Halloween Costume ideas 2015

त्यागाच्या जाणिवांची सर्वव्यापी सजग वाढो

देशाचा नागरिक म्हणून, लोकशाहीची निष्ठा अढळ राखत आपल्या जाणिवांना सजग ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. प्रत्येक व्यक्तीची जाणीव ही त्याच्या आसपास परिसरातील  सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक जडणघडणीतून तयार होत असते. या जाणिवेला अधिक सक्षम करण्याचे कार्य ’वाचन’ करत असते. हळूहळू विकसित किंवा पक्क्या होत  जाणाऱ्या जाणिवा या गाव-शहर संस्कृतीशी निगडीत राहतात. पण अलिकडच्या दशकभरात सगळ्यांनाच सत्ताधिशांच्या जाणीवांचे ’ओझे वाहक’ मारूनमुकटून बनविण्यात आलं आहे. या  दशकभरात अनेक संज्ञा किंवा टर्मस सर्वसामान्यांच्या माथी मारल्या गेल्या. सामान्यांच्या जगण्यासाठीच्या, धडपडीच्या ज्या जाणीवा बुद्धीकुवतनुसार विकसित असतात त्या जाणिवा,  विचारांना आपल्या फ्रेममध्ये बसविण्याचा आग्रही खटाटोप अतिरेकी झाला. त्यातूनच लोकसंस्कृती म्हणजे रोजच्या जगण्याच्या गोष्टी व धर्मसंस्कृती यात गोंधळसंघर्ष सुरू झाला. याच  गोंधळाच्या पेरणीचा फायदा काही तकलादू धर्ममार्तंडानी राजकीय पक्ष पार्ट्यांना करून दिला.
उदार पूर्वीच्या शुभेच्छांना, कोणत्याही प्रकारचा वास येत नव्हता. आज सदिच्छा, शुभेच्छा, सण-सणवार, जयंती पुण्यतिथी सोहळ्यांना जातीय अस्मितेचा रंग, द्वेष खोडसाळपणाचा वास  येतो. सोशल ते कॉमन मीडियातून बोकाळलेला हा गडदभाव सौहार्द निर्माण करण्यापेक्षा अनेक भिंती पक्कं बांधतो आणि भीती नक्की होते. देशाची राजसत्ता सांगेन, पसरवेल तीच  राष्ट्रवादी भूमिका किंवा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वंकष भूमिकांच्या पदराआड लपवून पद्धतशीर तीव्र केलेल्या तुकड्यांच्या जात अस्मिता, या एकूण भितीस पोषक, भय निर्माण
करणाऱ्या ठरल्या आहेत.
’लोकशाही’ची व्याख्याच भयग्रस्त असेल तर जातीपल्याड ’धर्म’ म्हणवून वेगळेपण अधोरेखित केल्या गेलेल्या मुस्लिम समाजाचे जाणीवप्रश्न पुन्हा उपरे परके किंवा बाजूलाच फेकले  जाताहेत. दिवंगत झालेल्या, शहिदलेल्या विचारवंताला मोठं करून वर्तमानसमस्या विनाआकलनात सोडवू पाहणाऱ्या बावळट विचारवंताचा सूळसूळाट माजलाय. यावर ज्या पद्धतीने काम  किमान सध्या महाराष्ट्रभर सुरू आहे, त्यात योग्य ’मुस्लिम जाणीवा’ विकसित झाल्याचे आशादायी चित्र आज दिसत असले तरी ’एकोपा’ नाहीसा होईल अशा भितीचे संकेत ही  खुणावतायत.
आरक्षणाच्या चळवळीचा बोलबाला असताना त्यांची कार्यशैली, कार्यान्वितता यावर मुस्लिम म्हणून कुणी चिकित्सा करताना दिसत नाही. आरक्षणाच्या बरोबरीने ’रक्षणाच्या’ गोष्टीचा  उहापोह कितीसा घेतला. साहित्य सौंदर्य सांस्कृतिकतेला नव्याने ऊर्जा देणारी किती मेहनत कुणी घेतली! केवळ धर्मसंस्था विकसित करताना सामान्यांच्या भिती-गाव मर्यादाची समज  झाली का? अशांमध्ये आण्णा, बाबा, रामदेव, साध्वी सारखे येतात नि जातात. गुरूजी त्याचा प्रभाव मात्र द्वेषफैलावात अग्रेसर राहतो. आजच्या घडीला ’मुस्लिम समुहाचे’ आम्हीच भले  करू शकतो असे म्हणणाऱ्यांची वर्गवारी करायला पाहिजे. देशभरचा मुस्लिम त्याची एकूण मानसिकता, प्रदेशनिहाय गावगाड्याचा एकरूप असणारा मुस्लिम त्याच्या समस्या, त्याची  राजकीय अडचण, बौद्धिक प्रगल्भता, धार्मिक मांडणीतल्या त्याला जाणवणाऱ्या मर्यादा, त्याची साहित्य सांस्कृतिक ओळख यावर काम करणाऱ्यांनी अधिक सजग काम करायला हवे.  अन्यथा धबधब्याच्या कोसळण्याचे हंगामीपण अंगी बाळगून पुन्हा धर्म / राजस्तेच्या भांडवली आमिषाला बळी जाऊन अख्खा समाज वेठीसच धरला जाईल. प्रश्न दशदिशांनी आपल्यावर   आदळत असताना,’आम्ही म्हणतो तेच खरं’ असं न मानता... जीथून जसे जे-जे पोषक करता येईल ते-ते करायला हवे. रमजानच्या मुबारक महिन्यात त्यागाच्या जाणिवांची सर्वव्यापी  सजग वाढो.. समाजाची समज विकसित होत मानवकल्याणाच्या भूमिकेचा जोमदार उच्चार होवो इतकेच.

’हंगामा बडा करना मेरा मक्सद नहीं...
हम सबके सीने में आग लगनी चाहिए.’

- साहिल शेख
कुरूंदवाड (कोल्हापूर)
9923030668

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget