Halloween Costume ideas 2015

आत्मीक समाधानासाठी शरीफ भागवितात वाटसरूंची तहान

जळगाव (शोधन सेवा) - समाजसेवा हीच ईश्वरसेवा असते. हे कळायला बराच कालावधी लागतो. मात्र जेव्हा अंतर्मनातून एखाद्या घटनेवरून आवाज निघतो तेव्हा तो परिणामकारक ठरतो, आणि माणूस झपाट्याने सेवाभाव वृत्तीने काम करत निघतो. अशीच घटना शेख शरीफभाई यांच्याशी घडली आणि त्यांनी स्वखर्चाने थंड पाण्याचे वाटप वाटसरूंना करण्याचे ठरले. ते गेल्या दोन महिन्यांपासून सेवा बजावत आहेत.
    जळगाव शहर उन्हाने फणफणत आहे. तापमानाने 45 अंशाचा पारा गाठला आहे. 100 ते 150 पावले चालले नाहीत की घशाला कोरड पडत आहे. पाण्याची टंचाई त्यात बाटली बंद पाणीही महाग. रस्ते निर्मणुष्य आणि रस्त्यावर कुठेच पाणपोई नको. अशात माणुसकीचे गीत गात तप्त उन्हात वाटसरूंची तहान भागवण्याचं काम आत्मीक समाधान म्हणत शेख शरीफ शेख करीम हे करीत आहेत. त्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून दुचाकीवर जार ठेऊन चालती-फिरती पाणपोई सुरू केली आहे. दररोज 20 लिटरचे 10 जार पाणी ते तहानलेल्यांना पाजवितात.
    जळगाव शहरात तापमानाचा दिवसेंदिवस उच्चांक होत आहे. गेल्या आठवडाभरापासून पारा 40 अशांच्या पुढे आहे. गरम झळाया आणि उन्हाच्या चटक्यांनी शरीराची लाहीलाही होत आहे. शंभर दीडशे पावले चालले की नाही तोच घसा कोरडा पडत आहे. त्यामुळे प्रत्येकजण आजूबाजूला पाणी शोधत असते. स्वतःजवळ पाणी असले तरी ते लागलीच गरम होत आहे. तहानेने व्याकूळ वाटसरूंना 15 ते 20 रूपयांची थंड पाण्याची बाटली घेणेही आर्थिक परिस्थितीमुळे शक्य होत नाही. वाटसरूंची होत असलेली पाण्यासाठीची ही वाताहत पाहून जळगावातील शेख शरीफ यांनी आपली दुचाकी घेऊन त्यावर 20 लिटर क्षमतेचे दोन पाण्याचे थंड जार ठेवून त्याला साखळीने दोन ग्लास बांधून  चालती फिरती पाणपोई सुरू केली. रस्त्यावर उन्हात कुणीही वाटसरू दिसला की त्याला ते थांबवून थंड पाण्याचा ग्लास भरून देतात. थंड पाणी असल्याने वाटसरू पाणी पिताक्षणी त्यांचे आभारही मानतात.
    एकाएकाची तहान भागवत ते पुढे चालत राहतात. दिवसभरात त्यांना किमान 10 जार पाणी लागते. त्यांच्या या सेवाभाव वृत्तीचे जळगावकरांतून स्वागत होत आहे. शरीफभाई सारखे असे राज्यभरात हजारो लोक तयार झाले तर निश्चितच दुष्काळाची दाहकता कमी होईल आणि मानवप्रेमही वाढेल. 
उपक्रमासाठी पदरमोड

शेख शरीफ यांचा टेंट हाऊसचा व्यवसाय आहे. मोबाईलवर ते व्यवसायाचे बुकींग करतात. इतर कुटुंबीय काम सांभाळतात. व्यवसायाच्या उत्पन्नातून ते उपक्रमासाठी पदरमोड करतात.
या भागात जलसेवा
मोफत जलसेवा देणारे शेख शरीफ हे न्यू ख्वाजा नगरातील पिंप्राळा हुहकोत राहतात. सकाळी 11 वाजता ते तेथून निघतात. पिंप्राळा, गणेश कॉलनी, कोर्ट चौक, स्टेशन रोड, टॉवर चौक, जुने बसस्थानक, दाणाबाजार, चित्रा टॉकीज चौक, अजिंठा चौफुली, इच्छादेवी, आकाशवाणी, नवीन बसस्थानक अशा मार्गाने ते जलसेवा देतात.
वाटसरूच्या काहीलीमुळे दृढ निश्चय...
फेब्रुवारीत पाच मित्र कोर्टचौकात एका कामाच्या निमित्ताने उभे होतो. तहान लागल्याने 30 रूपयाला दोन पाण्याच्या बाटल्या घेतल्या. यावेळी रस्त्याने दोन वाटसरू जात होते. त्यांना तहान लागल्याने ते पाणपोईचा शोध घेत होते, परंतु त्यांना पाणी मिळाले नाही. त्यांच्या काहीलीमुळे तेव्हाच दृढनिश्चिय केला अन् दुसर्याच दिवशी चालती-फिरती पाणपोई सुरू केली. पाणी वाटपामुळे मला आत्मिक समाधान लाभते.
- शेख शरीफ, जळगाव.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget