Halloween Costume ideas 2015

डोळे दिपवणारा तब्लिगी इज्तेमा

औरंगाबाद (सालार शेख) -  
24,25,26 फेब्रुवारीला लिंबेजळगाव जिल्हा औरंगाबाद येथे तब्लीगी जमाअतचा आलमी इज्तेमा संपन्न झाला. या इज्तेमाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. देश, विदेशातील लाखोंच्या संख्येने आलेल्या मुस्लिम बांधवांचे शिस्तबद्ध वावरणे पाहणार्‍यांसाठी आश्चर्यकारक होते. गेल्या सहा महिन्यांपासून या इज्तेमाची तयारी करण्यात येत होती. आलेल्यांना जेवण, पाणी, कमी पडणार नाही याची दक्षता संयोजकांनी घेतलेली होती. सर्वांसाठी पुरेल एवढे पाणी व अंघोळी तसेच मलनिस्सारणाची आश्चर्यजनक शिस्तबद्ध व्यवस्था करण्यात आलेली होती. प्रत्येक जिल्ह्याला कामाची वाटणी करून दिलेली होती. प्रत्येक जिल्ह्यातून स्वयंसेवक अनेक महिने या ठिकाणी तळ ठोकून होते. दोन हजार एकर परिसरात 21 विहिरी होत्या. त्या सर्वांचे पाणी उपसून 8 मोठी शेततळी उभारण्यात आली होती. पाणी शुद्धीकरणाचीही व्यवस्था करण्यात आलेली होती. विजेची व्यवस्थाही अफलातून होती. नांदेड येथील वास्तूविशारदाने ड्रॉईंग तयार करून दिले होते. मुख्य मंडप 1 कोटी 5 लाख चौरस फुटाचा होता. इज्तेमाच्या यशस्वीतेसाठी दुआ करण्यात काही लोक 24 तास मग्न होते. 17 लोक मुख्य मंडपात एहतेकाफमध्ये बसलेले होते. अनेकांनी रोजे ठेवलेले होते. विदेशी साथींच्या सेवेसाठी वातानुकूलित तंबू लावण्यात आलेले होते. विशेष म्हणजे एवढ्या लोकांच्या वाहनासाठी पार्किंग व्यवस्था अतिशय सुलभ अशी करण्यात आलेली होती. स्थानिक लोकांनी चहा, नाष्टा, जेवण याची भरपूर काळजी घेतली होती. एकंदरित हा इज्तेमा म्हणजे डोळे दिपवणारा व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना होता.

पंढरपूर ट्रस्टचे पदाधिकारी आले
सोलापूर येथील पंढरपूर ट्रस्टच्या पदाधिकार्यांनी तीन दिवसांपूर्वीच इज्तेमास्थळी हजेरी लावली. दरवर्षी पंढरपुरात लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होतात. इज्तेमाप्रमाणे आम्हालाही सोयी-सुविधा देता येऊ शकतील का, याचा आढावा त्यांनी घेतला. संपूर्ण इज्तेमा स्थळ फिरून त्यांनी पाहणी केल्याचे संयोजकांनी सांगितले.

इस्लामचे तत्व आचरणात आणण्याचे आवाहन
औरंगाबाद येथे तीन दिवस चाललेल्या इज्तेमामध्ये अनेक उलेमांनी संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, इस्लामची जीवनव्यवस्था समस्त मानवजातीसाठी कल्याणकारी आहे. मुस्लिमांनी आपल्या आचरणातून इस्लामी जीवनपद्धतीची उपयोगिता, स्वच्छ आणि सरळ जीवन जगण्याची पद्धत, तनावरहित आयुष्य, नितीमान जीवन या जीवनमुल्यांचा नमुना देशबांधवांना दाखवून द्यावा. 
तब्लीगी जमाअतचे प्रमुख मौलाना साद म्हणाले, निकाह हे मागील काही वर्षापासून खर्चिक करण्यात येत आहेत. लाखो रूपयांची उधळपट्टी होत आहे. अल्लाह आणि प्रेषित सल्ल. यांना हे मान्य नाही. निकाह अत्यंत सोप्या पद्धतीने करावा. स्वर्ग प्राप्तीसाठी पैगंबर मुहम्मद सल्ल. यांनी दिलेली शिकवण आचरणात आणण्याचा सल्ला मौलाना शमीम अहेमद यांनी दिला. रविवारी जोहरच्या नमाजनंतर लाखो लोकांना मार्गदर्शन करतांना आपल्या बयानमधून कुरआन आणि हदीस संबंधी विविध उदाहरणे देवून प्रत्येक मुस्लिमाने  इस्लामी जीवनाचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले. संपूर्ण सृष्टीचा पालनहार एकमेव अल्लाह असून, त्याच्या नजरेत आयुष्य अनमोल आहे. समस्त मानवजातीचे कल्याण व्हावे म्हणून अल्लाहने वेळोवेळी जगाच्या वेगवेगळ्या भागात पैगंबर पाठविले. आता कुठलेही पैगंबर येणार नाहीत. शेवटचे पैगंबर मुहम्मद मुस्तफा सल्ल. यांच्या शिकवणी स्वत: अमलात आणून ते जगापुढे मांडण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget