Halloween Costume ideas 2015

प्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा

हिरवळीचा रोप वाढायला हवा..!

दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्रातील सगळ्याच परिवर्तनाच्या विचारधारेतल्या चळवळींना  बनारसी घाटांवर नदीत बुचकळून काढावे असे हल्ली वाटायला लागलयं.
सातत्याने बदलत जाणाऱ्या राष्ट्रवादाच्या सत्ताधिशी संकल्पना आणि अधिक सतर्कतेने उतरंडीच्या पार तळाशी पददलीतत्व आपलेसे करणारा मराठी मुस्लिम समाज, संघी सामुहिक  मानसिकतेत दबून भयाच्या काठावर उभ्या असणाऱ्या समुहाला आपल्याशा वाटणाऱ्या सगळ्या बहुजन चळवळींची छुपीलाईन पुन्हा ’मुसलमानाला’ अधिक आश्रित अवस्थेपर्यंत घेऊन  जाते. या सामाजिक कोलाहलात समाजाभिमुख असणाऱ्या मुस्लिमांसाठीच्या जाणकारांच्या चळवळीचे हेतू मधेच ढासळताहेत. व्यक्तीस्तोमाचा, संसर्ग वाढीस लागून खरा स्वार्थी मुखौटा  सामान्यांसमोर येतोय.

पुन्हा हताशा हाती.
रमजानच्या मुबारक महिन्यातल्या उत्साही धावपळीत अठ्ठावीसाव्या रोजावेळी मॉबलिंचिंगमधल्या मोहसीन शेख च्या हत्येला पाचेक वर्ष पूर्ण होतायत. न्यायाच्या नावाने उदोउदो चांगभलच्या प्रतीक्षेत कित्येकांची होरपळ सुरूच आहे. आरक्षणरक्षणाच्या मुद्द्यावरून उसळी मारलेले समाजचिंतक प्रेमी आता सध्या कुठे गायब आहेत कळत नाही. धार्मिकतेच्या अंगानी  सुरू असणाऱ्या सकारात्मक कामातून काही ठोस घडत असतांना विचारवंताचे सामान्य मुस्लिमांपासून तुटणे सुरूच आहे. राजकीय अप्रगल्भतेच्या जाणीवांचा ठपका ठेऊन सरळ मतांची  किमतच शुन्यवत करण्याची चळवळींची खेळी कळायला मार्ग नाही. सामान्य मुस्लिमाच्या जगण्याच्या एकूण वाटांची कोंडी करून त्याला जखडण्याचे सगळे उजवे-डावे प्रयत्न यशस्वी  होतायत. अशा शोषितावर बोलण-लिहिणं, विचार करणं देखील आता बहुजनी समाजपदराशी बाजूला होण्यासारखं आहे. समन्वयाच्या सगळ्या चांगल्या मुद्यांवर केवळ जातीय चर्चा  होताना धर्म आणि त्याहूनही मुस्लिमांच्या प्रादेशिक जाणीवांचा खरा विचार कुठेच आढळत नाही.
समाज कधीही कुणाला प्रबोधन करायला या म्हणून हाका मारीत नसतो. स्वतः ची अस्वस्थता समाजाप्रत आपल्याला खेचून नेते. आपल्या अस्वस्थतेला स्वस्थता देताना लगेचच  समाजाकडून सहकार, सहमती अथवा सकारात्मकतेची अपेक्षा करणे चुकीचेच! केवळ भावनिक तात्पुरते उसने प्रबोधन अवसानघातकी उरेल. प्रादेशिक प्रश्नांच्या योग्य उत्तरांच्या  पर्यायासकट समाजाशी मिसळत सांस्कृतिक सामाजिक जाण निर्माण करायला हवी. नव्याने येणारे तरूण, जुन्यांच्या यशापयशाचे अनुभव. बदलत्या भिती सॉफ्टवेअरचे नॉलेज.  व्यक्तीस्तोमापलिकडे सामुहिक समाजनिष्ठा बाळगणाऱ्या धडपड्या कृतीशिल कार्यकर्ताग्रुपची जिल्हानिहाय बांधणी व्हायला हवी.
तुकड्यातुकड्यांनी का होईना पण शिक्षण, अर्थकारण, सामाजिक सुरक्षितता या मुद्यांवर भरीव ठोस ऊर्जा निर्माण करणे गरजेचे. असे प्रयत्न होताहेत सर्वत्र पण पुन्हा तेच  व्यक्तीस्तोम, स्वंयअहंकार यामुळे प्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी नाहीच पडतं. अशा समुहसंस्था, सामाजिक-सांस्कृतिक ग्रुप्स, विचारवंताच्या वैचारिकता. शिक्षण, धर्म, रोजगार  यातील योग्य समन्वय साधणाऱ्याचा संवाद महत्त्वाचा पर्याय असेल. लोकशाहीचे कित्येक खांब ढासळण्याची सगळी तयारी केलीय फॅसिस्टांनी, सत्ता कुणाचीही असली तरी ’नंबरदोन’चा  छुपा शिक्का मुस्लिम मानसिकतेवर गडदच असणार आहे.

’मुफलीसी मुसलमानाचा’ अधोरेखितपणा त्रासदायक.
स्वतःला गाडून घेण्याची ताकद मिळत राहो..
हिरवळीचा रोप वाढायला हवा.. आता ’ईद’ला हीच दुवा.
उगीच काय कालच्या पिढ्या तशाच संपल्या?
उगीच काय ही फुले आम्ही जपून ठेवली?
पराभवापलीकडे अजून युद्ध चालले, अजून माणसेच ही खरीखुरी न पेटली! (भेटली)


- साहिल शेख
8668691105

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget