Halloween Costume ideas 2015

बदरचे युद्ध

जिंदा रहेना है तो हालात से डरना कैसा
जंग लाजिम हो तो लष्कर नहीं देखे जाते
इस्लाम हा समतावादी धर्म असल्या कारणाने पृथ्वीवर जेथे कोठेही त्याचा नावाचा उच्चार केला जातो तेथे प्रस्थापितांमधून त्याचा विरोध सुरू होतो तर सामान्य जनतेतून त्याचे स्वागत  केले जाते. गार-ए-हिरामधून प्रेषित्व बहाल झाल्यावर हजरत मुहम्मद मुस्तफा (सल्ल.) यांनी इस्लामची घोषणा करताच ज्या मक्का शहरामध्ये त्यांना अमीन (विश्वासपात्र) आणि  सादीक (खरा) म्हणून ओळखले जात होते त्याच शहरात त्यांचा विरोध सुरू झाला. हा विरोध शोषित समाजाकडून नव्हे तर प्रस्थापितांकडून झाला.
मक्का शहर त्यावेळी अरबास्थानाची आर्थिक राजधानी होती. तेथील काबागृहामध्ये 360 मुर्त्या ठेवलेल्या होत्या. प्रत्येक मुर्ती ही अनेक कबिल्यांची कुलदैवत होती. त्या काळातील  टोळ्यांवर आधारित समाजरचनेमध्ये कुलदैवतेचे अनन्यसाधारण महत्व होते. प्रत्येक टोळीमध्ये ज्या काही चांगल्या घटना घडत होत्या त्या मक्केमधून येऊन आपल्या कुलदैवतेसोबत  साजऱ्या केल्या जात होत्या. वर्षातील 360 दिवस अखंडपणे विविध टोळया मक्का शहरात येत आणि बकरे, ऊंट व पूजेचे इतर साहित्य खरेदी करत. तेथे काही दिवस मुक्काम करत आणि परत जात. त्यामुळे मक्का शहरात चारही बाजूंनी पैशाचा ओघ सातत्याने येत होता. 360 दिवसांचा हा अखंड रतीब तर राहिलेले पाच दिवस हजचा उत्सव, त्यात तर लोकांच्या उत्साहाला उधान येई व पैशांच्या राशी मक्का शहराच्या व्यापाऱ्यांसमोर पडत. थोडक्यात मक्का हे अरबस्थानाचे एकमेव तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र झाले होते. त्यामुळे साहजिकच तेथे राहणारे सर्व कबिले खासकरून ’कुरैश’ कबिला सर्वार्थाने संपन्न झालेला होता. स्पष्ट आहे जेव्हा प्रेषितांनी 360 मुर्त्यांना नाकारून एका ईश्वराची उपासना करण्याचा संदेश दिला तेव्हा  त्या सर्व कबिल्यांचा डोळ्यासमोर त्यांचा आर्थिक मृत्यू दिसायला लागला. त्यांच्या अंगाचा तीळपापड झाला. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा संदेश याच कारणाने त्यांनी नाकारला. त्यांना  स्वतः आपल्या हाताने आपल्या अर्थव्यवस्थेची मान आवळने शक्य झाली नाही. त्यांनी सर्व शक्तीनिशी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा विरोध सुरू केला. मात्र त्याचवेळेस त्याच शहरातील  प्रस्थापितांच्या अत्याचाराला कंटाळलेल्या शोषित लोकांना प्रेषित सल्ल. यांचा संदेश आवडला व तो त्यांनी अत्यंत प्रेमाने स्वीकारला देखील. मुठभर शोषितांनी जेव्हा प्रेषित मुहम्मद सल्ल. यांची साथ देण्यास सुरूवात केली तेव्हा प्रस्थापितांना ही गोष्ट रूचली असती तरच नवल. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्या गरीबांना त्रास देण्यात सुरूवात केली. इतका त्रास की त्यांना  मक्का शहरात राहणे अशक्य झाले. तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी त्यांच्यापैकी काही लोकांना तत्कालीन शेजारील राष्ट्र हबशमध्ये हिजरत (स्थलांतर) करण्याचा आदेश दिला. सातत्याने 13  वर्षे प्रयत्न करूनही मक्का शहरातील प्रस्थापितांनी इस्लामचा स्वीकार केला नाही. याउलट मक्का शहराच्या आजूबाजूच्या इलाख्यामध्ये मात्र इस्लामचा स्विकार करणाऱ्यांची संख्या  सातत्याने वाढत गेली. कारण ते लोक मक्काच्या रहिवाशांसारखे संपन्न नव्हते. विशेषतः मक्क्यापासून जवळ असलेल्या मदिना शहरातील लोकांना प्रेषितांचा संदेश खूप भावला. मक्का  पेक्षा मदिनामध्ये इस्लामचा स्विकार करण्याची संख्या वाढत गेली. मदिनातून लोकांच्या झुंडीच्या झुंडी येऊन प्रेषित सल्ल. यांची भेट घेऊन त्यांच्या हातावर बैत (प्रेषितांच्या हातात हात  देऊन एकनिष्ठ राहण्याची शपथ घेणे) करत. याला बैत-ए-उक्बा असे म्हटले जाते. एकूण तीन वेळा बैत-ए-उक्बा झाल्या. तिसरी बैत-एउ क्बा प्रेषित्वाच्या बाराव्या वर्षी झाली. झाले  असे की, मदिनाच्या 75 सन्माननीय व्यक्तींचे एक शिष्टमंडळ हजसाठी आले होते. हज झाल्यानंतर त्या शिष्टमंडळाने एका रात्री प्रेषित सल्ल. यांची भेट घेऊन त्यांच्या हातावर बैत  केली व मदिनाला येण्याचे निमंत्रण देऊन सर्वार्थाने साथ देण्याची शपथ घेतली. या घटनेनंतर थोड्याच दिवसात अल्लाहच्या आदेशाने स्वतः प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी मदिना येथे  हिजरत केली. प्रेषितांच्या आगमनाने मदिनाचे एकूण वातावरणच ढवळून निघाले. त्या वातावरणाचे वर्णन ’शोधन’चे माजी संपादक आणि प्रेषितांचे चरित्रकार सय्यद इफ्तखार अहेमद  यांनी खालीलप्रमाणे केलेले आहे. ’’प्रेषितांनी आणलेला धर्म स्विकारणे म्हणजे प्रत्येकाने स्वतःविरूद्ध जाणे आणि सर्व लोकसमुहांनी स्वतः अंगीकारलेल्या वृत्ती, प्रवृत्ती, उद्दिष्टे अशा सर्व  गोष्टींना तिलांजली देऊन नव्या संकल्पना, नवी विचारधारा, जीवनाचा नवा अर्थ, ईश्वराच्या एकत्वाची संकल्पना स्विकारावी लागणार होती. लोक सहजासहजी हे करण्यास तयार नव्हते.’’(संदर्भ : मुहम्मद सल्ल. नवयुगाचे प्रणेते पान क्र. 289- 290).
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या यशस्वी हिजरती व त्यांना मदिना शहरात मिळालेल्या आश्रयामुळे मक्कावासियांचा नुसता जळफळाट झाला. यावर कडी तेव्हा झाली जेव्हा मदिनेहून औस या प्रतिष्ठित कबिल्याचे सरदार सअद बिन मआज रजि. उमराह (काबागृहाच्या दर्शना) साठी मक्का शहरात आले व आपले स्नेही उमैय्या यांचेकडे थांबले. एका दिवशी ते दोघे उमराह  करण्यासाठी काबागृहाकडे निघाले असता कुरैशचा सरदार अबु जहल त्यांना भेटला आणि उमय्या यांना विचारले की, ’’तुमच्या बरोबर हे गृहस्थ कोण?’’ उमैय्या यांनी सआद बिन  मआज रजि. यांचा परिचय करून देताच तो त्यांच्यावर खवळला आणि धमकी दिली की, ’’ तुम्ही उमैय्याचे पाहूणे नसले असते तर जिवंत परत जावू दिले नसते.’’ त्यावर हजरत  सआद रजि. ही चिढले व म्हणाले की, ’’तुम्ही आमच्यावर हज आणि उमराह करण्यासाठी बंदी घातली तर आम्ही मदिनाजवळचा महामार्ग रोखू, मग पाहू तुमचे व्यापारी काफिले कसे  जातात ते?’’ तेव्हा अबु जहलचे डोळे उघडले व प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या मदिना शहरात हिजरत करण्यामागचा अर्थ त्याला समजला. मक्का शहराचा जवळ-जवळ सर्व व्यापार  यमन आणि सीरियाशी होत होता व व्यापारी काफिले मदिनालगतच्या मार्गानेच जात होते. हजरत सआद रजि. यांनी तो मार्गच तोडण्याची धमकी दिली होती. या धमकीमुळे कुरैश  हादरले व सर्व व्यापाऱ्यांची तातडीने एक बैठक बोलाविण्यात आली व या विषयावर विचार करण्यात आला. शेवटी असे ठरले की, मदिना शहरामध्ये राहणारा एक सरदार ज्याचे नाव   अब्दुल्लाह बिन उबई होते व ज्याची मदिना शहराचा प्रमुख म्हणून निवड जवळ-जवळ निश्चित झाली होती. मात्र प्रेषित मुहम्मद सल्ल. मदिना शहरात आल्यामुळे त्याचे प्रमुखपद  आपोआपच रद्द झाले होते. प्रेषित सल्ल. यांचा अघोषितपणे मदिनाच्या बहुसंख्य लोकांनी आपला प्रमुख म्हणून स्वीकार केला होता. म्हणून अब्दुल्ला बिन उबई चिडून होता. याची  माहिती मक्कावासियांना होती. म्हणून त्यांनी त्याला पत्र लिहून प्रेषित सल्ल. व त्यांच्या साथीदाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्याची सूचना केली व त्यासाठी आवश्यक ती मदद देण्यासाठी तयार असल्याचे पत्रामध्ये नमूद केले.
ही गोष्ट जेव्हा प्रेषित सल्ल. यांना समजली तेव्हा त्यांनी अब्दुल्ला बिन उबईची भेट घेऊन त्याची समजूत काढली व त्याला या गोष्टीची जाणीव करून दिली की आमच्या विरूद्ध कारवाई करण्याच्या नादात त्याला स्वतःच्या नातेवाईकांशीच संघर्ष करावा लागेल व त्यात सर्वांची अतोनात हानी होईल. ही परिस्थिती लक्षात आणून दिल्याने दोन पत्रे मिळूनही  अब्दुल्ला बिन उबई गप्प बसला. तो काही करत नाहीये हे लक्षात आल्यावर मक्कावासियांनी मदिनावासियांच्या खोडी काढण्यास सुरूवात केली. त्यांच्या क्षेत्रात जाऊन त्यांच्या बकऱ्या  आणि उंट चोरण्याचा सपाटा लावला. काहीही करून एक मोठी शक्ती बनण्यापूर्वी प्रेषित सल्ल. व त्यांच्या साथीदारांना नामोहरम करण्याचा त्यांनी जणू चंगच बांधला. त्यांना स्वतःच्या  लष्करी शक्तीचा फार अभिमान होता. दरम्यान, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी मदिना शहरात येताच तेथील अनेक कबिल्यांशी विशेषतः ज्यू आणि ख्रिश्चन कबिल्यांशी वाटाघाटी करून  मदिना शहर सुरक्षित करून घेतले होते. इतिहासामध्ये याला मदिना करार म्हणतात. मक्कावासियांचे आक्रमण मदिनावर होणार याची खुनगाठ बांधून त्यांनी सर्व कबिल्यांची एकजूट  केली होती. त्यानंतर त्यांनी कुरैशच्या कुरापतींचे उत्तर कसे द्यावे? यासाठीची योजना आखण्यास सुरूवात केली. त्यांनी मदिना शहरातील सर्व कबिल्यांची बैठक घेऊन मक्कावासियांच्या  संभावित आक्रमणाविरूद्ध कशी रणनिती आखावी यासंबंधी चर्चा केली. तेव्हा मदिना वासियांनी विशेषतः अन्सार लोकांनी प्रेषित सल्ल. यांना सर्वाधिकार देऊन निर्णय घेण्याची विनंती  केली व त्यांच्या निर्णयावर जीव ओवाळून टाकण्याचा निश्चय व्यक्त केला.
प्रेषित सल्ल. नेहमी सावध राहत. लवकरच त्यांना एक बातमी समजली की अबु सुफियानच्या नेतृत्वाखाली एक मोठा व्यापारी काफला, व्यापार करून, साधन संपत्ती घेऊन, सीरियाकडून मक्का शहराकडे येत आहे. त्या काफिल्यासोबत 40-50 पेक्षा जास्त सुरक्षा सैनिक नाहीत. तेव्हा मदिनातील बहुतेक लोकांना वाटत होते की, प्रेषित सल्ल. यांनी या काफिल्याला लूटण्याची परवानगी द्यावी. काफिल्याचा प्रमुख अबु सुफियान स्वतः एक अत्यंत हुशार सरदार होता. त्यालाही या गोष्टीचा अंदाज आला होता म्हणून त्याने मदिना  शहराजवळ येण्याअगोदरच एक उंटस्वार मक्का येथे पाठवून लष्करी मदद मागीतली होती. अबु सुफियानचा निरोप मिळाल्याबरोबर कुरेशचे लोक चौताळले व त्यांनी एक हजार लोकांचे  लष्कर घेऊन मदिनाकडे कूच केले.

- प्रत्यक्ष युद्ध -
इकडे अल्लाहने प्रेषित सल्ल. यांना सूचना केली की, दोन पैकी कुठल्याही एकाशी सामना केल्यास त्यांची निश्चितपणे मदद केली जाईल. त्यावर प्रेषित सल्ल. यांनी मदिन्यातील सर्व सरदारांची बैठक बोलाविली व त्यांच्यासमोर परिस्थिती विशद केली. काही लोकांचा विचार होता की, काफिल्याला लुटावे. कारण त्यांच्याकडे लोक कमी आणि संपत्ती जास्त आहे. परंतु,  प्रेषित सल्ल. यांना मक्काकडून येणाऱ्या लष्कराशी दोन हात करण्याची इच्छा झाली. कारण जोपर्यंत मक्कावासियांचा निर्णायक पराभव केला जाणार नाही तोपर्यंत त्यांच्यातली खुमखुमी  कमी होणार नाही, याची त्यांना जाणीव होती. म्हणून पुरेशी तयारी नसतांनासुद्धा अल्लाहच्या भरोश्यावर त्यांनी मक्काकडून येणाऱ्या कुरैशच्या लष्काराशी दोन हात करण्याचा निर्णय  घेतला. प्रेषित सल्ल. यांच्या या निर्णयाचे मुठभर युवक सोडले तर सर्वांनी समर्थन केले. जेव्हा युद्धाची जुळवाजुळव केली गेली तेव्हा 300 पेक्षा थोडे जास्त लोक उपलब्ध झाले.  ज्यांच्यापैकी फक्त दोन, तीन लोकांकडे घोडे होते. 70 लोकांकडे उंट होते, हत्यारसुद्धा पुरेशे नव्हते. फक्त 60 लोकांकडे चिलखत होते. अशाही परिस्थितीत या 313 लोकांनी आपले शीर  हातावरून घेऊन एक हजार लोकांच्या कुरैशच्या बलाढ्य लष्कराशी युद्ध करण्याची तयारी केवळ प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यावर विश्वास ठेऊन दर्शविली. या 313 लोकांना घेऊन 17  रमजान 2 हिजरी, (13 मार्च 624) मंगळवारी प्रेषित सल्ल. यांनी मक्काकडे कूच केले. शत्रूला मदिना शहरापासून 200 किलोमीटर दूर बदरच्या ठिकाणी थोपवून युद्ध करण्याची  प्रेषितांची इच्छा होती. त्याप्रमाणे बदर या गावाजवळ उंच टेकडीवर इस्लामी लष्कराने पाडाव टाकला. पाडाव टाकताच पावसाला सुरूवात झाली. लष्कराने तात्काळ श्रमदान करून  तात्पुरता खड्डा (हौद) बांधून पाणी गोळा केले. इकडे कुरैशचे लष्कर टेकडीखाली येवून ठेपले. पावसामुळे टेकडीचा वरचा भाग पाण्याने अधिक घट्ट झाला होता तर खाली पायथ्याशी चिखल झाला होता. प्रेषितांनी प्रत्यक्ष युद्ध सुरू करण्यापूर्वी अल्लाहशी दुआ केली आणि युद्धाला आणि युद्धाला तोंड फुटले. या 313 च्या लष्कराने परिस्थितीचा लाभ उठवत हजार लोकांच्या कुरेशच्या लष्कराची दानादान उडविली. या युद्धामध्ये मुस्लिमांचे 14 यौद्धे तर कुरैशचे 70 यौद्धे कामाला आले. मुस्लिम सैनिकांनी कुरेशच्या अनेक लोकांना युद्धबंदी बनविले व  पुढे हजरत अबुबकर रजि. यांच्या सल्ल्याप्रमाणे प्रेषित सल्ल. यांनी कुरेशकडून काही रक्कम घेऊन युद्धकैद्यांना सोडून दिले. बदरचे युद्ध प्रलयाच्या दिवसापर्यंत मुस्लिमांसाठी प्रेरणादायी  युद्ध ठरले आहे. आजही आपण अनेक मुस्लिम तरूणांच्या मोटारबाईकवर 313 चा अंक लिहिलेला पाहिलेला असेल. अनेक कवी आणि शायर लोकांनी या 313 लष्कराचे गुणगाण  गायलेले आहे. विषम परिस्थितील हे युद्ध जिंकल्याचे दोन परिणाम झाले. एक तर मुस्लिमांचा आत्मविश्वास वाढला दोन कुरेशच नव्हे तर समग्र अरबस्थानामध्ये मुस्लिमांच्या लष्करी  ताकदीचा धाक बसला.
बदरच्या युद्धामुळे एक गोष्ट सिद्ध झाली की, युद्ध हे साधन सामुग्री किंवा सैनिकांच्या संख्या बळावर नव्हे तर धैर्य, साहस आणि अल्लाहवरील दृढ विश्वासाच्या साह्याने जिंकता येते.

- एम.आय.शेख
9764000737

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget