Halloween Costume ideas 2015

लैंगिक समानता एक वेगळा दृष्टिकोन

-नझराना शेख, पणजी (गोवा)
इंटरनॅशनल सेंटर, दोनापाऊला, गोवामध्ये नुकतेच लैंगिक समानतेबद्दल अतिशय दुर्मिळ
    चर्चासत्र पार पडले. स्त्रियांचे सबलीकरण करणे आणि लैंगिक समानताच्या दृष्टीने त्यांच्या काय समस्या आहेत यावर खूप चर्चा झाली.
    प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन अधिकतर उत्साहाने साजरा केला जातो. परंतु महिलांसंबंधित समस्या दिवसेंदिवस जास्त वाढत आहेत. एका काळात समाजात ती अत्यंत दबलेली होती आणि आता ती स्वातंत्र्य व मुक्त आणि बहुतेक अधिकारांची हक्कदार असूनसुद्धा तिच्या दडपशाहीची आणि गैरवापराची कहाणी अजूनही कायम आहे. प्रत्यक्षात तिच्या दडपशाहीत दुसऱ्या मार्गाने वाढ होत आहे.
    संसदेत मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षण २०१६-२०१७ ने सांगितले की अपहरण, मुली व स्त्रियांवर लैंगिक अत्याचार, या गुन्हेगारीची संख्या भयावह पातळीवर पोहचली आहे आणि सार्वजनिक ठिकाणी तिची असुरक्षित वाढली आहे.
    एनसीआरबी डेटा २०१६ नुसार २०१६ मध्ये स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये २.९ टक्के वाढ झाली आहे.
    बलात्काराची प्रकरणे जी २०१५ मध्ये ३४,६५१ होती त्यातही २०१६ मध्ये १२.४ टक्के वाड झाली आहे.
    वर नमूद केलेले आकडे स्पष्ट करतात की, ‘स्वतंत्र आणि मुक्त’ अशी असणारी पश्चिम संस्कृतीचा नमुना घेऊन स्त्रियांची उन्नती करण्याचा आमचा निर्णय अयशस्वी ठरला आहे. ही संस्कृती तिला तो सन्मान देण्यासाठी चुकली आहे ज्यावर तिचा हक्क आहे. या संस्कृतीने  लैंगिक समानतेच्या आणि स्वातंत्र्याच्या नावावर खोटी प्रतिष्ठा देऊन तिला असला असुरक्षित आणि धोकादायक मंच दिला आहे ज्यामध्ये तिचे खूप चालाकीने शोषण चालू आहे.    
    समानतेच्या नावावर तिला सर्व कृतींच्या क्षेत्रांत आणले गेले. तिला पुरुषाचे अनुकरण करून त्याच्यासारखे वागायला, त्याच्यासारखे दिसायला आणि त्याच्यासारखे सामथ्र्य दाखवायला भाग पाडले. याच्या व्यतिरिक्त स्त्रियांना त्यांची प्रमुख भूमिका म्हणजे एक परिपूर्ण गृहिणी, आई, पत्नी, बहीण, हीसुद्धा जबाब्दारीने पार पडण्याची अपेक्षा तिच्यापासून केली गेली. स्त्रियांनीदेखील स्त्री-पुरुष अशी दुहेरी भूमिका निभावण्याची तडजोड केली. असे करताना तिला हे कळून चुकले की तिने दीर्घकाळामध्ये काय गमावले. तिला या दुहेरी भूमिकेत आपले कौटुंबिक जीवन आणि मातृत्वाचे बलिदान द्यावे लागले, पुरुषांच्या पूर्वाभिमुख समाजात चांगल्यारीतीने रचलेल्या सापळ्यात ती सहजपणे अडकत गेली. आज स्त्रिया शिक्षित, आत्मनिर्भर होऊनसुद्धा जुन्या काळाची स्त्रियांवरील अत्याचाराची कहाणी आजच्या आधुनिक जगात कायम आहे.
    पूर्वीच्या काळामध्ये स्पष्टपणे दिसणारी दडपशाही आज स्वातंत्र्य व समानता आणि न्याय या कवचाखाली एक सुनियोजित पद्धतशीर चालविली जात आहे, ज्यात तिचे शोषण नजरेला पडत नाही पण त्यामुळे तिला खूप नुकसान झाले आहे आणि तिच्यावरील वाढत्या अत्याचार आणि गुन्ह्यांचे मुख्य कारण बनले आहे.
    ज्ञान किंवा शिक्षण मानवजातीसाठी एक मोठी भेट म्हणून मानला जाते. ज्यामुळे व्यक्ती, समाज आणि जगाचा विकास होतो. पण याला मनुष्याने फक्त संपत्ती मिळवून देण्याचे साधन मानले. पूर्वी स्त्रियांना काम करावे लागत नव्हते म्हणून त्यांना ज्ञान आणि शिक्षणापासून दूर ठेवले गेले आणि आता आधुनिक काळात मुलींना तो अधिकार मिळाला तेव्हा तिच्या भक्षकांनी त्याला तिचापासून पैसे उत्पन्न करायचा  स्रोत बनवून टाकले. बऱ्याच प्रकरणांमध्ये पालकही स्वार्थी होतात आणि मुलींच्या शिक्षणावर केलेला खर्च मिळवून घेण्यासाठी तिला स्रोत बनवतात. पुत्रांनी जे केले नाही किंवा करू शकत नाहीत अशा सर्व गोष्टी करण्याची प्रेरणा मुलींना दिली जाते. मुलींपासून या वाढत्या अपेक्षा त्यांना पुढे जीवनात महाग पडतात. यासाठी त्यांचा विवाह उशिरा होतो आणि मग एक चांगला जोडीदार शोधणे तिला अवघड होते आणि वैवाहिक जीवन सुरू करण्यातही तिला समस्या येतात. काही स्त्रिया आयुष्यभर अविवाहितसुद्धा राहतात.
    हुंडा प्रणालीचा धोका हाताळण्यासाठी अनेक कठोर कायदे तयार केले गेले आहेत आणि काही प्रमाणात त्यांचा फायदाही झाला आहे. परंतु इथेसुद्धा भक्षकांनी हुंडा हाताळण्याच्या नवीन पद्धतीं शोधून काढल्या आहेत. आज शिक्षित आणि नोकरी करणाऱ्या मुलींची नवरी म्हणून निवड होते ते याच कारणामुळे की ती काम करून त्यांच्या संपत्तीला भर घालेल. स्त्रियांवरच सर्व आर्थिक आणि घरगुती जाबाबदारी घालून  काही बाबतीत त्यांचे पती पूर्णत: बेजबाबदार बनले आहेत. ज्या स्त्रिया स्वत:च्या इच्छेनुसार नोकरी करायच्या अधीन असतात त्यांना पण भावनांच्या जाळ्यात फसवून त्यांच्या कमाईतून बराच पैसा या भक्षकांसाठी खर्च करण्यास लुभावले जाते. काही स्त्रियांना असल्या नोकऱ्यांतदेखील खेचले जाते, ज्यामध्ये फक्त त्यांच्या सौंदर्याची आणि शरीराची प्रशंसा होते आणि तिच्या अंत:करणाच्या प्रतिभेचे काही मोल होत नाही.
    या आकर्षित करणाऱ्या ग्लॅमरस दुनियेत तिची गुंतागुंत होते ज्यामुळे शेवटी तिच्या नशिबाला एकाकीपणा, नैराश्य, विनाश वाट्याला येतो आणि बऱ्याच वेळा आत्महत्या करून तिला आपली सुटका करावी लागते. एका बाजूला जेथे लैंगिक समानतेची पदोन्नती चालू आहे तिथेच दुसरीकडे वय, वर्ग, सौंदर्य, शरीर यांच्या आधारावर महिलांचा भेदभाव चालू आहे. आणि हाच निकष पाळून लग्न व नोकरीसाठी तिची निवड होते. जी स्त्री उच्च पदावर पोचली आहे तीसुद्धा कुठल्यातरी पुरुषाची किंवा पुरुषासंबंधी गटाचीच कठपुतळी म्हणून चालते. या सर्व प्रकरणांत स्त्रिया आपल्या विरूद चालणाऱ्या कटाला ओळखण्यात चुकतात आणि ज्या वेळेस ते जाणतात तेव्हा फारच उशीर झालेला असतो.
    आजच्या आधुनिक लढायांमध्ये सैनिकांपेक्षा जास्त नागरिकांची बळी जाते. त्यातही स्त्रियांना जास्त अत्याचार सहन करावा लागतो जो खूप वेळा लष्करी किंवा राजकीय उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी पद्धतशीरपणे विविध रूपाने स्त्रियांवर घडविला जातो. देहव्यापाराच्या वाढत्या गरजेमुळे मानवी तस्करी आणखीनच वाढली आहे आणि याचा परिणामसुद्धा स्त्रियांनीच जास्त भोगला आहे.
    स्त्रियांना न्याय देण्यात आपण कुठे कमी पडत आहोत याबाबतचे विश्लेषण करताना हे समजून घेणे आवश्यक आहे की पुरुषाची नक्कल करणे आणि त्याला आदर्श म्हणून मानणे हे या समस्यांचे समाधान नाही. पुरुष आणि स्त्री ही दोन भिन्न लिंग आहेत आणि त्यांना  समाजात आपली अनोखी भूमिका निभावण्यासाठी रचले गेले आहे. त्यांची विशिष्ट शारीरिक, जैविक आणि मानसिक निर्मिती हे दर्शविते की त्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत आणि त्यांना समान करण्याचा प्रयत्न शेवटी व्यर्थ ठरेल.
    प्रश्न हा आहे की स्त्रीला आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी पुरुषाची नक्कल करणे किंवा त्याच्या पातळीवर पोहचणे का आवश्यक आहे? मानवाला जन्म देण्याची आणि मानवजातीला आपल्या प्रेमळता व काळजीने उभारण्याची उत्कृष्ट भूमिका तिला ईश्वराने दिली आहे, जी एक पुरुष प्रयत्न करूनसुद्धा साध्य करू शकत नाही. या भूमिकेने ती अशी मानवजाती आपल्या शिकवणीने निर्माण करू शकते जी खऱ्या अर्थाने स्त्रियांच्या दुर्बल शरीराचा फायदा न घेता त्यांच्या कोमल हृदयाचे मोल करू शकते आणि तिला तो आदर देऊ शकते ज्यास ती पात्र आहे. आईच्या पदरात लहानपणीच हे संस्कार पुरुषांना मिळाले तर पुढे ते स्त्रियांविषयी होणाऱ्या प्रत्येक शोषणला बंदी घालू शकतात आणि असले वातवरणही निर्माण करू शकतात जिथे स्त्रियांविरुद्ध सगळ्या षड्यंत्रांना रोखू शकतात आणि सर्व वाईट गोष्टीचा मुळांपासून नाश होऊ शकतो.
    लैंगिक समानता हा आजच्या आधुनिक समाजाचा नारा आहे. हा तोच समाज आहे जो भौतिकवाद, स्वार्थ, अमानवीपणा, लोभ, दृष्टा, शक्ती आणि संपत्तीसाठी वेड, असल्या बुद्धीच्या आधारावर विकसित झाला आहे. अशा समाजात स्त्रियांची सुरक्षितता कशी काय होणार? हा समाज लैंगिक समानता व स्वातंत्र्यच्या नावाखाली बनावट स्वाभिमान प्रदान करून महिलांचा लाभ घेऊन फक्त स्वत:ची तहान तृप्त करू शकतो. आज समता आणि मुक्तीची खरी परिभाषा समजून घेणे आवश्यक आहे. मुक्तीची मर्यादा आणि समता चे स्पष्टीकरण केल्याशिवाय यात पाऊल टाकणे अतिशय धोकेदायक आहे. स्त्रीच्या शोषणास प्रोत्साहन देणाऱ्या सर्व सामाजिक वाईट गोष्टी नष्ट करण्यासाठी वातावरण तयार करणेही गरजेचे आहे. पुरुषाचे अनुकरण करून स्त्री-जातीच्या विशिष्ट दर्जाचा केवळ अपमानच होईल आणि ही दुहेरी भूमिका बजावताना फसवणूकच स्त्रियांच्या हाती लागेल.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget