Halloween Costume ideas 2015

महिलांचे समाजात नक्की स्थान कोणते?

तेरा वजूद है के फूल है चमेली के
तेरे आने से महेक उठे दरोदिवार हवेली के
महिलांच्या बाबतीत जागतिक दृष्टीकोण असा आहे की, स्त्री-पुरूष समान आहेत. दोघांनाही समान शिक्षण दिले गेले पाहिजे. दोघांना ही समान संधी मिळाली पाहिजे. महिलांना चूल आणि मूल पर्यंत मर्यादित ठेवणे हा त्यांच्यावर अत्याचार आहे. त्यांना प्रत्येक क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने संधी मिळाली पाहिजे. त्यांच्यामध्ये सहशिक्षेच्या माध्यमातून एवढा आत्मविश्वास तयार व्हावयास हवा की, पुरूषांच्या गराड्यातही त्यांना सहज वावरता आले पाहिजे. कपड्यांच्या बाबतीत त्यांची निवड अंतिम मानली जावी. त्या आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र असाव्यात. मूलं किती जन्माला घालावयाचे? घालावयाचेच की नाही? याचा संपूर्ण अधिकार त्यांचाच राहील. इतकेच नव्हे ’हर बॉडी हर चॉईस’ चा अधिकार सुद्धा त्यांना मिळावा. आवडेल त्या पुरूषाबरोबर किंवा महिलांबरोबर त्यांना संबंध ठेवण्याचा अधिकार मिळावयास हवा. सारांश त्या पुरूषापेक्षा किंचित ही कमी नाहीत. म्हणून पुरूषाचे वर्चस्व त्यांच्यावर असता कामा नये.
या उलट इस्लामी दृष्टीकोण आहे. स्त्री-पुरूष मानव म्हणून समान आहेत मात्र सारखे नाहीत. म्हणजेच दोघांचे अधिकार व कर्तव्ये ही सारखे नाहीत. दोघांची जडण घडण ही वेगवेगळी व्हावी. जेणेकरून दोघेही आपापल्या क्षेत्रात परिणामकारकपणे काम करू शकतील. दोघेही एकमेकांचे पूरक आहेत प्रतिस्पर्धी नव्हेत. 
महिलांसंबंधी महिलांचे विचार
आता आपण महिलांच्या बाबतीत काही प्रसिद्ध महिलांचे विचार जाणून घेऊया. 
1. जमाअते इस्लामी हिंदच्या सचिव अतिया सिद्दीका  यांचे मत असे की,  ’आपल्या मुलांवर संस्कार करण्याचे स्त्रीचे महत्वपूर्ण कार्य आज सामाजिक संस्था आणि पाळणाघरा सारख्या संस्थाकडे सोपविण्यात आले आहे ही फार खेदाची आणि चिंतेची बाब आहे. स्त्रीच्या सौंदर्याचा बाजार भरविण्यात आला आहे. सर्वात खेदाची बाब तर ही आहे की आज स्त्री देखील या सर्व बाबींना आपल्या फायद्याची आणि स्वातंत्र्याची गोष्ट समजून बसली आहे. वास्तविक पाहता हे स्त्रिंयाचे मोठ्या प्रमाणावार होत असलेले शोषण आहे.’ (संदर्भ : एसआयओ कॉन्फ्रन्स दिल्ली दि. 25 फेब्रुवारी 2018).
2. पनवेलच्या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा फातिमा मुजावर यांचे म्हणणे असे की, ”स्त्रियांनी मातृत्वाच्या नैसर्गिक जबाबदारी बरोबर पुरूषांसह राजकीय, आर्थिक, औद्योगिक व इतर जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, (उर्वरित लेख पान 2 वर)
अशी अपेक्षा करणे म्हणजे महिलांवर अन्याय व अत्याचार करण्यासारखे आहे. मानवजातीच्या उत्पत्ती व सेवा सुश्रुसेची संपूर्ण जबाबदारी ती एकटीच पार पाडत असते. त्यासोबत पुरूषांच्या जबाबदारीतही तिने सहभागी व्हावे, हे कितपत योग्य आहे? 
बिचाऱ्या स्त्रियांनी विवश होवून पुरूषांच्या जबाबदाऱ्या स्विकारलेल्या आहेत. पुरूषांची कामे न केल्यास तिला सन्मानजनक वागणूक देण्यास पुरूष तयार नव्हता. कुटुंब व्यवस्थेकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोणच बदललेला आहे. आपला आग्रह आहे की, स्त्रीने मातेचे कर्तव्य पार पाडावे, त्याचबरोबर तिने उच्चशिक्षण प्राप्त करून मॅजिस्ट्रेट सारखे पद भुषवावे. पुरूषांच्या मनोरंजनासाठी नृत्य करावे, संगीताच्या मैफिली सजवाव्यात, अशा अनेक कामांचे ओझे तिच्यावर लादल्या गेल्याने ती एकही जबाबदारी समाधानकारकरित्या पूर्ण करू शकत नाही. ज्या कामाकरिता तिचा जन्म झालेला नाही, जे तिच्या शरीराला पेलवणार नाही, जे तिच्या व्यक्तिमत्वाला शोभणार नाही, अशी कामे तिच्यावर सोपविण्यात आलेली आहेत. मात्र तिचे कौतूक झालेच तर ते केवळ तिच्या सौंदर्य व स्त्रीत्वामुळेच होते. सुज्ञ व चारित्र्यवान नागरिक निर्माण करणाऱ्या कुटुंब व्यवस्थेला आपण गौण स्थान देत आहोत. गृहिणी सक्षम व सुरक्षित असून, घरकाम व्यवस्थित पार पाडत आहे. या विश्वासाने पुरूष ही निश्चितपणे आपल्या घराबाहेरील जबाबदाऱ्या अधिक कार्यक्षतेने पार पाडू शकतो.’(संदर्भ:काफला-2017 पान क्र. 66).
3.”इस्लाम शिवाय अन्य जीवन पद्धतीमध्ये परदा पद्धती नाही. यामुळे महिला बाजारात येतात आणि सार्वजनिक होतात. (अर्थात त्यांचं सौंदर्य सार्वजनिक होतं. वास्तविकपणे त्यांचं सौंदर्य व्यक्तीगत राहणे गरजेचे असते). त्यातूनच एकतर्फी प्रेमातून महिलांवर हल्ले होतात. अ‍ॅसिड फेकले जातात. ब्लेड मारले जातात. 
आश्चर्य या गोष्टीचे वाटते की, परद्याचा विरोध करणारे ख्रिश्चन पुरूष आपल्या जोगीनींना परद्यामध्ये 
पाहून त्यांच्याविषयी आदर व्यक्त करतात. मात्र मुस्लिमांना परद्यामध्ये पाहून त्या त्यांना पीडित वाटतात. 
कांही पुरूष वासनांध असतात तेव्हा पुरूषांनी संयमाने वागावे. एवढे सांगून भागत नाही तर आपली काळजी आपण घ्यावी लागते. कोण वासनांध आहे हे समजून येत नाही. म्हणून बुरखा घातला तर सर्वच पुरूषांच्या वाईट नजरेपासून संरक्षण मिळते. मी जेव्हा माझ्या छोट्या बहिनीस स्कर्टमध्ये पहाते तेव्हा कासाविस होते. पुरूष पहात असतील तर त्यांची काय अवस्था होत असेल. लाखो अत्याचार होऊन सुद्धा या लोकांना परदा पद्धतीचे महत्व लक्षात येत नाही, याचे आश्चर्य वाटते. काही (काय बहुतेक) महिला उत्तम श्रृंगार करून घराबाहेर पडतात. त्या तशा घरात राहत नाहीत. इस्लाम अपेक्षा करतो त्यांनी उत्तम श्रृंगार बाजारात जाताना नव्हेत तर घरात राहतांना करावा. आपल्या पतीसाठी करावा. असा श्रृंगार दाम्पत्य जीवनात बहार आणतो. स्त्रीयांनी बाहेर जातांना का म्हणून पर पुरूषांसाठी श्रृंगार करावा? या उलट त्यांनी तसा श्रृंगार घरात केला तर कुटुंब व्यवस्था बळकट होण्यास मदत होते. महिलांचे शरीर गुपीत ठेवल्याने जास्त आकर्षक दिसते. आमच्यासाठी काय हितावह आहे व काय नाही याचा निर्णय कोणीच करू शकत नाही अल्लाह खेरीज करून. मानव संस्कृतीची सुरूवात व स्थैर्य लाज लज्जेवर आहे. जर मानवाने तेच सोडले तर मग मानव आणि जनावर यात फरक तो काय राहतो? परद्याने मला अनोळखी नजरे (वासना पूर्ण) पासून संरक्षण दिले. दाढीधारी नवरा हा सुंदर स्त्रीचा बॉडीगार्ड असतो. एकतर परदा व सोबत अंगरक्षक मला तर व्हीआयपी असल्याचा भास होतो. मला पाश्चिमात्य महिलांची कीव येते त्या स्वत:ला अती शिक्षित समजतात मात्र पर पुरूषाच्या वासनेला सहज बळी पडतात. मला तर महिलांचा तंग पोशाख कैद्यांसारखा वाटतो. त्या पुरूषांच्या  नजरेच्या  सतत कैदेत असतात. उलट आम्ही पडद्यात स्वतंत्र असतो. - खौला लगाता (इस्लाम स्विकारणारी एक जापानी महिला) (संदर्भ : दावत 13.11.2010, पान क्र.1).
समाजाला अनैतिकतेची लागन झाली की वातावरण विशक्त होवून जाते. वेळीच काळजी घेतली नाही तर सगळा समाज नासून जातो. पश्चिमेमध्ये हेच होत आहे. त्यातून स्वार्थी, कपटी, लिंगपिसाट लोकांची संख्या वाढत आहे. त्याचा सर्वात वाईट परिणाम महिला व बालकांवर होत आहे. शाळेमध्ये गोळीबार होत आहे. शिक्षक आणि चिमुरडी मुले बळी पडत आहेत. अशा व्यवस्थेत गुन्हे वाढतात, पोलीस व न्यायालय त्यांना थोपवू शकत नाही. 
- महिलांसंबंधी कुरआनचे निर्देश -
’स्त्री’ ला अरबी भाषेत पर्यायी शब्द मस्तूर असा आहे. ज्याचा अर्थ, ”लपविण्या योग्य” असा आहे. महिलांना परद्यामध्ये लपविले जाते. म्हणून त्यांना अरबी भाषेमध्ये मस्तुरात असे म्हणतात. इस्लाम खेरीज जगातल्या कुठल्याही धर्मात महिलांना परद्यात ठेवण्याची व्यवस्था नाही.  कुरआनमध्ये परद्याच्या व्यवस्थेसंबंधी एकूण 7 आयाती अवतरित झालेल्या आहेत. त्यापैकी तीन सूरे नूर आणि चार सूरे एहजाबमध्ये आहेत. 70 पेक्षा अधिक हदिस आहेत. महत्वाच्या आयाती खालीलप्रमाणे... 1.” आपल्या घरामध्ये समाधानाने रहा.” (संदर्भ : सुरे एहजाब आयात नं. 30.)  
2. ’हे नबी (स.)! आपल्या पत्नी व मुली आणि श्रद्धावंतांच्या स्त्रियांना सांगा की आपल्या चादरीचे पदर आपणावर आच्छादून ठेवत जा. ही अधिक योग्य पद्धत होय. जेणेकरून त्या ओळखल्या जाव्यात आणि त्यांना त्रास दिला जाऊ नये. अल्लाह क्षमाशील व परमकृपाळू आहे. (संदर्भ : सूरे एहजाब आयात नं. 59)
वर नमूद पहिल्या आयातीमध्ये महिलांसाठी घरामध्ये शांती व समाधानाने राहण्याचा आदेश दिलेला आहे. आपण पाहतो ही बिल्कुल नैसर्गिक पद्धत आहे. पुरूषांपेक्षा महिला ह्या घरात जास्त रमतात. ’घरात समाधानाने रहा’, याचा अर्थ असा नव्हे की महिलांनी घराबाहेर निघूच नये. निकड असेल तेव्हा त्या दिवसातून केव्हाही घराबाहेर निघू शकतात. मात्र महेरम आणि परद्याची व्यवस्था त्यांच्यासाठी अनिवार्य आहे. हे त्यांच्या सोयी व संरक्षणाशी संबंधित आहे. त्यात कुठलीही नकारात्मक बाब नाही.
1.” आणि त्याच्या संकेत चिन्हांपैकी ही आहे की, त्याने तुमच्यासाठी तुमच्यामधून पत्नीं बनविल्या, जेणेकरून तुम्ही त्यांच्यापाशी संतोष प्राप्त करावा आणि तुमच्या दरम्यान प्रेम आणि करूणा उत्पन्न केली. निश्चितच यात बरीच संकेतचिन्हे आहेत. त्या लोकांसाठी जे मनन व चिंतन करतात.”(संदर्भ : सुरे रोम : आयत नं. 21).
पुरूष घरात जेवढा संतुष्ट राहतो तेवढा तो बाहेर राहू शकत नाही.  पत्नीपासून फक्त लैंगिक संतोष मिळतो एवढेच नाही तर मुलांपासून त्याला मानसिक समाधान मिळते. घरी पत्नी आणि मुलं आनंदी असतील तर पुरूष बाहेर कणखरपणे कोणत्याही परिस्थितीस सामोरे जावू शकतो. घरात जर किरकिर असेल तर बाहेर मोठमोठी संकटे लिलया पेेलणारा पुरूष कोसळून पडतो. पत्नी आणि मुले ही त्याची भावनिक भूक भागवतात व त्याला आतून शक्तीमान करतात. स्त्रीला जर पुरूषांसारखेच अनावश्यकरित्या इतर कामांना जुंपले तर ती सुद्धा थकून जाईल व कुटुंबाची रचना करण्यामागच्या ईश्वरीय हेतुलाच हरताळ फासल्यासारखेच होईल. स्त्री चार पैसे जरूर कमवील मात्र त्या मोबदल्यात कुटुंबाचे होणारे नुकसान हे फार जास्त असेल यात शंका नाही. स्त्रियांनी रणगाडे आणि पादत्राणे निर्माण करण्यापेक्षा चांगली सुसंस्कारित पिढी निर्माण केली तर जग तिचे कायम ऋणी राहील. 
परदा व्यवस्थेचे उद्देश
  परदा व्यवस्थेची तीन प्रमुख उद्देश्य आहेत. 
        1. स्त्री आणि पुरूषांच्या मुक्त भेटी-गाठींमुळे स्वैराचाराचे मार्ग निश्चितपणे खुलतात. त्या मार्गांना रोखून दोघांच्याही चारित्र्याचे रक्षण करणे हे परदा व्यवस्थेचे पहिले उद्देश आहे. 
2.स्त्री आणि पुरूषांच्या कामांच्या ईश्वरीय वाटणीचा सन्मान करणे आणि त्या वाटणीला अधिक मजबूत करणे.
3. कुटुंब व्यवस्था हा कुठल्याही समाजाचा पाठिचा कणा असतो. ती व्यवस्था मजबूत करणे व त्या व्यवस्थेच्या केंद्रामध्ये असणाऱ्या स्त्रिला बाह्य आक्रमणापासून वाचविणे. हे तिन्ही उद्देश परद्याच्या व्यवस्थेशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. प्रत्येक काळामध्ये समाजामध्ये काही महिला अशा जरूर असतात ज्यांना स्वत: काम केल्याखेरीज गत्यंतर नसते. अशा वेळेस ही शासनाची जबाबदारी आहे की, त्यांच्या व्यक्तित्वाला शोभेल व त्यांना पेलेल अशा क्षेत्रांना चिन्हित करून सर्व सुरक्षेसह त्यांना त्या क्षेत्रात काम मिळवून द्यावे.
एकंदरित स्त्रियांशी संबंधित दोन प्रमुख जागतिक दृष्टीकोण मी आपल्यासमोर थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यापुढे प्रत्येक सुजान नागरिकाने आपल्या महिलांना कोणत्या दृष्टीकोणातून सन्मान देता येईल, याचा विचार करावा. इस्लामोफोबियाच्या दुष्प्रचाराला बळी न पडता स्वतंत्र विचार करावा व महिलांसाठी बिकनी बरी की बुरखा बरा याचा निर्णय ज्याचा त्याने करावा. जय हिंद ! जय स्त्री शक्ती.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget