Halloween Costume ideas 2015

इक्बालांच्या काव्यातील राष्ट्रविषयक चिंतन, सांस्कृतीक राष्ट्रवाद तथा टागोर आणि मार्क्स

- सरफराज अ. रजाक शेख
एड. गाजीउद्दीन रिसर्च सेंटर, सोलापूर 
8624050403
आधुनिक विचारवंतात डॉ. इक्बाल यांचे स्थान वरचे आहे. सुरवातीला इक्बालांच्या लेखणी आणि वाणीतून प्रकटलेल्या सृजनशील, परिवर्तक विचारांना मुस्लीम समाजातून मोठा विरोध झाला. नंतर मात्र भारतीय उपखंडातल्या मुस्लीमांच्या सांस्कृतीक मुल्यांचे ते प्रतिनिधी ठरले. इस्लामी चिंतनांच्या परंपरेवर दाटलेले मळभ त्यांनी झटकून टाकले. अनेक अस्पर्श विषयांना त्यांनी हात घातला. काहींची नव्याने व्याख्या केली. नवमुल्यांना ते मोठ्या धाडसाने भिडले. इक्बालांच्या नावावर संख्येने मोठी ग्रंथावली नाही. जावेदनामा, आसारे खुदी, बांगे दिरा,  बाले जिब्राईल, काही लेख आणि उर्दु काव्य अशी सहज उच्चारता येतील इतकीच त्यांची ग्रंथसंपदा. पण मागील शतकभरात जगाच्या पातळीवर इक्बालांच्या साहीत्यावर जितकं लिखाण झालं, तितकी दखल शेक्सपिअर, मार्क्स नंतर अभावानेच कुणाची घेतली गेली असेल. इक्बाल म्हणावे तर इस्लामनिष्ठ होते. आणि अनुभवावे तर स्वतंत्र विचारधारा मांडणारे लिबरल देखील होते. इक्बाल धर्मापलिकडे जाणारे आणि धर्मावर भाष्य करणारे. इक्बालांनी दांते हाताळला. मार्क्सलाही इक्बालांनी हाताळलं. हेगेल, एंजेल्स, वर्डस्वर्थ सार्‍यांनीच इक्बालांच्या काव्यातून हजेरी लावली. व्हाल्टेअर सारखा राज्यक्रांती घडवून आणणारा क्रांतीकारक विचारवंत इक्बालांनी नेहमीच आपल्या प्रतिभेने मोहवित आला आहे. लेनिन वर इक्बालांनी रचलेले काव्य असो वा एंगल्स वर केलेली टिका इक्बालांच्या साहीत्यात मानवकल्याणाची भूमिका नेहमी केंद्रस्थानी राहीली आहे.  त्यामुळेच इक्बालांना कामगारहित केंद्रस्थानी मानून अर्थशास्त्राची रचना करणारा मार्क्स भावला. त्यामुळेच इक्बालांनी आपल्या काव्यात अनेक ठिकाणी मार्क्सचा गौरव केला. इक्बाल ज्या प्रकर्षाने मार्क्स मांडत होते. त्याच तडफेने ते इस्लामी जीवनमूल्यांची पुन:व्याख्या करत होते. इस्लामला फक्त इश्वरनिष्ठ मानून इक्बालांनी अल्लाहची भक्ती आराधली नाही. तर इस्लामला त्यांनी दास कापिलटलच्या तुलनेत हाताळलं. दास कापिटल मध्ये मार्क्सने सांगितलेल्या भौतीकवादाची इस्लामी प्रेरणा त्यांनी शोधून काढली. त्यांच्या विचारांनी मार्क्सशी हात मिळवणी केली म्हणून उलेमांनी त्यांना काफीरही ठरवलं. पण ते डगमगले नाहीत. त्यांनी आपला शिकवा (गर्‍हाणे) अल्लाहच्या दरबारात मांडला. ते लढत राहीले. व्यक्त होत राहीले. त्यांनी  अनेक नवविचारांना जन्म दिला. चिंतनाच्या नव्या दिशा दाखवल्या. इक्बाल गेले त्याला आता शतकाहून आधिक काळ झाला आहे. इक्बालांना ज्या वर्गाने विरोध केला. ते आज इक्बालांना घेउन मिरवतायत. इक्बालवर जितक संशोधन अंतरराष्ट्रीय विद्यापीठातून झालं तितकचं मदरश्यातूनही होतयं. एकेकाळी ज्या मदरशांनी इक्बालांवर बहीष्कार घातला, आता तेच इक्बाल मांडतायत. काळाच्या उपचाराची ही जालीम धन्वंतरी आहे.
विसाव्या शतकाच्या पुर्वार्धात इंग्रजी सत्तेचा सुर्य मध्यान्ही तळपत होता. भारतीयांवर परकीय सत्ता अधिकारात होती. माणसं लुटली जात होती. नागवली जात होती. शोषली जात होती. भारतीय समाज संक्रमणावस्थेत होता. अशा काळात इक्बाल आपल्या काव्याचे खंङ्ग घेउन अवतरले. युरोपात मार्क्स ज्या पध्दतीने भांडवलदाराविरोधात उभा राहीला. त्याच पध्दतीने इक्बाल भारतीय उपखंडात वसाहतवादाविरोधात उभे ठाकले. आपल्या शायरीने त्यांनी स्वातंत्र्याच्या प्रेरणा उत्फुल्लीत केल्या. काव्यातून चिंतन आणि चेतनेचे दर्शन घडवत इक्बाल नववविचार मांडत होते. इक्बालांचं काव्य आणि त्यांच चिंतन चतुरस्त्र आहे. त्यामध्ये प्रेमाध्यात्म आहे. रहस्यवाद आहे. जगण्याची जिगिविषा आहे. निसर्गजाणिवा आहेत. गुढता ही तर त्यांच्या काव्याचा आत्मा. मानवी जीवनाच्या नानाविध पारदर्शक, अपारदर्शक संदर्भमुल्यांचा परिचय इक्बालांनी आपल्या काव्यातून नेहमीच करुन दिला. जगणं उदात्त व्हावं. ते आनंदानं बहरावं यासाठी इक्बालांचं चिंतन. सर्जनशीलता हा त्यांच्या काव्याचा स्वभावधर्म. त्यामुळेच उर्दु काव्याची पृथगात्मता म्हणजे इक्बाल, अशी ओळखच उर्दु काव्याला मिळाली.
इक्बालांच्या काव्यातले राष्ट्रगौरव, टागोरांच्या पलिकडे जाणारी त्यांची भूमिका मात्र उपेक्षित राहीली. आजच्या भारतात दुर्दैवाने इक्बालांची ओळख त्यांनी लिहलेल्या ‘सारे जहां से अच्छा’ या गीतापलिकडे नाही. कुणी इक्बालांचा अभ्यास केला  असेलच तर ते इक्बालांच्या भारतीय निष्ठेवर संशय घेतात. त्यांना पाकीस्तान निर्मितीचा गुन्हेगार देखील मानतात. त्यामुळेच इक्बालांनी लिहलेल्या सारे जहां से अच्छा या गीताला राष्ट्रगानाऐवजी राष्ट्रगीताचा दर्जा मिळू शकला नाही. इक्बालांच्या तुलनेत टागोरांनी ब्रिटीश राज्यकर्ता राजा पंचम जॉर्ज याच्या भारतात स्वागतासाठी लिहिलेल्या गीताला राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली. टागौरांनी ज्या ब्रिटीश राजवटीविरुध्द आपल्याला लढायचे होते त्याच्या राजालाच भारतातील जनाचा आणि भारतीय गणाचा अधिनायक आणि भाग्यविधाता ठरवले. पंजाब पासून गुजरात आणि सिंध पर्यंतची वर्णने करुन त्यांनी राजाचे स्वागत केले. राजीव दिक्षित या स्वदेशी प्रचारकाच्या भाषेतच बोलायचे झाले तर “दुर्दैवाने गुलामीचा गौरव करणारे हे गीत आज आपण आपले राष्ट्रगीत म्हणून गातोय.” टागोरांच्या तुलनेत इक्बालांनी साऱ्या विश्वात भारताच्या सौंदर्याची पृथगात्मता आपल्या काव्यातून स्पष्ट केली. इक्बालांनी ब्रिटीश राजवटीला आपल्या देशावरील संकट मानले. इक्बाल या संकटांची जाणिव करुन देताना भारतीयांना उद्देशून आपल्या काव्यात म्हणतात,
“ वतन की फिक्र कर ऐ नादां मुसीबत आनेवाली है
तेरी बरबादीयों के मश्वरे  हैं आसमान पर
न समझोगे तो मिट जाओगे ऐ हिंदोस्ता वालों
तुम्हारी दास्तां तक न रहेगी दास्तानों में”
पण दुर्दैवाने इक्बालांच्या अंतकरणातील भारताविषयीचा हा दर्द त्यांना जाउन कित्येक दशके लोटली तरी आपण समजून घेउ शकलो नाही. त्यांना पाकीस्तान निर्मितीचा गुन्हेगार ठरवून आपण मोकळे झालो. इतिहासाचा अर्थ लावण्याची संघनिष्ठ उजवी परंपरा आपण या प्रकरणात ग्राह्य मानली. जर ‘सारे जहां से अच्छा’ हे राष्ट्रगीत लिहिणाऱ्या इक्बालांच्या राष्ट्रनिष्ठेला आपण आधुनिक मोजमाप लावणार असू तर त्याच मोजपट्टीने आपल्याला रविंद्रनाथ टागोर आणि बंकिमचंद्र यांचीही राष्ट्रनिष्ठा तपासायला घेणे गरजेचे आहे. पाकीस्तान निर्मितीचा गुन्हेगार इक्बालांना ठरवणार्‍यांनी संदर्भाच्या चौकटीत राष्ट्रनिष्ठेचे न्यायदान केले तर फाळणी किंवा द्वीराष्ट्र सिध्दांतांचे पहिले गुन्हेगार इक्बालांऐवजी रविंद्रनाथ टागोर हेच ठरतात. माझ्या विधानाने अनेकांने आश्चर्य वाटत असले तरी ते खरे आहे. कोणाला पटत नाही म्हणून इतिहास नाकारता येणार नाही. बंगालमध्ये ज्यावेळेस काँग्रेस आणि इतर तत्सम पक्षांनी मुस्लीमांना विधिमंडळात प्रतिनिधित्व देण्याची भूमिका मांडली त्यावेळी बंगालातल्या भद्र मंडळींनी म्हणजे उच्चवर्गीयांनी एक बैठक घेतली. त्या बैठकीतील वृत्तांत आज टागोर पेपर्स या नावाने बंगालच्या अभिलेखागारात सुरक्षित आहेत. 1920 च्या दशकात भद्र मंडळींनी बोलावलेल्या बैठकीत टागोरांनी प्रस्तुत केलेल्या ठरावात स्पष्ट पणे नमूद केले आहे की, “ भारतात  मुस्लीमांचे अस्तीत्व मान्य केले तर त्यांना कौन्सीलात प्रतिनिधित्व देखील आपल्याला द्यावे लागणार आहे. जर मुसलमानांना या देशातून काढून त्यांना याच देशातील एका भौगौलिक प्रदेशात त्यांचे राज्य निर्माण करुन दिले तर आम्हा भद्र लोकांचा धर्म यवनांच्या पातकाने भ्रष्ट होणार नाही.” अशा पध्दतीने  भारतामध्ये सर्वप्रथम हिंदु आणि मुस्लीम हे दोन राष्ट्र आहेत हा सिध्दांत टागोरांनी मांडला. इक्बालांनी नव्हे. पण सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या हव्यासापोटी भारताच्या अखंडतेला सुरुंग लावणाऱ्या विद्वानाला मात्र आपण राष्ट्रगीतकार म्हणून मान्यता देउन बसलोय. आणि भारताच्या कल्याणासाठी जो विद्वान आपल्या चिंतनाच्या जगात अस्वस्थ होता त्याला मात्र आपण पाकीस्तान निर्मितीचा गुन्हेगार ठरवून मोकळे झालोय.
इक्बाल आणि पाकीस्तान निर्मितीच्या संदर्भावर आधुनिक काळात अनेकांनी संशोधन केले आहे. प्रसिध्द इतिहासकार, फारसीचे अभ्यासक आणि निजाम आर्कीयॉलाजी मध्ये अधिकारी राहिलेले सेतू माधव पगडी म्हणतात, “ काहिंच्या मते ही देशाच्या विभाजनाची नांदी होती. पण इक्बालच्या आयुष्याच्या शेवटच्या काळातील त्याच्या उद्गारावरुन विभाजनाचा पुरस्कार करीपर्यंत त्याने मजल मारली होती, हे दिसत नाही. भारतीय संघराज्यात मुस्लीम बहुसंख्यक असलेल्या प्रांताना स्वायतत्ता असावी असा त्याचा विचार असावा. अर्थात त्याच्या मृत्युनंतर द्विराष्ट्रवाद आणि विभाजन याला पार्श्वभूमी म्हणून इक्बालचे तत्वज्ञान चांगलेच उपयोगी पडले आणि राजकारणी नेत्यांनी त्याचा पुरेपूर लाभ घेतला हि वस्तूस्थिती आहे.”  पगडींप्रमाणे सुरेश चंद्र नाडकर्णी यांनी देखील इक्बाल यांना फाळणीचा गुन्हेगार मानण्यास नकार दिला आहे. सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी एक लेख लिहला होता. त्यात ते म्हणतात, फाळणीचे खापर डॉ. इकबालांच्या डोक्यावर फुटले. हा फार मोठा अन्याय आहे. मृत्युपुर्वी देशाची फाळणी हा भयानक प्रकार आहे, हिंदू - मुसलमान दोन्ही जमाती भरडल्या जातील आणि आतोनात रक्तपात होईल, काहिही करा पण फाळणी होउ देउ नका. असे स्वच्छ मत त्यांनी नमूद करुन ठेवले आहे. त्यांचे भाकीत तंतोतंत खरे ठरले.
(लेखक इतिहासतज्ञ व पत्रकार आहेत.)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget