Halloween Costume ideas 2015

देशासाठी एक उत्कृष्ट नागरिक तयार करणे हाच शिक्षणाचा उद्देश- मौ. जलालुद्दीन उमरी

एस.आय.ओ.चे तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत उत्साहात संपन्न

दिल्ली (सलीम खान, औरंगाबाद)- देशासाठी एक आदर्श आणि उत्कृष्ट नागरिक तयार करणे हाच शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. परंतु शिक्षण देणाऱ्या आणि शिक्षण घेणाऱ्या या दोघांनाही या उद्देशाचा विसर पडला आहे, असे प्रतिपादन जमाअते इस्लामी हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना जलालूद्दीन उमरी यांनी केले. 
स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (एस.आय.ओ.) च्या वतीने  ‘संकल्प आत्मसन्मानाचा- संघर्ष भविष्य निर्माणाचा’  या विषयावर आयोजित करण्यात आलेले तीन दिवसीय राष्ट्रीय महाअधिवेशन दिल्ली येथील संघटनेच्या केंद्रिय मुख्यालयात 23, 24 व 25 फेब्रूवारी रोजी संपन्न झाले. या अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात मौ. उमरी बोलत होते. संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आवभगत आणि स्तुतीला कडाडून विरोध दर्शवितांना ते पुढे म्हणाले, की आज शिक्षण संस्था आणि विद्यार्थी वर्ग आपल्या जबाबदाऱ्या व शिक्षणाचा उद्देश पुर्णत: विसरला आहे आणि हेच कारण आहे की आधुनिक काळात शिक्षण संस्थांची आणि विद्यार्थी वर्गाची दयनिय अवस्था झाली आहे. त्यामुळे शिक्षण देणाऱ्या आणि शिक्षण घेणाऱ्या दोघांनीही शिक्षणाचा मूळ उद्देश आणि महत्व जाणून घेतले पाहिजे. 
सदर कार्यक्रमाची सुरूवात पवित्र कुरआनच्या पठणाने झाली. तद्नंतर संघटनेवरील गीत (तराना) सादर करण्यात आले. जमाअते इस्लामी हिंदचे उपाध्यक्ष सय्यद सादातुल्लाह हुसैनी यांनी ’समाजातील दुष्कर्म हटवा आणि नव्या आशा निर्माण करा’ या विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की, ’आज देशात अनेक प्रकारच्या दुष्कर्म आणि समस्यांनी उच्चांक गाठला आहे. सांप्रदायिकता, अश्लिलता, नग्नता, भ्रष्टाचार, व्याभिचार तसेच अनेक प्रकारच्या दुराचारांनी देशातील शांततेला व सुव्यवस्थेला धेाका निर्माण झाला आहे. त्यामुळे वेळीच या समस्यांचे समूळ उच्चाटन करण्याची आज नितांत गरज आहे.’
डॉ. वाय. एल. बतकरी यांनी पॅलेस्टीनची परिस्थिती व पार्श्वभूमी डोळ्यांसमोर ठेऊन अनेक महत्वपूर्ण तथ्यांचा उलगडा केला. त्यानंतर एस.आय.ओ.चे राष्ट्रीय अध्यक्ष नहास माला यांनी सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून   देशातील कानाकोपऱ्यातून या अधिवेशनात सहभागी झालेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी सदर अधिवेशनाचा विषय असलेल्या  ’संकल्प आत्मसम्मानाचा- संघर्ष भविष्य निर्माणाचा’  या ब्रिदवाक्याचा उलगडा करतांना ते म्हणाले की, ’या अधिवेशनाचा मुख्य उद्देश युवकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या इच्छा आणि अपेक्षांना एक निर्माणकारी दिशा देणे हा आहे. विद्यार्थी आणि युवकांना समसामायिक मुद्यांची व सामाजिक परिस्थितीची जाणीव करून देवून त्यांची भूमिका काय असावी याबद्दल मार्गदर्शन केले जाईल’. नहास माला पुढे म्हणाले की,’ या राष्ट्रीय अधिवेशनाच्या माध्यमातून विद्यार्थी आणि तरूणांना शैक्षणिक, बौध्दिक, सामाजिक, राजनीतिक आणि आर्थिक दर्जा सुधारण्याच्या दिशेने मार्गदर्शन केले जाणार आहे.’ 
सदर अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात ’प्रतिरोध, आत्मसन्मान आणि युवा विरोध’ या विषयावर मार्गदर्शन करतांना एस.आय.ओ.चे माजी राष्ट्रीय सचिव मसिउज्जमा अन्सारी म्हणाले की, ज्याप्रमाणे आज विविध विद्यार्थी संघटना व त्यांचे प्रतिनिधी अशा प्रकारच्या एका व्यासपिठावर येऊन विचारांची देवाण-घेवाण करताहेत. त्याचप्रमाणे समाजात देखील अशा प्रकारची देवाण-घेवाण होणे गरजेचे आहे. याप्रसंगी बोलतांना एम.एस.एफ.चे राष्ट्रीय अध्यक्ष टी.पि.अशरफ अली यांनी सांगितले की, सर्वांनी एकत्र येऊन जातीयवादी शक्तीच्या कंबरेत लाथ घालण्याची हीच वेळ आहे. त्यानंतर HCUSU> चे अध्यक्ष श्रीराग पोईकादन यांनी दलीत विद्यार्थी आणि मुस्लिम विद्यार्थी संघटनांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे नमूद केले. 
तद्पश्चात SMUSU चे अध्यक्ष मसकूर अहेमद उस्मानी यांनी पवित्र कुरआनची सुरूवातीची आयत इक़रा चा आधार घेवून देशात वर्तमान काळात अल्पसंख्यांकांच्या शैक्षणिक परिस्थितीचा आढावा घेत खंत व्यक्त केली. यावेळी एफ. एम.चे अध्यक्ष अन्सार अबुबकर यांनी फैज़, रोहीत वेमुला, नजीब अहेमद व जुनैद यांच्याबद्दल सविस्तर चर्चा करत असतांना विधानसभेत अल्पसंख्यांक समुदायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्यांच्या भुमिकेवर चिंता व्यक्त केली. YFDA,JNU च्या अध्यक्ष हेबा अहेमद यांनी हदिया, फातेमा नफिस आणि बिल्कीस बानो यांची सहनशिलता आणि धाडसीपणाची उदाहरणे देत प्रेमभावना व मंगलमय वातावरणाच्या निर्मितीसाठी ईश्वराकडे प्रार्थना केली. NSUIचे अध्यक्ष फेरोजखान यांनी एस.आय.ओ.च्या उपक्रमाची प्रशंसा करून अशा कार्यक्रमांचे आयोजन काळाची गरज असल्याचे सांगितले.  AAMSU चे अध्यक्ष अजिजूर्रहमान यांनी आपल्या भाषणात आसाम राज्यातील अल्पसंख्यांक समुदायाच्या दयनिय अवस्थे बद्दल माहीती दिली. United Against Hate  चे नेते नदिम खान यांनी अल्पसंख्यांक समुदायांवर दिवसेदिवस वाढत चाललेल्या अत्याचारावर प्रकाश टाकतांना याला सर्वस्वी मुस्लिम समुदायच जबाबदार असल्याचे नमूद केले. ते म्हणाले की मुस्लिम समुदायाने आपली जबाबदारी योग्य रित्या पार पाडली नाही आणि हेच कारण आहे की ते आपली ओळख व आपले स्थान निर्माण करू शकले नाही. त्यामूळेच आज त्यांना अन्याय आणि अत्याचाराचा सामना करावा लागत आहे.  एस. आय. ओ. चे राष्ट्रीय कॅम्पस सचिव जसीम पी पी यांनी पवित्र कुरआन मधील हज़रत मुसा अ. यांचा वृत्तांत प्रस्तुत करतांना सांगितले की, आजही असत्यावर सत्याचा विजय मिळविण्याची तीच वेळ येऊन ठेपली आहे. ए.एम.आय. देवबंद चे अध्यक्ष मेहदी हसन ऐनी कासमी यांनी लोकशाहीची व्याख्या व तिचे विविध पैलू स्पष्ट केले. AMUSU चे कॅबिनेट सदस्य मतीन अशफ यांनी आजही देशाला गांधीजी, मौलाना आझाद, अश्फाकूल्लाह खान यांच्यासारख्या नेत्यांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. 
या प्रसंगी भगतसिंह, अंबेडकर स्टूडंट्स ऑर्गनायजेशन चे नेते उमर खालीद यांनी विविधतेतून एकता या विषयावर भर दिला. ते म्हणाले की असत्याचाराचा नायनाट करण्यासाठी सत्य बोलणे आणि सत्यासोबत उभे राहणे हेच सर्वात मोठे क्रांतीकारी कार्य आहे. यावेळी त्यांनी मोदी सत्तेवर कडाडून टिका केली. Solidarity Youth Movement चे अध्यक्ष पी एम सालेह यांनी सांगितले की, आज प्रत्येक मनुष्य हा स्वार्थी प्रवृत्तीचा बनला आहे. आपल्या स्वार्थासाठी तो आपल्याच बांधवाचा वैरी बनला आहे. ते पूढे म्हणाले की संपूर्ण मानवजाती एकाच माता-पित्याची संतती आहे. त्यामुळे सर्वजण आपापसात एकदूसऱ्याचे भाऊ आहोत, हीच शिकवण प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दिली आहे. BAPSA चे नेते राहूल सोनपिंपळे म्हणाले की आज भारतातील सर्व जनता रा. स्व.सं. च्या विचारसरणीची झाली आहे असे म्हणने योग्य नाही. कारण देशातील तळागाळातील बऱ्याच समुदायांपर्यंत कोणी पोहचलेले नाही. आर एस एस आणि भाजप त्यांच्यापर्यंत पोहचली आहे. त्यांनी मोठ-मोठी अश्वासने दिली आहेत आणि म्हणूनच ती मंडळी त्यांच्या सोबत उभी राहीली आहे. 
गर्ल्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया च्या विभागीय सचिव फसना मियान या प्रसंगी बोलातांना म्हणाल्या, की भारतातील प्रत्येक समुदायाने जातीच्या आधारावर म्हणजेच दलित, मुस्लिम, बहुजन अशी ओळख तर बनविली परंतु एक भारतीय असल्याची ओळख तो विसरला आहे. आज सरकारने ट्रिपल तलाक, हिजाब सारखे मुद्दे उकरून मुस्लिम महिलांसमोर मोठी समस्या निर्माण केली आहे. आज स्त्रीच्या आब्रूची लक्तरे उडविली जात आहेत. स्वत:च्या मूली सोबत सेल्फी काढून तो सोशल मिडियावरती व्हायरल करणे हा कुठला महिलांचा आदर सन्मान होय?’ 
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या शिक्षण आणि न्यायव्यवस्था या तिसऱ्या सत्रात ’न्यायव्यवस्थेची आणि शिक्षणाची दयनीय अवस्था’ या विषयावर मार्गदर्शन करतांना एस.आय.ओ. चे राष्ट्रीय सचिव तौसिफ अहेमद मेडीकरी यांनी न्यायव्यवस्थेबद्दल सविस्तर माहिती देतांना शासनाच्या विविध्द शिष्यवृत्त्यांबद्दल माहिती दिली. RTE फोरमचे राष्ट्रीय समन्वयक अंबरीश राय म्हणाले की, भारत हे एकमात्र असे राष्ट्र आहे की जेथे तरूणांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि येथे रोजगार व कारखानदारी संपृष्टात येत आहे. आज आपल्या देशात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवल्या आहेत. देशातील 25 टक्के शाळांमध्ये शौचालय नाहीत, शिक्षण आणि आरोग्यासाठीच्या अर्थसंकल्पात घसरण होत चालली आहे. 25 टक्के शेतकरी कर्जात बुडालेले आहेत. ते पूढे म्हणाले की शाळा ही समाजाचा कणा आहे, त्यामूळे शिक्षणातील वर्गिकरण थांबले पाहिजे. सर्वांना शिक्षणाची समान संधी मिळायला हवी. Quill
Foundation चे संचालक सोहेल के.के.म्हणाले की, या अधिवेशनाच्या माध्यमातून देशात नक्कीच एक आत्मविश्वासाची लाट उठेल. गुजरात मधील वडगामचे आमदार जिग्नेश मेवानी यांनी मोदी प्रशासनाच्या अनागोंदी कारभारावर टिका करतांना सांगितले की आज दलित आणि मुस्लिम समुदायावर जातीच्या नावाखाली अत्याचार केले जात आहेत. ते पूढे म्हणाले की अगामी 2019 मध्ये प्रजातंत्र आणि संविधानाला विरोध करणाऱ्या शक्तींना त्याची जागा दाखवून देण्यात येईल. जमाअते इस्लामी हिंदचे उपाध्यक्ष टी आरिफ अली म्हणाले की विद्यार्थी आणि युवापिढीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे स्वप्न घेवूनच येथून उठायचे आहे. ते म्हणाले की आसाम राज्यात शिक्षण, आरोग्य अशा समस्यांमुळे जवळपास 50 लक्ष मूस्लिमांचे अस्तित्व धोक्यात आहे. 
ध्येय, मुल्ये आणि आत्मसुधार या चौथ्या सत्रात मार्गदर्शन करतांना एस.आय.ओ.चे राष्ट्रीय सचिव लबीद आलिया यांनी एस.आय.ओ.ची निती आणि ध्येय धोरणे स्पष्ट करतांना सांगितले की, इस्लामची पायाभूत तत्वे ही सदस्यांसमोर ठळक पणे मांडलेली असतात, त्यामूळे या संघटनेत प्रत्येक संप्रदायातील लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असतो. ते पूढे म्हणाले की एस.आय.ओ.चे कार्यकर्ते इस्लामच्या शिकवणीच्या आधारावर अंमलबजावणी करतात. त्यामूळे ते कधीही अयशस्वी होत नाहीत. जमाअते इस्लामी हिंदच्या सचिव अतिया सिद्दीका या सामाजिक न्याय आणि इस्लामची शिकवण या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की इस्लाम ही परिपूर्ण जीवन पध्दती आहे. लिंगभेद, जातीयवाद, रंगभेद आणि वर्णभेदाला इस्लाम मध्ये थारा नाही. आपल्या मूलांवर संस्कार करण्याचे स्त्रीचे महत्वपूर्ण कार्य आज सामाजिक संस्था आणि पाळणाघरा सारख्या संस्थाकडे सोपविण्यात आले आहे ही फार खेदाची आणि चिंतेची बाब आहे. स्त्रीच्या सौंदर्याचा बाजार भरविण्यात आला आहे. सर्वात खेदाची बाब तर ही आहे की आज स्त्री देखील या सर्व बाबींना आपल्या फायद्याची आणि स्वातंत्र्याची गोष्ट समजून बसली आहे. वास्तविक पाहता हे स्त्रिंयाचे मोठ्या प्रमाणावार होत असलेले शोषण आहे. IIS  नवी दिल्ली चे संचालक हसन रजा यांनी इस्लामी चळवळ आणि साहित्य या विषयावर मार्गदर्शन करतांना युवकांनी मोठ्या प्रमाणावर साहित्याकडे वळण्याचे अवाहन केले. प्रसिध्द लेखक आणि इस्लामी विचारवंत डॉ इनायतुल्लाह सुब्हानी यांनी कुरआन- ज्ञानाचा मार्ग या विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की ईश्वराने निर्माण केलेल्या या सृष्टीमध्ये नको ते बदल करणे हा सर्वात घाणेरडा गुन्हा आहे. ते म्हणाले की मानवाच्या मार्गदर्शनासाठी ईश्वराने प्रत्येक युगामध्ये ग्रंथाच्या रूपात आपले मार्गदर्शन पाठविले. त्यापैकी कुरआन शेवटचा आणि सर्वात सुंदर आणि अनुपम ग्रंथ आहे. ’इकामते दीन’ या विषयावर मार्गदर्शन करतांना, जामिया मिलीया इस्लामिया नवी दिल्ली येथील प्राध्यापक डॉ. मो. रफत म्हणाले की, विनाकारण व फालतूच्या गोष्टींपासून दूर राहणे हा श्रध्दावंताचा गुणधर्म आहे. ते म्हणाले की, पाश्चिमात्य चळवळी या पोकळ स्वरूपाच्या आहेत कारण त्यांच्या मागेपूढे कोणताच ठाम असा उद्देश नाही. जमाअते इस्लामी हिंदचे उपाध्यक्ष सय्यद सादातुल्लाह हुसैनी म्हणाले की ईश्वरीय मार्गदर्शनाच्या आधारावर सामाजिक जडणघडणीसाठी विद्यार्थी आणि नवतरूणांना तयार करणे हेच एस.आय.ओ.चे ब्रिदवाक्य आहे. 
शलोकतंत्र, सार्वजनिक विवेक - वैकल्पिक माध्यमांची संभावनाश या विषयावरील पाचव्या सत्रात मार्गदर्शन करतांना एस आय ओचे राष्ट्रीय सचिव सय्यद अजहरूद्दीन म्हणाले की इस्लाम हा नेहमी इस्लामच राहील. न त्यात नाविन्य आहे ना तो कधी जूना होणार आहे. तो नेहमी परिपक्व होता, परिपक्व आहे आणि नेहमी परिपक्व राहणार आहे. आधुनिक प्रसार माध्यामांच्या अनागोंदी कारभारावर चिंता व्यक्त करतांना ते म्हणाले की आज प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेदभाव आणि पक्षपाताची अनेक उदाहरणे बघायला मिळताहेत. वरीष्ठ पत्रकार अमीत सेन गुप्ता म्हणाले की, सन 2014 मध्ये नवीन सरकार सत्तेवर आल्यापासून झुंडशाही आणि मोबलिंचिंग सारख्या घटनांमध्ये फार वाढ झाली आहे. एका विशिष्ट समुदायाकडून काही विशिष्ट समाजांना लक्ष्य केले जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर अशा अप्रिय घटना घडत असतांनाही सरकारचे डोके शांत कसे आहे. आज तिरस्काराचे हे वातावरण पूर्ण देशभरात पसरत आहे. या देशातील सर्वोच्च न्यायालयातील न्यायधिशांवर न्याय मागण्यासाठी पत्रकार परिषदा बोलवाव्या लागत आहे, ही फार लाजिरवाणी गोष्ट असल्याचेही ते म्हणाले. रेडियन्स विकलीचे एजाज असलम म्हणाले की, ’गेल्या सत्तर वर्षांपासून आपण एका लोकशाही राष्ट्रात वास्तव्य करीत आहोत, परंतु आज देशातील नागरीकांमुळेच लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. ज्या दिवशी लोकशाही संपुष्टात येईल त्या दिवशी या देशाची अवस्था छिन्न-विछिन्न होऊन जाईल. त्यामूळे लोकशाहीचे संगोपन व संरक्षण होणे फार गरजेचे आहे. इस्लामी चळवळीचे भावी कार्यकर्ते या नात्याने लोकशाहीचे संरक्षण, प्रसार माध्यमांचा दर्जा यांच्या बाबतीत विचार करणे ही एस.आय.ओ.ची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. वरीष्ठ पत्रकार आणि लेखक अजित साही, कानडी वर्तमानपत्र वार्ताभारतीचे संस्थापक व संपादक अब्दूस्सलाम पूथिगे यांनीही आपल्या भाषणातून भारतीय प्रसार माध्यमांच्या भूमिकेबद्दल चिंता व्यक्त केली. जमाअते इस्लामी हिंदचे उपाध्यक्ष नूसरत अली यांनी सांगितले की, लोकशाही मध्ये प्रत्येक व्यक्ती आपापली बुध्दी वापरून आपले विचार मांडू शकतो आणि मांडतही आहे, परंतु तो काय बोलतो आहे हे त्याने विचार करूनच बोलावे. ईश्वरावर विश्वास ठेवणारे लोक कधीही कोणत्याही एका बाजूला झुकत नाहीत. ते पूढे म्हणाले की, गुन्हेगार फक्त तेच लोकं नाहीत जे गुन्हा करतात, तर गुन्हेगार ते लोकं सुध्दा आहेत जे गुन्हेगाराला बघूनही शांत बसतात. 
(अधिवेशन तीन दिवसाचे असल्याने जागेअभावी काही मान्यवरांची भाषणे पुढील अंकात घेण्यात येतील.)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget