Halloween Costume ideas 2015

अन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(१०४) या गटाचा१३८ पाठलाग करण्यात दुबळेपणा दाखवू नका, जर तुम्ही त्रास सहन करीत आहात तर तुमच्याप्रमाणे तेदेखील त्रास सहन करीत आहेत. आणि तुम्ही अल्लाहकडून त्या   गोष्टीची आशा बाळगता ज्याचीआशा ते बाळगीत नाहीत.१३९ अल्लाह सर्व काही जाणतो आणि तो विवेकशील व बुद्धिमान आहे.
(१०५) हे नबी (स.)!१४० आम्ही हा ग्रंथ सत्यानिशी तुमच्याकडे उतरविला आहे की जो सरळमार्ग अल्लाहने तुम्हाला दाखविला आहे त्यानुसार लोकांमध्ये न्यायनिवाडा करा. तुम्ही अपहार  करणारांचे समर्थक बनू नका.
(१०६) अल्लाहजवळ क्षमेची याचना करा, तो मोठा क्षमा करणारा व दयावंत आहे.
(१०७) जे लोक स्वत:शी विश्वासघात करतात, तुम्ही१४१ त्यांचे समर्थन करू नका अल्लाहला असा मनुष्य पसंत नाही जो अप्रामाणिक व दुराचरणी गुन्हेगार आहे.
(१०८) हे लोक माणसापासून आपल्या कारवाया लपवू शकतात परंतु अल्लाहपासून लपवू शकत नाहीत. तो तर त्या वेळेसदेखील यांच्याबरोबर असतो जेव्हा हे रात्री गुप्तपणे त्याच्या  मर्जीविरूद्ध सल्लामसलत करतात. यांच्या सर्व कृत्यांना अल्लाहने घेरले आहे.
(१०९) बरे तर तुम्ही लोकांनी या अपराध्यांतर्फे लौकिक जीवनात तर युक्तिवाद केलेत परंतु कयामत (पुनरुत्थानाच्या) दिवशी त्यांच्यासाठी कोण युक्तिवाद करील? शेवटी त्यांचा तेथे  कोण बरे वकील असेल?
(११०) जर एखाद्या व्यक्तीकडून वाईट कृत्य घडले अथवा आपल्या स्वत:वर अत्याचार केले आणि त्यानंतर अल्लाहजवळ माफीची विनंती केली तर अल्लाह त्याला क्षमा करणारा व  कृपा करणारा आढळून येईल.
(१११) जो वाईट कर्म करील तर त्याची ही कमाई त्याच्याकरिता संकट ठरेल. अल्लाहला सर्व गोष्टीची खबर आहे व तो विवेकशील व बुद्धिमान आहे.
(११२) मग जो एखादी चूक वा अपराध करून त्याचा आरोप इतर निरपराध व्यक्तींवर लादेल, त्याने तर मोठे कुभांड व उघड पापाचे ओझे शिरावर घेतले.



१३८) म्हणजे शत्रूंचा एक गट जो त्या काळी इस्लामी आवाहन आणि इस्लामी जीवनपद्धतीला प्रस्थापित करण्याच्या मार्गात अडथळे निर्माण करीत होता.
१३९) म्हणजे आश्चर्य आहे की ईमानधारक (श्रद्धावंत) सत्यासाठी तितके कष्ट झेलण्याससुद्धा तयार होऊ नयेत; जितके कष्ट शत्रू असत्यासाठी सहन करीत आहे. शत्रूसमोर फक्त नश्वर  भौतिकता आहे व हे जग आहे. याविरुद्ध ईमानधारक सृष्टीनिर्मात्याची प्रसन्नता, त्याचे सान्निध्य आणि पुरस्काराचे उमेदवार आहेत.
१४०) या आयतपासून आयत नं. ११३ पर्यंत एका महत्त्वपूर्ण घटनेवर चर्चा करण्यात आली आहे. ही घटना त्याच काळात घडलेली आहे. अन्सारच्या बनीजफर टोळीतील एक मनुष्य  तामा किंवा बशीर बिन उबेरिक नामक होता. त्याने एका अन्सारीचे चिलखत चोरले होते आणि जेव्हा त्याचा तपास सुरु झाला तर चोरी गेलेल्या मालास एका यहुदीच्या येथे ठेवले.  चिलखतच्या मालकाने पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे फिर्याद केली आणि तामावर आपला संशय व्यक्त केला. परंतु तामा आणि त्याच्या नातेवाईकांनी बनीजफरच्या अनेक लोकांशी  साठगाठ करून त्या यहुदीवर पूर्ण आरोप ठेवला. यहुदीला विचारण्यात आले तर त्याने जबाबदारी घेतली नाही. परंतु या लोकांनी तामाची बाजू भक्कम लावून धरली होती. ते सांगू लागले की हा यहुदी दुष्ट आहे; तसेच सत्याचा इन्कार करणारा आणि अल्लाह व त्याच्या पैगंबरांना न मानणारा आहे. याच्यावर भरोसा केला जाऊच शकत नाही. आमचेच म्हणणे मान्य केले पाहिजे कारण आम्ही मुस्लिम आहोत. शक्य होते की पैगंबर मुहम्मद (स.) बाह्य रूपातील या सूचनेवरून प्रभावित होऊन यहुदीविरुद्ध निर्णय देतील. इतक्यात दिव्य प्रकटन   झाले आणि सत्य समोर आले. एका काझीच्या रूपात पैगंबर मुहम्मद (स.) यांनी प्रस्तुत विवरणानुसार निर्णय देणे चुकीचे नव्हते. अशी परिस्थिती काझीसमोर येत असते. त्यांच्यासमोर  चुकीची साक्ष आणि रिपोर्ट करून चुकीचा निर्णय जज (काझी)कडून घेतला जातो. परंतु त्या वेळी जेव्हा इस्लाम आणि कुफ्रमध्ये संघर्ष जोरात होता; अशा वेळी साक्ष आणि समोर  आलेल्या रिपोर्टनुसार पैगंबर मुहम्मद (स.) यांनी निर्णय दिला असता तर इस्लाम विरोधकांना पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या विरोधात आणि इस्लामी समुदाय आणि इस्लामी संदेशा  विरुद्ध एक सशक्त नैतिक हत्यार मिळाले असते. विरोधकांनी जोरात प्रचार केला असता की येथे सत्य आणि न्याय आहेच कुठे? येथे तर पक्षपात आहे. याच संकटातून वाचविण्यासाठी  येथे स्वत: अल्लाहने हस्तक्षेप केला आहे. या आयतींमध्ये (१०५ ते ११३) त्या मुस्लिमांवर टीका केली ज्यांनी खानदान, कबिल्याची बाजू घेऊन पक्षपात केला आणि अपराधीचे समर्थन  केले. दुसरीकडे सर्व मुस्लिमांना शिकवण दिली गेली की न्यायासाठी पक्षपातीने काम घेऊ नका. हा न्याय मुळीच नाही की आपल्या गटाच्या अपराधीचे अनुचित समर्थन केले जावे आणि  दुसऱ्या गटाचा मनुष्य सत्याधिष्ठित असेल तरी त्याच्याशी अन्याय केला जावा.
१४१) जो कोणी दुसऱ्याशी विश्वासघात करतो तो सर्वप्रथम खरेतर स्वत:शी विश्वासघात करतो कारण मन आणि बुद्धीची शक्ती त्याच्याजवळ ठेव म्हणून आहेत. त्यांचा दुरुपयोग करून  तो त्यांना मजबूर करतो की विश्वासघात करण्यासाठी त्यांनी त्या व्यक्तीला साथ द्यावी. अल्लाहने त्याच्या अंतरात्म्याला त्या व्यक्तीच्या चारित्र्याचा रक्षक बनविला. त्यास या  सीमेपर्यंत दाबून ठेवतो की तो अंतरात्मा या विश्वासघात कृत्यात अडथळा बनत नाही. जेव्हा मनुष्य आपल्या आत या अन्यायपूर्ण भ्रष्टाचाराला पूर्ण करतो तेव्हाच कोठे बाहेर त्याच्या हातून पाप व विश्वासघात घडतो.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget