Halloween Costume ideas 2015

पाकिस्तान ही डॉ. इक्बाल यांची योजना नव्हती

सरफराज अ. रजाक शेख
एड. गाजीउद्दीन रिसर्च सेंटर, सोलापूर 
8624050403
इक्बालांच्या काव्यातील राष्ट्रविषयक चिंतन,
सांस्कृतीक राष्ट्रवाद तथा  टागोर आणि मार्क्स
16डिसेंबर 1982 च्या टाईम्स ऑफ इंडीयाच्या अंकात इक्बालांनी 1920 साली एडवर्ड थामसन या आपल्या मित्राला एक पत्र लिहले होते. ते प्रकाशीत करण्यात आले आहे. त्यामध्ये इक्बाल म्हणतात, “ पाकिस्तान नावाच्या योजनेचा पुरस्कर्ता असे तुम्ही मला संबोधता, पाकिस्तान ही माझी योजना नाही. अलाहबादच्या अखिल भारतीय मुस्लीम लीगच्या वार्षिक अधिवेशनातील माझ्या भाषणात जी योजना मी सुचवली ती म्हणजे मुस्लीम बहुसंख्यांक प्रांतांची निर्मिती होय.  तो प्रांत नियोजित भारतीय संघराज्याचा भाग असला पाहिजे. ”इक्बालांचा राष्ट्रवाद हा विशुध्द स्वरुपाचा होता. त्यांनी मांडलेल्या राष्ट्रवादामध्ये पाश्तात्य  विचारवंताप्रमाणे मानव कल्याणाच्या जाणीवा होत्या. राष्ट्र आणि त्याच्या संस्कृतीचा अभिमान देखील त्यामध्ये होता. कारण राष्ट्र हि संकल्पना ठराविक भौगौलिक क्षेत्राच्या साम्य असणाऱ्या संस्कृतीच्या इतिहासातून निर्माण होते. त्या इतिहासातील इतिहास पुरुष हे त्या राष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रेरणा देत असतात. त्यामुळे राष्ट्रवादामध्ये राष्ट्राच्या इतिहासाविषयीच्या अभिमानाला खूप महत्व आहे.
रविंद्रनाथ टागोरांच्या तुलनेत इक्बालांच्या साहित्यामध्ये राष्ट्रविषयक जाणिवा अधिक आहेत. इक्बालांनी भारतीय इतिहासपुरुषांविषयी प्रचंड असे लिखाण केले आहे. आपल्या काव्यप्रतिभेने इक्बालांनी भारतीय विचारवंतांचा आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. वेगवेगळ्या धर्म पंथाच्या प्रमुखांविषयी त्याच्या संस्थापकांविषयी देखील इक्बालांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. इक्बालांच्या साहित्यात गौतम बुध्द, राम, गुरुनानक, चार्वाक, महाराणाप्रताप यांचे मोठे संदर्भ येतात. इक्बाल वसाहतवादाविरुध्द म्हणजे इंग्रजाविरुध्द संघर्ष केलेल्या 1857 च्या योध्द्यांविषयी कृतज्ञता प्रकट करतात. इंग्रजाविरोधातील लढ्यात शहादत पत्करलेल्या टिपू सुलतान यांच्याविषयी जावेदनामा मध्ये इक्बाल मोठ्या आत्मीयतेने लिहितात. टिंपूंची तुलना ते जगातील महान योध्यांशी करतात. इक्बाल इतिहासाला राष्ट्राची संस्कृती मानतात. पण इतिहासाला ते सांस्कृतीक संघर्षासाठीचे शस्त्र म्हणून पाहत नाहीत. उलट ते या देशातील बालकांना त्यांच्या संस्कृतीविषयीचा अभिमान शिकवतात. “हिंदुस्तानी बच्चों का कौमी गीत” या त्यांच्या कवितेत ते म्हणतात,
“ चिश्ती ने जिस जमीं में पैगामे हक सुनाया
नानक ने जिस चमन में वहदत का गीत गाया
तातारीयोंने जिसको अपना वतन बनाया
जिसने हजाजियों से दश्ते अरब छुडाया
मेरा वतन वही है। मेरा वतन वही है। ”
चिश्ती पंरपरेतल्या सुफी संतानी पाखंडाच्या विरोधात सत्यधर्माच्या प्रसारासाठी ज्या भूमीची निवड केली ती पाक जमीन हीच आहे. नानकांनी एकेश्वरवादाचे गीत जिथे गायले ते चमन हेच आहे. तातारी योध्यांनी ज्याला आपले राष्ट्र मानले तो माझा देश, माझे वतन तेच आहे  ते इतके महान आहे की हजाजिंनी देखील याच्या प्रेमापोटी अरबस्तानाचा त्याग केला. देशाचा गौरव करताना इक्बाल याच काव्यात पुढे म्हणतात -
“ युनानियों को जिसने हैरान कर दिया था
सारे जहाँ को जिसने इल्मो हुनर दिया था
मिट्टी को जिसकी ह़क ने जर का असर दिया था
तुर्की का जिसने दामन हिरों से भर दिया था
मेरा वतन वही है। मेरा वतन वही है।  ”
1947 मध्ये हिंदीच्या धर्मांध आग्रहापुढे भारतीय एकात्मतेचे प्रतिक असणाऱ्या उर्दूचा पराभव झाला नसता तर भारतीय बालकांना जाज्वल्य देशप्रमाची इक्बालची विचारधारा समजू शकली असती. खोट्या प्रतिकांचा गौरव करणाऱ्या गीतांऐवजी ते उज्वल देशाभिमानाची गीत गाऊ शकले असते. पण दुर्दैव इक्बाल आणि गालीबच्या  उर्दुचा ज्या देशात जन्म  झाला. त्या देशातून तिला विस्थापित होण्याची वेळ आली. हे सारं घडलं ते धार्मिक राष्ट्रवादाच्या उन्मादातून. 
ज्या काळी सावरकरांपासून बकीमचंद्र चटर्जीपर्यंत सारेच भारतीय संघराज्याच्या राष्ट्रवादाला सांस्कृतीक अधिष्ठान देण्यात मश्गूल होते. त्या काळात इक्बाल संमिश्र राष्ट्रवादाचा आधार देऊ पाहत होते. एकिकडे बंकीचंद्र त्यांच्या ‘आनंदमठ’ या कांदबरीत हिंदू-मुस्लीम दंगलीचे चित्र रेखाटतात. त्यातील दंगलखोर आणि मुस्लीमांचे शिरकाण करणाऱ्या पात्रांच्या ओठी ‘ वंदे मातरम’ हे गीत घालातात. हा देश म्हणजे फक्त मुस्लीमेतरांची अधिसत्ता आहे असे निक्षून सांगतात. त्याच काळात इक्बाल देशनिष्ठेची व्याख्या करताना नानकांपासून गौतम बुध्दांपर्यंतच्या साऱ्या इतिहासपुरुषांविषयी कृतज्ञ भाव व्यक्त करतात. इक्बालांनी भारतीय समाजाच्या शोषणाचे मर्म देखील शोधून काढले.
इक्बालांच्या शायरीतील सत्यशोधकी परंपरा आणि राष्ट्रनिष्ठा वेगळी आहे. इक्बालांनी ज्या प्रमाणे कांट, नित्शे, डंकेन या पाश्‍चात्य विचारवंताशी वाद घातला. त्यांचे समर्थन केले. त्यापध्दतीने त्यांनी समकालीन काही प्रादेशिक अब्राम्हणी चळवळींचा अभ्यास केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. इक्बालांच्या काळातच 1910 ते 1930 च्या दरम्यान भारतात अनेक समाज सुधारणावादी चळवळी मोठ्या धडाक्यात सुरु होत्या. तामिळनाडूतील द्रविड चळवळ, बंगालातील समता चळवळ, महाराष्ट्रातील ब्राम्हणेतर चळवळ त्यावेळी राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरली होती. याच काळात इक्बालांनी लिहिलेल्या अनेक कवितांमध्ये त्यांनी बहुजनांचे आणि इतल्या मुलनिवासी समाजाचे ब्राम्हणांकडून केल्या गेल्या शोषणाविषयी लिखाण केले. इक्बालांची एक कविता ब्राम्हणांना उद्देशून लिहलेली आहे. “ नया शिवाला ” हे त्याचे शिर्षक. त्यात इक्बाल म्हणतात-
“ सच कह दूं ऐ ब्रम्हण । गर तू बुरा न माने
तरे सनम कदों के बुत हो गए पुराने
अपनों से बैर रखना तूने बुतों से सिखा ”
ब्राम्हणांनी माणसा-माणसात भेद केला. त्यांच्या अहंकारांमुळे भारतीय समाजातील कित्येक वर्गांना पशू पेक्षा हीन जिणे जगावे लागले. त्यांच्या या कृत्याचा समाचार घेताना इक्बाल त्यांना म्हणतात ‘ तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर मी तुला सांगतो की तुमच्या प्रिय व्यक्तींच्या देवता आता जुन्या झाल्या आहेत. यांच्यापासूनच तू भेद करणे शिकला आहेस. त्यांच्यामूळेच आपल्या लोकांपासून भेद करण्याचा बोध तुला मिळाला आहे.’ मराठीतल्या केशवसूती प्रवृत्तीचे मुर्तीभंजक विचार यामध्ये आहेत. पण त्याला नुसता काव्यात्म प्रेरणा नाहीत. त्यामागे सामाजिक प्रेरणा आहेत. कविता रचून इक्बाल कधी थांबले नाहीत. आपल्या शायरीच्या माध्यमातून समाजक्रांतीचा अंगार त्यांना पेटवायचा होता. दुर्दैवाने शायर इक्बाल, कवी इक्बाल आणि धर्मचिंतक इक्बालवर आपण जितके संशोधक केले तितके संशोधन समाजसुधारक आणि समाजसेवक इक्बालांवर होऊ शकले नाही. त्यामुळेच इक्बालांचे साहित्य प्रकाशात आले तरी त्यांच्या सामाजिक प्रेरणा मात्र दुर्लक्षित राहील्या. एकिकडे इक्बाल ब्राम्हणकृत शोषणाची मिमांसा करतात. तर दुसरीकडे एकेश्वरवादी समाजचिंतकांचा गौरव करतात.
इक्बाल देवतांचे अवडंबर नाकारून एकेश्वरवादाचा प्रसार करणाऱ्या विचारवंतांचा गौरव करताना कृतज्ञता व्यक्त करतात. भारतातील जितक्या वैदीक विरोधी अब्राम्हणी चळवळी झाल्या त्यांनी गौतम बुध्दांना प्रेरणा पुरुष मानले. गौतम बुध्दांसारखा महान धर्मचिंतक, समाजचिंतक भारतात होउन गेला याचे इक्बालांना अभिमान वाटायचे.  इक्बाल बुध्दांविषयी म्हणतात,
“ कौमने पैगामे गौतम की जरा परवाह न की
कद्र पहचानी न अपने गौहरे यकदानां की ”
भारतीयांना गौतम बुध्दांचा विसर पडला त्यामूळेच भारतभूमी शुद्रांच्या दुःखाचे आगार बनली असल्याचेही इक्बालांनी म्हटले आहे, इक्बाल म्हणतात,
“ आह । शुद्दर के लिए हिंदौस्तां गमखाना है
दर्द इन्सानी से इस बस्ती का दिल बेगाना है ”
शुद्रांविषयी आत्मीयता प्रकट केल्यानंतर इक्बाल पुन्हा ब्राम्हणांच्या अहंकारावर आघात करतात, इक्बालांच्या कवितेतील या ओळी खूप मार्मिक आहेत.
“ बरहमन सरशार है अबतक मये पिंदार में
शमे गौतम जल रही है महफिले अयार में ”
ब्राम्हण अजूनही आपल्या अहंकारात मस्त आहेत. त्यामुळेच भारतीयांनी प्रज्वलीत केलेला गौतम नावाचा दिवा परक्यांच्या मैफीलीत जळतोय. गौतम बुध्दांनी उठवलेला न्यायाचा अवाज न ऐकता आपण गाफील राहिल्याचे इक्बाल सांगतात
“ आह। बदकिस्मत रहे आवाजे हक से बेखबर
गाफिल अपने फल की शीरीनी से होता है”
  अशा वेदना प्रकट करुन इक्बाल पुन्हा गुरु नानकांच्या समतावादाने आशावादी होतात. नानक या कवितेत ते म्हणतात,
“ फिर उठी सदा तौहीद की पंजाब से
हिंद को इक मर्दे कामिल ने जगाया ख्वाब से  ”
इक्बालांच्या काव्यात अशा अनेक राष्ट्रीय प्रतिकांचा गौरव होतो. इतिहासाचा अभिमान प्रकट केला जातो. पण त्या तुलनेत सावरकरांपासून टागोरांपर्यंत समकालीनांनी  गौतम बुध्दांपासून शिवाजी महाराजांपर्यंत या सर्व इतिहासपुरुषांवर अन्यायच केला. सावरकरांनी शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला काकतालीय ठरवून नाकारले. तर गौतम बुध्दांच्या बौध्द चळवळीला संपवणाऱ्या पुष्यमित्रशुंगाचा सावरकरांनी भारतीय इतिहासातील सोनेरी पान म्हणून गौरविले. भारतीयांच्या दुर्दैवाने भारतीय इतिहास प्रतिकांना नाकारणारे आज भारताच्या स्वाभिमानाचा तर भारतीय प्रतिकांना गौरवणारे इक्बाल निंदेचा विषय ठरले आहेत. 
इक्बालांच्या साहित्यात मानवकल्याणाची निष्ठा आहे. इक्बालांच्या साहित्यात गरीबांविषयीची कणव आहे. इक्बाल सामान्यांना विकसित करु पाहतात. इक्बाल त्यामुळेच गौतम बुध्दापासून चार्वाकापर्यंत सर्वांचा गौरव करतात. याच मानवकल्याणाच्या तडफेसाठी ते कार्ल मार्क्सच्या समाजावादी मुल्यांचादेखील गौरव करतात. त्याच्या नास्तिकतेला नाकारून इक्बाल मार्क्ससीझममधल्या इस्लामिक प्रेरणांचा शोध घेतात.
मार्क्स आणि इक्बालचा शिकवा, कुफ्र नाही, तर दुःखाचा शोध
मार्क्सने जगातील दुःखाचा शोध घेतला. त्याची कारणे धुंडाळली. समाजात दुःख पसरवणारे स्त्रोत त्याने निश्‍चीत केले. शोषणातून दुःखाची निर्मिती होते. हे त्याने ताडले. त्यासाठी धर्म ही व्यवस्था जबाबदार नाही. हे देखील त्याने मान्य केले. पण सामान्यांच्या कल्याणासाठी असलेली धर्म नावाची व्यवस्था, शोषकांच्या मक्तेदारीत अडकल्याचे त्याच्या नजरेने हेरले. मार्क्सची प्रवृत्ती बंडखोराची होती. त्यामुळे तो या धर्ममुखंडांविरोधात उभा राहीला. म्हणून इश्वर आणि माणूस यांच्यातील ‘दलाल’ व्यवस्थेला सुरुंग लागले. मग मार्क्स हा धर्मविच्छेदक असल्याचा प्रचार धर्ममुखंडांनी सुरु केला. तो आजतागायत सुरु आहे. पण मार्क्स इतके धर्माचे कौतूक कोणीच केले नाही. धर्म चांगला असेल. तर त्यातून ऐहीक कल्याण साध्य होतं. या धर्ममुल्यावर त्याची निष्ठा नव्हती काय? धर्म व्यवस्थेवर मळभ दाटलं. त्यामुळे धर्म व्यवस्थीत पणे कार्यरत होत नाही. हा मार्क्सचा शिकवा (गर्‍हाणे) होता. त्यामुळे त्याने हा शिकवा समाजासमोर मांडला. दास कापिटल म्हणजे मार्क्सच्या गार्‍हाण्याचा संग्रह. म्हणजे शिकवा.
इक्बालांनी देखील शिकवा मांडला. इक्बालांचा ‘जावेदनामा’ आणि ‘असरारे खुदी’ काय आहेत ? इक्बालांनी लिहलेली ‘शिकवा’ नावाची कविता हा त्यांचा शिकवा नाहीये. ती त्यांची काव्य प्रतिभा आहे. पण त्यांचा अस्सल शिकवा हा त्यांच्या दुसऱ्या ग्रंथात शब्दांकीत झालाय. धर्म नावाची उदात्त व्यवस्था कार्यान्वीत करणारे सर्वोत्तम प्रेषित येउन गेले. पण त्यांच्या विचारांना ग्रंथात बंदीस्त करुन आम्ही त्या प्रेषितांनाही पराभूत करतोय का? हे प्रश्न इक्बालांच्या विचारांनी अप्रत्यक्षपणे उपस्थित केले. इक्बालांनी मांडलेला इस्लाम तोच होता. जो प्रेषित सल्ल. यांंनी मांडलेला होता. इक्बालांनी सांगितलेली व्यवस्था देखील तीच होती. जी कुरआनने सांगितली होती.  त्याचा भौतीकतावाद इक्बालांनी इस्लामीझमच्या केलेल्या व्याख्येशी मेळ खाणारा नव्हता काय? (क्रमशः) 
(लेखक इतिहास संशोधक असून टिप सुलतान, इक्बाल इत्यादी इतिहासातील व्यक्तिमत्वांवर संशोधन करून ते त्यांचे विचार व्यक्त करतात) (भाग-2)

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget