Halloween Costume ideas 2015

‘रमजान’ची ही संधी सोडू नका

अपनी मिल्लत पर कयास अक्वामे मगरीब से न कर
खास है तरकीब में कौम-ए-रसूल-ए-हाश्मी (सल्ल.)
उनकी जमियत का है मुल्क व नसब पर इनहेसार
कुव्वत-ए-मजहब से मुस्तहेकम है जमियत तेरी

मजान म्हटलं की कुरआनची आठवण यायला हवी, पण ती येत नाही. आठवण येते ती, रंगीबेरंगी कपडे आणि विविध वस्तूंच्या शॉपिंगची, वेगवेगळ्या प्रकारच्या मिष्टान्नांची, उशिरापर्यंत चौका-चौकात उभे राहून जागण्याची, दिवसा झोपण्याची. रमजान म्हटले की असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. मुस्लिमांचे हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. वास्तविक पाहता कुरआनचा विषय मनुष्य आहे आणि हा जगातील सर्वात महत्त्वाचा विषय आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, विकास, संपन्नता इत्यादी गोष्टी नंतर येतात. मनुष्य संतुलित असेल तर बाकीच्या गोष्टींचा उपयोग आहे आणि तो असंतुलित असेल तर बाकीच्या गोष्टींचा काहीच उपयोग होत नाही.
    आज परिस्थिती अशी आहे की, मनुष्यच बिघडलेला आहे, स्वार्थी झालेला आहे, नफ्स परस्त (इच्छा आणि आकांक्षांचा गुलाम) झालेला आहे, स्वतःच्या लहानशा सुखापुढे त्याला दुसर्याचे हिमालया एवढे दुःखही कस्पटासमान वाटते. असे नसते तर असहाय्य शेतकर्यांच्या आत्महत्या एवढ्या मोठ्या प्रमाणात झाल्या नसत्या. सरकार आणि श्रीमंत लोक संवेदनशील राहिले असते तर शेतकर्यांच्या मूळ प्रश्नांवर कधीचाच तोडगा निघाला असता. ”कितीही तूर खरेदी केली तरी रडतात साले”, ”शेतकर्यांची आत्महत्या फॅशन झालेली आहे”, ”ड्रग्ज आणि दारूमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत” सारख्या विशेषनांनी त्यांची संभावना राजकारण्यांकडून केली गेली नसती. कोट्यावधींच्या संख्येने बिपीएल लोक असहाय्यपणे जगत असताना, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून अब्जावधीचे आयपीएलचे सामने झाले नसते, श्रीमंत आणि गरीबांमध्ये एवढी दरी निर्माण झाली नसती, -
संसाधनांचे समान वाटप झाले असते, सरकारी शाळा आणि रूग्णालये डबघाईला आली नसती. आज देशामध्ये जेवढ्या काही समस्या आहेत त्या कुशासनामुळे निर्माण झालेल्या आहेत. चारित्र्यहीन लोकांच्या हातात सत्तेची सुत्री एकवटलेली असल्यामुळे आज देशाची ही अवस्था झालेली आहे. फुलटाईम राजकारण करणार्यांच्या  संपत्तीमध्ये दर पाच वर्षांनी आपोआप वृद्धी होत आहे. हा या गोष्टीचा पुरावा आहे की, शासनात बसलेले लोक आपल्या राजकीय पोजीशनचा दुरूपयोग करून पैसा कमावित आहेत. कोणत्याही पक्षाच्या पहिल्या फळीतील शंभर नेत्यांच्या संपत्तीचे विश्लेषण केले असता त्यांची संपत्ती ते राजकारणात आल्यानंतर विद्युत गतीने वाढल्याचे सत्य समोर येईल. सत्ताधार्यांच्या दुष्कर्माची चर्चा करीत बसलो तर हा लेखच काय कित्येक पुस्तकेसुद्धा कमी पडतील. म्हणून या ठिकाणी सत्ताधार्यांच्या वाईट कृत्यांचा ओझरता उल्लेख यासाठी केला आहे की, सत्ता हे एक असे साधन आहे, ज्याचा उपयोग करून सत्ताधारी जमात,  जनतेचे कल्याणही करू शकते व तिचा दुरूपयोग करून जनतेची पिळवणूकही करू शकते. राज्यघटना कितीही चांगली असो, व्यवस्था कितीही चांगली असो, वाईट चारित्र्याचे लोक त्याची वाट लावण्यासाठी सक्षम असतात.
    दुर्दैव या गोष्टीचे आहे की, सत्तेचा सदुपयोग कसा करावा? त्यासाठी चारित्र्यवान सत्ताधारी कसे घडवावेत? याचे सविस्तर मार्गदर्शन ज्या कुरआनमध्ये करण्यात आलेले आहे, त्याचा विसर स्वतः मुस्लिमांना पडलेला आहे. 20 कोटी लोकसंख्येच्या या समाजाला कुरआनमधील चारित्र्यवान लोकांची संकल्पनाच समजलेली नाही, किंबहुना ती समजून घ्यावी, असे त्यांना कधी वाटले नाही, ज्यांनी समजून घेतली त्यांनी तिला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न करण्याची हिम्मत दाखविली नाही.
    रमजानच्या निमित्ताने चारित्र्यवान लोक कसे घडवावेत? या संकल्पनेला नव्याने समजून घेण्याची संधी अल्लाहने पुन्हा एकदा आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिलेली आहे. वाचक मित्रानों! जरा क्षणभर दोन्ही डोळे बंद करा, दोन-तीन लांब श्वास घ्या आणि शांतपणे विचार करा, गेल्या रमजानमध्ये आपल्यासोबत असे किती लोक होते जे आज आपल्यात नाहीत? त्यांच्या चेहर्यांची आठवण करा, आज ते कित्येक टन मातीखाली असहाय्यपणे पडून आहेत. जे मागच्या वर्षापर्यंत मोठमोठ्या बाता मारत होते ते आज मातीखाली गाडले गेलेले आहेत. आज जे आहेत माहित नाही त्यांच्यातील किती लोक पुढचा रमजान पाहू शकतील? पुढील रमजान न पाहणार्यांमध्ये तुमचा माझा कोणाचाही समावेश असू शकतो. म्हणून वेळ महत्त्वाची आहे, संधी हाती आलेली आहे, रमजान दारासमोर उभे आहे, स्वतःच्या चारित्र्य संवर्धनाची ही संधी सोडू नका. स्वतःला आणि स्वतःच्या तरूण पिढीला चारित्र्यवान बनविण्यासाठी या महिन्याच्या खडतर प्रशिक्षणाला आनंदाने सामोरे जा.
    रोजे आणि चारित्र्य निर्मितीची प्रक्रिया
    कुरआनमध्ये अल्लाहने म्हटले आहे की, “हे इमानधारकांनो! विहित केले तुमच्यावर उपवास जसे विहित केले होते तुमच्या पूर्वींच्या(लोकां) वर, जेणेकरून तुम्ही चारित्र्यवान व्हाल.” (संदर्भ ः सुरह बकरा आयत नं.183).
    रोजे ठेवल्याने चारित्र्याची निर्मिती कशी होते? हे समजून घेणे उद्बोधक ठरेल. मुस्लिम समाजामध्ये दहा-बारा वर्षाची मुलं-मुली रोजे ठेवण्यास सुरूवात करतात. त्या माध्यमातून त्यांच्या बालमनामध्ये अल्लाहबद्दल प्रचंड विश्वास निर्माण होतो. तो कसा होतो? याला काही उत्तर नाही. ती ईश्वरी लीला आहे. एवढे मात्र नक्की की, अगदी तापत्या उन्हांमध्ये सुद्धा दहा-बारा वर्षाची लहान मुलं तहान आणि भुकेने अगदी व्याकूळ होऊन जातात पण संधी असूनही चोरून काही खात-पीत नाहीत. चांगल्या चारित्र्याचा पाया येथूनच रचला जातो. मग जस-जसे वय वाढते, समज वाढते, तस-तसे याच पायावर पाच वेळेसच्या नमाजच्या माध्यमातून चांगल्या चारित्र्याची उत्तूंग इमारत आकार घेते. रोजा आणि नमाज यांच्या पाबंदीमुळे माणसे चारित्र्यवान बनतात. त्यांच्या मनामध्ये अल्लाहविषयी भीती व अल्लाहविषयीचे प्रेम या संमिश्र भावना निर्माण होतात. त्यातूनच त्यांच्यात एकाप्रकारची स्वयंशिस्त निर्माण होते, जी की त्यांच्या हातात आलेल्या पैसा, पद अगर सत्तेचा दुरूपयोग करण्यासापासून त्यांना परावृत्त करते.
    इस्लामी चारित्र्याच्या बळावर सत्ताधारी बनण्याच्या प्रक्रियेविषयी जमाते इस्लामीचे संस्थापक सय्यद अबुल आला मौदूदी म्हणतात, ”आप तआज्जुब करेंगे के कुरआन ने मुसलमानों की तरक्की और उनके एक हुक्मरान जमात बनने और सबपर गालीब आ जाने का जरिया सिर्फ इमान और अमले सालेह (पुण्यकर्म) को करार दिया है. और कहीं ये नहीं कहा के, तुम युनिव्हर्सिटीयां बनाओ, कॉलेज खोलो, कारखाने कायम करो, जहाज बनाओ, कंपनीयां कायम करो, बँक खोलो, सायंस के आलात (वैज्ञानिक सामुग्री) इजाद करो, और ऊंचे लिबास पहनो, मुआशरतअंदाज व अतवार (सामाजिकरित्या प्रगत लोकांच्या सवयी) में तरक्कीयाफ्ता कौमों की नकल करो. नेज उनसे तनज्जुल व इनहेतात (पतन) और दुनिया व आखिरत की जिल्लत व रूसवाई का वाहिद सबब भी निफाक (मतभेद) को ठहराया न के इन असबाब के फुकदान को जिन्हें आजकल दुनिया असबाबे तरक्की (विकासाचे कारण) समझती है.” (संदर्भ ः ’मुसलमानों की ताकत का असल मंब्बा’, तर्जुमानुल कुरआन जानेवारी 1935).
    आपल्या देशातील चारित्र्यवान लोक
    स्वातंत्र्य लढ्यादरम्यान जी सर्वधर्मीय-सर्वपक्षीय चारित्र्यवान पिढी उदयास आली होती, स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर ती पीढि लोपपावली. कोणत्याही देशाला चारित्र्यवान लोकांचा अखंड पुरवठा करत राहणे यापेक्षा मोठी देशसेवा नाही. याचा विसर आज बहुसंख्य दाम्पत्यांना पडल्याने, गरज नसतांनाही अनेक महिला जॉब करण्यामध्ये प्रतिष्ठा समजत आहेत. गृहिणी या पदाचे एवढे अवमुल्यन झाले आहे की, क्षमा करा! तिला मोलकरणीच्या बरोबरीने आणून समाजाने उभे केले आहे. ज्या महिलांनी आपल्या प्रजननक्षम आयुष्यामध्ये किमान चार अपत्यांना जन्म देऊन, त्यांच्यावर चांगले संस्कार करून, त्यांना जबाबदार नागरिक बनवून, देशसेवेसाठी पुरविण्याची महत्त्वाची जबाबदारी स्वीकारायला हवी, त्या स्त्रियांनी जॉब करण्यात प्रतिष्ठा शोधलेली आहे व जॉबमध्ये ती त्यांना मिळतही आहे. परिणामी, चारित्र्यवान नागरिक घडविण्याच्या त्यांच्या प्राथमिक जबाबदारीवर, त्यांच्या या जॉबमुळे विपरित परिणाम होत आहे. चार पैसे जरूर त्या कमवित आहेत, परंतु त्या मोबदल्यात लहान मुलांवर सुसंस्कार करण्याची त्यांची क्षमता कमी होत असल्याने भ्रष्ट, लिंगपिसाट आणि चारित्र्यहीन नागरिकांचा मोठ्या प्रमाणात देशाला पुरवठा होत आहे. परिणाम सर्वांसमोर आहे. हेच नागरिक शासन आणि प्रशासनात जावून आपल्या चारित्र्याप्रमाणे आपल्या देशाला ’सेवा’(?) प्रदान करीत आहेत. म्हणून आज देशाची अशी अवस्था झालेली आहे.
    कोट्यवधी जबाबदार राष्ट्रवादी मुस्लिम नागरिकांचा एक समुह म्हणून या देशात चारित्र्यवान नागरिकांचा अखंड पुरवठा करण्यास आपण सुद्धा कमी पडलेलो आहोत, हे मान्य केल्याशिवाय आपल्याला यावर उपाय शोधता येणार नाही. एकदा हा गुन्हा मान्य केला की मग यावर उपाय रमजानच्या स्वरूपात आपल्या समोर उभा राहतो. सुदैवाने तो आपल्या समोर आणि आपण त्याच्या समोर उभे आहोत. हा 30 दिवसाच्या रोज्यांचा कठीण काळ, एक खडतर प्रशिक्षणाचा काळ समजून यात जास्तीत जास्त सद्वर्तन करण्याचा, कुरआन समजून घेण्याचा, सचोटीने वागण्याचा, माणुसकी दाखविण्याचा, क्षमा करण्याचा, आपले अधिकार सोडून दुसर्यांचे अधिकार देण्याचा हा काळ आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
    रमजानच्या या खडतर प्रशिक्षणातून ताऊन, सुलाखून निघालेल्या चारित्र्यवान मुस्लिमांचा जेव्हा इतर बहुसंख्य नागरिकांशी संपर्क होईल व जेेव्हा त्यांना खात्री पटेल की अल्पसंख्यांक मुस्लिम समाज हा चारित्र्यवान लोकांचा उपयोगी समूह आहे, तेव्हा ते मुस्लिम समाजाविषयी घृणा करणार नाहीत, उलट प्रेम करतील. कारण उपयोगी माणसे कोणाला नको असतात?
    भांडवलशाही लोकशाही व्यवस्थेमध्ये राहून-राहून बहुतेक मुस्लिम नागरिक सुद्धा पाश्चिमात्यांच्या स्वार्थी जीवनशैलीशी एकरूप झालेले आहेत व त्यामुळे त्यांचे चारित्र्य कमकुवत झालेले आहे, त्यांच्यात आपसात प्रचंड मतभेद निर्माण झालेले आहेत, त्यातूनच शिया-सुन्नी आणि इतर भेद निर्माण होऊन आपसात भीषण लढाया होत आहेत. ही अतिशय गंभीर स्थिती आहे. जीचे वर्णन प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी खालील शब्दात केलेले आहे, ”मुझे इस बात का खौफ नहीं के मेरे बाद तुम शिर्क करोगे, मगर डरता इस बात से हूं के, कहीं तुम दुनिया में मुब्तला न हो जाओ और आपस में लढने न लगो, अगर ऐसा करोगे तो हलाक हो जाओगे जिस तरह पहली उम्मते हलाक हो चुकी हैं.”
    तरी समस्त वाचकांना आवाहन आहे की, रमजानच्या मूळ स्पिरिटशी एकरूप होऊन आपले चारित्र्य संवर्धन होईल याकडे लक्ष द्या व रमजान झाल्यावर पुढील रमजानपर्यंत आपल्या चारित्र्याच्या सुगंधाने देशाला शुचिर्भुत करण्याचा प्रयत्न करा, हीच खरी मुसलमानी, हीच खरी देशसेवा, रमजानच्या माध्यमाने संवर्धित करा चारित्र्याचा ठेवा. अल्लाह माझ्या आणि तुमच्यावर या रमजानमध्ये बरकतींचा वर्षाव करो. (आमीन.)

- एम.आय.शेख 
9764000737

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget