Halloween Costume ideas 2015

करूणेच्या, संवेदनेच्या बळावरच मानवता बहरेल

अस्मितेच्या प्रतिष्ठेची स्पर्धा लागली की मानवता नेस्तनाबूत होते. सद्यवर्तमानात उजळ माथ्याने अस्तित्ववादाची ही टोकं प्रखर विखारी होताहेत. आधीच पेटलेल्या वैशाखवणव्यात  प्रचार-प्रसाराची सगळ्या नीच मर्यादा ओलांडून धु्रवीकरणाचा झेंडा फडकतोय. साक्षी ते साध्वीचा शाप एकीकडे तर दुसरीकडे किंचित बावळट बुद्धीवाद्यांचा वैचारिक कहर उफाळून ओसंडतोय.
’कोळसा उगळावा तितका काळा’ कडू कारले ते कडूचं. या म्हणीपासून ’भीक नको पण कुत्रा आवर’ म्हणण्याची वेळ सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मुस्लिमांवर आली आहे. मनुवादी  सत्तेला पलटून लावण्यासाठी नोटबंदी ते मॉबलिंचिंगच्या सगळ्या घटनांची उजळणी करून सुद्धा आपल्यातील राजकीय अप्रगल्भता आपल्यासाठीच मारक ठरत आहे. बहुजन म्हणून  असणारे सरसकट मुस्लिम गृहितकावर बेरजेची गणिते मांडत आहे. सध्या आश्रीतापेक्षा सोशिकत्वाची विचित्र अवस्था या व्यवस्थेने निर्माण केली आहे. गर्दीची मौज आणि वक्तृत्वाचा  माज मांडणीचा साज लेऊन, आम्हास अंकित करण्याचा पुरोगामीत्व डाव आपल्या लक्षात कसा येत नाही हाच चिडीचा सवाल? आपला कोणताच प्रश्न निकालात न काढता केवळ  आमच्यावर उपकार म्हणून आमची भलावण म्हणजे मंदबुद्धी बालकाला, अन्याय असल्याची जाणीव करत सांभाळणे होय. सारेच पक्ष मुस्लिम दुय्यमत्वापलीकडे जाऊन मुस्लिमांना  केवळ आश्रीत समजतायत याचं दु:ख मोठ आहे. सहिष्णुतेच्या गप्पांना आता तुमचं संरक्षण आम्हीच करू शकतो, असा कीचिंत दटावणीचा सूर उमटू लागलाय. तुम्ही आम्हास मत द्या  किंवा नाही, बघून घेईनची मेनकामय भाषा असो किंवा ढाल बनून रक्षणाला आम्हीच पुढे येऊची बहुजनी भाषा असो... म्हणजे एकूण काय ’मौत का डर पक्का आहे’ इकडे सतूर तिकडे  सुरी आपली मान दोन्हीकडे समान. साध्वीच्या उमेदवारीलाच विरोधांची लाट निर्माण व्हायला वही होती, ती न होता, निगेटीव्ह मार्केटींगने साध्वी घराघरांत पोचली. ’बिकाऊ मीडियाचे   काम उथळ सवंग प्रतिक्रियावाद्यांनी सोप्प केलं.’
नागरिक म्हणून चिकित्सेचा शब्द लिहावा तर संघीय धर्मांधता धमक्याप्रत येऊन आदळते तर जातीय कट्टरता समोरासमोर विरोधाला उभी. जो उमेदवार हवा तो नको असणाऱ्या पक्षात  आणि हव्या असणाऱ्या पक्षात नको असणारा उमेदवार, त्रिकोणाच्या टोकावर तिसराच कुणी, म्हणजे मतांच्या अधिकाराची देखील आमची किंमत शुन्य. मुस्लिम आईपीएस अधिकाऱ्याला  निलंबित करणारा निवडणूक आयोग, इंदिराजींच्या काळातील किरण बेंदीची आठवण... आपण भावूक घावूक अजून सण जयंत्या उत्सवातून गल्लीबोळांत गडद होणारा जात्यांधपणा,  उपरा ठरणारा मुसलमान. गोंधळ असा निर्माण केलाय की काहीही झाले तरी दोषी आपणच!
जात, धर्म, भाषा यांचा उपयोग केवळ राजकीय हव्यासापोटी करून अंधअनुयायांची अफाट, गर्दीभर्ती हेच आपल्या लोकशाहीचे सध्याचे फलीत. बुद्धीची, मनसंवेदनांची सारी दारे बंद करून  केवळ द्वेषआदेशाचे पालन करणाऱ्यांना आपल्याला सदैव आरोपी आणि सध्या आश्रीत या अवस्थेत ठेवण्याची आटोकाट तयारी झालीय. सातत्याने झालेल्या प्रचंड अवहेलनाची सल  सळसळावी तर कुणीच आपले वाटत नाहीत. बुद्धीवाद्यांची गणिते, धार्मिकतेचे नियम, विचारवंत, समाज-राजकारण्यांच्या चुकलेल्या वाटा यातून रस्त्यावरचा तरूण (मुस्लिम) गच्चपिडीचा
नाराज आहे.
जगण्याच्या अनेक प्रश्नांनी भरडला जात असलेला मुस्लिम तरूण, सामान्य माणूस एखाद्या पक्ष्याच्या नादात बळ विध्वंसक घेतो आणि अख्खी कौमला दावणीला देतो. अपप्रचार गैरसमजांच्या पेव फुटलेल्या रद्दीत अशांची गर्दी होते आणि पुन्हा आपण बदनाम, सल सदैव सातत्याने सलणारी. असो! सध्याचा दशदिशांनी दणाणत येणारा जातीय माज आणि धार्मिक  मौज यांना टाळून सुसह्य जगण्यासाठीच्या वाटा विधायक होण्याची प्रार्थना येऊ दे ओठांवर. करूणेच्या, संवेदनाच्या बळावरच मानवता बहरेल केवळ पंचवार्षिकत्वाची लोकशाही  सामान्यांसाठी भितीप्रद गोंधळजन्य ठरत असेल तर, चळवळीचे धुणे पुन्हा बडवून उन्हात वाळायला टाकणे हाच पर्याय.
शेवटी.’’ तुम्हारी तहजीब अपने खंजर से आप ही खुदकुशी करेगी. म्हणणारे अल्लामा इक्बाल आठवतात... संस्कृती नावाच्या गोष्टीत तीव्रधार असावा की प्रेमआधार असावा...ठरवू  या....!

- साहिल शेख
8668691105
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget