-शाहजहान मगदुम
सीरियातील संघर्षाला जागतिक आयाम प्राप्त झाला असून, नागरिकांच्या स्थलांतरामुळे संपूर्ण युरोपभर सोयी-सुविधा व सुरक्षाविषयक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. या स्थलांतराची तुलना दुसऱ्या महायुद्धात झालेल्या स्थलांतराशीच होऊ शकेल. एखाद्या देशातील जनता एकाच घराण्याच्या ४० वर्षांच्या जुलमी राजवटीखाली सतत पिचली जात असेल, तर तिच्या मनात त्या राजवटीबद्दल किती चीड असेल, याची कल्पनाच केलेली बरी! सीरिया, लेबॅनॉन, जॉर्डन, इस्रायल व तुर्वâस्तान या देशांच्या सीमा एकमेकींना स्पर्श करतात. गेली दीड हजार वर्षे सीरियावर कुणाचे ना कुणाचे आक्रमण होत आलेले आहे. प्रथम इजिप्त, नंतर हिब्रू, नंतर आसीरियन, मग चाल्डीन्स व पर्शिया असे लोक एका मागोमाग एक सीरियावर तुटून पडले. यानंतर सीरिया रोमन साम्राज्याचा हिस्सा झाले व नंतर ऑटोमन साम्राज्यात ते खालसा केले गेले. पहिल्या महायुद्धानंतर ऑटोमन साम्राज्याचे तुकडे झाले व फ्रान्सकडे सीरियाचा ताबा आला. सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद यांच्याविरोधात ७ वर्षांपूर्वी शांततेच्या मार्गाने सुरू झालेल्या लढ्याचे रूपांतर आता पूर्णत: गृहयुद्धात झाले आहे. आपले वडील हाफेज यांच्याकडून सत्ता मिळवलेले राष्ट्राध्यक्ष बशर-अल-असाद यांचा दबाव या विरोधात आवाज उठवला होता. २०११मध्ये अरब क्रांतीतून प्रेरणा घेऊन लोकशाहीसाठी सीरियातल्या दक्षिणेकडील डेरा या शहरात निदर्शनांना सुरूवात झाली. मात्र, हे आंदोलन अत्यंत वाईट पद्धतीने चिरडल्याने राष्ट्राध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीचे आंदोलन संपूर्ण देशभर पसरले. यातून इथे हिंसाचाराचा आगडोंब उसळला आणि सुरूवात झाली गृहयुद्धाला. या गृहयुद्धात इराण, रशिया, सौदी अरेबिया आणि अमेरिका यांसारख्या देशांनी हस्तक्षेपास सुरूवात केली. यातील काहींनी सीरियन सरकारला आणि काहींनी विरोधकांना दिलेल्या आर्थिक, राजकीय आणि लष्करी पाठबळामुळे सीरियन गृहयुद्ध अधिकचे तीव्र झाले. या गृहयुद्धामुळे देशात शिया आणि सुन्नी मुस्लिमांमध्येही संघर्ष उफाळून आला. यातून मोठ्या प्रमाणात जीवितहानीला सुरूवात झाली. या दरम्यान, कथित इस्लामिक स्टेट, ज्यांच्या अधिपत्याखाली उत्तर आणि पूर्व सीरियाचा भाग येत होता. कथित इस्लामिक स्टेटविरोधात रशिया आणि अमेरिका आदी देशांनीही आघाडी उघडली. सीरियातल्या शिया धार्मिक स्थळांचा बचाव करण्यासाठी इराण, लेबनॉन, इराक, अफगाणिस्तान आणि येमेन या देशांतल्या शिया बंडखोरांनी सीरियन सैन्याच्या बाजूने या युद्धांत प्रवेश केला. सीरियातला आपला रस कायम ठेवण्यासाठी रशियाला असाद यांना वाचवणे गरजेचे होते. गेल्या ५ वर्षांत सीरियामध्ये जवळपास अडीच लाख लोकांचा मृत्यू झाल्याचे संयुक्त राष्ट्रांनी स्पष्ट केले आहे. मात्र, संयुक्त राष्ट्रांनी ऑगस्ट २०१५ पासून आकडेवारी अद्यावत करणे थांबवले आहे. फेब्रुवारी २०१६ मध्ये द सीरियन ऑब्झर्वेटरी फॉर ह्युमन राईट्स या युकेमधल्या संस्थेने हा आकडा ४ लाख ७० हजार असल्याचे सांगितले आहे. तसेच, महिला आणि मुलांसह जवळपास ५० लाख जणांनी सीरिया सोडून स्थलांतर केल्याचे संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे. सीरियाच्या शेजारील लेबनॉन, जॉर्डन आणि तुर्वâस्तान या देशांमध्ये स्थलांतरीतांचा ओघ वाढला आहे. १० टक्के सीरियन स्थलांतरितांनी युरोपात आश्रय मिळवला आहे. तसेच, ६३ लाख सीरियन नागरिकांना सीरियाच्या दुसऱ्या भागात आश्रय शोधला आहे. २०१७मध्ये सीरियातल्या १ कोटी ३० लाख नागरिकांना मानवी दृष्टिकोनातून मदत करण्यासाठी २२० अब्ज रुपयांची गरज लागेल असे संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केले होते. सीरियातले जवळपास ८५ टक्के नागरिक गरीब आहेत. इथल्या १ कोटी २८ लाख नागरिकांना आरोग्याच्या सेवांची नितांत गरज आहे. तर, ७० लाखांना अन्नाची चणचण भासत असून इथे अन्नाचाही तुटवडा जाणवत आहे. अनेकांना आपल्या उत्पन्नातली पाव रक्कम पाण्यावर खर्च करावी लागते. तर, १७.५ लाख मुले शाळेबाहेर आहेत. तर, ४९ लाख लोक सीरियातल्या दुर्गम भागात राहत आहेत. सीरियात आतापर्यंत सुमारे १००० नागरिकांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये १५०हून अधिक लहान मुलांचा समावेश असल्याचे म्हटले जाते. सीरियन ऑब्झर्वेटरी फॉर ह्युमन राईट्स या संस्थेच्या माहितीनुसार, सरकारविरोधी गटांच्या ताब्यात १५ टक्के सीरियाचा भाग आहे. सीरियाच्या उत्तर-पश्चिम भागातल्या इडलिब परगण्यात आणि अलेप्पोच्या पश्चिम भागात अजूनही ५० हजार सरकारविरोधी गटाचे लोक कार्यरत असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. गेल्या २ वर्षांत बंडखोर गटांचे मोठे नुकसान झाले असले तरी मध्य आणि उत्तर सीरियात आणि इथल्या राक्का शहरांत त्यांचे वर्चस्व अद्यापही कायम आहे. सीरियातील संघर्ष निर्णायक टप्प्याच्या दिशेने जात असतानाच, इराण-इस्रायलमधील हा तणाव उफाळून वर आला आहे. या सात वर्षांमध्ये बदलत गेलेली परिस्थिती पाहता, इराणकडून प्रभाव वाढविण्यासाठी प्रयत्न होणार आणि त्यातून इराण-इस्रायल आमनेसामने येणार, हे उघड आहे. त्यामुळे, सीरियाच्या सीमेवर नव्याने निर्माण होणारा हा संघर्ष अटळ दिसत आहे.
Post a Comment