Halloween Costume ideas 2015

हिजाब : सुरक्षेस अडथळा आणि प्रगतीत विघ्न आणतो काय?

भांडवलशाही व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या बुरखा पद्धतीला पछाडता न आल्यामुळे तसेच अनेक युरोपीयन आणि भारतीय महिला इस्लामच्या हिजाब पद्धतीने प्रभावित होऊन इस्लामच्या  शीतल छायेमध्ये येत असल्यामुळे व त्यांना रोखता येत नसल्यामुळे, चिडून भांडवलशाहीचे समर्थक हिजाब पद्धतीचा विरोध करतात.


ऐसा नहीं था के कोई
बरहना था बज्म में
लेकिन किसी-किसीही बदन
पर लिबास था


मागच्या इस्टरच्या दिवशी कोलंबो येथील चर्च आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात अडीचशे पेक्षा जास्त निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यास जबाबदार  म्हणून श्रीलंकन तौहिद जमात नावाच्या एका अपरिचित गटाचे अगोदर नाव घेतले गेले व त्याच्या 9 सदस्यांना ज्यापैकी एक महिला होती, या स्फोटांसाठी जबाबदार धरण्यात आले. ती  महिला हिजाब घातलेली होती की नाही याबद्दलही कुठलीही अधिकृत माहिती श्रीलंकन सरकारने दिलेली नाही. तसेच सामान्य मुस्लिम महिलांना हिजाब वापरण्यावर कुठल्याही प्रकारची  अधिकृत बंदी घातली गेली नसतांना, बंदी घालण्याचा केवळ एक विचार व्यक्त झाला असतांना, आपल्या देशात हिजाब हा राष्ट्रीय सुरक्षेस अडथळा आणतो एवढेच नव्हे तर तो  महिलांना प्रगती करण्यामध्येही विघ्न आणतो म्हणून त्यावर बंदी घालावयास पाहिजे, अशी मागणी सामनामधून संजय राऊत यांनी करताच हा विषय पाहता-पाहता राष्ट्रीयप्रश्न  असल्यासारखा अचानक प्रकाश झोतात आला आणि लोकसभा निवडणुकांच्या ’अंदाजपंचे विश्लेषणाला’ कंटाळलेल्या वाहिन्यांना टीआरपीसाठी अचानक एक चविष्ट विषय चघळायला  मिळाला. मग काय ! लगेच चर्चासत्रे सुरू झाली, तथाकथित तज्ञ बोलावले गेले आणि एका पाठोपाठ एक शब्द बंबाळ कार्यक्रमाचा धडाका लावून एकच गदारोळ माजविण्यात आला.  एव्हाना त्यामुळे उडालेला धुराळा थोडासा खाली बसलेला आहे. म्हणून शांतपणे या विषयावर विचार करूया. मुळात श्रीलंका किंवा भारतच नव्हे तर जगामध्ये ज्याज्या देशात आतंकवादी  हल्ले झाले, त्या-त्या देशातील हल्ल्यात महिलांचा सहभाग हाच मुळात दखल घेण्याएवढा नव्हता, हे सत्य कोणालाही मान्य केल्याशिवाय गत्यंतर नाही. एखाद्या ठिकाणी अतिरेकी हल्ला  करावयाचा असल्यास त्यातील सर्वात प्रमुख एलिमेंट जो असतो तो ’सरप्राईजींग एलिमेंट’ असतो. अतिरेकी अशा ठिकाणी हल्ला करतात ज्या ठिकाणी लोक बेसावध असतात. हल्ला  करताना अनेकवेळा पुरूष अतिरेकी सुद्धा माकडटोप्या, मफलर किंवा अन्य कापडांनी स्वतः चा चेहरा झाकून घेतात. त्याबद्दल मात्र कोणी कधीच काही बोलत नाही.
आतंकवादाची मूळ व्याख्याच संयुक्त राष्ट्राला आजपर्यंत करता आलेली नाही. प्रसिद्ध अमेरिकी लेखक नॉर्म चोमस्की यांच्या मते ’राजकीय किंवा धार्मिक उद्देशाच्या प्राप्तीसाठी, निरपराध  लोकांविरूद्ध केला गेलेला, संघटित हिंसेचा वापर म्हणजे आतंकवाद होय’. या व्याख्येवरून आतंकवादाच्या उद्देश्याची कल्पना वाचकांना येऊ शकेल. मुळात आतंकवादी घटनांमध्ये सामील  लोक हे विकृत मानसिकतेचे असतात. विकृत ध्येयाने पछाडलेले असतात. अमेरिकेसारख्या महासत्तेला एक ट्रिलीयन पेक्षा जास्त खर्च आणि हजारो सैनिकांचा बळी देऊन सुद्धा जगाच्या  पाठीवरून आतंकवादाला नष्ट करता आले नाही. यातच आतंकवादाच्या व्याप्तीची कल्पना येऊ शकते.
मुळात आतंकवाद दोन प्रकारचा असतो. एक मुलभूत आतंकवाद, दूसरा प्रतिक्रियावादी आतंकवाद. अमेरिकेच्या नेतृत्वात 42 देशांनी मिळून अफगानिस्तान, इराक, लिबिया सारख्या  देशावर, खोटी कारणे दाखवून हल्ले केले, त्याबद्दल जागतिक माध्यमे चकार शब्द काढत नाहीत. वास्तविक पाहता हा मुलभूत आतंकवाद आहे. एखाद्या सार्वभौम राष्ट्रावर कुठल्याशा  तकलादू कारणे पुढे करून हवाई हल्ले करणे हेच मुळात अमानवीय आहे, हाच खरा आतंकवाद आहे. त्या हल्ल्यांच्या प्रतिक्रियेस्वरूप त्या देशातील नागरिकांनी प्रतिरोध केला की त्याला  आतंकवाद म्हणायचे, हे दुट्टपी धोरण झाले. यांनी हल्ले केले नसते तर त्यांनी विरोध केला नसता. एवढे साधे तर्क या संबंधी लोकांना कळत नाही, याचेच आश्चर्य वाटते. ज्या  तालीबानला 17 वर्षे आतंकवादी म्हणून त्यांच्याविरूद्ध एकतर्फी युद्ध अमेरिकेने केलेत्याच तालीबानबरोबर अमेरिकेच्या वाटाघाटीच्या पाच फेऱ्या संपल्या असून, सहावी फेरी अमेरिकेचे  अ‍ॅम्बेसेडर सीनेटर जल्मे खलील जाद यांच्या नेतृत्वाखाली दोहा (कतर) येथे नुकतीच संपली. जर तालीबान आतंकवादी होते तर पडेल ती किमत देऊन त्यांचा संपूर्ण नायनाट करावयास  हवा होता. अमेरिकेने 17 वर्षाच्या युद्धानंतर त्याच तालीबान्यांशी शांततेची बोलणी करून हे सिद्ध केले आहे की, आतंकवाद ही एक सापेक्ष कल्पना आहे.
थोडक्यात आतंकवादाला समूळ नष्ट करायचे असल्यास आतंकवादाची जी कारणे आहेत, त्यांचे उच्चाटन अगोदर व्हावयास हवे. तसेच आतंकवाद फक्त मुस्लिमच करतात हा  गैरसमजसुद्धा मनातून काढून टाकायला हवा. ज्या श्रीलंकेमध्ये घडलेल्या घटनेमुळे ही सर्व चर्चा सुरू झाली. तोच देश एलटीटीईच्या आतंकवादाशी कित्येक वर्ष लढत होता. मग ते  एलटीटीवाले मुस्लिम होते का? न्यूझिलँडच्या मस्जिदीमध्ये नुकत्याच झालेल्या हल्ल्यातील आरोपी ब्रेन्टॉन टॅरन्ट हा मुस्लिम आहे काय? गेल्या अनेक दशकापासून सुरू असलेला नक्षली  आतंकवाद हा काय मुस्लिमांनी सुरू ठेवला आहे काय? त्यात सामील लक्षणीय संख्येतील महिला काय बुरखा घालतात काय? इशान्य भारतातील उल्फा आणि नागा या हिंसक संघटना  जो हिंसाचार करतात ते मुस्लिम आहेत काय? आयरिश रिपब्लिक या अतिरेकी संघटनेने ब्रिटनमध्ये जो हिंसाचार केला ते मुस्लिम होते काय? गॅस चेंबरमध्ये घालून ज्या हिटलरने  निरपराध ज्यूंचा होलोकॉस्ट केला तो मुस्लिम होता काय? अमेरिका आणि युरोपमध्ये भारतीय नागरिकांवर अधुन-मधून जीवघेणे हल्ले करणारे गोरे नागरिक मुस्लिम आहेत काय?,  भारतात अनेक बॉम्बस्फोटास कारणीभूत असणारे व सुरक्षा संस्थांच्या सहकार्यामुळे निर्दोष सुटणारे स्वामी असिमानंदसारखे अनेक लोक मुस्लिम आहेत काय? या सर्व लोकांनी कोणता  हिजाब घातला होता? मुळात हिजाब आणि आतंकवादी घटना याचा तिळमात्र संबंध नाही. आपल्या प्रिय देशाला अतिरेक्यांपासून दूर ठेवायचे असल्यास असा सिलेक्टीव्ह अ‍ॅप्रोच ठेऊन  जमणार नाही. अतिरेक्यांविरूद्ध सरसकट कारवाई व्हावयास हवी. मग हिजाबबद्दल एवढी घृणा का?
जगात कोट्यावधी मुस्लिम महिला फक्त हिजाबच नव्हे तर नखशिकांत बुरखा घालून प्रत्यक्षात भांडवलशाही व्यवस्थेच्या फॅशन, फिल्म आणि टी.व्ही. उद्योगातील अब्जावधी रूपयाच्या  गुंतवणुकीला आपल्या वर्तनातून नाकारतात, त्यावर लानत (निषेध) पाठवितात, ही गोष्ट या उद्योगातील मुखंडांना रूचत नाही. तसेच प्रगतीच्या नावाखाली संभ्रांत महिलांना घराबाहेर काढून चालाख पुरूष त्यांना लैंगिक आणि आर्थिक शोषणासाठी तयार करत असतात. बुरखा घालणाऱ्या कोट्यावधी मुस्लिम महिला ह्या या चालाख पुरूषांच्या तावडीत सापडत नाहीत म्हणून त्यांचे त्यांना शोषण करता येत नाही. त्यामुळेसुद्धा त्यांना बुरख्याविषयी चीड निर्माण होते.
प्रत्येक लोकशाही मानणाऱ्या व्यक्तीला कोणी कुठले कपडे घालावेत याचे स्वातंत्र्य असायला हवे. जेव्हा काही स्त्रियांना बिकीनी घालण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे तेव्हा काही  महिलांना बुरखा घालण्याचे स्वातंत्र्यही दिलेच गेले पाहिजे. आपल्या देशात तर मुस्लिम महिलांव्यतिरिक्त अनेक समाज घटकातील महिला घूंगट घेतात, तो ही एका प्रकारचा हिजाबच  आहे. हा महिलांचा घटनादत्त अधिकार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणाचा बागुलबुवा पुढे करून महिलांचे हिजाब घालण्याचे घटनादत्त स्वातंत्र्य हिरावून घेणे भारतासारख्या महान  राष्ट्राच्या लोकशाही मुल्यांच्या विरोधी होईल. राहता राहिला प्रश्न बुरखा महिलांच्या प्रगतीमध्ये विघ्न ठरू शकतो काय? तर या बाबतीत मी भाष्य करण्यापेक्षा एका उच्चशिक्षित  महिलेचे मत मी या ठिकाणी आपल्या सेवेत सादर करत आहे. याच अंकात प्रकाशित प्रा. सौ. फातिमा मुजावर (अध्यक्षा : 11 वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन  2017 पनवेल) यांच्या लेखाचा एक छोटासा परिच्छेद उधृत करत आहे. त्या म्हणतात ’’माझी एक डॉक्टर मैत्रीण अचानक मला बुरख्यात दिसली. तिने हाक मारल्यामुळे मी तिला  ओळखू शकले. घरातच दवाखाना थाटणाऱ्या या माझ्या मैत्रिणीला बुरखा घालण्याची का गरज भासली? माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहून ती मला म्हणाली ’’माझ्या एका पेशंटचा सुंदर  बुरखा पाहून मी तिला विचारले, ’ कुठे ग घेतला हा बुरखा?’ ती म्हणाली, ,’ मी ज्यांच्या घरी घरकाम करते त्यांनी मला बुरखा हा भेट म्हणून दिला आहे. मी हा बुरखा जीवापाड  जपते. हा बुरखा माझ्या गरिबीस श्रीमंताचे रूप देतो, माझी लाज राखतो.’ तिच्या या उत्तराने मी भारावून गेले. डोक्यात विचारांचे अनेक चक्रे फिरली आणि मी तिलाच माझ्यासाठीही  तुझ्याच सारखा एक बुरखा आण असे सांगितले. आज या बुरख्यामुळे मी दिवसाचे दोन तास ज्यादा विधायक कार्यासाठी खर्च करू शकते. शिवाय पवित्र कुरआनची शिकवण  अवलंबविल्याचा आनंद वेगळाच! माझे बघून सर्व घरच्या महिला आज बुरखा घालू लागल्या आहेत. बुरख्याचा आनंद, सुख वेगळंच आहे पण त्याचा अतिरेक मात्र घातक आहे. मी  प्रत्येक बुरखाधारी महिलेस विचारले की बुरख्याची तुम्हास सक्ती आहे का? उत्तर नाही असे आहे. बुरख्यामुळे आम्ही बिनधास्त बाहेर पडू लागलोत आणि कामे करू लागलोत. आमच्या  प्रगतीचे कारणच आमचा बुरखा आहे.’’
एकंदरित भांडवलशाही व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या बुरखा पद्धतीला पछाडता न आल्यामुळे तसेच अनेक युरोपीयन आणि भारतीय महिला इस्लामच्या हिजाब पद्धतीने प्रभावित होऊन  इस्लामच्या शीतल छायेमध्ये येत असल्यामुळे व त्यांना रोखता येत नसल्यामुळे, चिडून भांडवलशाहीचे समर्थक हिजाब पद्धतीचा विरोध करतात. परंतु सोशल मीडियाच्या या काळात  आता कुठलीच गोष्ट लपविता येत नाही. दस्तुरखुद्द सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना त्यांच्याच शिवसेनेच्या अनेक महिला सदस्यांकडून विरोध झाल्यानंतर त्यांना आपल्या  भूमिकेपासून माघार घ्यावी लागली आहे, हा परदा पद्धतीचा विजय आहे. शेवटी एक विनंती करतो की, बुरखा पद्धतीबद्दल ज्यांना खरोखरच मनापासून सविस्तर माहिती हवी असेल  त्यांनी सय्यद अबुल आला मौदूदी (रहे.) यांचे ’परदा’ नावाचे पुस्तक जरूर वाचावे. मला विश्वास आहे की, परद्याचा कितीही घोर विरोधक का असेना हे पुस्तक वाचल्यानंतर त्याचे मत  परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. सदरचे पुस्तक हिंदीमध्ये ’परदा’ व मराठीमध्ये ’गोषा’ या नावाने जमाअते इस्लामी हिंदच्या प्रत्येक कार्यालयात सहज उपलब्ध आहे.

अंदाज-ए- बयां गरचे कोई शूख नहीं है
शायद के उतर जाए तेरे दिल में मेरी बात.

- एम.आय.शेख
9764000737

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget