Halloween Costume ideas 2015

देशविघात वाचाळवर्तन

सध्याच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात प्रचारात सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्या गेल्या. विविध राजकीय पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांपासून ते आता आता तुरुंगातून जामिनावर बाहेर येऊन  निवडणूक रिंगणात उतरलेल्या तथाकथित नेत्यांनी लोकशाहीला अशोभनीय वक्तव्ये करून वाचारविरांच्या रांगेत अग्रस्थान पटकविण्याची जणू चढाओढच लागलेली होती. अजित पवारांचे   धरणाबाबतचे विधान असेल, राम कदम यांचे दहीहंडी दरम्यान मुलीबाबत केलेले वक्तव्य असेल, प्रशांत परिचारकांचे सैनिकांच्या पत्नींबाबतचे वक्तव्य असेल किंवा रावसाहेब दानवेंचे  शेतकऱ्यांना ‘साले’ म्हणणे असेल किंवा साक्षी महाराज, दिग्विजय सिंग यांसारख्या काही व्यक्तींनी तर स्वत:शीच जबरदस्त स्पर्धा करत एकापेक्षा एक नवनवीन विक्रम प्रस्थापित  केलेले आपण सर्वांनीच पाहिलेले आहेत. ही यादी संपणार नाही! याची आज आठवण यायचे कारण म्हणजे २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी असलेल्या प्रज्ञासिंह ठाकूर हिने तत्कालीन एटीएसप्रमुख हेमंत करकरे यांच्याविषयी केलेले वक्तव्य भयानक तर आहेच, त्यामुळे ब्राह्मणवादी आतंकवादाचा बेसूर चेहरा पुन्हा एकदा समोर आला  आहे. हेमंत करकरे यांनी तिला विनाकारण मालेगाव बॉम्बस्फोटात गोवले होते. त्यांनी तिला प्रचंड यातना दिल्या. त्यांचा मृत्यू तिच्या शापामुळे झाला असल्याचे मत तिने निवडणूक  प्रचारात व्यक्त केले. आता या बॉम्बस्फोटातील आरोपीला भोपाळमधून भाजपाने उमेदवारीही दिली आहे. त्यामुळे भाजपाला देश कुठल्या दिशेने घेऊन जायचा आहे याचा अंदाज एव्हाना देशवासियांना आला असेल. प्रज्ञासिंह ठाकूर हिच्यासहीत लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, दयानंद पांडे, राकेश धावडे, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, शिवनारायण गोपालसिंग  कालनसागर, श्याम साहू, रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, जगदीश म्हात्रे, रामचंद्र कालसंग्रा, संदीप डांगे, प्रवीण मुतालिक यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले. प्रज्ञासिंह ठाकूर,  लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, राकेश धावडे यांची भूमिका तर देशद्रोही आहे. स्वतंत्र संविधान, स्वतंत्र राष्ट्रध्वज निर्माण करण्याचा त्यांचा हेतू होता. या सर्वांचा हेमंत करकरे पर्दाफाश   करणार होते. त्यांनी पुरावा गोळा केल्यामुळे प्रज्ञासिंह ठाकूरला जेलमध्ये जावे लागले होते. संपूर्ण देशभर ‘देशभक्त’ आणि ‘देशद्रोही’ ठरवायची चढाओढ लागलेली असताना स्वत:ला  ‘देशभक्त’ म्हणवून घेणारे या वक्तव्याचे निर्लज्जपणे समर्थन करतात! किती हा कर्मदरिद्रीपणा!! जेव्हा तुम्ही प्रज्ञा सिंह-ठाकूरचे समर्थन करता, तेव्हा तुम्ही हे मान्य करता की  करकरेंनी जीव पणाला लावून चूक केली. ब्राम्हणवादी शक्तींनी २६/११ च्या मुंबईतील हल्ल्यात करकरे यांची हत्या घडवून आणली आणि ब्राम्हणवादी आतंकवादाचा बुरखा जो फाटणार होता तो बालंबाल बचावला. या षड्यंत्राची पोलखोल माजी पोलीस महानिरीक्षक एस.एम.मुश्रीफ यांनी ‘हू किल्ड करकरे’ या पुस्तकात केली आहे. आजपर्यंत केवळ मुस्लिमांकडे बोट  दाखवले जात होते. त्यांना टार्गेट करण्यात येत होते. जाणून-बुजून मुस्लिमांना गोवून आतंकवादाचे बालंट त्यांच्यावर कसे येईल असे षड्यंत्र रचले जात होते. जेणेकरून ब्राम्हणवादी  आतंकवाद लोकांना कळता कामा नये अशी जाणीवपूर्वक आखणी केली जात होती. ब्राम्हणवादी आतंकवादाच्या मुळावरच घाव घालण्याचा करकरे यांचा प्रयत्न होता. म्हणूनच त्यांनी  मालेगाव बॉम्बस्फोटाची कसून चौकशी केली होती. मात्र याच ब्राम्हणवादी संघटनांच्या हातात आयबी व मीडिया ताब्यात आहे. याचाच फायदा उठवत ब्राम्हणवादी संघटना नेहमीच  मुस्लिम आतंकवादी असल्याचा डांगोरा पिटत असतात. परंतु प्रज्ञासिंह ठाकूर हिचे बरळणे यामुळे खरा आतंकवाद कुणाचा आहे हे लक्षात आल्यावाचून राहत नाही. मनेका गांधी,  मायावती, आझम खान आणि योगी आदित्यनाथ यांनी प्रचारादरम्यान केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई केली. असली विधाने ही अज्ञानातून आलेली  नसतात तर जाणूनबुजून केलेली असतात. किंबहुना अशा विधानांनी कोणत्या समाजाची मते आपल्याला मिळतील हा हिशेब त्या विधानांमागे असतो. भारतात बहुपक्षीय संविधानिक   लोकशाही आहे आणि प्रत्येकाला स्वत:ची काही राजकीय मते, भूमिका आहेत, हे मान्यच आहे आणि तेच भारतीय लोकशाहीच खरे सौंदर्य आहे. विखारी विचारांची राजकीय व्यूहनीती  नेहमीच एकेक पाऊल हळूहळू पुढे टाकून समाजात थोडा थोडा विखार पेरत तो सर्वमान्य आणि त्याचे सार्वत्रिकीकरण (नॉर्मलाईज) करत जाणे अशी राहिलेली आहे. सभ्य राजकीय संस्कृती निर्माण करायची असेल तर स्वत:वर नियंत्रण ठेवण्याचे तंत्र राजकीय नेत्यांनी शिकायला हवे. कितीही कठोर टीका देखील सभ्यतेने करता येते हे तत्त्व पाळणारे अनेक नेते  खुद्द भारताने पाहिले आहेत. मुळात समाजाने देखील असल्या प्रचाराला आपण चटावलो नाही ना याचेही आत्मपरीक्षण करावयास हवे. केवळ राजकीय नेत्यांना दोष देऊन भागणार नाही;  समाजाची अभिरुची निकृष्ट होत नाही ना हेही तपासले पाहिजे.

-शाहजहान मगदुम
(मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@eshodhan.com)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget