Halloween Costume ideas 2015

अन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

१०२) आणि हे नबी (स.)! जेव्हा तुम्ही मुस्लिमांच्या दरम्यान असाल आणि (युद्धाच्या स्थितीत) त्यांना नमाज पठण करविण्यासाठी उभे असाल१३४ तर हे आवश्यक आहे की१३५  यांच्यातील एक गट तुमच्याबरोबर उभा राहावा आणि आपले हत्यार घेऊन असावा, नंतर त्याने जेव्हा सजदा केला असेल तेव्हा त्याने पाठीमागे जावे आणि दुसरा गट ज्याने अद्याप   नमाज अदा केली नाही, त्याने येऊन तुमच्यासह नमाज अदा करावी आणि त्यानेसुद्धा जागरूकराहावे व सशस्त्र असावे,१३६ कारण विरोधक (कुफ्फार) यासाठी टपून आहेत की तुम्ही  आपले हत्यार आणि आपल्या सामानाविषयी थोडेदेखील गाफील झालात तर ते एकदम तुमच्यावर तुटून पडतील, परंतु जर तुम्हाला पावसामुळे त्रासाचे वाटत असेल अथवा आजारी  असाल तर शस्त्र दूर ठेवण्यात काहीही हरकत नाही, तरीसुद्धा जागरूक राहा. विश्वास ठेवा की अल्लाहने अश्रद्धावंतांसाठी काफिरांसाठी (विरोधकांसाठी) अपमानजनक शिक्षा तयार ठेवली आहे.१३७
(१०३) नंतर जेव्हा नमाज आटोपून घ्याल तेव्हा उभे असताना, बसले असताना किंवा पहुडले असतानादेखील प्रत्येक स्थितीत अल्लाहचे स्मरण करीत राहा व जेव्हा शांतता लाभेल तर  पूर्ण नमाज पठण करा. नमाज वास्तविक पाहता असे अनिवार्य कार्य आहे जे नियमित वेळेसह ईमानधारकांसाठी आवश्यक केले गेले आहे.



१३४) इमाम अबू यूसुफ आणि हसन बिन जियाद यांनी या आयतच्या शब्दाने असा अर्थ घेतला आहे, `भीतीच्या स्थितीतील नमाज' (सलातेखौफ) केवळ पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या  काळासाठीच होती. परंतु कुरआनमध्ये याची अनेक उदाहरणे आहेत की पैगंबर मुहम्मद (स.) यांना संबोधन करून एक आदेश दिला आहे आणि तोच आदेश पैगंबरानंतर अनुयायांनासुद्धा  लागू आहे. म्हणून भयस्थितीतील नमाजला (सलातेखौफ) पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यापुरताच आदेश म्हणणे योग्य नाही. अनेक महान सहाबींद्वारा सिद्ध आहे की त्यांनी पैगंबर  मुहम्मद (स.) यांच्या नंतरसुद्धा `भय नमाज' अदा केली आहे. याविषयी सहाबी समुदायात मतभेदसुद्धा दिसून येत नाही.
१३५) भयस्थितीतील नमाजचा (सलातेखौफ) आदेश त्या स्थितीत जेव्हा शत्रूच्या हल्ल्याची भीती असेल परंतु प्रत्यक्षात युद्ध छेडले गेले नसेल. जेव्हा युद्ध प्रत्यक्षात सुरु असेल तर  हनफिया मतानुसार नमाज पुढील वेळेसाठी स्थगित केली जाईल. इमाम मालिक (रह.) इमाम सौरी यांच्या मतानुसार रुकूअ आणि सजदा शक्य नसेल तर इशाऱ्याद्वारे नमाज अदा  केली जावी. इमाम शाफईच्या मतानुसार नमाजच्याच स्थितीत थोडासा मुकाबलासुद्धा करू शकता. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या कार्यप्रणालीपासून सिद्ध आहे की पैगंबर मुहम्मद (स.)  यांनी खंदकच्या युद्धाप्रसंगी चार वेळची नमाज अदा केली नव्हती आणि संधी मिळताच क्रमश: त्यांना अदा केले. जेव्हा की खंदक युद्धापूर्वी भयाची नमाजचा (सलातेखौफ) आदेश आलेला होता.
१३६) भयस्थितीत नमाज कशी अदा केली जावी हे युद्धस्थितीवर अवलंबून आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी विभिन्न परिस्थितीत वेगवेगळया प्रकारे नमाज अदा केलेली आहे.   काळानुरूप इमामला हा अधिकार आहे की युद्ध परिस्थितीनुसार योग्य पद्धतीचा त्याने स्वीकार करावा. एक पद्धत ही आहे की सैन्याची एक तुकडी इमामसह नमाज अदा करील आणि  दुसरी तुकडी शत्रूशी मुकाबला करीत राहील जेव्हा एक रकअत पूर्ण झाली तर सलाम फेरून पहिल्या तुकडीने मोर्चा सांभाळावा आणि दुसरी रकत सैन्याच्या दुसऱ्या तुकडीने इमामच्या  मागे पूर्ण करावी. अशाप्रकारे इमामची दोन रकअत आणि सैन्याची एक एक रकअत नमाज होईल. दुसरी पद्धत ही आहे की इमामसोबत सैन्याची एक तुकडी एक रकअत अदा करून  मोर्चा संभाळील तर दुसरी तुकडी इमामच्यामागे दुसरी रकअत पूर्ण करील नंतर जसा वेळ मिळेल राहिलेली एक एक रकअत दोघांनी अदा करावी. अशाप्रकारे दोन्ही तुकड्यांची एक एक  रकअत इमामच्यामागे आणि एक एक रकअत ते स्वतंत्ररित्या अदा करतील. मिळून दोन रकअत पूर्ण होतील. तिसरी पद्धत इमामच्या मागे सैन्याच्या एका तुकडीने दोन रकअत नमाज  अदा करावी आणि तशहदुद (अत् हिय्यात व दरुद) नंतर सलाम फेरुन त्यांनी मोर्चा संभाळावा तिसऱ्या रक़अतीत दुसरी तुकडीने नमाज मध्ये इमामच्या पाठीमागे सामील व्हावे आणि   दोन रकअत पूर्ण कराव्यात.
अशाप्रकारे इमामच्या चार रकअत आणि सैन्याच्या दोन दोन रकअती होतात. चौथी पद्धत ही आहे की सैन्याची एक तुकडी इमामबरोबर एक रकअत अदा करेल आणि मोर्चा संभाळेल  जेव्हा इमाम दुसऱ्या रकअतीसाठी उभा राहील तेव्हा दुसरी तुकडी नमाज इमामच्या मागे अदा करेल. यासाठी इमाम यांना दसऱ्या रकअत मध्ये दीर्घ कयाम करावा लागतो. पहिल्या पद्धतीला इब्ने अब्बास, जाबिर बिन अब्दुल्लाह आणि मुजाहिद (रजि.)यांनी कथन केले आहे. दुसऱ्या पद्धतीला अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांनी कथन केले आहे आणि हनफिया  यास प्राथमिकता देते. तिसऱ्या पद्धतीला हसन बसरी (रह.) यांनी अबू बकर (रजि.) यांच्या कथनानुसार घेतले. चौथ्या पद्धतीला इमाम शाफई आणि इमाम मालिक यांनी थोड्या  मतांतराने प्राथमिकता दिली आहे. याचे स्त्रोत सुहेल बिन हस्मा यांचे कथन आहे. याव्यतिरिक्त असुरक्षेच्या अवस्थेत अदा केली जाणारी नमाजच्या आणखी पद्धती आहेत. याविषयीचा  तपशील इस्लामी धर्मविधानाच्या ग्रंथात उपलब्ध आहे.
१३७) म्हणजेच ही सतर्कता ज्याचा आदेश दिला जात आहे ती फक्त भौतिक उपायांच्या दृष्टीने आहे. तुमच्या उपायांवर जयपराजयाचा निर्णय अवलंबून नाही तर अल्लाहच्या निर्णयावर  आहे. म्हणून या सतर्कतापूर्ण पूर्वउपायांना व्यावहारिक रूप देताना तुम्हाला यावर विश्वास ठेवला पाहिजे की जे कोणी अल्लाहच्या प्रकाशाला पुंâकर घालून विझवू इच्छितात, त्या सर्वांना  अल्लाह अपमानित करील.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget