Halloween Costume ideas 2015

बुरखा नवयुगाच्या प्रगतीस पोषक

’’माझ्या एका पेशंटचा सुंदर बुरखा पाहून मी तिला विचारले, ’ कुठे ग घेतला हा बुरखा?’ ती म्हणाली, ,’ मी ज्यांच्या घरी घरकाम करते त्यांनी मला बुरखा हा भेट म्हणून दिला आहे.  मी हा बुरखा जीवापाड जपते. हा बुरखा माझ्या गरिबीस श्रीमंताचे रूप देतो, माझी लाज राखतो.’ तिच्या या उत्तराने मी भारावून गेले. डोक्यात विचारांचे अनेक चक्रे फिरली आणि मी  तिलाच माझ्यासाठीही तुझ्याच सारखा एक बुरखा आण असे सांगितले. आज या बुरख्यामुळे मी दिवसाचे दोन तास ज्यादा विधायक कार्यासाठी खर्च करू शकते.

प्रत्येक धर्माची धारणा, शिकवण व जीवनपद्धत मानवी प्रवृत्तीस अनुकूल अशी असते. इस्लाम हा एक शक्तीशाली धर्म आहे. समाजाच्या उन्नती व अवनतीमध्ये स्त्रियांची एक  महत्त्वाची भूमिका असते. इस्लामने पुरूषांसह स्त्रियांच्या उन्नतीवर भर दिला आहे. स्त्रियांचे सगळे प्रश्न पुरूष सत्तेने निर्माण केलेले प्रश्न आहेत. त्यांच्यामध्ये मुस्लिम स्त्रीचा बुरखा  जसा येतो तसाच घुंघटही येतो. जसा तलाक येतो तसा बाईला न सांगता सोडून देणे हे ही येते. सगळ्या धर्मावर पुरूषांचा कब्जा असल्यामुळे धर्मांनी स्त्रीला दिलेल्या स्वातंत्र्याचा संकोच  पुरूषसत्ता आपापल्या सोयीने करत असते. ’हिजाब’ हा अरबी शब्द आहे. त्याचे उर्दू भाषांतर ’परदा’ असे आहे. हिजाब हा शब्द कुरआनोक्तीतून घेण्यात आला आहे. त्या आयातीत  अल्लाहने प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या घरात निःसंकोचपणे ये-जा करणाऱ्यांना मनाई केली आहे. घरातील महिलांकडून काही हवे असेल तर ते पडद्याआडून मागावे असे आदेश देण्यात  आले आहेत. याच आदेशाच्या अनुषंगाने बुरखा पद्धत अस्तित्वात आली आहे. तद्नंतर बुरख्या संबंधात आलेल्या इतर आदेशांना बुरख्याचे आदेश (अहकामे हिजाब) असे संबोधण्यात  आले आहे.
नश्तर मेडिकल कॉलेज मुलतान येथे ऑल इंडिया इंटरकॉलिजिएट चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. चर्चे चा विषय होता, बुरखा देशाच्या प्रगतीच्या मार्गातील अडथळा आहे का?  या चर्चासत्रात सर्वोत्तम पारितोषिक मिळालेल्या श्रीमती सय्यद परवीन रिजवी यांचे विचार मला येथे मांडावेसे वाटतात. या चर्चासत्रात उपस्थित श्रोत्यांची मते आजमावण्यात आली  आणि लक्षात आले की, 99 टक्के लोकांनी बुरखा पद्धतीच्या पक्षात मतदान केले आहे.
श्रीमती सय्यदा परवीन म्हणतात, ’बुरख्या बाबतचा तपशिलवार वर्णन कुरआनच्या चोवीस व तेहतीस या दोन अध्यायात (सूरहमध्ये) दिले गेले आहे. ज्यात म्हटले आहे की, महिलांनी  आपल्या घरात मोकळेपणाने व थाटाने वावरावे. इस्लाम धर्माच्या प्रसारापूर्वीचे असभ्य राहणीमान सोडून द्यावे व नटून थटून आपल्या सौंदर्याचे सर्वत्र प्रदर्शन करत फिरू नये. संपूर्ण शरीर आच्छादित होईल असे वस्त्र धारण करावे. पुरूषांना पवित्र कुरआनने आदेश दिला आहे की, त्यांनी आपल्या आई,बहिणीच्या खोलीत जाताना परवानगी घ्यावी, जेणेकरून अचानक  प्रवेशाने बेसावध बसलेल्या महिलांवर खजील होण्याची पाळी येणार नाही.’
बुरख्यामध्ये हल्ली बरीच विविधता दिसून येते. मात्र बुरख्याबाबतच्या मूळ तत्वात व उद्देशात फारकत झालेली नाही. असे सांगण्यात येते की बुरखा स्त्रियांच्या प्रगतीच्या मार्गात अडथळा निर्माण करतो ते दुतोंडीपणाचे धोरण प्रगट करीत आहेत. त्यांचे वक्तव्य अल्लाह व प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या विरोधात आहे जे स्त्रियांनाही आवडणार नाही. बुरखा  पद्धतबाबत थोडे बारकाईने अभ्यास केल्यास तीन महत्त्वाचे उद्देश लक्षात येतील.
1. पहिला उद्देश असा की पुरूष व स्त्रियांच्या चारित्र्याचे रक्षण करण्यात यावे व अशा दुवर्तनापासून त्यांना अलिप्त ठेवावे जे स्त्री-पुरूषांच्या स्वैर सहजीवनामुळे निर्माण होतात.
2. दुसरा उद्देश असा की स्त्री-पुरूषाचे कार्यक्षेत्र निश्चित करण्यात यावे. नैसर्गिकरित्या जी कर्तव्ये स्त्रियांनी पार पाडावयाची आहेत ती त्यांनी निश्चितपणे पार पाडावीत व ज्या जबाबदाऱ्या पुरूषांच्या वाट्यास येतात त्या त्यांनी व्यवस्थितपणे पूर्ण कराव्यात.
3. तिसरा उद्देश कुटुंब व्यवस्था मजबूत व सुरक्षित करावी हा आहे. कुटुंबव्यवस्था जीवनाच्या इतर व्यवस्थांपेक्षा अधिक महत्वाची बाब आहे. इस्लाम स्त्रियांना सर्व अधिकार देऊ पाहतो, त्याच बरोबर घरातील व्यवस्थाही सुरक्षित ठेऊ इच्छितो. हे केवळ बुरखा पद्धतीचा अवलंब केल्यानेच शक्य होऊ शकते.
समाजात सहजीवनाची प्रथा जितकी जास्त वाढत जात आहे तितकाच जास्त स्त्रियांच्या शृंगारिक प्रसाधनाचा खर्च वाढत जात आहे. हा वाढता खर्च काबाडकष्ट करून मिळालेल्या रास्त  कमाईने पूर्ण होत नाही म्हणून लाच, अफरातफर व इतर भ्रष्ट मार्गांनी हा वाढता खर्च पुरा केला जात आहे. त्यामुळे पूर्ण समाज पोखरला जात आहे. कोणत्याच कायद्याची योग्यरित्या  अंमलबजावणी होऊ शकत नाही. जे लोक आपल्या स्वतःच्या इच्छांवर ताबा ठेवू शकत नाही, जे लोक आपल्या स्वतःच्या इच्छांवर ताबा ठेवू शकत नाहीत ते दुसऱ्यावर शिस्तीचे  नियम कसे लागू करू शकतील? जो आपल्याच कौटुंबिक जीवनात विश्वासपात्र नसेल तो समाज व देशाशी एकनिष्ठ कसा राहू शकेल?
स्त्री-पुरूषांचे कार्यक्षेत्र वेगळे असावे ही एक नैसिर्गक व्यवस्था आहे. स्त्रीला मातृत्वपद देऊन तिचे कार्यक्षेत्र दाखवून देण्यात आले आहे. पुरूषाला पितृत्वाचा अधिकार देऊन इतर जबाबदाऱ्या त्याच्यावर सोपविण्यात आल्या आहेत. स्त्रीपुरू षांच्या शरीर रचनेत आवश्यक ते फरक निर्माण करून, दोहोंना वेगळी मानसिकता, शारीरिक क्षमता व गुण प्रदान करण्यात  आले आहेत. मातृत्वाची जबाबदारी कौशल्याने पार पाडता यावी म्हणून तिला अधिक संयम व सहनशील प्रवृत्ती प्राप्त झाली आहे. तिच्या ममत्व व कोमल भावनांमुळे बालकांचे  संगोपन व पालनपोषण अत्यंत सहृदयपणे पार पाडले जाते. पुरूष त्या मानाने कणखर वृत्तीचा असतो. त्याच्यावर कुटुंबाच्या रक्षणाच्या व उदरनिर्वाहाच्या कठीण जबाबदाऱ्या टाकण्यात  आल्या आहेत. स्त्री पुरूषांचे नैसर्गिक कार्यक्षेत्र वाटप जर आपणास अमान्य असेल तर जगास मातृत्वाला मुकावे लागेल व परिणामतः संपूर्ण मानव समाज हायड्रोजन वा अणुबॉम्बविना  संपुष्टात येईल. स्त्रियांनी मातृत्वाच्या नैसर्गिक जबाबदारी बरोबरच पुरूषांसह राजकीय, आर्थिक, औद्योगिक व इतर जबाबदाऱ्या पार पाडाव्यात अशी अपेक्षा करणे म्हणजे महिलांवर  अन्याय व अत्याचार करणे आहे. मानवजातीच्या उत्पत्ती व सेवाशुश्रुसेची संपूर्ण जबाबदारी ती एकटीच पार पाडीत असते. या उलट पुरूषांच्या जबाबदारीत ही तिने सहभागी व्हावे हे  कितपत न्याय ठरेल?
स्त्रियांनी परिस्थितीनुरूप अन्यायकारक जबाबदाऱ्यांचा स्वीकार केला आहे. एवढेच नव्हे आता तर अधिकाधिक सामाजिक स्वातंत्र्य व अधिकार मिळविण्याकरिता त्यांनी सामुहिक  चळवळी सुरू केल्या आहेत. आपल्या मातृत्वाचा ’उपहास’ केला आहे. गृहिणीचा अपमान केला आहे. महिलांनी घरात राहून केलेल्या सेवा सुश्रुसेला तुच्छ लेखले आहे. तिच्या सेवाकार्याचे  महत्व पुरूषांचे राजकारण, उद्योगधंदे व युद्धाच्या जबाबदाऱ्यापेक्षा कमी मानता येणार नाही. बिचाऱ्या स्त्रियांनी विवश होऊन पुरूषांच्या जबाबदाऱ्या स्विकारल्या आहेत. पुरूषांची कामे न  केल्यास तिला सन्मानजनक वागणूक देण्यास पुरूष तयार होत नव्हता. इस्लामने महिलांना घरगुती स्त्री सुलभ जबाबदाऱ्या पार पाडण्याचा आदेश दिला होता. मातृत्व व बालकांच्या  संगोपनाच्या उदात्त कार्यामुळे तिला समाजात सन्मानजनक स्थान प्राप्त होते. मात्र आता कुटुंब व्यवस्थेबाबतचा आपला दृष्टीकोणच बदलत गेले आहे. आपला आग्रह आहे की स्त्रियांनी  मातेची कर्तव्ये पार पाडावीत, त्या बरोबरच तिने उच्चशिक्षण प्राप्त करून मॅजिस्ट्रेटसारखे पद भूषवावे, पुरूषांच्या मनोरंजनासाठी नृत्य व संगीताच्या मैफिली ही सजवाव्यात. अशा  अनेक प्रकारच्या कामाचे ओझे तिच्यावर लादले गेल्यामुळे ती एकही जबाबदारी पूर्णतः समाधानकारकपणे पार पाडू शकत नाही. ज्या कामाकरिता तिचा जन्म झालेला नाही, जे तिच्या  शरीराला पेलवणार नाही, जे तिच्या व्यक्तिमत्त्वाला शोभणार नाही अशी कामे तिच्यावर सोपवण्यात आली आहेत. मात्र तिचे कौतुक केलेच तर ते केवळ तिच्या सौंदर्य व स्त्रीत्वामुळेच
होते!
सुज्ञ व चारित्र्यवान नागरिक निर्माण करणाऱ्या कुटुंबव्यवस्थेला आपण गौणस्थान देत आहोत. कुटुंबसंस्था निश्चित श्रेष्ठ आहे. स्त्रियांना चारित्र्य घडविण्याची आवश्यक क्षमता व कोमल  मानसिकता निसर्गाने देऊ केली आहे. घरगुती जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या कर्तव्यनिष्ठ महिला घरात सदैव कार्यमग्न असतात. त्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या सक्षमपणे व नैपुण्याने पार  पाडाव्यात म्हणून त्यांना उच्च शिक्षण व योग्य प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. कुटुंब संस्थेचे संचालन तिने आत्मविश्वासाने, निश्चितपणे, संतोषजनकरित्या अमलात आणावेत म्हणून  बुरखापद्धत अवलंबण्यात आली होती. त्यामुळे स्त्रिया विचलित न होता आपली कर्तव्ये कौशल्याने पार पाडू शकत होत्या. गृहिणी सक्षम आणि सुरक्षित असून घरकारभार व्यवस्थितपणे  पार पाडीत आहेत. या विश्वासाने पुरूष ही निश्चितपणे आपल्या घराबाहेरील जबाबदाऱ्या पार पाडू शकत होते. आता आपण या प्रकारच्या गृहव्यवस्थेस नवयुगाच्या प्रगतीसाठी नाकारू  पाहत आहोत. हा चुकीचा मार्ग आहे.
मला वाटते की बुरखापद्धत नष्ट करून आणि इस्लामने महिलांना दिलेले कायदेशीर व आर्थिक अधिकार नाकारून कुटुंब व्यवस्था सुरक्षित ठेवता येणार नाही. आपणास नवयुगाची प्रगती  हवी आहे, कुटुंब व्यवस्था सुरक्षित ठेवायची आहे याबाबत शांतपणे विचार करून निर्णय घेतला पाहिजे. प्रगती ही फार विस्तृत संज्ञा आहे. या संज्ञेची कोणतीच निश्चित परिभाषा नाही.  एकेकाळी बंगालच्या आखातापासून थेट अटलांटिक महासागरापर्यंत मुस्लिमांचे राज्य पसरले होते. ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात ते अग्रेसर होते. सांस्कृतिक व वैचारिक पात्रतेच्या बाबतीत  त्यांची बरोबरी करणारा कोणीही नव्हता. मात्र त्या काळात बुरखापद्धत अस्तित्वात होती. इस्लामी इतिहासाचे अध्ययन केल्यास लक्षता येईल की त्या काळात मोठमोठे नावाजलेले  मुस्लिम संत, विचारवंत, विद्वान, राज्यकर्ते, लेखक व शूरवीर होऊन गेलेत. ते सर्व महापुरूष अशिक्षित व अडानी असूनही अनेक महिलांनी ज्ञान व विद्वतेच्या क्षेत्रात स्थान प्राप्त केले होते. विज्ञान, कला, वाड्.मय आदि क्षेत्रात नैपुण्य प्राप्त केले होते. तत्कालीन मुस्लिमांच्या प्रगतीच्या मार्गात बुरखा पद्धतीने कोणतीच अडचण निर्माण झाली नाही. आजही बुरखा पद्धतीचा अवलंब करून मुस्लिम समाजास प्रगती करणे शक्य आहे. आजच्या नवयुगाच्या प्रगतीस बुरखा पोषक आहे.
माझी एक डॉक्टर मैत्रीण अचानक मला बुरख्यात दिसली. तिने हाक मारल्यामुळे मी तिला ओळखू शकले. घरातच दवाखाना थाटणाऱ्या या माझ्या मैत्रिणीला बुरखा घालण्याची का गरज  भासली? माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहून ती मला म्हणाली ’’माझ्या एका पेशंटचा सुंदर बुरखा पाहून मी तिला विचारले, ’ कुठे ग घेतला हा बुरखा?’ ती म्हणाली, ,’ मी ज्यांच्या घरी  घरकाम करते त्यांनी मला बुरखा हा भेट म्हणून दिला आहे. मी हा बुरखा जीवापाड जपते. हा बुरखा माझ्या गरिबीस श्रीमंताचे रूप देतो, माझी लाज राखतो.’ तिच्या या उत्तराने मी  भारावून गेले. डोक्यात विचारांचे अनेक चक्रे फिरली आणि मी तिलाच माझ्यासाठीही तुझ्याच सारखा एक बुरखा आण असे सांगितले. आज या बुरख्यामुळे मी दिवसाचे दोन तास ज्यादा  विधायक कार्यासाठी खर्च करू शकते. शिवाय पवित्र कुरआनची शिकवण अवलंबविल्याचा आनंद वेगळाच! माझे बघून सर्व घरच्या महिला आज बुरखा घालू लागल्या आहेत. बुरख्याचा  आनंद, सुख वेगळंच आहे पण त्याचा अतिरेक मात्र घातक आहे. मी प्रत्येक बुरखाधारी महिलेस विचारले की बुरख्याची तुम्हास सक्ती आहे का? उत्तर नाही असे आहे. बुरख्यामुळे  आम्ही बिनधास्त बाहेर पडू लागलोत आणि कामे करू लागलोत. आमच्या प्रगतीचे कारणच आमचा बुरखा आहे.

- प्रा. फातिमा मुजावर
अध्यक्षा : 11 वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी
साहित्य संमेलन, पनवेल

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget