(२७६) अल्लाह व्याजाचा ऱ्हास करतो आणि दान-धर्माची वाढ करतो३२० आणि अल्लाह कोणत्याही कृतघ्न आणि वाईट आचरण करणाऱ्याला पसंत करत नाही.३२१
(२७७) होय, जे लोक श्रद्धा ठेवतील आणि पुण्यकर्म करतील आणि नमाज कायम करतील व जकात देतील, नि:संशय त्यांचा मोबदला त्यांच्या पालनकत्र्यापाशी आहे आणि त्यांच्यासाठी कोणत्याही भयाचा आणि दु:खाचा प्रसंग नाही.३२२
(२७८) हे ईमानधारकांनो, अल्लाहचे भय बाळगा आणि जे काही तुमचे व्याज लोकांकडून येणे बाकी असेल ते सोडून द्या, जर खरोखर तुम्ही ईमानधारक असाल.
(२७९) परंतु जर तुम्ही असे केले नाही, तर सावध व्हा, अल्लाह व त्याच्या पैगंबराकडून तुमच्याविरूद्ध युद्धाची घोषणा आहे.३२३ अजूनसुद्धा पश्चात्ताप कराल (आणि व्याज सोडून द्याल) तर आपली मूळ रक्कम घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे. तुम्ही कुणावर अत्याचार करू नका न तुमच्यावर कुणी अत्याचार करील.
३२०) या आयतमध्ये एक असे सत्य वर्णन करण्यात आले आहे जे नैतिक आणि आध्यात्मिक दृष्टीने तसेच आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्टीने पूर्ण सत्य आहे. व्याजाने संपत्ती वाढते असेच दिसते आणि दान-पुण्याने संपत्ती घटते असे दिसून येते. परंतु सत्य हे आहे की मामला याविरुद्ध आहे. अल्लाहचा नैसर्गिक नियम हाच आहे की व्याज नैतिक, आध्यात्मिक तसेच आर्थिक व सांस्कृतिक प्रगती करण्यात अडथळाच बनून राहात नाही तर या सर्वांच्या पतनाचे कारण बनते. या विपरीत दान-पुण्याने (ज्यात कर्जे हसना (उत्तम कर्जसुद्धा सामील आहे) नैतिकता, आध्यात्मिकता, संस्कृती आणि आर्थिक स्थिती इ. सर्व विकसित होत जातात.
३२१) स्पष्टत: व्याजावर पैसा तोच व्यक्ती लावतो ज्याला गरजेपेक्षा जास्त मिळाले आहे. हा गरजेपेक्षा जास्त हिस्सा जो त्या व्यक्तीला मिळतो ती कुरआनच्या दृष्टीने अल्लाहची कृपा आहे. अल्लाहच्या कृपेची खरी कृतज्ञता व्यःत करणे म्हणजे अल्लाहने जशी त्याच्यावर कृपा केली त्याचप्रमाणे त्याने अल्लाहच्या इतर गरजवंत दासांवर मेहरबानी करावी. तो जर असे करत नसेल परंतु याविरुद्ध अल्लाहच्या कृपेला या उद्देशासाठी वापरतो, की त्या कमी उत्पन्न गटाच्या लोकांच्या त्यांच्या अल्पशा हिश्यातून आपल्या पैशाच्या जोरावर काही भाग हडप करत असतो तर असा मनुष्य खरे तर अल्लाहचा कृतघ्न आहे, तसेच अन्यायी, अत्याचारी आणि दुष्कर्मसुद्धा आहे.
३२२) या आयती (नं. २७३ ते २८१) मध्ये अल्लाहने पुन्हा पुन्हा दोन प्रकारच्या चारित्र्याला डोळ्यांपुढे ठेवले आहे. एक चारित्र्य स्वार्थ, लोभी आणि कृपण शायलॉकवृत्ती मनुष्याचे आहे. अशी व्यक्ती अल्लाह आणि दासांच्या हक्कांशी बेपर्वा बनतो. तो तर फक्त रुपये पैसे मोजण्यात आणि मोजून मोजून संभाळून ठेवण्यातच आणि संपत्ती वाढविण्यातच आपले आयुष्य वेचतो. दुसरे चारि्त्र्य एकेश्वरवादी, दानशूर आणि मानवतेचे भले करणाराचे चारित्रय आहे. तो अल्लाह आणि अल्लाहच्या त्या दासांच्या हक्कांविषयी जागरूक असतो. आपल्या कष्टाने कमवितो, स्वत: खातो आणि दुसऱ्यांना खाऊ घालतो; तसेच मन:पूर्वक भलाईच्या कामात खर्च करतो. पहिल्या प्रकारचे चारित्रय अल्लाहला अति अप्रिय आहे. जगात या चारित्र्याने भले समाज निर्माण न होता बिघाड निर्माण होतो आणि परलोकात अशा चारित्र्याच्या व्यक्तीसाठी दु:ख, परेशानी, पीडा व कष्टच आहे, याविरुद्ध अल्लाहला दुसऱ्या प्रकारचे चारित्रय अतिप्रिय आहे. यामुळेच जगात भल्या समाजाची घडण होते आणि परलोक सफलता यावरच आधारित आहे.
३२३) ही आयत मक्का विजयानंतर अवतरित झाली होती तेव्हा अरबस्थान इस्लामी शासनाच्या पूर्ण आधीन होते. यापूर्व व्याज एक अप्रिय वस्तू समजली जात होती. परंतु कायद्याने त्यावर बंदी घातली गेली नव्हती. ही आयत अवतरित झाल्यानंतर इस्लामी राज्याच्या सीमेत व्याजबट्ट्याचा व्यवहार फौजदारी गुन्हा बनला. अरबांच्या ज्या टोळया व्याज खात होत्या त्यांच्याकडे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपले वसुली अधिकारी पाठवून त्यांना तंबी दिली की त्यांनी व्याजबट्ट्याच्या व्यवहारापासून दूर राहावे अन्यथा त्यांच्याविरुद्ध युद्ध पुकारले जाईल. आयतच्या अंतिम शब्दांनुसार इब्ने अब्बास, हसन बसरी, इब्ने सरीन आणि रूबैअ बिन अनस यांच्या मते जो मनुष्य इस्लामी राज्यात व्याज खाईल त्याला क्षमा-याचना (तौबा) करण्यास भाग पाडावे आणि मान्य केले नाही तर त्याला ठार करावे. दुसऱ्या फिकाहशास्त्रींच्या (फुकाह) मते अशा व्यक्तीला कैद करणे पुरेसे आहे. जोपर्यंत तो व्याजबट्ट्यांचा व्यवहार बंद करण्याचे सोडत नाही, तोपर्यंत त्याला तुरुगांतून सोडले जाऊ शकत नाही.
Post a Comment