेळेस त्यांनी लिहिलेल्या साहित्यकृती स्वत:च्या हस्ते ‘प्रिय, प्रा. डॉ. ताहेर पठाण यांस सप्रेम भेट’ असे लिहून खाली स्वाक्षरी केली. हे सर्व आज मनासमोर तरळत आहे. त्यांना शब्दरूपी श्रद्धांजली वाहताना त्यांच्या वाङ्मयीन कामगिरीचा संक्षिप्त आलेख मांडत आहे.

साठोत्तरी मराठी वाङ्मयात साहित्याचे विविध प्रवाह निर्माण झाले. या प्रवाहांतून साहित्यात मोठया प्रमाणात पिचलेला, दबलेला व दुर्लक्षित माणूस आणि त्याचे समग्र जीवन चित्रित होताना दिसत आहे. उपेक्षित माणसं लिहू लागली आहेत; हीच मुळात विचारप्रक्रियेतील क्रांती आहे. साठोत्तरी प्रवाहामध्ये मुस्लिम मराठी साहित्याचा प्रवाह महत्त्वाचा मानला गेला आहे. या प्रवाहाने मुस्लिम समाजाचे दु:ख, दारिद्र्य, व्यथा, वेदना व त्यांचा आक्रोश यांसह समाजजीवनातील भावविश्व जाणिवेस आविष्कृत केले आहे. प्रा. फ. म. शहाजिंदे, फकरुद्दीन बेन्नूर, अजिज नदाफ, मुहंमद आजम, जावेद पाशा, एहतेशाम देशमुख, मुबारक शेख, महेबुब सय्यद, जुल्फी शेखपासून ते अक्रम पठाण आदी साहित्यिकांचा उल्लेख करता येईल.

अक्रम पठाण हे डॉ. यशवंत मनोहर यांचे एम.ए.पासून ते पीएच.डी.पर्यंतचे विद्यार्थी. एम.ए.ला नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर विभागात शिक्षण घेत असताना शेवटच्या बाकावर बसत असत. डॉ. मनोहर यांनी त्यावेळी म्हटले होते, “अक्रम, तुझी जागा शेवटच्या बाकावर नाही. तुझी जागा पुढच्या बाकावर आहे.”

या वाक्यांनी त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाल्याची नोंद त्यांनी आपल्या ग्रंथात केली आहे. डॉ. मनोहरांच्या वैचारिक भट्टीत अक्रम पठाण यांची वाङ्मयीन जडणघडण झाली. ‘मुस्लिम मराठी साहित्य’ (२०१४), ‘मुस्लिम समाजाचे नवे क्षितिज’ (२०१४), ‘संग्रामकवी अमर शेख’ (२०१५), ‘यशवंत मनोहरांची युद्धकविता’ (२०१८), ‘कवितेची युद्धशाळा’ (२०२०) आणि ‘सभ्यतेचा गौरव : हिफजूर रहमान’ (२०२१) या ग्रंथांचे लिखाण केले; तर डॉ. मनोहर यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ‘बदलते विश्व आणि साहित्यापुढील आव्हाने’ या ग्रंथाचे संपादन त्यांनी केले आहे. साठोत्तरी मराठी वाङ्मयाच्या प्रवाहात मुस्लिम मराठी साहित्याचा प्रवाह मानायचा काय? या साहित्याची सैद्धांतिक मांडणी करण्यात आली आहे? या साहित्याच्या प्रेरणा कोणत्या? यात किती मुस्लिम साहित्यिकांनी योगदान दिले आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते.

वादविषयक प्रश्न उपस्थित करणे हे ज्ञानप्रक्रियेचे एक आवश्यक अंग असते आणि समीक्षाव्यवहारही नव्या नव्या संकल्पनांच्या प्रकाशात समाविष्ट होत असते. मुस्लिम मराठी साहित्याची सैद्धांतिक मांडणी करून प्रा. फ. म. शहाजिंदे यांनी संपादित केलेले ‘मुस्लिम मराठी साहित्य : परंपरा, स्वरूप आणि लेखकसूची’ हे पहिले पुस्तक आहे. त्यानंतर डॉ. नसीम एहतेशाम देशमुख यांनी ‘मुस्लिम मराठी साहित्य :  संकल्पना, स्वरूप व समीक्षा’ या समीक्षा पुस्तकात मुस्लिम मराठी साहित्याची संकल्पना, स्वरूप व वाटचालींची समीक्षा करण्याचा प्रयत्न केला.

डॉ. महेबुब सय्यद यांनीही मुस्लिम मराठी साहित्यावर छोटी पुस्तिका प्रकाशित केली आहे. अक्रम पठाण यांनी डॉ. मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर विद्यापीठात ‘मुस्लिम मराठी साहित्य’ या विषयावर संशोधन करून २०१४ मध्ये ‘मुस्लिम मराठी साहित्य’ हे पुस्तक प्रकाशित केले. डॉ. मनोहर यांच्या तालमीत तयार झालेला हा साक्षेपी समीक्षक व अभ्यासक होता. ‘मुस्लिम साहित्य : संकल्पना विचार, १९६० पूर्वीचे मुस्लिम साहित्य : एक सिंहावलोकन, मुस्लिम मराठी कविता, मुस्लिम मराठी कथा, मुस्लिम मराठी कादंबरी, मुस्लिम मराठी नाटक, मुस्लिम मराठी आत्मचरित्रे, मुस्लिम मराठी वैचारिक निबंध, मुस्लिम मराठी ललित निबंध व मुस्लिम मराठी समीक्षा अशा दहा प्रकरणांत, या पुस्तकांची मांडणी करण्यात आली आहे. ‘मुस्लिम मराठी साहित्य’ हा ग्रंथ ‘मुस्लिम मराठी साहित्याचा अधिकृत, साक्षेपी’ गांभीर्याने लिहिलेला इतिहास पहिला मानण्यास हरकत नाही.

‘मुस्लिम समाजाचे नवे क्षितिज’ हे अक्रम पठाण यांचे २०१४ मध्ये प्रकाशित झालेले दुसरे पुस्तक आहे. मुस्लिम समाजाने देशाच्या एकूण राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्याची समीक्षा व्हावी हाच दृष्टिकोन समोर ठेवून अक्रम पठाण यांनी ‘मुस्लिम समाजाचे नवे क्षितिज’ या ग्रंथाची निर्मिती केली. मुस्लिम समाजाविषयी अनेक गैरसमज इतर धर्मांमध्ये आहेत. हे गैरसमज दूर व्हावेत, इस्लामचा मानवतावादी चेहरा जगासमोर यावा हा उद्देश समोर ठेवून या पुस्तकातील लेख लिहिण्यात आले आहेत. यातून भारतीय समाजरचनेत समताधिष्ठित मूल्य प्रस्थापित करण्याचा अक्रम पठाण यांचा अट्टहास दिसतो. या ग्रंथात मुस्लिम समाज आणि सम्यक परिवर्तन, ‘जोतीराव फुले यांचा इस्लामविषयक ‘दृष्टिकोन’, ‘मौलाना अबुल कलाम’ यांचे सांस्कृतिक, साहित्यिक व शैक्षणिक विचार’, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मुस्लिम समाज’, ‘सूफी संतांचा सांस्कृतिक समन्वय’, ‘इस्लामचे सैद्धांतिक विचारपीठ : डॉ. असगर अली इंजिनीअर’ आदी विषयांवरील पंचवीस लेख या पुस्तकामध्ये समाविष्ट आहेत.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे अमर शेख यांच्या जीवनचरित्राचा आणि वाङ्मयीन कर्तृत्वाचा आढावा घेणारे ‘संग्रामकवी अमर शेख’ अक्रम पठाण यांचे तिसरे पुस्तक २०१५ मध्ये प्रकाशित झाले. शाहीर अमर शेखांच्या साहित्याची दखल मराठी वाङ्मयात फारशी घेतली गेली नाही. अमर शेख यांच्या कवितेची हेटाळणी मराठी साहित्यिकांकडून झाली. पु. भा. भावे यांनी अमर शेख यांचा ‘शेख मिय्यांना कवी म्हणू नका’ असा तुच्छतादर्शक उल्लेख केला होता. या गोष्टीची फिकीर अमर शेख यांनी कधीच केली नाही. त्यांचे ‘अमर गीत’, ‘धरणीमाता’ व ‘कलश’ हे महत्त्वाचे काव्यसंग्रह असून संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी आणि मजूरवर्गाला आपल्याबरोबर घेतले.

पहाडी आवाजाला धार देऊन दिल्ली दरबारी सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद केला. औरंगाबाद, सातारा, मालवण येथील मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्राच्या ठरावासाठी ते हजर होते. कवी म्हणून त्यांना संमेलनात आमंत्रित केले नव्हते. जनतेच्या आग्रहामुळे संयोजकाला अमर शेख यांना काव्यवाचनासाठी सहभागी करून घ्यावे लागले. अमर शेख यांच्या काव्यकर्तृत्वाचा शोध ‘संग्रामकवी अमर शेख’ या ग्रंथातून डॉ. अक्रम पठाण यांनी घेतला आहे. पाच प्रकरणांत या ग्रंथाची मांडणी करण्यात आली आहे. याची ‘मराठीतील मार्क्सवादी कवितांचा आढावा’, ‘अमरगीत : सामाजिक परामर्श’, ‘धरणीमाता : सामाजिक परामर्श’, ‘कलश : सामाजिक परामर्श’, ‘अमर शेखांच्या कवितासंग्रहाचे वाङ्मयीन मूल्यमापन’ व ‘अमर शेखांच्या कवितासंग्रहातील जाणिवांतरे’ अशा प्रकरणात विभागणी करण्यात आली आहे. परिशिष्टामध्ये अमर शेख यांची वाङ्मयसूची’ तसेच अमर शेख यांच्यासंदर्भात बाबुराव बागूल व अजीज नदाफ यांच्या मुलाखतींतून अमर शेख यांचे व्यक्तिमत्त्व व साहित्यिक गुण डॉ. अक्रम पठाण यांनी उलगडले आहेत. अमर शेखांचे जीवनचरित्र, लेखनकर्तृत्व व सामाजिक कार्याला उजाळा मिळावा, हा नि:पक्ष हेतू डॉ. अक्रम पठाण यांचा ग्रंथ लिहण्यामागे असल्याचे दिसून येते.

डॉ. अक्रम पठाण यांचे ‘यशवंत मनोहरांची युद्धकविता’ हे समीक्षेचे चौथे पुस्तक २०१८ मध्ये प्रकाशित झाले. या समीक्षा ग्रंथात डॉ. मनोहर यांच्या अकरा कवितासंग्रहांवर लेख लिहिले आहेत. आंबेडकरी विचारविश्वाने प्रेरित झालेल्या लेखक कवींनी, आपल्या दाहक अनुभवविश्वाला उजागर केले आणि पिढ्यानपिढ्या, शतकानुशतकांच्या अखंड उपेक्षेला साहित्यातून मांडण्यात आले आहे.

या पिढीतील एक महत्त्वाचे कवी म्हणून डॉ. यशवंत मनोहर यांचा विचार करावा लागतो. प्रस्थापित व्यवस्थेला आणि धर्मग्रंथांना प्रश्न विचारणारी, सामाजिक जीवनव्यवहाराची परखड चिकित्सा करणारी, मूल्यगर्भ जाणिवेची चिंतनात्मक कविता त्यांनी लिहिली आहे. मनोहर यांचे व्यक्तिमत्त्व आणि लेखनाचे अनेक पैलू आहेत. विचारवंत, कवी, कादंबरीकार, शिक्षक व एक चांगला माणूस यांपैकी कवीची वेगळ्या पैलूंनी अक्रम पठाण यांनी समीक्षा केली आहे. या ग्रंथात मनोहरांच्या काव्यातील सामाजिक आशयाभिव्यक्तीसोबतच क्रांतिभिमुखता अक्रम पठाण यांनी अधोरेखित केली आहे.

अक्रम पठाण यांचे ‘कवितेची युद्धशाळा’ हे कवितेचे समीक्षेचे पुस्तक २०२० मध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकात त्यांनी क्रांतीची परिभाषा मांडत अन्यायाविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या १४ कवींच्या १७ कवितासंग्रहांवर समीक्षा लिहिली आहे. या ग्रंथात काव्यसंग्रहावर केलेली समीक्षा मानवमुक्तीसह स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि मानवी मूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या कवींच्या काव्यसंग्रहांचा विचार केला आहे. यात प्रभाकर दांडेकर, प्रमोद वाळके, केतन पिंपळापुरे, विमल वाघमारे, संजय गोडघाटे, महेंद्र ताजणे, सुरेश वर्धे, महेंद्रकुमार मेश्राम, संध्या रंगारी, भूषण रामटेके, मनोहर नाईक, विशाल इंगोले आदी कवींच्या कवितांची वेगवेगळ्या अंगाने समीक्षा केली आहे.

हे सर्व निवडलेले कवी अन्यायाविरुद्ध लढणारे आणि विद्रोहाची मशाल हातात घेऊन लेखणी करणारे कवी आहेत. सामाजिक जाणिवांतून व्यक्त होणाऱ्या आक्रोशाची न्यायतत्त्वातहत मांडणी करण्यासाठी ही कवितेची युद्धशाळा भरविण्यात आली आहे.

‘सभ्यतेचा गौरव : हिफजूर रहमान’ हा अक्रम पठाण यांचा शेवटचा ८८ पृष्ठांचा छोटेखानी ग्रंथ आहे. तो याच वर्षी प्रकाशित झाला. आपल्यावर दिलेली जबाबदारी सांभाळताना आपला विवेक ढळू न देणाऱ्या व्यक्तीची नोंद समाज निश्चितच घेत असतो. हिफजूर रहेमान यांनी शिक्षण क्षेत्रात महत्त्वाच्या पदांवर कार्यरत राहिलेल्या प्रामाणिक अधिकाऱ्याची समाजाला करून दिलेली ही ओळख म्हणता येईल.

शिक्षण विभागात मुख्याध्यापक ते राज्य लोकसेवा आयोगामार्फत  शिक्षण विभागातील प्रशासकीय सेवेत दाखल झालेल्या हिफजूर रहमान यांनी शिक्षण विभागात महत्त्वाच्या पदांवर नोकरी केली. नोकरीच्या काळात त्यांनी घेतलेले निर्णय आणि कार्यसभ्यतेचा गौरव ‘हिफजूर रहमान’ या पुस्तकात अक्रम पठाण यांनी केला आहे. पुस्तकातील समाविष्ट अनुभवांची शिदोरी वाचकांना माणूसपणाची ऊर्जा पुरवणारी आहे. हिफजूर रहमान यांचे व्यक्तिमत्त्व व कार्याचे पैलू उलगडताना ‘संस्कार शिबिरात उगवलेले सभ्य झाड’, बंडाची ऊर्जा देणारा मुख्याध्यापक’, ‘सामाजिक बांधिलकी जपणारा अधिकारी’, भ्रष्टाचाराच्या अंधकारात तेजाळणारी उजेड ज्योत’, ‘एक रुपया मानधन घेणारा शैक्षणिक सल्लागार’, ‘इस्लामच्या महामूल्यांचा निष्ठावंत प्रचारक’ अशा लेखांच्या आधारे हिफजूर रहेमान यांचे व्यक्तिमत्त्व उलगडण्यात आले आहे.

डॉ. मनोहर राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार हिंगणपाट, विदर्भ संशोधन मंडळाचा ‘बाळाजी हुद्दार’ पुरस्कार, शाहीर अमर शेख राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार बार्शी, विदर्भ साहित्य संघाचा ‘नवोदित ‘साहित्यलेखन’ आदी पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

डॉ. अक्रम पठाण यांनी आपल्या ४० वर्षांच्या काळात वरील साहित्य संपदा लिहिली. ते नव्या पिढीतील एक महत्त्वाचे समीक्षक व मुस्लिम मराठी साहित्याचे आधारस्तंभ होते. अलीकडच्या काळात प्रकाशित झालेल्या त्यांच्या पुस्तकांमधून याचे प्रत्यंतर येते. त्यांच्या लिखाणातून साहित्यकृतीच्या मर्माचा वेध घेण्याची समीक्षेची क्षमता सतत वृद्धिंगत होत होती. त्यांचा वाङ्मयीन दृष्टिकोन भारतीय संविधानावर आधारित होता. कोरोनाच्या वैश्विक महामारीच्या काळात आपण मुस्लिम मराठी साहित्याचा साक्षेपी अभ्यासक, साहित्याचा मर्मज्ञ विश्लेषक आणि नवीन पिढीच्या समीक्षकाला कायमचे मुकलो आहे.

- डॉ. ताहेर पठाण

(लेखक अलीगड मुस्लिम विद्यापीठात मराठी भाषा विभागाचे प्रभारी आहेत.)

(सौजन्य : डेक्कन क्वेस्ट मराठी)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget