Halloween Costume ideas 2015

अन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(९७) ...त्यांचे आत्मे जेव्हा दूतांनी कब्जात घेतले तेव्हा त्यांना विचारले की तुम्ही या कसल्या धिक्कारलेल्या दशेत गुरफटला होता? त्यांनी उत्तर दिले की, आम्ही पृथ्वीवर निर्बल व  विवश होतो. दूतांनी सांगितले की अल्लाहची पृथ्वी विशाल नव्हती काय की तुम्ही देशत्याग करून दुसरीकडे जावे?१३० अशा लोकांचे ठिकाण जहन्नम (नरक) आहे. आणि ते फारच  वाईट ठिकाण आहे.
(९८) परंतु जे पुरुष, ज्या स्त्रिया व जी मुले खरोखरच विवश आहेत आणि देशांतराचा कोणताच मार्ग आणि साधन सापडत नाही,
(९९) हे दूर नव्हे की अल्लाह त्यांना माफ करील. अल्लाह मोठा माफ करणारा व क्षमा करणारा आहे.
(१००) जो कोणी अल्लाहच्या मार्गात देशांतर करील तो पृथ्वीवर आश्रय घेण्यासाठी मुबलक जागा व उदरनिर्वाहासाठी मोठी सुबत्ता प्राप्त करील आणि जो आपल्या घरातून अल्लाह व  पैगंबराकडे देशांतरासाठी निघाला, नंतर त्याला वाटेतच मृत्यू आला, त्याचा मोबदला अल्लाहजवळ अनिवार्य ठरला, अल्लाह फार क्षमा करणारा व कृपाळू आहे.१३१
(१०१) आणि जेव्हा तुम्ही प्रवासाला निघाल तर याच्यात काही हरकत नाही की तुम्ही नमाजला संक्षिप्त करावे१३२ (विशेषत:) जेव्हा तुम्हाला भीती वाटेल की अश्रद्धावंत तुम्हाला  सतावतील१३३ कारण ते उघडउघड तुमच्या शत्रुत्वावर आहेत. काफिर (विरोधक).
१३०) म्हणजे एकीकडे अल्लाहच्या विद्रोहींचा प्रभाव होता आणि इस्लामी जीवनपद्धतीनुसार आचरण करणे शक्य नव्हते तर अशा स्थितीत तिथे राहाणे गरजेचे नव्हतेच. त्या जागेला  सोडून त्यांनी अशा भूभागावर स्थलांतर का केले नाही, जिथे इस्लामी जीवनपद्धतीचे पालन करणे शक्य होते?
१३१) येथे हे समजून घेतले पाहिजे की ज्याने इस्लामी जीवनपद्धतीवर (अल्लाहच्या दीन) ईमान धारण केले त्याच्यासाठी इस्लामी जीवनपद्धतीऐवजी इतर पद्धत किंवा अधार्मिक  जीवनव्यवस्थेच्या आधीन राहून जीवन जगणे दोनच स्थितीत वैध ठरू शकते. एक म्हणजे इस्लामी जीवनपद्धतीला या भूभागावर प्रभावशील बनविण्यासाठी आणि अधार्मिक  जीवनव्यवस्थेला इस्लामी जीवनव्यवस्थेत बदलण्यासाठी संघर्ष करीत राहाणे. हे प्रयत्न आणि संघर्ष ज्याप्रकारे पैगंबर मुहम्मद (स.) आणि त्यांचे प्रारंभिक अनुयायी (सहाबा) करीत  होते, त्याचप्रमाणे होणे आवश्यक आहे. दुसरी स्थिती म्हणजे येथून वास्तविकपणे बाहेर पडण्यासाठीचा मार्ग आणि संधी त्याला प्राप्त् होत नसावी आणि अत्यंत घृणेसह आणि  अनिच्छेसह तेथे उपायहीन म्हणून थांबलेला असावा. या दोन परिस्थितीऐवजी प्रत्येक परिस्थितीत इस्लामेतर आणि अधार्मिक जीवनव्यवस्थेच्या आधीन राहून जीवन जगणे महापाप  आहे. काहींना या हदीसमुळे भ्रम झाला आहे की मक्का विजयानंतर आता हिजरत नाही. खरे तर ही हदीस काही स्थायी आदेश मुळीच नाही. तात्कालिन परिस्थितीमध्ये अरबांना तो  हदीसचा आदेश तात्पुरत्या स्वरुपाचा होता. जोपर्यंत अरबांचा एक मोठा हिस्सा इस्लामेतर आणि अधार्मिक राज्याचा होता आणि फक्त मदीना आणि लगतच्या भागांमध्ये इस्लामी कायदे  लागू होत होते. तेव्हा मुस्लिमांना सक्त आदेश होता की सर्व बाजूंकडून एकत्रित होऊन इस्लामी राज्यात यावे. परंतु जेव्हा मक्का विजयानंतर अनेकेश्वरवादी प्रभाव आणि जोर कमी  होत गेला आणि जवळ जवळ पूर्ण देश इस्लामी शासनप्रणालीच्या आधीन झाला तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की आता हिजरतची आवश्यकता राहिलेली नाही. याचा अर्थ  हा होत नाही की तमाम जगातील मुस्लिमांसाठी सर्व परिस्थितीत कयामतच्या दिवसापर्यंत हिजरतचे अनिवार्य होणे समाप्त् झाले आहे.
१३२) शांतीकाळात प्रवासात नमाजला लहान करणे (कस्त्र) म्हणजे ज्यात चार रकअत अनिवार्य आहेत तिथे दोन रकअतच  नमाज अदा करावी. युद्धाच्या वेळी कमी करण्यासाठी (कस्त्र)  सीमा निश्चित केलेली नाही. युद्धस्थिती ज्याप्रकारे परवानगी देईल नमाज त्याचप्रकारे अदा केली जाईल. सामुस्रfयक (जमात) रित्या नमाज अदा करण्याची संधी असेल तर ठीक अन्यथा  वेगवेगळी नमाज प्रत्येकाने अदा करावी. काबागृहाकडे दिशा नसेल (किबला) तरीही, स्वारीवर स्वार असताना आणि चालतानाही नमाज अदा केली जाऊ शकते. कपड्यांना रक्त माखलेले  असेल तरीही नमाज अदा करता येते. या सर्व सुविधांऐवजी अशी खतरनाक स्थिती असेल की कोणत्याही स्थितीत नमाज अदा होऊच शकत नाही तर अशा स्थितीत मजबुरीत पुढील  वेळेसाठी नमाज तहकूब केली जावी जसे खंदकच्या युद्धासमयी घडले होते.
१३३) जाहिरीयांनी आणि खारजीयांनी असा अर्थ काढला की कसर नमाज (कमी नमाज) फक्त लढाईच्या स्थितीत आहे आणि शांतीकाळात प्रवासात `कसर' नमाज अदा करणे  कुरआनविरुद्ध आहे. परंतु हदीसच्या प्रामाणिक कथनांद्वारा सिद्ध आहे की माननीय उमर (रजि.) यांनी हीच शंका पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यासमोर सादर केली तेव्हा पैगंबर मुहम्मद  (स.) यांनी सांगितले, ``ही कसरची परवानगी एक देणगी आहे ज्याला अल्लाहने तुमच्यासाठी दिली आहे. म्हणून त्याच्या देणगीचा स्वीकार करा.'' हे परंपरागत सिद्ध आहे की पैगंबर  मुहम्मद (स.) यांनी भय आणि शांतीकाळात कसर नमाज अदा केली आहे. इब्ने अब्बास तपशील देतात, पैगंबर मुहम्मद (स.) मदीनाहुन मक्का येथे गेले आणि त्या वेळी  अल्लाहशिवाय कोणाचीही भीती नव्हती. परंतु पैगंबर मुहम्मद (स.) यांनी (प्रवासात) दोनच रकअत नमाज अदा केली होती. ``म्हणून मी अनुवाद करतांना'' ``विशेषत:'' कोष्टकात  टाकले आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget