माननीय इमरान बिन हुसैन (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘लज्जाचे लक्षण फक्त उत्तमता आणते.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
स्पष्टीकरण : लज्जेचे लक्षण म्हणजे असा स्वभाव ज्यात अनेक प्रकारचा चांगुलपणा भरलेला आहे. हे लक्षण ज्या मनुष्यात असेल तो दुराचाराच्या जवळदेखील फिरकणार नाही आणि सदाचाराकडे तो आकर्षित झालेला असेल.
इमाम नबवी यांनी ‘रिया़जुस्सालिहीन’मध्ये लज्जेची हकीगत सांगताना लिहिले आहे– ‘‘लज्जा एक असा गुण आहे जो मनुष्याला वाईट कर्म करण्यापासून रोखतो आणि परिश्रम करणारांचे पारिश्रमिक देण्यात कुचराई करण्याची मनाई करतो.’’
तसेच माननीय जुनैद बगदादी यांनी सांगितले की ‘‘लज्जाची हकीगत अशी आहे की मनुष्य अल्लाहच्या देणग्यांना पाहतो आणि मग असा विचार करतो की त्या इनाम देणाNयाची कृतज्ञता व्यक्त करण्यात माझ्याकडून कुचराई होते, तेव्हा त्यामुळे मनुष्याच्या मनात जी स्थिती निर्माण होते तिला ‘लज्जा’ म्हणतात.’’
स्पष्टीकरण : आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या लक्षणाच्या आवश्यकतेबाबत परलोकाच्या चिंतेविषयी असलेल्या एका हदीसमध्ये स्पष्टीकरणासह सांगितले आहे.
संयम आणि दृढता
माननीय अबू सईद खुदरी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जो मनुष्य संयम बाळगण्याचा प्रयत्न करेल त्याला अल्लाह संयम देईल. संयमापेक्षा अधिक उत्तम आणि अनेक प्रकारचा चांगुलपणा सामावणारा पुरस्कार दुसरा कोणताही नाही. (हदीस : बुखारी, मुस्लिम)
स्पष्टीकरण : मनुष्य कसोटीमध्ये सापडल्यानंतर संयम बाळगतो तेव्हा जोपर्यंत त्याला अल्लाहवर भरोसा व विश्वास बसत नाही तोपर्यंत संयम बाळगू शकत नाही. मग ज्या मनुष्यात कृतज्ञतेचे लक्षण आढळत नाही तो अजिबात संयम बाळगू शकत नाही. अशाप्रकारे लक्षपूर्वक विचार केल्यास माहीत होते की संयमाचे लक्षण आपल्याबरोबर किती वैशिष्ट्ये सामावितो.
माननीय उसामा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या कन्येने संदेश पाठविला की ‘‘माझा मुलगा शरीरातून प्राण निघून जाण्याच्या अवस्थेत आहे. कृपया आपण यावे.’’ पैगंबरांनी सलाम पाठविला आणि ‘‘हे जे काही अल्लाह घेतो ते त्याचेच आहे आणि जे काही देतो ते त्याचेच आहे आणि प्रत्येक गोष्ट त्याच्यापाशीच निश्चित होते आणि प्रत्येकाची मुदत निश्चित होते, तेव्हा तुम्ही परलोकात मोबदला प्राप्त करण्याच्या दृढनिश्चयाने संयम बाळगा.’’ मग त्यांनी संदेश पाठविला की ‘‘आपण अवश्य यावे.’’ तेव्हा पैगंबर आणि त्यांच्यासह सअद बिन उबादा (रजि.), मुआज बिन जबल (रजि.), उबय्यिब्ने कअब (रजि.), जैद बिन साबित (रजि.) आणि काही दुसरे लोकदेखील गेले. मुलाला पैगंबरांजवळ आणण्यात आले. पैगंबरांनी त्याला मांडीवर बसविले, त्या वेळी त्याचा श्वास मंदावत होता. ते दृश्य पाहून पैगंबरांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले तेव्हा सअद बिन उबादा (रजि.) म्हणाले, ‘‘हे काय?’’ (म्हणजे पैगंबर रडतात काय. हे संयमाच्या विरूद्ध नाही काय?) तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘अल्लाहने आपल्या भक्तांच्या हृदयात ठेवलेली ही कृपेची भावना आहे.’’
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाहचे आज्ञाधारक पुरुष आणि स्त्रिया कधी कधी कसोटीत सापडतात. कधी स्वत: त्याच्यावर संकट येते, कधी त्याच्या अपत्यावर येते. कधी त्याची संपत्ती नष्ट होते (आणि तो त्या सर्व संकटांच्या वेळी संयम बळगतो आणि अशाप्रकारे त्याच्या मनाची स्वच्छता होत राहते आणि दुष्टव्यांपासून दूर जात असतो.) इतकेच नव्हे तर जेव्हा अल्लाहशी त्याची भेट होते तेव्हा अशा स्थितीत भेटतो की त्याच्या कर्मपत्रात कसलेही पाप नसते.’’ (हदीस : तिर्मिजी)
माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘कसोटी जितकी कठोर असेल तितका मोठा पुरस्कार मिळेल (या अटीवर की मनुष्य संकटांना घाबरून सरळमार्गापासून दूर जाऊ नये) आणि अल्लाह जेव्हा एखाद्या जनसमूहावर प्रेम करतो तेव्हा त्यांना (आणखी अधिक पारखण्यासाठी आणि पवित्र करण्यासाठी) कसोटीत टाकतो. जे लोक अल्लाहचा निर्णय मान्य करतात आणि संयमाने राहतात तेव्हा अल्लाह त्यांच्यावर प्रसन्न होतो आणि जे लोक या कसोटीत अल्लाहवर नाराज होतात तेव्हा अल्लाहदेखील त्यांच्यावर नाराज होतो.’’ (हदीस : तिर्मिजी)
Post a Comment