Halloween Costume ideas 2015

मुल्याधिष्ठित इस्लामी व्यापार

जवाल-ए-कौम की तो इब्तदा वो थी के जब
तिजारत आपने की तर्क, नोकरी कर ली


जागतिक व्यापाराचा पाया हा व्याजाधारित भांडवलावर उभा आहे. व्याजदरात वाढ होईल या भीतीने सतत मालाचे दर चढे ठेवण्याकडे व्यापाऱ्यांचा कल असतो. म्हणून बाजारात वस्तू  चढ्या किमतीने विकल्या जातात. नाईलाजाने लोकांना त्या घ्याव्या लागतात. व्याजाला नफा समजण्याची सामुहिक चूक केल्यामुळे हा भुर्दंड सामान्य माणसांना बसतो.

इस्लाम एक परिपूर्ण जीवन व्यवस्था असल्याकारणाने व्यापारसुद्धा इस्लामी अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपल्यापैकी अनेकांचा अनुभव असेल की मुस्लिम मार्केटमध्ये  वस्तू ह्या स्वस्त मिळतात. याच आठवड्यात लोकसत्ताच्या दोन प्रतिनिधींनी मुंबईच्या मुहम्मदअली रोडला रमजाननिमित्त भेट देउन रूचकर आणि पौष्टिक अन्न अवघ्या पाचशे रूपयात दोन माणसाचे कसे मिळते? यावर फेसबुक लाईव्ह केला होता. मुस्लिम मार्केटमध्ये वस्तू स्वस्त मिळण्याचे कारण म्हणजे व्याज विरहित भांडवलावर व्यापार करण्याकडे  मुस्लिम व्यापाऱ्यांचा कल असतो. त्यामुळे त्याला व्याजदर वाढतील याची भीती नसते. शिवाय प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी व्यापारामध्ये कमी नफा घेण्याबद्दल जी सक्तीने ताकीद  दिलेली आहे त्याचेही मुस्लिम व्यापारी पालन करतात. या दोन कारणांमुळे मुस्लिम मार्केटमध्ये वस्तू स्वस्त असतात.

इस्लामी व्यापाराची तत्वे
इस्लामी व्यापाराचा उद्देश भांडवलशाही व्यवस्थेमधील व्यापाराप्रमाणे केवळ नफा कमविणे नाही. नफ्याबरोबर ग्राहकांची सेवा करणे हा सुद्धा इस्लामी व्यापाराच्या संकल्पनेचा अत्यावश्यक  भाग आहे. म्हणून श्रद्धावंत मुस्लिम जेव्हा व्यापार करतो तेव्हा कमी नफा व कमी भाव ठेवण्याकडे त्याचा कटाक्ष असतो. इस्लामी व्यापार हा नैतिकतेवर आधारित व्यापार असतो. या  संबंधी प्रेषित सल्ल. यांचे मार्गदर्शन खालीलप्रमाणे -
1. ’’ तुम पर तिजारत (व्यापार) को इख्तीयार (अंगीकार)करना लाजीम (अनिवार्य) है. क्यूंके, रिज्क (उपजिविका) के दस में नौ हिस्से फकत इसमे हैं.’’(संदर्भ : अहयाउल उलूम-इमाम  गजाली, भाग वल-नश्र-व-तौज़ी बैरूत, पान क्र. 504). याचा अर्थ उपजिविकेच्या 10 दारांपैकी 9 दार हे व्यापारातून उघडतात. त्यामुळे मुस्लिमांनी व्यापाराला प्राथामिकता देतात हे ओघाणे आले.
2. ’’आदमी का अपने हाथ से कोई काम करना और हर वो तिजारत जो पाकिजगी के साथ हो ’’(मस्नद अहेमद). या हदीसमध्ये पाकिजगी अर्थात पावित्र्याने तिजारत अर्थात व्यापार  करण्याची सूचना प्रेषित सल्ल. यांनी दिलेली आहे.
3. ’’सच्चा और अमानतदार (विश्वासपात्र) ताजीर (व्यापारी) कयामत के दिन अंबिया (प्रेषित), सिद्दीकीन (खरे लोक) और शोहदा (शहीद लोक) के साथ उठाया जाएगा.’’ (संदर्भ : तिर्मिजी).
वरील मार्गदर्शनावरून इस्लामी व्यापारामध्ये खरेपणा आणि पावित्र्याला अतिशय महत्व दिलेले आहे. येथे इतर व्यापारांप्रमाणे जनहिताच्या विरोधात जाऊन त्यांना चढ्या भावाने माल  विकता येत नाही. साधारणपणे सुरूवातीच्या काळापासूनच मुस्लिमांचा कल व्यापाराकडे असल्याचे दिसून येते. भारतातही मलबार येथे सातव्या शतकात मुस्लिम व्यापारी आले होते  याची नोंद इतिहासात नमूद आहे. त्यांनी बांधलेली पहिली मस्जिद जिचे नाव ’चिरामन जामा मस्जिद’ आजही केरळच्या मलबारमध्ये उभी आहे. चीनमध्ये सुद्धा मुस्लिम व्यापाऱ्यांनी  व्यापारानिमित्त प्रवेश केला होता. याचीही नोंद चीनच्या इतिहासामध्ये आहे. एका रिवायतीप्रमाणे चीनमध्ये 8 व्यापाऱ्यांचा एक जत्था माल घेऊन गेला होता व तेथेच स्थायीक झाला.  त्यांच्या सचोटीच्या व्यापाराला चीनच्या नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्यामुळे ते आठही मुस्लिम व्यापारी त्याच ठिकाणी स्थायीक झाले. आज चीनमध्ये जी आठ कोटींपेक्षा जास्त  मुस्लिम जनसंख्या आहे ती त्या आठ व्यापाऱ्यांचाच विस्तार असल्याची आख्यायिका चीनमध्ये प्रसिद्ध आहे. चीनवर कधीच कुठल्या मुस्लिम राजाने आक्रमण केल्याचे चीनी इतिहासात  नमूद नाही. त्यामुळे चीनमध्ये इस्लामचा प्रचार मुस्लिम व्यापाऱ्यांकडूनच झाला यावर विश्वास ठेवल्याशिवाय गत्यंतर नाही.

श्रेष्ठ व्यापारी अब्दुरहेमान बिन औफ रजि.
हजरत अब्दुरहेमान बिन औफ हे आशरा-ए- मुब्बशरा (ते दहा साहबी रजि. ज्यांना जीवंतपणीच जन्नतमध्ये प्रवेश देण्यात आल्याची आनंदवार्ता देण्यात आली होती.) मध्ये सामील   असलेले प्रेषितांचे सोबती होते. ते जेव्हा हिजरत करून मदिनामध्ये गेले तेव्हा त्यांची जोडी मदिनाच्या एका अन्सारी व्यक्तीबरोबर प्रेषितांनी लावून दिली. तेव्हा ते अन्सारी साहबी अब्दुरहेमान बिन औफ रजि. यांची मदत करू इच्छित होते. तेव्हा त्यांनी मदत घेण्यास साफ इन्कार केला व त्यांना फक्त दोन प्रश्न विचारले. 1. मार्केट कुठे आहे 2. मार्केटमध्ये  कोणत्या वस्तूंना जास्त मागणी आहे. या दोन्ही प्रश्नाची उत्तरे मिळाल्याबरोबर अब्दुरहेमान बिन औफ रजि. यांनी उंटांच्या गळ्यात बांधण्यात येणाऱ्या घंट्यांचा व्यापार सुरू केला व  पाहता-पाहता त्याच्यात ते यशस्वी झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या व्यापाराचा विस्तार केला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या व्यापारामधून यहूदी व्यापाऱ्यांना जवळ-जवळ हुसकावून  लावले. यहूदी व्यापारी हे चढ्या दराने वस्तू विकत व त्यांचा व्यापार सर्व चक्रवाढ व्याजावर आधारित पतपुरवठ्यावर अवलंबून होता. म्हणून मार्केटमध्ये वस्तू अतिशय महाग होत्या.  यहूदींची त्यावेळेस व्यापाराच्या सर्वच विभागांमध्ये एकाधिकारशाही होती. ती अब्दुरहेमान बिन औफ रजि. यांनी मोडून काढली. ते छोट्या व्यापाऱ्यांना बिनव्याजी आणि अत्यल्प नफा  या दोन तत्वावर माल देऊ लागले. त्यामुळे त्यांच्याकडून माल खरेदी करण्याची स्पर्धाच जणू किरकोळ व्यापाऱ्यांमध्ये लागली आणि पाहता-पाहता त्यांचा व्यापार इतका वाढला की,  जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या चारही पत्नींना इतकी संपत्ती मिळाली की त्या मदिना शहरातील श्रीमंत महिलांमध्ये गणल्या जाऊ लागल्या.
प्रेषित सल्ल. यांच्या काळापासूनच मुस्लिमांच्या कमर्शियल सेन्सचा अनुभव जगाला येऊ लागला होता. प्रेषित सल्ल. यांच्या नंतर शंभर वर्षात मुस्लिमांचा व्यापार जगातील तीन खंडामध्ये विस्तारीत झालेला होता. तिन्ही खंडातील  लोक मुस्लिम व्यापाऱ्याकडूनच माल घेण्यासाठी दुकान उघडण्यापूर्वी रांग लावून उभे राहत.’’ इस्लामी तिजारत’’ हा एक ब्रँड नेम त्याकाळी झालेला होता. मुस्लिम व्यापाऱ्याकडून वस्तू  घेणे म्हणजे ती उत्कृष्ट दर्जाची आणि रास्त दराची असेल याबद्दल लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला होता. मुस्लिम व्यापारी ज्या वस्तू विकत तेव्हा त्या वस्तूं संबंधी इत्यंभूत  माहिती ग्राहकांना सांगत. पावसामुळे ओला झालेला गहू ओला आहे म्हणून कमी दरात देत आहोत हे सांगून विकत. दुसरे व्यापारी ओल्या गव्हावर सुके गहू टाकून न सांगता विकत.  एखाद्या कपड्यामध्ये दोष असेल तर मुस्लिम व्यापारी तो दोष स्वतःहून ग्राहकांना दाखवून देत आणि कमी किमतीत विकत. घेतलेली वस्तू ग्राहकांनी परत आणली तर आनंदाने ती  परत घेत व त्याची संपूर्ण किमत त्याला परत देत. ते कधीही शपथा घेऊन माल विकत नसत. या छोट्या-छोट्या नितीमान गोष्टींची भूरळ ग्राहकांवर पडत असे व मुस्लिम लोकांच्या  दुकानावर ग्राहकांच्या उड्या पडत.
पूर्वीसारखे व्यापार तज्ज्ञ मुखलीस (प्रामाणिक) मुस्लिम व्यापाऱ्यांची संख्या आज त्यामानाने कमी झालेली आहे. तरी अल्लाहची कृपा आहे श्रद्धावान मुस्लिम व्यापारी आजही लाखोंच्या  संख्येत देशाच्या प्रत्येक शहरात विखुरलेले आहेत. मात्र इस्लामी व्यापार संहितेची जाण नसलेले, अप्रामाणिक, अश्रद्धावान, फक्त नावापुरत्या मुस्लिम व्यापाऱ्यांचा सुद्धा मार्केटमध्ये  बऱ्यापैकी सुळसुळाट झालेला आहे. त्यांच्यामुळे इस्लामी व्यापाराच्या नाममुद्रेला मोठा फटका बसत आहे.

इस्लामी व्यापाराची मूलतत्वे
1. कुठलाही व्यापार सुरू करण्यापूर्वी त्या व्यापारासंबंधीच्या बारीक-सारीक गोष्टींची इत्यंभूत माहिती करून घेणे, शक्य झाल्यास संबंधित वस्तूंच्या व्यापाऱ्याकडे काही दिवस काम करून त्या व्यापारासंबंधी प्रशिक्षण घेणे.
2. ज्या वस्तू आपल्या मालकीच्या नाहीत किंवा ताब्यात नाहीत, त्यांचा सौदा कधीच करू नये.
3. ग्राहकाला वस्तू देण्यापूर्वी वस्तू संबंधी इत्यंभूत माहिती ग्राहकाला देऊन त्याचे समाधान करणे व त्यानंतरच ती वस्तू त्याला विकणे. विशेषतः वस्तूमध्ये काही वैगुण्य असेल तर ते ठळकपणे ग्राहकाला समजेल अशा पद्धतीने समजून सांगणे.
4. ग्राहकाला त्याच्या गरजेनुसार वस्तू खरेदी करण्याचा प्रामाणिक सल्ला देणे. अनेक व्यापारी ग्राहकाला गरज नसतांना अनेक वस्तू गोडबोलून विकून टाकतात. असे करण्यापासून मुस्लिम व्यापाऱ्याला प्रेषित सल्ल. यांनी सक्तीने मनाई केलेली आहे.
5. ग्राहकाला वस्तूची किंमत स्पष्टपणे सांगणे. अनेक व्यापारी वस्तू विकतांना, ’’साहेब तुम्ही घ्या तर खरं! तुमच्याकडून आम्ही काय जास्त घेणार का?’’ सारखी वाक्य बोलून  साखरपेरणी करतात व ग्राहकाला फसवतात. सकृतदर्शनी मान देऊन त्याची मान कापतात.
6. जर कोणाला उधार माल द्यायचाच असेल तर तो व्यवहार लिहून घ्यावा. ज्यामुळे दोघांच्याही मनामध्ये किंतू राहणार नाही.
वरील तत्वांवर आधारित व्यापार केला गेला तर कोणत्याही मार्केटमध्ये व्यापारामध्ये जम बसविता येतो. मात्र वरील तत्वांवर विश्वास ठेऊन त्यांच्यावर अंमलबजावणी करणे यासाठी  मजबूत इमान आणि दीर्घकाळापर्यंत वाट पाहण्याची क्षमता लागते. आजकालच्या मार्केटमध्ये अशा लोकांची प्रचंड कमतरता आहे. रातोरात श्रीमंत होण्याकडे लोकांचा कल आहे. प्रत्येकाला वाटते की अल्पावधीतच आपण मोठी संपत्ती कमवावी. त्यासाठी राजकीय नेत्यांच्या आश्रयाला जाण्याकडे आजच्या व्यापाऱ्यांचा कल दिसून येतो. निवडणुकांमध्ये राजकीय  पक्षांना मोठी रक्कम ’निधी’ म्हणून व्यापारी देतात आणि ज्यांना निधी दिला ते निवडून आले की, त्यांच्याकडून आपल्या व्यापारास अनुकूल अशा योजना आणि कायदे त्यांच्याकडून  करून घेतात. या व्यवहारामध्ये व्यापारी आणि राजकीय नेते यांचाच लाभ केंद्रस्थानी असतो. या प्रक्रियेमध्ये सामान्य ग्राहकाला कुठलेच स्थान नसते. म्हणून आज अव्वाच्या सव्वा  दरामध्ये लोकांना वस्तू खरेदी कराव्या लागतात. या महागाईला तोंड देण्यासाठी मग ज्याला जसे जमेल, जेथे जमेल तसे व तेथे लोक भ्रष्टाचार करून वरकमई करून महागाईला तोंड  देण्याचा प्रयत्न करत असतात. यात मरण होते ते सामान्य कष्टकऱ्याचे, शेतकऱ्याचे. कारण शेतीमध्ये भ्रष्टाचार करता येत नाही. समाजाच्या अंतिम माणसाला, जो की भ्रष्टाचार करू  शकत नाही, चढ्या दराने वस्तू घ्याव्या लागतात. त्यामुळे श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी अधिकच रूंद होत जाते.
इस्लामी व्यापारांच्या नीतिनियमांची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करून आपल्या तरूणांना व्यापाराकडे वळविण्याची मोठी जबाबदारी मुस्लिम समाजावर आहे. या संदर्भात थ्री टीज अर्थात तालीम (भौतिक शिक्षण), तरबियत (इस्लामी संस्कार) आणि तिजारत (मुल्याधिष्ठीत व्यापार) कडे तरूणांना वळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होणे गरजेचे आहे. शेवटी  अल्लाहकडे दुआ करतो की, मुल्याधिष्ठीत इस्लामी व्यापाराच्या फायद्यांची आमच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जाणीव निर्माण व्हावी आमच्यावर कृपा कर. (आमीन).

- एम.आय.शेख
9764000737

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget