Halloween Costume ideas 2015

बोल के लब आज़ाद है तेरे

ज्यांना हिंसा आणि दहशतवाद दिसतो, त्यांच्याकडे गप्प राहणं एवढा एकच पर्याय उरला की दहशतवाद यशस्वी होतो


आजची संस्कृती हीच आता भयाची संस्कृती झाली आहे. तुमचं घाबरलेलं असणं ही तुमची इथे राहण्याची पूर्वअट झालेली आहे. ज्यांना हिंसा आणि दहशतवाद दिसतो, त्यांच्याकडे गप्प राहणं एवढा एकच पर्याय उरला की दहशतवाद यशस्वी होतो. हे ज्यांना कळतं ते दहशतवादाला हरवण्यासाठी भीती सोडतात, बोलत राहतात.
    दोन महिन्यांपूर्वी नेहमीसारखी रेल्वेने दिल्लीला निघाले होते. गेल्या दोन वर्षांत हा प्रवास इतका सवयीचा झालाय की काही दिवस एका गावात राहिले की हटकून मला आवडणार्या या रेल्वे रुळांची आठवण येऊ लागते. महाराष्ट्र आणि दिल्लीसारखंच ‘भारतीय रेल्वे’ हे सुद्धा जवळपास माझं घर होण्यात जमा आहे. मात्र हा प्रवास वेगळा होता. अगदी गाडीत चढल्यापासून जाणवू लागलं की आज इथे काही तरी वेगळा माहोल आहे.
    आरडाओरडा, भांडणं, गप्पा, चेष्टामस्करीचं खास मिश्रण असलेली रेल्वे आज वेगळ्या मूडमध्ये होती. नुकताच पुलवामा हल्ल्याला उत्तर म्हणून ‘बालाकोट स्ट्राइक’ झाला होता. ‘अरे तीनसौ मारे है उनके! हमको समझ क्या रक्खा था’ मुंबईहून निघालेला बिझनेसमन लोकांचा गट मोठ्याने बोलत होता. दोघं तरुण मुलं मोबाइलवर कुठल्या तरी चॅनलचा व्हिडिओ पाहत होती आणि अॅँकर ओरडत होता की, पाचशे पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले. रेल्वे धावत होती तसा बिझनेसमन गटातला उत्साह वाढत गेला. त्यांचा आवाज आणि प्रत्येक वाक्यातलं शिव्यांचं प्रमाण रेल्वेपेक्षाही वेगानं पळत होतं. पाकिस्तानी दहशतवाद्यांवरून गाडी कधी काश्मिरी लोकांकडे, तर कधी मुसलमानांकडे जात होती. गोंगाट एका अश्लाघ्य अवस्थेला पोहोचला तेव्हा डब्यातली एकटी वृद्ध स्त्री खिडकीबाहेर पाहू लागली होती. गाडी थांबेपर्यंत तिने नजर आत वळवलीच नाही. क्षणभर माझ्या मनात आलं, बरं झालं मी काश्मिरी नाही किंवा मुस्लिम नाही-आणि पोटात चरकलं. जर या डब्यात याक्षणी मी खरंच काश्मिरी मुस्लिम असते तर? अशाच एका रेल्वेच्या डब्यात छोट्या जुनैदला रेल्वेतल्या जमावाने मारून टाकलं त्याला फार दिवस झालेले नाहीत. जुनैदचा चेहरा आठवत ती रात्र रेल्वेमध्ये काढताना माझ्या लक्षात आलं की आणखी किती तरी लोकांची अशीच झोप उडालेली असणार प्रवास संपेपर्यंत.
    न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्चमधल्या मशिदींवरच्या हल्ल्याची जखम ताजी असतानाच परवा ईस्टरच्या दिवशी श्रीलंकेत गोळीबार झाला. मला आठवतंय, 26/11च्या मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कित्येक दिवस आमच्या शाळेबाहेर मुलांना सोडायला आलेले आईबाप नुसतेच घुटमळत राहायचे. दिवसन्र्ात्र टीव्हीवर पुन्हा पुन्हा हल्ल्यांचं आणि जखमी झालेल्या माणसांचं फुटेज दिसत राहिलं. काही दिवसांनी कुणी तरी सांगितलं की आपण असं घाबरून राहावं म्हणूनच तर असे हल्ले होत असतात, अशा वेळीच तर हिंमत दाखवायची असते! तेवढ्या वाक्यानेच आम्ही मुलं आईवडिलांना धीर देऊन घराबाहेर पडायची हिंमत करू लागलो होतो.
    परवा साध्वी प्रज्ञा ‘माझ्या शापाने करकरे मेले’ म्हणाली तेव्हा हे 26/11चे दिवस आठवले. दहशतवाद थांबवताना शहीद झालेले करकरेंसारखे पोलिस अधिकारी आहेत, एवढं आठवूनच माझ्यासारख्या किती तरी मुलामुलींना तेव्हा रात्री झोप लागत होती. मात्र, 26/11 च्या आधीही करकरेंनी दहशतवादाविरोधात अनेकदा लढा दिला होता. 2008 मध्ये मालेगावमध्ये मुस्लिमांना लक्ष्य करून बॉम्बस्फोट झाला होता. या घटनेची चौकशी करून हेमंत करकरेंनी कट्टर हिंदुत्ववादी संघटना ‘अभिनव भारत’सोबत जोडलेल्या दहशतवाद्यांना अटक केली होती. या दहशतवाद्यांपैकी एक म्हणजे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर. सध्या तब्येतीच्या कारणामुळे जामिनावर असलेली ही साध्वी प्रज्ञा भाजपतर्फे भोपाळची उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. मालेगाव बॉम्बस्फोटाव्यतिरिक्त अजमेर दर्ग्यावरच्या बॉम्बस्फोटाच्या चौकशीमध्येही साध्वी प्रज्ञाचं नाव घेतलं गेलं होतं. भारत-पाकिस्तानला जोडणार्या ‘समझोता एक्सप्रेस’वरचा बॉम्बहल्ला, हैदराबादच्या मक्का मशिदीवरचा हल्ला, 2006 पासून वाढत गेलेल्या या हल्ल्यांची यादी मोठी आहे. ‘विवेक’ या आनंद पटवर्धनांच्या माहितीपटात दाखवलेली या दहशतवादाची मालिका अंगावर काटा आणते. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांनी गेल्या काही वर्षांत देशाला हादरवून टाकलं. मात्र, दुःखाची गोष्ट ही की या सगळ्या घटनांपुरता हा दहशतवाद मर्यादित नाही. दहशत पसरवणार्या काही संघटनांबाहेर त्यांचा दहशतवाद सांडतो आहे. 2012 पासून गोहत्येच्या खोट्या संशयावरून देशभरातल्या 88 दलित आणि मुस्लिम माणसांचे खून झाले आहेत, त्यातल्या 86 घटना 2014 नंतरच्या आहेत. हे सगळे खून दिवसाढवळ्या भर रस्त्यात झाले आहेत. रस्त्यावरचे जमावच यातले खुनी आहेत. याशिवाय जवळपास 300 लोक अशा जमावांच्या दहशतीमध्ये गंभीर जखमी झाले आहेत.
    26/11 नंतरच्या काही दिवसांमध्ये वाटणारी दहशत गेल्या काही वर्षांत रोजच्या जगण्याचा भाग कधी बनून गेली हे कळलंच नाही. ज्यांना-ज्यांना हा दहशतवाद दिसला आणि त्यांनी त्याबद्दल बोलायचा प्रयत्न केला, त्या सगळ्यांना जिवाची भीती लागून राहिली. पत्रकार रविश कुमार त्यांच्या ‘फ्री व्हॉइस’ या पुस्तकात म्हणतात की, आजची संस्कृती हीच आता भयाची संस्कृती झाली आहे. तुमचं घाबरलेलं असणं ही तुमची इथे राहण्याची पूर्वअट झालेली आहे. ज्यांना हिंसा आणि दहशतवाद दिसतो, त्यांच्याकडे गप्प राहणं एवढा एकच पर्याय उरला की दहशतवाद यशस्वी होतो. हे ज्यांना कळतं ते दहशतवादाला हरवण्यासाठी भीती सोडतात, बोलत राहतात. 2016 मध्ये आलेल्या ‘अ बिलियन कलर स्टोरी’ या सुंदर सिनेमातला छोटा मुलगा हरी अझीझ म्हणतो, ‘आपण बोलत राहिलो तरच या देशातलं काव्य टिकून राहील’.
उदय प्रकाशांची कविता आहे -
आदमी मरने के बाद
कुछ नही बोलता
आदमी मरने के बाद
कुछ नही सोचता
कुछ नही बोलने
और कुछ नही सोचने पर
आदमी मर जाता है...
    जिवंतपणीच प्रेतं बनून फिरणार्या जमावाचा हा देश होतो की काय अशी भीती वाटते आहे. मात्र, या भीतीला भेदायची धगही इथलं जिवंत काव्य आपल्याला देत राहतं.
    1992 मध्ये राजस्थानात बालविवाहाविरोधात काम करणार्या भंवरी देवी या ‘साथिन’ कार्यकर्तीवर अमानुष बलात्कार झाला. एक सामान्य कुंभार स्त्री गावात काही बदल आणू पाहते हे तिथल्या तथाकथित उच्चजातीय लोकांना सहन झालं नाही आणि पाच पुरुषांनी तिच्यावर अमानुष बलात्कार केला. भंवरी देवीने न्याय मागण्यासाठी मोठा संघर्ष केला. तिच्या या संघर्षाची आंतरराष्ट्रीय दखल घेतली गेली, तिच्यावर ‘भवंडर’ हा सिनेमाही येऊन गेला, पण तिला अजूनही न्याय मिळाला नाही. भंवरी देवी खचली नाही. तिचे गुन्हेगार मोकळे असतानाही त्याच गावात ती संघर्ष करत राहिली. तिने तिच्या हद्दीत भीतीला शिरूच दिलं नाही.
    ख्राइस्टचर्चमधल्या घटनेनंतर तिथल्या अल-नूर मशिदीतल्या हल्ल्यातून कसेबसे वाचलेले तिथले इमाम त्याच ठिकाणी झालेल्या सभेत म्हणाले, ‘त्या दहशतवाद्याच्या डोळ्यांत मला प्रचंड द्वेष दिसला, मात्र आज तुम्हा सगळ्यांच्या डोळ्यांत मला प्रेम आणि करुणा दिसते आहे. जगभरातल्या नेत्यांनी हा द्वेष संपवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, हेच आज इथली न्यूझीलंडची जनता सांगते आहे’. त्यांच्या समोरच्या जनसमुदायामध्ये ख्राइस्टचर्चमधले मुस्लिमच नाही, तर ख्रिश्चन आणि इतर धर्मीय नागरिकही उभे होते. त्यांची राष्ट्राध्यक्ष जसिंडा आर्डनसुद्धा हल्ल्यामध्ये आपली माणसं गमावलेल्या मुस्लिम स्त्रियांसोबत तिथे उभी होती.
    आपली संस्कृती ‘बिलियन’ रंगीबेरंगी माणसांच्या गर्दीची आहे, ती द्वेषाच्या आगीत धुमसणार्या जमावाची नाही. भीतीमुळे जिवंतपणीच मेलेल्या जनतेची तर ती नाहीच नाही. इथल्या लहान मुलांचा आपल्या निर्भीड उच्चारावरचा आणि देशातल्या काव्यावरचा विश्वास टिकावा म्हणून दहशतवादाला आव्हान देत वार्यावर हलकेच ‘फैज’च्या ओळी पुन्हा ऐकू येतात,
‘बोल के लब आजाद है तेरे,
बोल जुबां अब तक तेरी है!’

या ओळी गुणगुणताना माझ्या लक्षात आलं की रेल्वेचा प्रवास संपला होता आणि मी एका भक्कम प्लॅटफॉर्मवर उभी होते ! -
    (साभार - दिव्य मराठी रसिक पुरवणी)

- राही श्रु.ग.
9096583832

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget