Halloween Costume ideas 2015

‘अ’सन्माननीय मरण

-शाहजहान मगदुम
राज्यघटनेने अनुच्छेद २१नुसार प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला आहे. याच अनुच्छेदाअंतर्गत सरन्यायाधीशांसह पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठाने एकमताने शुक्रवारी ऐच्छिक इच्छामरणाचाही मूलभूत अधिकार काही अटींवर ९ मार्च रोजी दिल्यानंतर याबाबत नव्याने चर्चेची वादळे उठली आहेत. भा.द.वि. १८६० च्या सेक्शन ३०० नुसार आपल्या देशातले वैद्यकीय अधिकारी अशा प्रकारच्या अ‍ॅक्टिव्हिटीत असल्यास दोषी ठरू शकतात. कलम २१ नुसार जगण्याच्या अधिकाराबरोबर मृत्यूच्या अधिकारही चर्चिला जातो. आजच्या धावत्या युगात अनेकांना इच्छामरणाची इच्छा वाटू लागली आहे. सन्माननीय जगण्याऐवजी ‘अ’सन्माननीय मरण पत्करू लागले आहेत. यामागच्या प्रमुख कारणांपैकी एक कारण म्हणजे समाजातील नैतिकतेचा ऱ्हास होय. अध्यात्माकडे दुर्लक्ष करून आधुनिकतेच्या युगात मनुष्य निसर्गावर किंबहुना निसर्गनियमांवर मात करण्याची आकांक्षा बाळगून असतो. त्या माहीत असते की कोणत्याही सजीवाला मरण हे अटळ आहे. मात्र आपल्या अनावश्यक स्वार्थापोटी तो मरण पत्करणाचा निर्णय घेऊन टाकतो. जन्म-मृत्यू आपल्या हातात नाही हे त्याला ठाऊक असूनसुद्धा तो मरणाला कवटाळण्याची भाषा करतो. ही गोष्ट विधीलिखित आहे हे जवळपास सर्वच धर्म सांगतात. तरीही त्यात मनुष्य कुरघोडी करण्यास मागेपुढे पाहात नाही. काही वेळा तो विवश असेलही मात्र ईश्वरेच्छाविरूद्ध वागण्यात मोठे नुकसान आहे हे त्याला कळेनासे झाले आहे. इच्छामरण ही प्रगत मानवाची गरज ठरू पाहात आहे आणि व्यवस्थाच मानवावर इच्छामरण अप्रत्यक्षरीत्या लादू इच्छित आहे. विज्ञानाच्या मदतीने मानव मरणाला लांबवू शकतो पण त्याच्यावर विजय मिळवू शकलेला नाही. ते शक्य पण नाही. जर इच्छामरणाचा अधिकार दिला तो एक प्रकारे खून करण्याचा परवानाच ठरेल. अडचणी, संघर्ष आणि तडजोडीच जगणे एवढे निरर्थक का वाटते? जिथे आपल्याला निसर्गाने ठरवलेले आयुर्मान दिले आहे ते कमी का करू पाहतो आहोत आपण. आज मानवांतील नीतिमत्तेचा ऱ्हास झाल्यामुळे लोकांना जगण्यातली सहजता लक्षातच येत नाही. आणि म्हणूनच इच्छामरण कायद्यात एक सुखाची वाट दिसू लागली आहे. हा कायदा जीवणाच्या अंतिम सत्याला अनुसरून नाही. कारण अंतिम सत्य मृत्यू होणे होय. तो स्वत:हून करणे नाही. ईश्वराने जन्म दिला आहे तर त्याच्या मान ठेवून शेवटच्या श्वासापर्यंत बिनधास्त जगायला हवे. अनेक कारणे अशी आहे की संवेदनशील व्यक्तीला त्या क्षणी जगणे निरर्थक वाटते. इच्छामरण हे स्वत:हून स्वत:साठी मागितलेले मरण आहे तर दयामरण हे दुसऱ्याने दिलेले मरण आहे. अरुणा शानभाग या जवळपास चाळीस वर्षे कोमातच अंथरुणाला खिळून होत्या. तेव्हा त्यांच्या कुटुंबियांनी अरुणा शानभागच्या दयामरणासाठी अर्ज केला होता. तिथे इच्छामरण नव्हते. आणि नारायण लवाटे यांनी वयाच्या ८८व्या वर्षी तर इरावती लवाटे यांनी वयाच्या ७८व्या वर्षी या दांपत्याने इच्छामरणासाठी अर्ज केला होता. इच्छामरण की दयामरण हाही विचार केला तर इच्छामरण म्हणजे दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर आत्महत्या आणि दयामरण म्हणजे खून! त्यामुळे इच्छामरणाचा कायदा झाला तर या कायद्याचा गैरवापरच जास्त प्रमाणात होईल. आज समाजातील संवेदनशीलता हरवल्याचे दाखले पावलोपावली मिळतात. जन्मदात्या आईवडिलांनाच वृध्दाश्रमामध्ये ठेवण्याचे प्रमाण अतिशय जास्त आहे. आज जगात इतके दारिद्र्य आहे की, लोक भीक मागून रस्त्याच्या काठावर, पुलाखाली राहून जीवन जगतात. एवढेच नाही तर काहीजणांना इतके अपंगत्व आहे की, जन्मापासून अशा व्यक्ती परावलंबी असतात. अशा अपंगत्व व दारिद्र्यातही रस्त्याने फरकटत फरकटत भीक मागून आयुष्य जगणारे लोक पाहिले की असे वाटते, मानवामध्ये जगण्याची किती उमेद आहे! त्याच्या जीवनात काहीच सुंदर नसेल पण त्याला जगातील सुंदरता पाहायची असेल! वंचिताचे, अभावाचे जीवन जगताना असे अनेक लोक दिसतात. त्या वेळी मनात विचार येतो, प्रत्येक माणसाला जीवन जगण्याचा निर्मात्या ईश्वराने अधिकार प्रदान केला आहे. जन्म कुठे घ्यावा, हे जसे आपल्या हातात नाही, तसेच मृत्यू कसा यावा, हेही आपल्या हातात नाही. मग निसर्गनियमानुसार जीवन जगण्यास काय हरकत आहे? अनेक विकसित देशांत दयामरण कायदेशीर करण्यात आले असले तरी त्याच्या दुरुपयोगामुळे तो पुन्हा बेकायदेशीर ठरवला जात आहे. भारतातली समाज व्यवस्था अशा कायद्यांना धार्जिणी नाही. दयामरणाच्या कायद्यामुळेही कौटुंबिक स्तरावर अनेक अविश्वासाच्या आणि कुशंकांच्या वावटळी निर्माण होऊ शकतात. आपल्या देशात अनेक धर्म नांदतात. धार्मिक स्तरावर अनेकांचा मरणात हस्तक्षेप करण्यास विरोध आहे. इस्लाममध्ये तर अल्लाहच्या मर्जीच्या विरोधात जीव घेण्यास विरोध आहे. आयुष्य ही ईश्वराची देणगी आहे आणि दु:ख, वेदना याही जीवनचक्राचा एक भाग आहेत. त्या कृत्रिमरीत्या संपवण्याचा अधिकार मनुष्याला नाही.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget