Halloween Costume ideas 2015
April 2022


खेदाची गोष्ट अशी की महाराष्ट्रातून भ्रष्टाचार संपवण्यासाठी चंग बांधलेल्या ईडीला भाजपा नेत्यांचे भ्रष्टाचार का दिसत नाहीत. निवृत्त न्यायाधीश रंजन गोगोईंनी न्यायालयातील भ्रष्टाचाराविषयी एका प्रश्नाचे उत्तर देताना असे म्हटले होते की, ’’न्यायाधीश अकाशातून येत नसतात’’ भ्रष्टाचाराचा इतिहास आमच्या समाजाइतकाच जुना आहे. ही समस्या जणू जीवन शैलीचा अंगच बनलेली आहे. 

जेव्हा 6 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली तेव्हा कल्पनांना उधान आले होते. लोकांना असे वाटते की संजय राऊत भिऊन गेले आणि म्हणून ते काही तडजोड करू पाहत आहेत. शरद पवारांनी अन्य समस्यांव्यतिरिक्त असे ही म्हंटले की, राऊतांविषयी पंतप्रधानांशी बोलले आणि म्हणाले की त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्यांची मालमत्ता जब्त केली गेली. तसेच ईडीकडून त्यांना धमकावले जात आहे. त्यांच्याविरूद्ध ही कारवाई ते शासनाविरूद्ध बोलत असतात म्हणून केली आहे. शरद पवार हे ही म्हणाले की, राज्यात मविआ समोर कोणता धोका नाही ती भक्कमपणे उभी आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत देखील ही आघाडी एकत्र लढणार आहे. शरद पवारांच्या भेटीनंतर 7 एप्रिल रोजी संजय राऊत यांनी केंद्र सरकारला पुन्हा एकदा आवाहन दिले आणि स्पष्ट केेलं की, केंद्र सरकारशी ते कोणतीही तडजोड करणार नाहीत. त्यांनी, आपल्या एका लेखात हे म्हंटले आहे की, महाराष्ट्र आणि आमच्या विरूद्ध युद्ध छेडणाऱ्यांविषयी मी असे सांगू इच्छितो की, महाराष्ट्र राज्य ईडी व अन्य केंद्रीय संस्थांचा मुकाबला करण्यास तयार आहे. 

या भेटीनंतर एक नवीन प्रकरण समोर आले. एका सैन्य अधिकाऱ्यांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात किरीट सोमय्या आणि यांच्या मुलांविरूद्ध एक तक्रार दाखल केली. ही तक्रार विक्रांत ह्या युद्ध नौकेला वाचविण्यासाठी किरीट सोमय्या यांनी काही पैसे गोळा केल्याच्या संदर्भात होती. तक्रार करणाऱ्यांच्या मते सोमय्या यांनी जी रक्कम जमा केली होती ती राज्यपालांच्या ऑफिसमध्ये जमा न करता इतरत्र वळवली. यावर संजय राऊत यांनी सोमय्याविरूद्ध महाराष्ट्रासहीत देशाशीही गद्दारी केल्याचा आरोप केला.

अशा तऱ्हेने भाजपा आणि शिवसेना यांच्यातील हे युद्ध युक्रेन-रशिया मधील युद्ध सदृश्य झाले आहे. प्रश्न असा उपस्थित होतो की, हिंदुत्व विचारधारांचे हे दोन्ही पक्ष वर्षानुवर्षे एकमेकांबरोबर राजकारणात असताना शेवटी एकमेकांचे कडवे विरोधक का झाले? देवेंद्र फडणवीस यांचा असा पवित्रा की ते सेनेला निवडणुकीत पराजय करून पुन्हा मुख्यमंत्री होणार; हे भाजपासाठी धर्मसंकट बनले. फडणवीसांनी अजीत पवार ऐवजी उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना त्या रात्री उपमुख्यमंत्री बनवले असते तर कदाचित ही गंभीर समस्या निर्माण झाली नसती. शिवसेनेकडून अडीच अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाची संधी देवून आपली किंमत दाखविता आली असती. 

पण भाजपच्या म्हणण्यापेक्षा फडणवीसांनी त्याला आपल्या अहंकाराचा विषय करून टाकला आणि आजपर्यंत या अहंकाराच्या आगीत तडफडत आहेत. अजित पवार तर उपमुख्यमंत्री झाले पण फडणवीसांच्या हातातून मुख्यमंत्री पद निसटले. 

महाविकास आघाडीत वरकरणीत विरोध दिसत असतात पण वास्तवात त्यांच्यामध्ये कोणतेच विरोध नाहीत. शरद पवार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असले तरी काँग्रेसी आहेत आणि काँग्रेसीच राहणार आहेत. शिवसेनेची काँग्रेस पक्षाची जवळीक जगजाहीर आहे. ह्याच काँग्रेसने कम्युनिस्टांचे महाराष्ट्रातील आव्हाण संपवण्यासाठी शिवसेनेचे पालन पोषण केले हे वास्तव साऱ्या जनतेला माहित आहे. दिवंगत मुख्यमंत्री अब्दुर्रहमान अंतुले आणि वसंतदादा पाटील यांच्या आशीर्वादाने सेना लहानाची मोठी झाली आणि हिंदुत्व असो की धर्मनिरपेक्षता हे तर सत्ता काबिज करण्यासाठी प्रसंगी आणि वेळोवेळी वापरले जाणारे यंत्र आहेत. भारतामधील राजकारणातून विचारधारा केंव्हाच मरण पावली. आता केवळ संधी साधू राजकारणाचे पर्व चालू आहे.

महाविकास आघाडी बाहेरील विरोधाभास आता भाजपामध्येही शिरलेला आहे. फडणविसांनी काँग्रेसचे कृपाशंकरसिंह, मनसेचे प्रवीण दरेकर आणि नारायण राणे यांनी शिवसेनेला राम-राम ठोकून भाजपात प्रवेश केला. एकेकाळी भाजपाने या सर्वांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते पण आज त्याचा विसर पडला आहे. मविआ आता त्यांच्या प्रकरणाला बाहेर आणत आहे. आरोप लापवण्यात किरीट सोमय्या आघाडीवर होते. आता ह्याच आरोपामुळे ते बरेच विस्कळीत झाले आहेत. कृपाशंकरसिंह यांच्यावर 300 कोटी बेकायदेशीर संपत्ती जमावण्याचा आरोप होता पण 2016 साली आता नवीन सरकार त्यांची चौकशी करत असेल तर किरिट सोमय्या यांना त्यांचा बचाव करावा लागेल.

2017 साली किरिट सोमय्या यांनी ईडीला नारायण राणे यांचे सात भ्रष्टाचाराची प्रकरणे दाखवून दिली होती. त्यावर कारवाई देखील सुरू झाली होती. पण 2019 साली त्यांनी भाजपात पदार्पण करून आपली सर्व पापे धुवून घेतली. भाजपात गेल्याने न्हाल्यासारखेच झाले. आता ईडीला हे प्रकरण दिसत नाहीत. राणे पिता पुत्र सुशांतसिंहच्या मॅनेजर दिशा सालीयान यांच्या प्रकरणात अकडलेले आहेत. या पिता पुत्रांनी कोणताही पुरावा नसताना असे विधान केले होते की दिशाचा  आत्महत्या आधी विनयभंग झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी नऊ तास नारायण राणे यांची चौकशी केली होती. भाजपाचा एक कार्यकर्ता मोहित कंबोजवर आर्यन प्रकरणात किडनॅप आणि खंडणीचा आरोप आहे. यातून सुटकेसाठी ते हनुमान चालीसाच्या पठणासाठी मोफत लाऊडस्पीकर वाटण्याचे नाटक करत आहेत.

साऱ्या जगावर भ्रष्टाचाराचे आरोप लावणाऱ्या किरिट सोमय्या यांचे राकेश वाघवान यांच्याशी असलेले संबंध संजय राऊत यांनी चव्हाट्यावर आणले. हे तर लहान-सहान व्यक्ती झाले. महाविकास आघाडीचे लक्ष आता देवेंद्र फडणवीस आहेत. जलयुक्त शिवारमध्ये भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्याविरूद्ध तक्रार दाखल झालेली आहे. दूसरे प्रकरण फोन टॅपिंगचे आहे. मुंबई पोलिसांना अशी चिंता लागून आहे की, काही गुपीत गोष्टींची माहिती फडणविसांना कशी मिळाली. यासंबंधी आयपीएस अधिकारी रश्मी शु्नला यांच्यावर राजकीय नेत्यांचे फोन संभाषण टॅप करण्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी चालू असून भाजपाचे माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी रश्मी शु्नला यांच्या विरोधात साक्ष दिलेली आहे. चौकशीत जर हे सिद्ध झाले की शु्नला यांनी फडणवीसांच्या मर्जीने हे सर्व केले असतील तर ते अडचणीत येऊ शकतात.

खेदाची गोष्ट अशी की महाराष्ट्रातून भ्रष्टाचार संपवण्यासाठी चंग बांधलेल्या ईडीला भाजपा नेत्यांचे भ्रष्टाचार दिसत नाहीत. निवृत्त न्यायाधीश रंजन गोगोईंनी न्यायालयातील भ्रष्टाचाराविषयी एका प्रश्नाचे उत्तर देताना असे म्हटले होते की, ’’न्यायाधीश अकाशातून येत नसतात’’ भ्रष्टाचाराचा इतिहास आमच्या समाजाइतकाच जुना आहे. ही समस्या जणू जीवन शैलीचा अंगच बनलेली आहे. अशी शैली ज्याला आता लोक मान्यता देऊ लागले आहेत. न्याय व्यवस्थेची जर अशी दिशा असेल तर मग ज्या राजकारणींना निवडणूक जिंकून खुर्ची हवी असते त्यांच्या विषयी काय म्हणावे? ते बिचारे तर संपूर्ण भ्रष्टाचारात बुडालेले असतात. दुर्दैवाची गोष्ट अशी की, ही वास्तविकता असतांना भाजपाला फक्त महाराष्ट्र राज्याला का लक्ष करत आहे? माजी गृहमंत्री 71 वर्षीय अनिल देशमुख आणि नवाब मलिक जेलमध्ये खितपत पडले आहेत. याचे कारण नुकतेच एका कार्यक्रमात न्यायमूर्ती रमना यांनी केलेल्या एका भाषणात मिळते ते म्हणाले होते की, निष्पक्ष न्यायव्यवस्थेवर लोक संशय व्यक्त करत आहेत. त्यांचे म्हणणे बरोबर आहे. जर न्यायव्यवस्थेचा केंद्र शासन गैरवापर करत असेल तर महाराष्ट्रात जे घडतंय ते घडणारच आहे.


- डॉ. सलीम खान



पैगंबरी मिशनचा एक उद्देश नैतिकरित्या सर्वश्रेष्ठ समाजाची निर्मिती आहे व ती करतांना अनेक समस्या समोर येतात हे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या चरित्राचे वाचन केल्याने लक्षात येते. हे काम सोपे नाही पण अशक्यही नाही. मात्र या कामाच्या करण्या आणि न करण्यावरच भारतीय मुस्लिमांचे वर्तमान आणि भविष्य दोन्ही अवलंबून आहे. याची जाणीव देशाच्या सध्या असलेल्या परिस्थितीच्या निमित्ताने आपण सर्वांनी ठेवावी.


तुफां बडे गुरूर से ललकारता रहा

कश्ती बडी नियाज से जिद पर अडी रही

अजानबद्दल राज ठाकरेंनी नव्याने आंदोलनाची घोषणा केल्याने महाराष्ट्रासह देशातील वातावरण ढवळून निघालेले आहे. महाराष्ट्र सरकार त्यांच्या ‘लाऊड स्पीकर काढा नाही तर..!’ च्या धमकीला काडीचे महत्त्व देणार नाही, हे एव्हाना स्पष्ट झालेले असले तरी उत्तर भारतात मात्र त्यांच्या आव्हानाने पुरता ढवळून निघालेला आहे. राम नवमी ते हनुमान जयंती दरम्यान उत्तर भारतात ठिकठिकाणी दंगली झाल्या. त्यामुळे सांप्रदायिक उष्णतेचा पारा अधीच चढलेला असताना त्यात राज ठाकरेंनी सुचविलेल्या हनुमान चालिसामुळे अधिकच भर पडलेली आहे. 

दर आठ दिवसाला नवीन मुद्दा घेऊन काही दक्षीणपंथी विचारसरणीचे लोक देशात वातावरण तापत ठेवतात. कधी लव्ह जिहादच्या नावावर, कधी घरवापसीच्या नावावर, कधी गोमांसच्या नावावर, कधी दाढीच्या नावावर, कधी टोपीच्या नावावर, कधी हिजाबच्या नावावर, कधी हलाल मीटच्या नावावर, कधी कपड्यांवरून तर कधी शाळेच्या गणवेशावरून आणि आता अजानचा प्रश्न उचलून हे लोक देशातील जातीय उष्णतेचा पारा सतत चढत राहील याची काळजी घेत आहेत. वास्तविक पाहता ही सर्व कारणे निमित्तमात्र आहेत. खरे कारण इस्लामोफोबिया आहे.   

खरे पाहता प्रश्न अजानचा नाहीच. मुस्लिमांविषयी असलेल्या घृणेचा आहे आणि ही घृणा इस्लामोफोबियामधून जन्मलेली आहे. या स्थितीला अजानला विरोध करणारे जेवढे जबाबदार आहेत तेवढेच किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त जबाबदार देशातील मुसलमानसुद्धा आहेत. इस्लामविषयी असलेल्या अज्ञानामुळे दक्षिणपंथियांना इस्लामची भीती वाटते. ही भीती नष्ट करण्याची किंबहुना ती निर्माणच होऊ नये यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची जबाबदारी भारतीय मुस्लिम समाजाची होती. जी की त्यांनी प्रामाणिकपणे बजावलेली नाही. म्हणून परिस्थिती इतकी भीषण झालेली आहे. पुण्याचे प्रख्यात वकील असीम सरोदे यांनी राज ठाकरेंना आव्हान देत असे म्हटलेले आहे की, ’’माननीय उच्च न्यायालयाने अजानसाठी वापरण्यात येणाऱ्या लाऊडस्पिकरचा आवाज नियंत्रणात ठेवावा मात्र कोर्टाने कधीच मस्जिदीवरचे भोंगे काढा असा आदेश दिलेला नाही. तसा आदेश राज ठाकरेंकडें असेल तर त्यांनी त्याचे जाहीर वाचन पुण्यात करावे.’’ ही झाली पार्श्वभूमी. खरी अडचण अशी आहे की, इस्लामोफोबिया निर्माण होऊ नये यासाठी मुस्लिमांच्या फार छोट्या गटाने प्रयत्न केले आहेत. बहुतेक मुस्लिमांचा असा समाज आहे की, इस्लामचा परिचय देशबांधवांना करून देण्याची जबाबदारी फक्त उलेमांची आहे. मात्र त्यांचा हा समाज सपशेल खोटा आहे. कुरआनमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की, ’’आम्ही सर्व लोकांच्या मार्गदर्शनासाठी आपल्या ग्रंथात ज्याचे वर्णन केले आहे अशा आमच्या अवतरलेल्या स्पष्ट मार्गदर्शनाला जे लपवितात त्यांचा अल्लाहसुद्धा धिक्कार करतो आणि धिक्कार करणारेही त्यांचा धिक्कार करतात.’’  (संदर्भ : सुरे अलबकरा क्र.2 आयत नं.159)

भारतीय मुस्लिमांनी स्वतःजवळ कुरआनचे मार्गदर्शन 1400 वर्षांपासून जतन करून ठेवले. मात्र देशबांधवांपर्यंत ते पोहोचविले नाही. एका अर्थाने ते लपविलेलेच आहे. या आयातीचा अर्थ स्पष्ट करतांना जमाअते इस्लामी हिंदचे संस्थापक मौलाना सय्यद अबुल आला मौदुदी रहे. म्हणतात की,’’ उलमा-ए-यहूद का सबसे बडा कसूर ये था के, उन्होंने किताबुल्लाह के ईल्म की ईशाअत करने के बजाए उसको रब्बियों और मजहबी पेशेवरों के एक महेदूद तबके में मुकीद (कैद) कर रख्खा था. और आम्मा-ए-खलाएक (आम जनता) तो दरकिार खुद यहूदी अवाम तक को उसकी हवा न लगने देते थे. फिर जब आम जिहालत की वजह से उनके अंदर गुमराहियां फैली तो उलेमाओंने न सिर्फ ये के इस्लाह की कोई कोशिश न की बल्के वो अवाम में अपनी मकबुलियत बरकरार रखने के लिए हर उस जलालत (अज्ञानता) और बिदआत (धर्म में नई बात को डालना) को जिसका रिवाज आम हो जाता, अपने कौल और अमल या अपने सुकूत (खामोशी) से उल्टी सनदे जवाज (सच ठहेराना) अता करने लगे. इसीसे बचने की ताकीद इस आयत में मुसलमानों को की जा रही है. दुनिया की हिदायत का काम जिस उम्मत के सुपूर्द किया जाए उसका फर्ज ये है के, उस हिदायत को ज्यादा से ज्यादा फैलाये ना ये के बखील के माल की तरह उसे छुप्पा रख्खे.’’ 

मौलानांनी ज्या चुकीकडे अंगुलीदर्शन केलेले आहे ती चूक भारतीय मुस्लिम समाजाने गेल्या 1400 वर्षांपासून केलेली आहे. परिणामी ते आज या स्थितीला येऊन ठेपलेले आहेत की,  काही ना काही निमित्त काढून त्यांना खिजविले जाते, त्यांचीं मानहानी केली जाते, त्यांच्या वस्त्यांमधून नंग्या तलवारी घेऊन मिरवणुका काढल्या जातात, मस्जिदीसमोर डिजे वाजविला जातो, त्यांना अपमानित करणारे गीत वाजविले जातात, एवढे करूनही त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही तर मिरवणुकीतीलच काही लोक दगडफेक करतात व त्यानंतर दंगलीला सुरूवात होते. पोलीसही त्यांचीच साथ देतात. मोठ्या प्रमाणात मुस्लिमांनाच अटक केली जाते. आतातर त्यांच्या घरावर बुलडोजरही फिरविले जात आहे. या सर्व स्थितीला मुठभर दक्षिणपंथी जरी जबाबदार असतील तरी त्यांच्यापेक्षा जास्त जबाबदारी मुस्लिमांची आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित करण्याचा मोह मला आवरता येत नाहीये. 

दंगलींच्या बाबतीत सुद्धा मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांचे मार्गदर्शन अतिशय उपयुक्त आहे. ते म्हणतात, ’’फसादों को लेकर एक तो इजहार-ए-नफरत, दो उसपे बात नहीं करना, तीन उससे हुए नुकसानात पर इजहारे अफसोस करना, चार- इजहारे बेबसी करना, पांच- नाला (विलाप) करना. इसके सिवा मुसलमानों ने कुछ नहीं किया. मेजॉरिटी की जुबाने सिखना, उसमें लिट्रेचर तरतीब देना, उनसे रवाबित बढाना, खिदमते खल्क के इदारे चलाना, दावती नज्म को मजबूत करना, फलाही इदारे, दवाखाने, स्कूल, कॉलेज खोलके मेजॉरिटी के हक में खुद को फआल (उपयोगी) साबित करना, फालतू नारेबाजी, चर्ब बयानी से बचना, इश्तेआल अंगेज तकरीरों (प्रक्षोभक भाषण) से बचना, फसाद में लुटे लोगों को दुगनी ताकत से खडा करना ये वो काम हैं जो मुसलमान चाहें तो कर सकते हैं. जिनसे होनेवाले फसादों के नुकसानात को कम किया जा सकता है. बल्के फसाद खुद कम हो सकते हैं. इतना करने के बाद भी फसाद फूट पडें तो उसे कैसा निपटा जाए. इसके लिए भी मुसलमानों को प्रशिक्षित करने का काम हमने नहीं किया.’’

मौलानांनी जे वरील मुद्दे उपस्थित केले आहेत त्याबद्दल शंका घेण्यासाठी जागा नाही. आता तर दारूल उलूम देवबंद कडूनही मुस्लिमांना दंगलीमध्ये आत्मरक्षा करण्यासाठीचे आवाहन करण्यात आलेले आहे. दारूल उलूमचे व्यवस्थापक मुफ्ती अब्दुल कासीम नौमानी यांनी म्हटलेले आहे की,’’ मुसलमान हिम्मत और समझदारी से हालात का मुकाबला करें. खौफ और दहेशत को दिल से निकालें. हम अमन-ओ-अमान के मुहाफिज हैं. लेकिन अगर हालात ऐसे आ जाएं के हमारी जान, माल, इज्जत व आबरू पर कोई हमला करे तो डटकर मुकाबला करें’’ हा संदेश त्यांनी 15 एप्रिल रोजी बनारसच्या एका मस्जिदीमध्ये शुक्रवारचा खुत्बा (विशेष संबोधन) देतांना दिला. ते त्या मस्जिदीमध्ये एतेकाफ (धार्मिक उद्देशासाठी मस्जिदमध्ये केला जाणारा मुक्काम) मध्ये बसलेले आहेत. 

शेकडो वर्ष गफलतीत राहिल्याचा एकत्रित परिणाम आता आपल्याला याची देही याची डोळा पहावयास मिळत आहे. मुस्लिमांवर अतिशय कठीण वेळ आलेली आहे. त्यात पुन्हा ईश्वराच्या मदतीसाठी आपण पात्र नाहीत. ही पात्रता आपण आपल्या गैरइस्लामी आचरणामुळे स्वतःहून गमावलेली आहे. आता काही मुस्लिम राजे-महाराजेही नाहीत की, ज्यांच्याकडून मदतीची अपेक्षा करता येईल. आता केवळ स्वबळावर संघटितरित्या कुरआनने सांगितलेल्या उपायांची अंमलबजावणी केल्याशिवाय गत्यांतर नाही. या परिस्थिती पर्यंत येऊन ठेपल्यावरही वर नमूद उपाय करण्यास आपण कमी पडलो तर असेच धिक्कारले जाणार. असेच प्रश्न विचारले जाणार. उत्तर देत-देत आपण थकून जाऊ पण प्रश्नांची मालिका काही थांबणार नाही. जमाअते इस्लामीचे सध्याचे अध्यक्ष सय्यद सआदतुल्लाह हुसैनी यांनी म्हटलेले आहे की, ’’सख्त हालात ने कौमों के तीन रद्दे अमल हो सकते हैं. 1. खौफ, शिकस्त खुर्दगी (पराजित मानसिकता). ,पसमर्दगी (पराजय स्विकारणे), खुद सुपूर्दगी (परिस्थितीला शरण जाणे) 2. अंधी जज्बातीयत (अंधभावना), इंतहा पसंदी (आक्रमकता), तशद्दुद (हिंसा). 3. अपने अंदर इत्तरतजाईयत (जरासी लचक) पैदा करके सख्त हालात का तजजिया (विश्लेषण), अपना एहतेसाब (आत्मपरीक्षण) करके होशमंदी के साथ हालात का सामना करना.’’ 

सय्यद सआदतुल्लाह हुसैनी यांच्या मते मुस्लिमांना आता तिसऱ्या प्रकारे आचरण करावे लागेल तरच त्यांना या देशात चांगले भविष्य दिसेल. इतर समाजासारखे आपण नाहीत. आपण विशेष आहोत, प्रेषित सल्ल. यांचे वारस आहोत, आपल्यावर मोठी जबाबदारी आहे, याचे भान ठेऊन मुस्लिमांना वागावे लागेल. या ठिकाणी मी फक्त मुस्लिमांसमोरील प्रश्नच उपस्थित केलेले नसून सध्याच्या परिस्थितीमध्ये त्याच्यावर काय उपाय आहेत, हे सुद्धा सुचविलेले आहेत. आपण हे काम केले तर कुरआननी अशा लोकांसाठी जी शुभवार्ता दिलेली आहे ती खालीलप्रमाणे - ’’तथापि जे लोक या प्रवृत्तीपासून परावृत्त होतील व सुधारणा करतील आणि स्पष्टपणे विवेचन करतील त्यांना मी क्षमा करतो आणि मी क्षमावंत आणि दयावंत आहे.’’  (सुरे अलबकरा क्र.2: आयत नं. 160) 

थोडक्यात कुरआनच्या शिकवणी स्थानिक भाषांमध्ये बहुसंख्य बांधवांपर्यंत पोहोचविण्याचे कर्तव्य करण्याची ही कातरवेळ आहे. आज ही जर आपण गफलतीत राहिलो तर मग 

खुदा ने आजतक उस कौम की हालत नहीं बदली

न हो जिसको खयाल खुद अपने हालत के बदलने का

याबाबतीत कुरआनने म्हटलेले आहे की,’’ वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाह  कोणत्याही जनसमूहाच्या स्थितीत परिवर्तन करीत नाही जोपर्यंत तो स्वतः आपल्या गुणांना बदलत नाही आणि जेव्हा अल्लाहने एखाद्या जनसमूहावर अरिष्ट आणण्याचा निर्णय घेतला तेव्हा ते कोणाच्याही टाळल्याने टळू शकत नाही, आणि अल्लाहच्या विरोधात अशा जनसमूहाचा कोणी संरक्षक व मदतगारही असू शकत नाही.’’ 

(सुरे अर्रअद नं.13 आयत नं. 11)

कुरआनचा परिचय देतांना त्याच्या मार्गदर्शनावर चालण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. आपण जर कुरआनचे मार्गदर्शन इतरांना सांगू आणि स्वतः त्यावर आचरण करणार नाही तर मग त्या प्रबोधनाचा काडीचाही उपयोग होणार नाही. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवावी. हे न करता आल्यामुळेच आपण धिक्कारले जात आहोत. चोहीकडून संकटांची मालिका सुरू आहे हे ज्या दिवशी आपल्या लक्षात येईल तो सू दिन. आपण कुरआनवर आचरण सुरू केल्यावरच दूसऱ्यांपर्यंत त्याबद्दल प्रबोधन करण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होतो. अन्यथा कुरआन स्वतःच म्हणतो की, ’’हे लोकहो ! ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, तुम्ही का ती गोष्ट सांगता जी तुम्ही करीत नाही?’’  (सुरे अस्सफ नं.6 आयत क्र.2)

अजानच्या वादाच्या पार्श्वभूमीवर जमाअते इस्लामी हिंदचे वरीष्ठ आलीमे दीन मुहियोद्दीन गाजी यांनी एक चांगला प्रस्ताव देशाच्या मुसलमानांसमोर मांडलेला आहे. त्यावर या ठिकाणी चर्चा करणे अनाठायी होणार नाही. त्यांच्यामते अजान अरबी भाषेमध्ये दिली जात असल्यामुळे देशबांधवांनाच काय बहुसंख्य मुस्लिमांना सुद्धा त्याचा अर्थ कळत नाही. त्यामुळे अजानविषयी गैरसमज वाढण्यामध्ये हा एक फॅ्नटर कारणीभूत आहे. म्हणून अरबीची अजान देण्यापूर्वी किंवा दिल्यानंतर स्थानिक भाषेतून त्याचा अर्थ सांगणारी तशीच अजान दिली गेली तर सर्वांच्याच लक्षात येईल की अजानचा नेमका अर्थ काय आहे? व त्यामुळे लोकांचा गैरसमज सुद्धा दूर होईल. उदाहरणादाखल मराठीतील अजान खालीलप्रमाणे दिली जाऊ शकेल. 

1. ईश्वर सर्वश्रेष्ठ आहे. 

2. मी साक्ष देतो की, ईश्वराशिवाय कोणीही उपास्य नाही. 

3. मी साक्ष देतो की, मुहम्मद (सल्ल.) ईश्वराचे दूत आहेत.

4. या ईश्वराची उपासना करू. 

5. या सफलता प्राप्त करू 

6. ईश्वराचे स्मरण झोपेपेक्षा चांगले आहे. 

7. ईश्वर सर्वश्रेष्ठ आहे 

8. ईश्वराशिवाय कोणी उपासणा करण्यास योग्य नाही. 

भारतात इस्लामने ज्या परिस्थितीत आपले पाय रोवले होते त्या परिस्थितीचे वर्णन करतांना प्रसिद्ध कम्युनिस्ट लेखक एम.एन. रॉय यांनी आपले पुस्तक ’इस्लामचे ऐतिहासिक योगदान’ च्या पान क्र. 79 वर लिहिलेले आहे की, ’’ जेव्हा मुसलमान भारतात आले तेव्हा भारतातील बौद्ध क्रांती पराभूत झालेली नव्हती. त्या क्रांती अंतर्गत असलेल्या उणीवांचा फायदा उठवून ब्राह्मणी व्यवस्थेच्या पुरस्कर्तयांनी तिचा गर्भपात घडवून आणला होता. बुद्धाच्या क्रांतीला यशस्वी करण्याइतपत त्या काळातील शक्ती परिपक्व झालेल्या नव्हत्या. त्यामुळे बुद्धिझमचा ऱ्हास झाला. त्यानंतर ; आपला देश आर्थिक विनाश, राजकीय दमन, बौद्धिक अराजकता आणि आध्यात्मिक गोंधळाच्या भयंकर गर्तेत सापडला. प्रत्यक्षात संपूर्ण समाजच विघटन व पतनाच्या क्लेशदायक प्रक्रियेने त्रस्त झालेला होता. त्यामुळे, राजकीय स्वातंत्र्याचा विचार बाजूला सारून, त्रस्त व पीडित झालेले लोक, सामाजिक समता देऊ इच्छिणाऱ्या इस्लामच्या झेंड्याखाली त्वरेने गोळा झाले, इतकेच नव्हे; तर अगदी उच्च जाती-वर्गातील लोकांनीही स्वार्थासाठी परकीय आक्रमकाप्रती आपल्या सेवा रूजू केल्या. त्यातून; त्याकाळातील सर्वसामान्य लोक निराशाग्रस्त व उच्च वर्गातील लोक पूर्णत: नीतिभ्रष्ट झाले होते, हे स्पष्ट आहे. - एम. एन. रॉय

(संदर्भ: इस्लामचे ऐतिहासिक योगदान, पान क्रमांक 79)

पैगंबरी मिशनचा एक उद्देश नैतिकरित्या सर्वश्रेष्ठ समाजाची निर्मिती आहे व ती करतांना अनेक समस्या समोर येतात हे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या चरित्राचे वाचन केल्याने लक्षात येते. हे काम सोपे नाही पण अशक्यही नाही. मात्र या कामाच्या करण्या आणि न करण्यावरच भारतीय मुस्लिमांचे वर्तमान आणि भविष्य दोन्ही अवलंबून आहे. याची जाणीव देशाच्या सध्या असलेल्या परिस्थितीच्या निमित्ताने आपण सर्वांनी ठेवावी. शेवटी ईश्वराकडे प्रार्थना करतो की, ’’हे अल्लाह ! आम्हा सर्वांना आपल्या देशासाठी व देशबांधवांसाठी उपयोगी बनण्यासाठी कार्य करण्याची शक्ती व समज दे.’’ (आमीन)



लातूर

जीआयआये (गर्ल्स इस्लामिक ऑर्गनायझेशन) कडून 17 एप्रिल रोजी महिला पोलीस व विद्यार्थीनींसाठी दावते इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते. विविधतेत एकता या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमात महिला पोलीस व महाविद्यालयीन विद्यार्थी, डॉ्नटर, प्राध्यापक महिलांनी उपस्थिती लावून दावते इफ्तारचा आस्वाद घेतला व इस्लामला जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 

लातूर येथील अपना बाजार अंबाजोगाई रोड येथील कॉन्फ्रन्स हॉलमध्ये रविवारी संध्याकाळी नयनरम्य वातावरणात इफ्तार पार्टीचे आयोजन संध्याकाळी 4 ते 7.30 दरम्यान करण्यात आले होते. विशेष म्हणजे 20 पेक्षा अधिक महिला पोलीसही या कार्यक्रमास उपस्थित होत्या. कार्यक्रमाला संबोधित करतांना डॉ. सिमीन शहापुरे यांनी सांगितले की, ’’रमजानच्या उपवासाचा अर्थ फक्त अन्न, पाण्याच्या त्यागाने साध्य होत नाही तर त्यासाठी शरीराच्या प्रत्येक अवयवाचा रोजा ठेवणे अपेक्षित आहे. डोळ्याने वाईट न पाहणे, तोंडाने वाईट न बोलणे, हाताने वाईट कृत्य न करणे, पायाने वाममार्गाला न जाणे हे सर्व करून त्या उपर ईश्वराची विशेष भक्ती करणे अपेक्षित आहे. यातूनच ईशपरायणता प्राप्त होते. रमजानचे महत्व दोन गोष्टीमुळे आहे. एक गोष्ट या महिन्यात कुरआनच्या अवतरणाला सुरूवात झाली आणि दूसरी या महिन्यात शब-ए-कद्र नावाची एक रात्र येते. जी की हजार महिन्यांपेक्षाही जास्त महत्वाची असते. ती रात्र रमजानच्या शेवटच्या दहा दिवसांतील विषम तारखेच्या पाच रात्रींपैकी एका रात्रीत असते. म्हणून या महिन्यात कुरआन पठणावर जास्त जोर दिला जातो. मात्र त्याला समजून वाचणे ही गरजेचे आहे. रमजानचा महिना हा भक्तीभावाने उपासणा करण्याचा महिना आहे आणि मोठ्या प्रमाणात या महिन्यामध्ये लोक फक्त उपासनाच करत नाहीत तर दानपुन्यही करतात. 

त्यांच्या भाषणानंतर प्रश्नोत्तराची संधी देण्यात आली. तेव्हा उपस्थित महिलांकडून हिजाब, तलाक, बहुपत्नीत्व व इस्लामी शिकवणीवर आधारित प्रश्न विचारण्यात आले. ज्यांची अचुक उत्तरे जमाअतच्या महिला शाखेच्या सदस्या आजरा खान यांनी व जीआयओच्या सदस्या हिफ्जा नवल तसेच डॉ. सिमीन यांनी दिले. कार्यक्रमाचे संचलन हिफ्जा नवल यांनी केले. इफ्तारपूर्वी प्रार्थनेत सुरे रहेमान प्रोजे्नटरवर दाखवण्यात आले. त्यानंतर सामुहिक इफ्तार करण्यात आला. 

या कार्यक्रमाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना पोलीस कॉन्स्टेबल श्रीमती खलंग्रे म्हणाल्या की, मी स्वतः दोन-तीन रोजे केले आहेत. डॉ. सोनाली (बीडीएस)  यावेळी म्हणाल्या की, त्यांना इथे येवून आपल्या मैत्रीनींसोबत जलपान केल्यासारखे वाटत आहे. पोलीस कॉ. प्रणिता मुसणे यांच्या 11 वर्षीय मुलीने पहिल्यांदा रोजा ठेवला होता. सोमय्या या मुलीचा जीआयओतर्फे सत्कार करण्यात आला. श्रीमती सोनाली यांनी या ठिकाणी येवून चांगली माहिती मिळाली आणि बरेच गैरसमज दूर झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. ’’इस्लाम आणि स्त्री’’ हे पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. शेवटी जीआयओ अध्यक्षा जाजीया खानम यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमात 150 मुलींनी हजेरी लावली होती. कार्यक्रमाची संकल्पना विविधतेत एकता ही होती. जी या कार्यक्रमामध्ये जीवंत झाल्यासारखी दिसली.

या कार्यक्रमास विशेष उपस्थिती कॉक्सीट महाविद्यालयाच्या प्राध्यापिकांची होती. मुस्लिमेत्तर मुलींनी जीआयओच्या मुलींना दिवाळी फराळासाठीही आताच आमंत्रन दिले. गर्ल्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ही एक विद्यार्थीनींची संघटना आहे. जी शाळां-महाविद्यालयांमध्ये मुलींमध्ये नैतिक मुल्यांची जपणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असते. 



भारतीय सैन्यदलात एकूण 14 लाखांपेक्षा जास्त सैनिक कार्यरत असून अनेकांनी कामाच्या तणावातून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललंय. देशात सैनिकांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. याशिवाय दहशतवाद आणि नक्षलग्रस्त भागात कर्तव्यावर असलेल्या लष्करी दलाच्या जवानांचे शहीद होण्याचे प्रमाणही वाढत आहे. शहीद झालेल्यांमध्ये सीआरपीएफ जवानांची संख्या सर्वाधिक आहे. 

जम्मू-काश्मीरच्या दहशतग्रस्त भागापासून ते नक्षलग्रस्त भागापर्यंत तैनात असलेल्या सीआरपीएफ जवानांपैकी 950 जवान तीन वर्षांत कर्तव्य बजावताना शहीद झाले आहेत. दुसरीकडे, सैनिकांच्या आत्महत्येची आकडेवारी पाहिली तर 2021 मध्ये 153 जवानांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी 56 जवान सीआरपीएफचे तर 42 जवान बीएसएफचे होते. नक्षलग्रस्त भागात शहीद झालेल्या जवानांची संख्या 57 टक्के आहे. सर्व दलातील जवानांना एकत्र घेतले तर 2019 मध्ये 15 राजपत्रित अधिकाऱ्यांसह 622, 2020 मध्ये 14 राजपत्रित अधिकाऱ्यांसह 691 आणि 2021 मध्ये 18 राजपत्रित अधिकाऱ्यांसह 729 जवान शहीद झाले आहेत. गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 2015 ते 2020 या 6 वर्षांमध्ये चकमकींपेक्षा बीएसएफ, सीआरपीएफ आणि एसएसबीसह केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांच्या आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. 2015-2020 दरम्यान सुमारे 680 जवानांनी आत्महत्या केल्या तर 323 जवान चकमकीत शहीद झाले. म्हणजेच शहीद होण्याच्या तुलनेत सैनिकांच्या आत्महत्येचे प्रमाण दुपटीहून अधिक होते.

कामाचे अनियमित तास, वरिष्ठांकडून मिळणारी तुच्छ वागणूक, संसाधनांची कमतरता, बदली आणि बढतींमध्ये होणारा भ्रष्टाचार, असंवेदनशील नेतृत्व, महिनोमहिने न मिळणाऱ्या रजा तसेच राहण्या-खाण्याची होत असलेली गैरसोय, धोकादायक ठिकाणच्या तासंतास चालणाऱ्या ड्यूट्या, पाठीची वाट लावणाऱ्या कठीण भूभागावर काम, एकाकीपणा, कुटुंबापासून दुरावलेपण, घरातल्या समस्यांबाबत काहीही करता न येणे आणि अक्षरशः प्रत्येक गोष्टीबाबतची अनिश्चितता यामुळे सैनिकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. अनेकवेळा सैनिकांना उच्च तंत्रज्ञानाची शस्त्रे नसल्याचा फटका सहन करावा लागतो. मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात एक छोटीशी चूक देखील भारी पडू शकते. दुर्गम भागात रोगराईही त्यांच्या मृत्यूचे कारण बनते. मागच्या 15 वर्षांपासून आपल्या सैनिकांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यात भारतीय सैन्यदल आणि सुरक्षा मंत्रालय अपयशी ठरले आहे.

लष्करात जवानांना मोबाइल फोन वापरण्यास बंदी आहे. मोबाइलमुळे जवानांचे लक्ष विचलित होते. त्यामुळे मोबाइल हातात ठेवण्यास आळा घालण्यासाठी एका प्रशिक्षण केंद्रात सैनिकांचे मोबाइल जप्त करण्यात आले होते. त्यांच्यावर दगड घालून ते फोडून टाकले होते. 

मोबाइल फोडण्यामागे जवानात शिस्त पालनांची भावना जागृत करण्याचा हेतू आहे. यावर्षीच्या एकमेव  घटनेत, 17 जुलै रोजी जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ उरी सेक्टरमध्ये एका जवानाने मेजर शिकर थापा यांच्यावर गोळीबार केला. ड्युटीवर असताना मोबाईल फोन वापरल्याबद्दल या अधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याने नाईक कैथी रतनने त्यांच्यावर एके-47 रायफलने हल्ला केला. भूदल, हवाईदल आणि नौदल यांच्यातील तणाव निवळण्यासाठी संरक्षण आस्थापनांनी सर्व तथाकथित उपाययोजना करूनही सशस्त्र दलांमधील आत्महत्या आणि गुन्हेगारी प्रकरणे थांबत नाहीत. कारण सैनिक आपल्या कुटुंबापासून दूर राहिल्यामुळे एकाकीपणाचे बळी ठरत आहेत.

या जवानांनी आत्महत्या करण्यापूर्वी फोनवर खूप वेळ संवाद साधला होता, असे 70 टक्के प्रकरणात आढळून आले, अशी माहिती  सैन्यदलात आत्महत्यांच्या प्रकरणी करण्यात आलेल्या मानसशास्त्रीय संशोधनात दिसून आले आहे. यास सायकॉलॉजीकल अ‍ॅटॉप्सी असे म्हटले जाते. यात मृत्यूपूर्वी त्या व्यक्तीचे वागणे कसे होते? याचे विश्लेषण केले जाते. लष्करात आत्महत्यांना आळा घालण्यासाठी सायकॉलॉजिकल अटॉप्सी’ करण्यात आली. सायकॉलॉजिकल अटॉप्सी हे एक मनोवैज्ञानिक पोस्टमॉर्टम आहे. शरीराऐवजी एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर तिच्या वर्तनाची बारकाईने तपासणी होते. मरण्यापूर्वी ती व्यक्ती कोणाशी, कधी-कधी, काय बोलत होती? त्याचे खाणे-पिणे आणि दिनक्रम कसा होता? तो कोणकोणांशी भेटत होता? त्यांच्याशी त्याचे वर्तन कसे होते? हे पाहिले जाते. यानुसार, आत्महत्यांच्या अनेक प्रकरणात असे आढळून आले की, जवान सुटींवरून परतल्यानंतर तो घराकडून नुकताच आलेला आहे. सैनिकांना त्यांच्या कौटुंबिक, घरगुती समस्यांशी सामना करता येत नसल्यामुळे अनेकदा प्रचंड मानसिक ताण सहन करावा लागतो, ज्यामध्ये मालमत्ता विवाद आणि सामाजिक घटकांकडून होणारा छळ ते आर्थिक आणि वैवाहिक समस्यांपर्यंत असू शकतात. तो जेंव्हा घरी जातो तेव्हा कोणातरी जवळच्या नातेवाइकांशी त्याचे कडाक्याचे भांडण झालेले आढळले. हे भांडण इतके विकोपाला गेलेले असते की, जवानांच्या मनात आत्महत्येच्या विचाराने घर केलेले असते. जम्मू आणि काश्मीर आणि ईशान्येकडील बंडखोरीविरोधी कारवायांमध्ये दीर्घकालीन तैनातीमुळे सैनिकांच्या शारीरिक सहनशक्ती आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. या सर्व कारणांमध्ये कमी वेतन, रजा नाकारणे, मूलभूत सुविधांचा अभाव, कुचकामी नेतृत्व आणि काहीवेळा अधिकाऱ्यांच्या हातून अपमानाची भावना यांचा समावेश होतो.

संरक्षण मंत्रालयाने मानसिक आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी काही मनोवैज्ञानिक समुपदेशकांची नियुक्ती करण्याव्यतिरिक्त, मोठ्या संख्येने अधिका-यांना सल्लागार म्हणून प्रशिक्षण देण्यात आले आहे. इतर उपाय देखील करण्यात आले आहेत ज्यात राहणीमान आणि कामाच्या परिस्थितीत सुधारणा, अतिरिक्त कुटुंब निवास व्यवस्था आणि उदारीकृत रजा धोरण तसेच तक्रार निवारण यंत्रणा मजबूत करणे आणि सैन्याच्या प्रत्येक युनिटमध्ये योग आणि ध्यानाचा नियमित सराव समाविष्ट आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना 25 लाख ते 45 लाख रुपयांपर्यंतची एकरकमी नुकसानभरपाई दिली जाते. भारत के वीर’ पोर्टलद्वारे 15 लाखांपर्यंतचे सार्वजनिक योगदानही दिले जाते तसेच शहीद विवाहित सैनिकांच्या पालकांना वीर कॉर्प्स ऑफ इंडियाकडून 10 लाखांची अतिरिक्त मदत दिली जाते.

आपल्या सुरक्षा रक्षकांमध्येही तणावांच्या विकारांचे प्रमाण मोठे आहे. पण ज्या देशात शारीरिकदृष्ट्या अपंग सैनिकही त्यांचे वैध अधिकार मिळावेत याकरिता व्यवस्थेशी लढत आहेत, तिथे मानसिक अपंगत्वाला मान्यता देणे आणि त्यासाठी काही उपाय करणे ही फार दूरची गोष्ट आहे. आत्महत्यांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी लष्कराने काही उपायांचा अवलंब सुरू केला आहे, जसे की अधिक रजा, अधिक चांगले अन्न आणि पायाभूत सुविधा, अधिकाऱ्यांबरोबर अधिक संवाद, समुपदेशन सत्रे, इ. त्यांचा थोडाफार उपयोगही होऊ शकतो. पण केवळ शारीरिक कष्टांमुळेच मानसिक आघात होत नाही! तसे असते तर जगातले सर्वात श्रीमंत सैन्य, अमेरिकन लष्कराने फार पूर्वीच यावर उपाययोजना केली असती. आतल्या आत चालू असलेले द्वंद्व - जे स्वतःच्या देशातल्या नागरिकांशी लढताना सर्वाधिक असते. सैनिकांच्या मनातल्या नैतिक आंदोलनांना कारणीभूत असते, आणि एक दिवस त्याचे संतुलन हरवते. जीवावर उदार होऊन देशाची रक्षा करणारा सैनिकंच मानसिकरित्या खचलेला असणं हे भारतीय सैन्यदलाच्या कारभारात सर्वकाही आलबेल नसल्याचाच पुरावा आहे. मागे एका भारतीय सैनिकानं सैन्यदलात मिळत असलेली वाईट वागणूक आणि किमान सोयी-सुविधांची असलेली वाणवा याला वाचा फोडत बनवलेला व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर लागलीच भारतीय लष्करातून त्याचं निलंबनही करण्यात आलं. भारतीय लष्कराच्या गैरकारभाराची बाहेर वाच्यता न होऊ देण्यासाठी सैनिकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या दबाव पाडला जात असल्याच्या अनेक घटना याआधीही पाहायला मिळाल्या आहेत.

- सुरेश मंत्री, 

अंबाजोगाई

 9403650722



दिवाळी हा भारतीय उपखंडात साजरा केला जाणारा सर्वात महत्वाचा सण. अगदी दिवाळी एवढेच महत्व मुस्लीम बांधव रमजानला देतात. पवित्र रमजान सुरु होण्यापूर्वी पासूनच सगळीकडे रमजानच्या आगमनाची उत्सुकता दिसून येते. 'रमजान' हिजरी कालगणनेतील नवव्या महिण्याचे नाव आहे. हिंदू संस्कृतीत जसे श्रावण महिन्याचे पवित्र व मोठे स्थान आहे अगदी तसेच रमजानला हिजरी कालगणनेत महत्व दिले गेले आहे. हिजरी कालगणना संपूर्णत: चांद्रभ्रमणावर अवलंबून आहे. म्हणून हिजरीतील महिना हा चंद्र दर्शनावर बदलत असतो. चंद्रदर्शनानेच रमजानची सुरवात होते. ‘चांद नजर आ गया...’ असं म्हणत प्रत्येकजण रमजान प्रारंभाचा आनंद व्यक्त करीत असतो.

इस्लामचे कलमा, नमाज, रोजा, हज आणि जकात हे पाच प्रमुख स्तंभ (अरकान) आहेत. कलमा हा मंत्र जपाप्रमाणे सदोदित म्हणत राहिले पाहिजे. दिवसातून पाच वेळा नमाज अदा केली पाहिजे तर वर्षातून एक महिना रमजानचे उपवास ठेवायला हवेत. ज्याची आर्थिक स्थिती चांगली आहे त्याने आयुष्यात किमान एकदा तरी हज करावा. तर जकात म्हणजे प्रत्येकाने काही ठराविक रक्कम दरवर्षी दान केली पाहिजे. असे या अरकानांचे अर्थ आहेत. 

रात्रीच्या म्हणजे इशाच्या नमाजसोबत रमजान महिन्यात जास्तीची 20 रकात नमाज अदा करावी लागते. तिला 'तरावीह' असे म्हणतात. या नमाजमध्ये इमाम साहेब कुराणाच्या ओवींचे सलग पठण करतात. अशा प्रकारे प्रत्येक मुस्लिमाच्या कानावर वर्षातून किमान एकवेळ तरी कुराणाचा पवित्र संदेश पडत अ‍सतो. प्रत्येक मशिदीमध्ये तरावीहच्या नमाजची विशेष व्यवस्था केली जाते. काही ठिकाणी लोकांची गर्दी पाहता दोन पाळीत 'ही' नमाज अदा केली जाते.  

‘रोजा’ हा रमजानचा आत्मा होय. रोजा म्हणजे उपवास असा ठळक अर्थ काढल्या जातो. पण उपवास एवढा मर्यादित अर्थ रोज्यांचा नाही. जो कोणी रोजा म्हणजे फक्त उपवास असा मोघम अर्थ घेऊन रोजा ठेवत असेल त्याला अल्लाह फक्त ‘फाका’ (उपाशी राहणे) मानेल. रोजा ही एक जीवन पध्दती आहे. ती जीवन जगण्याची आचारसंहिता आहे. रमजान एक प्रशिक्षण आहे. जगावे कसे? वागावे कसे? सामाजिक, धार्मिक, आर्थिक जीवन कसे असावे? याचा घालून दिलेला वस्तूपाठ म्हणजे रमजान. माणूस जीवन जगत असतांना बराच वेळा बिनधास्त होवून जगत असतो. या बिनधास्त जगण्याला वेसण घालणे म्हणजे रमजान होय. देशाचा सैनिक जसा अतिशय कठिण प्रशिक्षणातून स्वत:ला सिध्द करित असतो अगदी तसेच इस्लामचे आचरण करणारा प्रत्येक व्यक्ती या वार्षिक प्रशिक्षणातून तावून सुखावून निघावा आणि एक चांगला माणूस म्हणून त्याने जीवन जगावे अशी या मागे धारणा आहे.

यावर्षीचे रोजे हे परिक्षा पाहणारेच आहेत. सर्वाधिक काळ अन्न व पाण्याविना यावेळी रोजेदारांना राहावे लागले. दरवेळी 13 ते 14 तास उपवासाचा काळ असतो. यावर्षी तब्बल चौदा  तास उपवास चालला. यंदाचा रमाजान एप्रिल महिन्यात आला आहे. पुढील वर्षीही रमजान मार्च आणि एप्रिल महिन्यात असेल. दरवर्षी रमजान गेल्या वर्षीच्या 10 दिवस आधी येतो. अशा प्रकारे 10 दिवसाने रमजान मास दरवर्षी पुढे सरकतो. त्यामुळे कुण्या एका विशिष्ट ऋतू पुरता मर्यादित न राहता रमजान वर्षाच्या प्रत्येक महिन्यात, प्रत्येक ऋतूत अनुभवता येतो. जसा तो सध्या उन्हाळ्यात येतो आहे तसा तो पुढे काही वर्षांनी थंडीत सुध्दा असेल आणि त्याहीपुढे काही वर्षांनी तो पावसाळ्यात पण येईल. 35 ते 40 वर्षांनी रमजानचे एक चक्र पूर्ण होते. प्रत्येक महिन्यात आणि प्रत्येक ऋतूत रमजानचे असे फिरणे हे त्याचे 'अद्वितीय' असे वैशिष्ट्य होय.

रमजान मधील सर्वात महत्वाची आणि खऱ्या अर्थाने माणसाला माणूसपण शिकविणारी गोष्ट म्हणजे जकात होय. जकात म्हणजे ‘टॅक्स’. तुम्हाला समाजात जगत असतांना समाजातील बऱ्या, वाईट प्रत्येक गोष्टीची जबाबदारी तुम्हाला घ्यावीच लागेल अशी शिकवण रमजान देतो. समाजातील प्रत्येक लहानमोठा घटक समाजासाठी महत्वाचा असून समाजातील लहानांचा सांभाळ करण्याची जबाबदारी समाजातील मोठ्यांची असते असा स्पष्ट उल्लेख कुराणात आहे. येथे लहान, मोठे हे शब्द आर्थिक स्थिती दर्शविणारे आहेत. म्हणजेच समाजातील गरीबांचा सांभाळ करण्याची संपूर्ण जबाबदारी अल्लाहने श्रीमंतांवर टाकली आहे. इस्लामच्या प्रत्येक अनुयायाने आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या 2.5 टक्के जकात काढण्याचे कुराण सांगतो. आपल्या आवश्यक गरजा पूर्ण करुन शिल्लक असलेल्या सोने, चांदी, रुपये वा इतर मालमत्तेवर अडीच टक्के जकात लावली जाते. ही जकात कपडे, अन्नधान्य, रुपये वा खाण्यापिण्याच्या वस्तू या रुपात वाटता येते. किंबहुना ती वाटावीच लागते. आपल्यापेक्षा गरीब नातेवाईक, शेजारी वा गरजवंताला अशी जकात वाटप केली जाते. जकात ज्याला दिली जाते त्याचा धर्म, लिंग, जात असा कोणताही भेद न मानता गरजवंताला ती दिली जाते. 

अशा प्रकारे सामाजिक सौहार्द निर्माण करण्याचे कार्य पवित्र रमजान करीत असतो. रमजान ईदने या पवित्र पर्वाचा शेवट होतो. हा गोड शेवटच परत पुढील रमजानसाठी लोकांना तयार करीत असतो.

- आमीन चौहान

दिग्रस जि. यवतमाळ, 

मो. 9423409606



राजर्षी शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृती शताब्दी निमित्ताने शासन आणि लोकांच्या वतीने लोकराजा शाहू कृतज्ञता पर्व १८ एप्रिल ते २२ मे २०२२ या कालावधीत विविध उपक्रम आयोजित करून राजर्षी शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृती शताब्दी ६ मे २०२२ रोजी लोकराजाला कोल्हापूरच्या जनतेकडून आदरांजली वाहण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने....

कोल्हापूर जिल्ह्यात आज दिसत असलेल्या ‘हरितक्रांती’चे खरे प्रणेते राजर्षी शाहू महाराज होत. शिवाय महाराष्ट्र राज्यात सहकार चळवळीने जी आर्थिक व सामाजिक प्रगती साधली आहे; तसेच इथल्या सामान्यजणांचे जीवनमान उंचावण्याचे जे अदद्भुत कार्य घडले आहे, त्याचे सर्वस्वी श्रेय सुद्धा राजर्षी शाहू महाराजांकडेच जाते. राजर्षींच्या कारकीर्दीतच कोल्हापूर इलाख्यात सन 1912 साली ‘सहकार विषयक कायदा’पारित करण्यात आला. आज सर्वसामान्यांची आर्थिक गंगोत्री म्हणून नावारूपाला आलेली ‘दि कोल्हापूर अर्बन को-ऑप बँक’ आणि काही वर्षांपूर्वी अपना सहकारी बँक या राज्य पातळीवर अग्रेसर असलेल्या सहकारी बँकेत विलीनीकरण झालेली ‘श्री बलभीम को-ऑप बँक’ या सहकारी बँका त्यांच्याच कारकीर्दीत स्थापन झाल्या होत्या. या बँका स्थापन करण्यामागे राजर्षींचे सहकार व आर्थिक चळवळींचे दूरदृष्टीने अंमलात आणलेले कृतीशील विचारच कारणीभूत होते. 1920-21 साली कोल्हापूर संस्थानात एक-दोन नव्हे, तर तब्बल 37 सहकारी सोसायट्या अस्तित्वात होत्या. यावरूनच राजर्षींचे आर्थिक धोरण व त्यासाठीचे कृतिशील प्रोत्साहन प्रकर्षाने लक्षात येते. यासंदर्भात राजर्षींच्या भाषणातून व्यक्त झालेले विचार मोठे बोलके आहेत. ते एका भाषणात म्हणतात, “पुष्कळ लोकांनी आपली कुशलता, अक्कल, पैसा व अंग मेहनत एकत्र केली पाहिजे. पूर्वी फार तर एक कुटुंब एका ठिकाणी काम करीत व येणारा नफा त्या कुटुंबातील माणसांना उपयोगी पडे, आता ही आपली कुटुंबाची व्याख्या पुष्कळ विस्तृत केली पाहिजे. 10/ 20/25 कुटुंबे उद्योगधंद्यासाठी एक झाली पाहिजेत. आपण सहकार्य करायला शिका. आपली सहकारी पतपेढी काढा, इतकेच नव्हे तर सहकारी कारखाने, सहकारी दुकानेही काढा...”

कोल्हापूर जिल्ह्याच्याच नव्हे, तर महाराष्ट्र राज्याच्या आजच्या आर्थिक विकासाला व प्रगतीला कारणीभूत असलेली सहकाराची गंगोत्री राज्यभरात दूथडी  भरून वाहत आहे, यांचा वेध घेतला तर राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याच्या व विचारांच्या मुळाशी जावे लागते. आपले संस्थान लहान आहे, लोकसंख्या कमी आहे, व्यापार उदीम अल्प प्रमाणात आहे. रयतेला व्यापारी किंवा कारखानदारी विषयक दृष्टिकोन नाही, प्रजा अशिक्षित आहे, तशीच ती चाकोरीप्रधान आहे इ.सर्व गोष्टी राजर्षींना जाणवत होत्या. त्यामुळे या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी ते रात्रंदिवस विचार करीत. तत्कालीन ब्रिटीश सरकारच्या काळातही कात, कॉफी यासारख्या आधुनिक शेतीमधील नवनवीन प्रयोगाला चालना देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विशेषत: नगदी पिके घेण्यासाठी तसेच परंपरागत, शेती मशागतीच्या पद्धतीमध्ये बदल करण्यासाठीही प्रयत्न केला. श्री. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी लोखंडी नांगर तयार करण्याचा कारखाना सुरू केला, मात्र कच्चे-पक्के लोखंड त्यांना मिळत नाही, ही त्यांची अडचण राजर्षीच्या कानावर गेली. त्यांनी ही अडचण लक्षात घेऊन तत्काळ आपल्या संस्थानातील जुन्या ऐतिहासिक तोफा श्री. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांना दिल्या. केवळ उद्योग-व्यवसायाला चालना व प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेतूनच त्यांनी उदार मनाने हा क्रांतिकारी निर्णय घेतला. पुढे श्री. किर्लोस्करांचा कारखाना भरभराटीस आला. किर्लोस्करांचे संपूर्ण घराणे उद्योगपती म्हणून नावारूपास आले. खेडूत तसेच परंपरागत कापड विणणारे देवांग कोष्टी समाजातील विणकर लोक भविष्यकाळात यंत्रयुगातील यंत्रोत्पादित मालासमोर टिकाव धरू शकणार नाहीत व कापडाच्या वाढत्या मागणीची सक्षम पूर्तता करू शकणार नाहीत, हे राजर्षींच्या दूरदृष्टीने हेरले व कोल्हापूर तसेच शिरोळ येथे कापडाच्या गिरण्या सुरू करण्याचा प्रयत्न  त्यांनी केला, पण केवळ गिरण्या उभा करून चालणार नाही, त्यासाठी कुशल तंत्रज्ञ व कारागीर यांची निर्मिती करण्याचे धोरण त्यांनी अंगिकारले.त्यासाठी प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्यासाठी प्रोत्साहित केले. पुढे या भागात सहकारी तत्त्वावर सूतगिरण्या सुरू झाल्या. अर्थात या सूतगिरण्यांच्या निर्मितीमागे राजर्षी शाहू महाराजांची दूरदृष्टी आणि विचारच कारणीभूत असल्याचे यामधून दिसून येते. त्यांनी कोल्हापुरात टेक्निकल स्कूलची निर्मिती केली. तसेच या अनुषंगाने छोटे-मोठे उद्योग सुरू व्हावेत यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. एक दोघे जण एकत्र येऊन काम करण्यापेक्षा पंचवीस पन्नास जण एकत्र येऊन सहकारी तत्त्वावर उद्योग व्यवसाय सुरू केल्यास व्यक्तिगत व सामाजिक प्रगती झपाट्याने होईल याची राजर्षी शाहू छत्रपती यांना जाणिव झाली होती, त्यामुळेच त्यांनी सहकारी चळवळीला बळ देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.

कोल्हापूर इलाख्यात इतर अन्नधान्याबरोबरच ऊस मोठ्या प्रमाणात लावला जातो व उसापासून गूळ तयार केला जातो. या गुळाला व्यापक बाजारपेठ आहे हे लक्षात आल्यावर राजर्षींनी गूळ उत्पादनावर भर दिला. गुळाची बाजारपेठ निर्माण केली. मात्र एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर उसाचे घाणे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले, त्या वेळी उसाच्या घाण्यात शेतकर्‍यांची बोटे चिरडतात, हे पाहून ते व्यथित झाले. तेव्हा तत्काळ घाण्यात हात सापडणार नाही आणि सापडलाच तर फार मोठी इजा होणार नाही अशा तर्‍हेचा निर्धोक घाणा तयार करण्यासाठी संस्थानात गॅझेट प्रसिद्ध करविले. माजी एरिगेशन इंजीनिअर मे.शानन यांनी राजर्षीना हवा तसा निर्धोक उसाचा घाणा बनविला. त्याला राजर्षींनी मान्यता दिली तसेच संस्थानातून मोठी बिदागी दिली. सदर घाण्याचा एकेक नमुना शेतकर्‍यांना तसेच फडकर्‍यांना पाहण्यास मिळावा म्हणून सर्व पेठांच्या मामलेदार व मालकरी यांच्याकडे पाठविण्यात आला. तसेच अशा प्रकारच्या घाण्याचा किती लोकांची प्रत्यक्ष उपयोग केला व किती लोकांनी केला नाही यासंबंधीची माहितीही वर्ष अखेरीस मागविली. ऊस शेतीसाठी सहकारी तत्त्वावर प्रयोग करून एकमेकां साहाय्य करू अवघे धरू सुपंथ हा मंत्र संस्थानात रुजविण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी प्रयत्न केल्याचे दिसून येते. 

कोल्हापूरच्या व्यापारपेठेचे ते जनक होत. 1895 साली त्यांनी शाहूपुरी येथे व्यापारी पेठ स्थापन केली. या पेठेत व्यापार पेढ्या काढणार्‍या व्यापार्‍यांना मोठमोठ्या आकाराचे प्लॉटस् विनामूल्य दिले. करात सवलती दिल्या. शिक्षण, कार्यालये आदींना आवश्यक असणारी शाईसारखी गोष्ट जर आपल्या संस्थानात तयार होत असेल तर त्याला उत्तेजन देण्यासाठी राजर्षींनी खास आदेश काढले होते. वाडी रत्नागिरी येथील जोतिबा डोंगर माथ्यावरील ‘दवणा’ या वनस्पतीपासून अत्तर तयार करण्याचा कारखाना उभा करण्याचाही राजर्षींचा मानस होता. हरी परसू मांग यास सरसाचा कारखाना काढण्यासाठी लागणारे सर्व साहित्य संस्थानातून खरेदी करून देण्याची व्यवस्था स्वत: राजर्षींनी केली. अर्थात, किरकोळ वाटणार्‍या पण उपयुक्त अशा वस्तूंचे उत्पादन करणारा जो कोणी पुढे येईल त्या त्या सर्वांना राजर्षींनी प्रोत्साहन दिले. त्यामध्ये कारागीर होते, कलावंत, मूर्तिकार, चर्मकार, टायपिस्ट, यंत्रे निर्मिती करणारे आदी लहान-मोठ्या उद्योगांना त्यांनी आपल्या संस्थानातून आर्थिक सहाय्य केले. राजर्षांच्या आर्थिक धोरणांचे व व्यवहाराचे प्रतिबिंब स्पष्टपणे त्यांच्या कार्यात दिसून येते. वास्तविक उद्योगधंदे काढणे व चालविणे हे राजाचे काम नाही अशा विचारांचा प्रभाव असलेला तो काळ होता, उद्योग, व्यवसाय, धंदे, व्यापार आदी आर्थिक व्यवहार वाढविण्याचे काम शासनाचे नाही असे तत्कालीन परिस्थितीत मानले जाई. ब्रिटिश सरकारचे धोरणसुद्धा यापेक्षा वेगळे नव्हते. भारताची औद्योगिक प्रगती व्हावी असे ब्रिटीशांना वाटत नव्हते, अशा काळात राजर्षीचे आर्थिक संपन्नतेविषयीचे विचार आणि सहकारांविषयीची तळमळ वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या भाषणातील उतारे त्यांचे आर्थिक धोरण स्पष्ट व अधोरेखित करतात. ते म्हणतात... “आर्थिक संपन्नता औद्योगिकीकरणावर अवलंबून आहे. लोकांनी मात्र एकत्र येऊन सहकारी कारखाने, सहकारी संस्था व सहकारी बाजारपेठांची व्यवस्था राबविली पाहिजे. कोल्हापूर संस्थान त्याकरिता सर्व प्रकारची मदत देण्यास तयार आहे'."

      या भाषणातील राजर्षी शाहू महाराजांनी दिलेला ‘सहकार’ या शब्दावरील भर अतिशय महत्वाचा आहे. याहूनही संस्थान सर्व प्रकारची मदत देण्यास तयार असल्याचा त्यांचा अंतरीचा उमाळा अत्यंत महत्त्वाचा आहे. आपले पिताश्री श्री. जयसिंगराव यांच्या स्मरणार्थ त्यांनी ‘जयसिंगपूर’ ही नवी वसाहत सुरू केली. निपाणी-शिरोळ, सांगली-मिरज-कुरुंदवाड- इचलकरंजी या विभागाचा जयसिंगपूर हा केंद्रबिंदू व्हावा, व्यापार-उद्योगाचे ते प्रमुख ठिकाण व्हावे अशी त्यांची इच्छा होती. एका दृष्टीने ब्रिटिश मुलूख व विविध संस्थाने यांना जोडणारा दुवा म्हणजे ‘जयसिंगपूर’ व्हावे, या नव्या वसाहतीला सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, दळणवळणाची साधने व सोयी उपलब्ध व्हाव्यात, वसाहतीची रचना आदर्श असावी अशी संकल्पना त्यांनी अत्यंत दूरदृष्टीने मांडली व ती वास्तवात साकारली. यासंबंधी काढलेल्या हुकूमनाम्यामध्ये राजर्षी शाहू महाराज स्पष्ट करतात की, ‘जयसिंगपूर वसाहतीमध्ये व्यापार, धंदा लवकरच वाढून वसाहतींची भरभराट होऊन लोकांच्या गैरसोयी दूर व्हाव्यात अशी फार इच्छा आहे. वसाहतीसंबंधी प्रत्येक बाबींबद्दल हकीकत घेऊन पुढील तजवीज ठेवीत जावे...!’ राजर्षींच्या या उदार आर्थिक धोरणासंबंधीच्या कृती-कल्पना आणि प्रत्यक्ष हुकूमनाम्यावरुन त्यांचे समाजोपयोगी विधायक अर्थकारण स्पष्ट होण्यास साहाय्यभूत होते. आज कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी संस्थांचा वाढलेल्या पसारा व या सहकारी संस्थांमुळे सर्वसामान्य शेतकरी तसेच कामगार वर्गाचे उंचावलेले राहणीमान पाहिले की, राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचे निश्चितच कौतुक करावेसे वाटते.

- सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२

(लेखक भारतसरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने व आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून ‘करवीर काशी’चे संपादक आहेत.)



प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले की माणसाच्या इस्लामची खुबी ही आहे की ज्या गोष्टीशी त्याचा काही संबंध नसेल ते सोडून द्यावे. (ह. अबू हुरैरा, तिर्मिजी)

अबू मुहम्मद यांच्या वक्तव्यानुसार, प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, या चांगल्या नैतिकतेची मदार चार निकषांवर आहे.

१) अल्लाह आणि परलोकावर ज्याची श्रद्धा असेल त्याने भल्या गोष्टी सांगाव्या किंवा गप्प राहवे.

२) माणसाच्या इस्लामची खुबी ही आहे की त्याने निरर्थक गोष्टी सोडून द्याव्यात.

३) रागावू नये.

४) एका श्रद्धावंतानं आपल्या भावासाठीही त्याचीच निवड करावी जशी त्याची स्वतःची आवड असेल.

ह. अब्दुल्लाह इब्ने मसऊद म्हणतात, एक व्यक्ती प्रेषित (स.) यांच्याकडे आली आणि विचारलं, माझ्या समूहाचे लोक मला मान देतात. मी सांगितलेलं ऐकतात. मला सांगा, की त्यांना काय मार्गदर्शन करू?

प्रेषित मुहम्मद (स.) यांनी त्यास सांगितले की, त्यांना सांगा, एकमेकांना सलाम करत राहावे. ज्या गोष्टींचा संबंध तुमच्याशी असेल त्याव्यतिरिक्त कमीतकमी बोलावे.

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, ह. इब्राहीम (अ.) यांच्या ग्रंथामध्ये असे आढळते की एका समंजस माणसावर हे अनिवार्य आहे की त्याने आपली बुद्धिमत्ता दुसऱ्या कुणाच्या अधीन करू नये. दिवसातून एक घटिका आपल्या विधात्याची प्रार्थना करावी. एक घटिका स्वतःच्या मनःस्थितीची तपासणी करावी. एक घटिका अल्लाहने जी सृष्टी निर्माण केली आहे त्यावर विचारविनिमय करावा. आणि एक घटिका आपल्या उपजीविका – खाण्यापिण्यासाठी कार्य करावे. एक समंजस माणसाने केवळ तीन बाबींसाठी प्रयत्नशील राहावे. परलोकाच्या तयारीसाठी, आपल्या ऐहिक गरजांच्या पूर्ततेसाठी आणि अशा आरामदायी जीवनाची पूर्तता करत राहावे जे निषिद्ध नाहीत. एका समंजस मानसावर हेदेखील अनिवार्य आहे की त्याने आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांवर विचार करावा. आपल्या कार्यावर लक्ष द्यावे. आपल्या जिभेचे रक्षण करावे. बोलताना मोजून मापून बोलावे.

प्रेषित (स.) म्हणतात की, श्रद्धावंत लोक आपसात एकमेकांशी स्नेह, सहानुभूती आणि दयेच्या संबंधात एका शरीराप्रमाणे आहेत. जर एखादा अवयव आजारी पडतो तेव्हा त्याच्या वेदना साऱ्या शरीराला जाणवतात.

जे लोक या जगात अहंकार आणि अनाचार माजवत नाहीत त्यांच्याविषयी अल्लाह म्हणतो की, परलोकाचे ठिकाण आम्ही अशा लोकांसाठी राखून ठेवले आहे जे धरतीवर आपलं श्रेष्ठत्व प्रस्थापित करू इच्छित नाहीत आणि जे अनाचार माजवत नाहीत. चांगला परिणाम केवळ सदाचारी लोकांसाठी असेल. (पवित्र कुरआन, अल कसस-४३) (गंजीन-ए-हिकमत)

संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद


 


(९०) पाहा, आपल्या पालनकर्त्याची क्षमा मागा आणि त्याच्याकडे परतून या, नि:संशय माझा पालनकर्ता फार दयाळू आहे आणि स्वनिर्मित सजीवांवर प्रेम करणारा आहे.’’
१०१

(९१) त्यांनी उत्तर दिले, ‘‘हे शुऐब (अ.)! तुझ्या पुष्कळशा गोष्टी तर आम्हाला कळतच नाहीत१०२ आणि आम्ही पाहतो की तू आमच्या दरम्यान एक दुर्बल मनुष्य आहेस, तुझी जातबिरादरी नसती तर आम्ही तुला केव्हाच दगडांनी ठेचून मारले असते. तुझे सामर्थ्य तर इतके नाही की तू आम्हाला जड जावास.’’१०३

(९२) शुऐब (अ.) ने सांगितले, ‘‘बंधुनो! माझे कुटुंब तुमच्यावर अल्लाहपेक्षा वरचढ आहे काय की तुम्ही (कुटुंबाची भीती बाळगता आणि) अल्लाहला पूर्णपणे पाठीमागे टाकता? समजून असा की जे काही तुम्ही करीत आहात ते अल्लाहच्या पकडीच्या बाहेर नाही.

(९३) हे माझ्या समाजातील लोकांनो! तुम्ही आपल्या पद्धतीने कार्य करीत राहा. आणि मी माझ्या पद्धतीने करीत राहीन, लवकरच तुम्हाला कळून चुकेल की कुणावर अपमानजनक प्रकोप ओढवतो आणि कोण खोटा आहे. तुम्हीही प्रतीक्षा करा आणि मीदेखील तुमच्याबरोबर वाट पाहात आहे.’’



१०१) म्हणजे अल्लाह निर्मम आणि पाषाणहृदयी नाही. त्याला आपल्या निर्माण केलेल्या निमिर्तीशी काही एक शत्रुत्व नाही. त्याला वाटेल तशी शिक्षा देत राहावी आणि दासांना मारून मारूनच तो प्रसन्न होतो असे मुळीच नाही. तुम्ही आपल्या उदंडतेत जेव्हा सीमा पार करता आणि बिघाड करतच जाता, तेव्हाच अल्लाह तुम्हाला शिक्षा देतो. अन्यथा त्याची स्थिती अशी आहे की तुम्ही कितीही अपराध करा परंतु जेव्हा आपल्या कर्मांवर लज्जित होऊन त्याच्याकडे परटून याल तेव्हा त्याच्या कृपेचा वर्षाव तुमच्यासाठी असेल. कारण अल्लाह आपल्या निमिर्तींशी असीम प्रेम करतो. या विषयाला पैगंबर मुहम्मद (स.) यांनी  दोन सुंदर उदाहरणाने स्पष्ट केली आहेत. एक उदाहरण म्हणजे तुमच्यापैकी एखाद्याचा उंट वाळवंटात हरवला आणि त्याच्या खाण्यापिण्याचे सामान त्याच उंटावर आहे आणि तो उंटाला शोधता शोधता थकून गेला आहे. जीवनापासून निराश होऊन तो एका झाडाच्या सावलीत पडला होता तेवढ्यात अचानक तो उंट त्याच्यासमोर येतो. त्या वेळी त्याला जो अत्यानंद होतो त्यापेक्षा अनेक पटीने खुशी अल्लाहला होते जेव्हा एखादा भटकलेला दास परतून त्याच्याकडे येतो. दुसरे उदाहरण यापेक्षाही अधिक प्रभावकारी आहे. माननीय उमर (रजि.) सांगतात की एकदा पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या सेवेत काही युद्धकैदींना पकडून आणण्यात आले. त्यांच्यापैकी एक स्त्री होती जिचा दूधपिता लहान बालक सापडत नव्हता. ती आपल्या ममतेने इतकी व्याकुळ झाली की एखादे बालक दिसले की त्याला आपल्या छातीशी लावून दूध पाजू लागते. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी त्या स्त्रीची दशा पाहून आम्हाला विचारले, "काय तुम्ही आशा करू शकता की ही आई आपल्या बाळाला स्वत:च्या हाताने अग्नीत फेकून देईल? आम्ही सांगितले, "कदापि नाही, स्वत: फेकून देणे तर लांबचे पण बाळ रडत असेल तर त्याला आपला जीव धोक्यात घालून वाचवेल." पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, "अल्लाहची दया आपल्या दासांवर याहून अनेक पटीने अधिक आहे जी दया ही आई आपल्या बालकासाठी ठेवते."

विचार केल्याने हे स्पष्ट होते की तो अल्लाहच आहे ज्याने मुलांच्या पालनपोषणासाठी आईवडिलांच्या मनात प्रेम उत्पन्न केले आहे. अल्लाहने त्या प्रेमाला निर्माण केले नसते तर आई आणि वडिलापेक्षा मुलाचा जास्त कट्टर शत्रू दुसरा कोणी नसता. कारण हेच सर्वात जास्त कष्टदायक त्यांच्यासाठी आहेत. आता कोणालाही कळेल की जो अल्लाह आईची ममता आणि वडिलांचे प्रेम निर्माण करणारा आहे, त्याच्यात आपल्या दासांसाठी किती असीम प्रेम असेल.

१०२) हे कळत नव्हते कारण आदरणीय शुऐब (अ.) यांची वेगळी भाषा होती. वार्तालाप सरळ आणि सोपाच होता आणि त्याच बोली भाषेत होता. परंतु लोकांची मनं इतकी वक्र झाली होती की ते शुऐब (अ.) यांची सरळ व सोपी भाषासुद्धा समजू शकत नव्हते. जे लोक पक्षपात आणि मनोकामनाच्या दासतेत कट्टरपणे ग्रस्त होतात आणि विशेष धारणेवर परिपक्व होतात, ते असे आपल्या मनाविरुद्धचे काहीच ऐकू शकत नाहीत. ऐकले तरी त्यांना कळत नाही की ही कोणत्या जगाची गोष्ट बोलली जात आहे.

१०३) हे नजरेसमोर ठेवा की हीच परिस्थिती या आयती अवतरण होताना मक्का शहरात होती. त्या वेळी  कुरैशचे लोक याचप्रकारे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या रक्ताचे तहानलेले झाले होते. पैगंबर मुहम्मद (स.) यांचे जीवन संपवून टाकावे हे त्यांचे ध्येय होते. परंतु पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर हात टाकण्यास ते भीत होते कारण बनू हाशिम हे त्यांचे सहाय्यक होते. शुऐब (अ.) आणि त्यांच्या राष्ट्राची ही घटना कुरैश आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याविषयी जोडून सांगितली जात आहे. पुढे पैगंबर शुऐब (अ.) यांचे बोधप्रद उत्तर नक्कल केले गेले आहे. त्याचा अर्थ होतो, "हे कुरैशच्या लोकांनो! तुम्हालासुद्धा पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडून हेच उत्तर आहे."


नागपूर 

वर्तमानातील भारतीय वातावरण हे अतिशय हिंसक असून, जगाला हिंसेने ग्रासले आहे. युक्रेन मरतोय, माणसे मारली जात आहेत, रक्त सांडले जात आहे. हे साहित्यिकांना अपेक्षित नसल्याचे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व प्रसिद्ध साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रविवारी केले. याचवेळी, राज्यातील भोंगेसदृश्य परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलं. तर, बाबासाहेब पुरंदरे आणि शिवाजी महाराज यांवरही मत मांडलं. 

सध्या भोंग्यांचे राजकारण तापत आहे. मात्र, साहित्यिकांनी हे लक्षात ठेवावे की राजकारण्यांचा भोंगा सत्तेचा असेल तर साहित्याचा भोंगा हा सत्याचाच असला पाहिजे. जगात बायडेन, पुतीन, जेलेन्स्की यांचे वेगवेगळे गट आहेत. मात्र, शेक्सपिअर, ज्ञानेश्वर, तुकाराम हे कोणत्याही गटाचे नाहीत, ते साऱ्या जगाचे नायक आहेत, असे सबनीस यांनी म्हटले. दरम्यान, एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी शिवाजी महाराज आणि ब्राह्मण व ब्राह्मणेत्तर वादावरही स्पष्ट भूमिका मांडली.  राजकारणात भ्रष्टाचार आहे, पण त्याहीपेक्षा महाराजांना जातीत बांधू पाहणाऱ्या या विद्वानांची विद्वत्ता भ्रष्ट झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे स्वराज्य जाती-धर्मापलीकडचे होते. शिवाजी महाराजांच्या इतिहासावरुन सुरु असलेला वाद आणि त्यांच्या ''छत्रपती शिवराय : ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर वाद आणि विवेकवादी भूमिका'' या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. ब्राह्मण आणि ब्राह्मणेत्तरांमधील जातीयवादी विद्वानांच्या कैदेतून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका व्हावी, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.  

छत्रपती शिवाजी महाराजांना जातीत विभागणाऱ्या ब्राह्मण, ब्राह्मणेत्तर व दलित इतिहासकारांचा त्यांनी समाचार घेतला. छत्रपती शिवरायांबद्दल विकृत इतिहास लिहिण्याचा प्रघात निंदनीय असून त्या सर्वांचा इतिहास विवेकवादाने खोडला आहे. “ब्राह्मणांमधील काही विद्वानांनी समर्थ रामदास व दादोजी कोंडदेव यांना महाराजांच्या गुरुपदी लादले. तर महाराजांचे शत्रू मुसलमान असल्याचा भास निर्माण करताना अफजलखानाच्या वधाचे उदाहरण दिले, पण अफजलखानाचा वध महाराजांनी स्वराज्याचे शत्रु म्हणून केला, हे या विद्वानांना ठाऊक नाही,” असेही यावेळी त्यांनी म्हटले.

“ब्राह्मणेत्तर विद्वानांनी महाराजांचे शत्रू ब्राह्मण असल्याचा भास निर्माण करताना कृष्णाजी कुलकर्णी यांना महाराजांनी ठार केल्याचे उदाहरण दिले, पण कृष्णाजी कुलकर्णी यांनाही स्वराज्याचे शत्रू म्हणून महाराजांनीच मारले हे ब्राह्मणेत्तर विद्वानांना ठाऊक नाही का?,” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “महाराज हे हिंदुत्त्ववादी म्हणवण्याचा जसा घाट घातला जात आहे, तसंच फुले, शाहू, आंबेडकरवादी असल्याचे सांगून त्यांची विभागणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून महाराजांच्या कर्तृत्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न ब्राह्मण, ब्राह्मणेत्तर व दलित समाजातील काही विद्वानांकडून केला जात आहे. या जातीयवादी विद्वानांच्या कैदेतून महाराजांची सुटका व्हावी,” असे सबनीस यांनी म्हटले.


पुणे 

सोमवार, 18 एप्रिल 2022 रोजी सेंट पॅट्रिक कॅथेड्रल येथील पुण्याच्या बिशपच्या घराचे दरवाजे उघडले आणि मुस्लिमांसाठी इफ्तार (उपवास सोडणे) आयोजित करण्यात आला. या मंत्रमुग्ध करणाऱ्या कार्यक्रमाला मुस्लिम तसेच ख्रिश्चनांसह 200 हून अधिक लोक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शांतता आणि सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट विविध समुदायातील लोकांनी ठेवले होते. जमात-ए-इस्लामी हिंद कॅम्प युनिट- पुणेचे अध्यक्ष करीमुद्दीन शेख म्हणाले, "हा एक सुंदर अनुभव होता. सेंट पॅट्रिक्स कॅथेड्रलमध्ये आमच्या वेगवेगळ्या धर्मांच्या बंधुभगिनींसोबत इफ्तार होतं. आम्ही रमजानचा पवित्र महिना आणि मुस्लिमांसाठी उपवासाचे महत्त्व यावर एक संक्षिप्त व्याख्यानही आयोजित केले होते. या वेळी धर्मांमधील काही समविचारांचादेखील उल्लेख करण्यात आला, ज्यास खूप चांगला प्रतिसाद मिळाला."

आर. रेव्ह. बिशप थॉमस डाबरे म्हणाले, 'पुणे शहरातील मदर चर्चमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्याची ही दुसरी वेळ आहे. शांतता आणि सलोखा राखण्यासाठी आणि इतर समुदायांच्या लोकांशी संबंध दृढ करण्यासाठी आंतरधर्मीय संवादांबद्दल मी नेहमीच बोललो आहे, जे  शांततेत एकत्र राहण्यासाठी खूप महत्वाचे आहे."

आयएनसी नेते माननीय साहिल केदारी हे देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. अशा शांतताप्रबोधन करणाऱ्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचा आनंद उपस्थितांनी व्यक्त केला. चर्चच्या कर्मचाऱ्यांनी  मुस्लिम उपस्थितांना नमाज पठण (प्रार्थना) करण्याची व्यवस्था केली तेव्हा या कार्यक्रमामुळे बंधुत्वाची हृदयस्पर्शी प्रतिमा तयार झाली.



नुकतेच प्रशासनातील दिग्गज ब्यूरोक्रेसींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. हे जरी तथ्य असले तरी या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चिंता ही आहे की जर जनतेला मोफत ५ किलो अन्नधान्याचे वाटप चालू राहिले, त्याचबरोबर इतर योजनांद्वारे त्यांना वीज बिलात कपात, मोफत पाणीपुरवठा आणि शेतकऱ्यांना काही हजार रुपये देण्याचे व अशाच प्रकारचे इतर कार्यक्रम देशाच्या विभिन्न राज्यांचे सरकार व केंद्र सरकार यांनी चालूच ठेवले तर देशाची आर्थिक स्थिती कोलमडल्याशिवाय राहणार नाही. लवकरच जशी परिस्थिती श्रीलंकेची झाली तशीच परिस्थिती भारताचीही होईल अशी चिंताही वेळोवेळी बऱ्याच बाजूंनी व्यक्त केली जात आहे. वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनी एकप्रकारे याचीच पुष्टी केलेली दिसते. सामान्य जनतेला दिल्या जाणाऱ्या सवलतींना फ्रीबीज असे म्हणण्याची प्रथा आहे. म्हणजे कोणताही अधिकार नसताना कसलीच परतफेडीची जबाबदारी नसताना सामान्य जनतेला दिली जाणारी मदत ‘मोफत’ आहे, अशी यामागची मानसिकता आहे. दुसरीकडे ज्या मोठ्या उद्योगपतींची कोट्यवधींची कर्जे माफ केली जातात याविषयी कोणत्याही संस्थेने शासनव्यवस्थेकडे चिंता व्यक्त केलेली नाही. लाखो कोटींचे कर्ज बँकांचे या उद्योगपतींनी घेतलेले असते. काही देशाबाहेर पळून जातात, काही देशातच राहून दिवाळखोरी जाहीर करतात आणि सरकार त्यांच्या बचावासाठी पुढे येऊन त्यांचे लाखो-करोडोंचे कर्ज नॉन परफॉर्मिंग असेट्स या नावाने माफ करून टाकते. हे फ्रीबीजमध्ये मोडत नाही, कारण हे कर्ज कोट्यवधींचे असते. सामान्य नागरिकांना दिलेली १००-२००- हजारची मदत फ्रीबीजमध्ये मोडते. आणि याची चिंता जास्त आहे. कारण यामुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळून श्रीलंकेसारखी परिस्थिती भारतावर येईल, अशी भीती व्यक्त केली जाते. जनतेला मोफत रेशन देण्यामागचे गणित व्होटबँकेशी संबंधित आहे. महिन्याला पाच किलो धान्य देऊन अमर्याद सत्ता-संपत्तीची दारे उघडली जात असतील तर यात गैर काय! पण सामान्य गरिबांनी आपला आत्मसन्मान या पाच किलो धान्याऐवजी सदासर्वदा स्वतःला ‘गरिबीत’ ठेवले का,  हा प्रश्न वेगळा. त्याचबरोबर या फ्रीबीजच्या मोबदल्यात प्रत्येक नागरिकाला दरवर्षी किती विविध प्रकारचे कर द्यावे लागतात याचे मोजमापही कधी तरी केले गेले तर सत्य परिस्थिती समोर येईल, पण हे कार्य करावे कुणी? आणखीन एक प्रश्न उपस्थित होतो की देशाच्या निवडून आलेल्या वेगवेगळ्या राज्यातील व केंद्रातील राजकारण्यांना अर्थातच आमदार आणि खासदारांना ज्या सवलती दिल्या जातात जितक्या प्रकारची पेन्शन त्यांना दिली जाते, त्याची बेरीज कधी केली जावी आणि सामान्य नागरिकांच्या फ्रीबीजची तुलना या राज्यकर्त्यांच्या निरनिराळ्या भत्त्यांशी केली जावी. कुणावर जास्त खर्च येतो, सामान्य नागरिकांच्या फ्रीबीजवर की राज्यकर्त्यांच्या फ्रीबीज नव्हे वेगवेगळ्या भत्त्यांवर जास्त खर्च येतो, हेदेखील कुणीतरी जनतेसमोर ठेवावे. हे अधिकारिक भत्ते आणि उद्योगपतींच्या कर्जांची माफी सगळी परिस्थिती सर्वांसमोर येणे गरजेचे आहे. एस. पद्मराजन यांनी एका लेखात असे म्हटले आहे की श्रीलंका सरकारने तेथील बहुसंख्यकाना खूश करण्यासाठी बुरख्यावर बंदी घातली. देशातले सगळे मदरसे बंद करून टाकले, निवडणूक निधी तिथल्या सरकारने स्वतःसाठी वापरला. सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांनी त्यांच्या प्रत्येक निर्णयाचा जल्लोष केला आणि म्हटले की जर पाचशे रुपये प्रति किलो तांदूळ घ्यायची वेळ आली तरी आम्ही राजपक्षेंना मतदान करू. आजची तिथली परिस्थिती सर्वांसमोर आहेच.

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक, 

मो.: ९८२०१२१२०७



आपले स्वतंत्र अस्तित्व जपत आपण बहुसंख्य बांधवांशी जेवढे चांगले संबंध ठेवणे शक्य असतील तेवढे ठेवणे अपेक्षित आहे व असे संबंध देशभरात आहेत, परंतु असे संबंध जेव्हा सामान्य स्थितीमध्ये असतात तेव्हाच आपल्या नैतिक वर्तनाने बहुसंख्य बांधवांना प्रभावित करण्याची व इस्लामचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची संधी आपण वाया घालवतो व त्यामुळे आपण त्यांना वेगळे वाटतो. हा वेगळेपणा जर बहुसंख्य बांधवांना पावलो पावली उपयोगी ठरत असेल तर ते त्याचा विरोध करणार नाहीत. अडचण अशी आहे की, साधारणपणे आपण स्वतःच तसे नैतिक जीवन जगत नाही जसे की कुरआनला अपेक्षित आहे. मग दुसऱ्यांसमोर ते कसे मांडणार? 


कुछ अजनबी से लोग थे कुछ अजनबी से हम

दुनिया में हो न पाये शनासा किसी से हम

गळवादी जीवन शैलीमुळे नैतिकता, करूणा, त्याग, माणुसकी हे विषय इतके मागे पडलेले आहेत की, आज या विषयावर बोलणे / लिहिणे मागासपणाचे लक्षण ठरत आहे. माणसे इतकी स्वार्थी झालेली आहेत की, हजारो वर्ष जीवंत राहिलो तरी आपण एक दिवस निश्चितपणे मरणार याचा जवळपास सर्वांनाच विसर पडलेला आहे. आजूबाजूच्या घटनांचा सुक्ष्म परिणाम प्रत्येकावर नकळतपणे होत असतो. म्हणूनच आजूबाजूच्या चंगळवादी जीवनशैलीचा सुक्ष्म परिणाम भारतीय मुस्लिमांवरही झालेला आहे. त्यामुळे इतर समाजापर्यंत इस्लामचा संदेश पोहोचविण्याच्या त्यांच्या मुख्य कर्तव्याचाच त्यांना विसर पडलेला आहे. परिणाम समोर आहे. देशात दिवसेंदिवस सांप्रदायिक वातावरण मुद्दामहून तापविण्यात येत आहे. रामनवमी सारख्या शांततापूर्ण सणात सुद्धा निघालेल्या मिरवणुकीमधून अनेक ठिकाणी हिंसा झालेली आहे. अगोदर विनापरवाना मिरवणूक काढायची व ती मुद्दामहून मुस्लिम वस्त्यांतून न्यायची, वाटेत येणाऱ्या मस्जिदींसमोर डीजे लावून डान्स करायचा, प्रसंगी मस्जिदीवर गुलाल टाकायचा हे सर्व प्रकार कमी होते की काय म्हणून यावेळी मस्जिदीच्या मिनारीवर चढून तिथे भगवे झेंडे लावण्यापर्यंतचे प्रकार घडले आहेत. या सर्वांसाठी प्रत्यक्षात जे लोक ही कृती करीत आहेत व पोलीस शांतपणे पाहत आहे आणि देशाचे नेतृत्व गप्प आहे. या सर्वांची मानसिकता समजून घेतल्याशिवाय यावर उपाय योजने शक्य नाही. या सर्वांची एकच मानसिकता आहे ती ही की, त्यांना प्रामाणिकपणे असे वाटते की, मुस्लिमांचे अस्तित्व हे त्यांच्या आणि देशासाठी फक्त अनुपयोगीच नव्हे तर धोकादायक आहे. म्हणून ते कधी लव जिहाद, कधी हिजाब, कधी उर्दू, कधी हलाल मांस, कधी तीन तलाक, कधी आतंकवाद, कधी आक्रमणकर्त्या मुस्लिम राज्यकर्त्यांचा इतिहास (ज्यांच्याशी स्थानिक मुस्लिमांचा काहीही संबंध नव्हता.), कधी मदरसे तर कधी मस्जिदीचा विषय काढून मुस्लिमांना या ना त्या प्रकारे हानी पोहोचविण्याचा प्रयत्न करत असतात. यासाठी त्यांची इस्लाम विषयीची चुकीची धारणा जेवढी कारणीभूत आहे तेवढीच ती धारणा चुकीची होईल इथपर्यंत वाट पाहणारे आणि तशी ती धारणा होऊ नये यासाठी काहीही प्रयत्न न करणारे 20 कोटी मुसलमानही कारणीभूत आहेत. मुळात जोपर्यंत आपल्या वाणी, लेखणी आणि वर्तणुकीतून मुस्लिम समाज बहुसंख्य बांधवांना आपण देशासाठी व त्यांच्यासाठी उपयोगी आहोत हे दाखवून देत नाही. तोपर्यंत हे असेच चालत राहणार. जसे पाणी उकळायला लागल्यानंतर गॅस बंद करून काही उपयोग होत नाही तसेच एकदा का जातीय दंगली सुरू झाल्या की दंगली करणाऱ्यांना उपदेश देऊन काही उपयोग होत नाही. जेव्हा शांत वातावरण असते, जेव्हा लोक ऐकण्याच्या मनस्थितीत असतात, तेव्हा त्यांच्यापर्यंत इस्लामचा संदेश वेगवेगळ्या माध्यमातून सातत्याने पोहोचत राहील याची व्यवस्था करणे व आपल्या वर्तनातून आपण देशाला उपयोगी आहोत हे पावलो पावली तोपर्यंत सिद्ध करत राहणे जोपर्यंत बहुसंख्य समाजाची इस्लामविषयीची धारणा बदलणार नाही, हे मुस्लिम  समाजाचे प्राक्तन आहे. याचा विसर पडल्याने देशाची स्थिती मुस्लिमांच्या विरोधात जात आहे. या गोष्टीचा शांतपणे विचार करून जोपर्यंत उपाय केला जाणार नाही तोपर्यंत हे प्रकार वाढतच जाणार. 

विशेष लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे ही स्थिती ठीक तशीच आहे जशी सातव्या शतकात मक्कामध्ये मुठभर मुस्लिमांची होती. मक्का शहरातील बहुसंख्य कुरैश हे मूर्तीपूजक होते व एका ईश्वराची उपासना करणाऱ्या अल्पसंख्यांक मुस्लिमांविषयी जी धारणा बाळगून होते अगदी तीच धारणा आज भारतीय बहुसंख्य समाज अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाबद्दल बाळगून आहे. म्हणून त्या काळात प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी बहुसंख्य कुरैश यांच्याशी व्यवहार करतांना जे धोरण अवलंबिले होते तेच धोरण आपल्याला आता अवलंबवावे लागेल. त्यासाठी त्या काळात प्रेषित सल्ल. कसे वागले? त्यांचे सहाबा रजि. कसे वागले? त्यांनी त्या काळात बहुसंख्यांशी व्यवहार करतांना कुठली काळजी घेतली? इत्यादी बाबींचा सखोल अभ्यास करून उलेमांना मस्जिदीमधून मुस्लिमांना मार्गदर्शन करावे लागेल. त्यांचे प्रशिक्षण करून घ्यावे लागेल. तेव्हा कुठे भविष्यात फरक पडू शकेल. नशीबाने रमजान सुरू आहे. मस्जिदीमध्ये मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत. या संधीचा लाभ घेऊन उलेमांनी लोकांचे प्रबोधन केले तर या रमजानचा सदुपयोग केल्यासारखे होईल. कारण आजही आपल्यात बऱ्यापैकी माणुसकी जीवंत आहे, नैतिकता जीवंत आहे आणि माणूस म्हणून दुसऱ्या माणसांचा सम्मान करण्याची प्रसंगी त्यांना मदत करण्याची उर्मी जीवंत आहे, ही बाब कोविडमध्ये मुस्लिमांनी दाखवून दिलेली आहे. कोविड 19 च्या साथी दरम्यान गेल्या दोन वर्षांपासून ज्या हिररीने मुस्लिम तरूणांनी समाजोपयोगी कामे केली त्यावरून एक गोष्ट सिद्ध झाली की, मुस्लिम समाजामध्ये आजही धैर्य, धाडस आणि माणुसकी जीवंत आहे. याचा असा अर्थ मुळीच नाही की इतर समाजामध्ये हे गुण नाहीत. आहेत! जरूर आहेत हे स्विकारून रमजानमुळे माणसात चांगुलपणा कसा निर्माण करता येतो याचे प्रशिक्षण करण्याचे सौभाग्य मात्र फक्त मुस्लिम समाजालाच लाभलेले आहे. हे नम्रपणे नमूद करू इच्छितो. 

ईश्वराने माणसाच्या निर्मितीसाठी दोन गोष्टी घेतलेल्या आहे. एक जमिनीतून माती ज्याने त्याचे शरीर निर्माण केलेले आहे व दूसरी आकाशातून आत्मा. म्हणूनच मृत्यूनंतर शरीर माती होऊन जाते आणि आत्मा आकाशाकडे प्रयाण करून आपल्या मूळस्थानी निघून जातो. माणसाला जीवंत राहण्यासाठी दुहेरी आहार लागतो. एक शरीरासाठी तर दुसरा आत्म्यासाठी. शरीर जे की मातीपासून बनलेले आहे त्याचा आहारही मातीमधून येेतो. उदा. अन्नधान्य, भाजीपाला इत्यादी. तसेच त्याचा आत्मा जो की आकाशातून आलेला आहे त्याचा आहारही आकाशातून येतो जो की कुरआनच्या स्वरूपात आलेला आहे व प्रलयाच्या दिवसापर्यंत शाश्वत राहणार आहे. मातीतून मिळत असलेल्या आहारावर सर्वांचा विश्वास आहे. परंतु आकाशातून मिळालेल्या आहारावर फार कमी लोकांचा विश्वास आहे. मुस्लिमेत्तर तर सोडा मुस्लिमांचीही मोठी संख्या कुरआनला फक्त एक पूज्यनीय ग्रंथ मानते, त्याप्रमाणे अनुकरण करणे आवश्यक आहे, ही बाब त्यांच्या गावीसुद्धा नाही. 

रमजानचा हा महिना कुरआनच्या अवतरणाचा महिना असल्यामुळे आत्म्याच्या आहाराचा पुरवठा याच महिन्यापासून 1443 वर्षांपूर्वी सुरू झाला होता व 23 वर्षापर्यंत सतत सुरू होता. याची जाणीव बहुसंख्य मुस्लिमांना नाही. कुरआन म्हणजे दूसरे तीसरे काही नसून फक्त ईश्वरीय आदेश (वहीं)चा समुच्चय आहे व त्याचा विषय मनुष्य आहे आणि हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे, याची जाणीव बहुसंख्य मुस्लिमांना नाही. जी माणसं कुरआनच्या निर्देशाप्रमाणे जगतील ते यशस्वी होतील जे जगणार नाहीत ते अयशस्वी होतील. याची आठवण करून देण्यासाठी जणू हा महिना दरवर्षी येतो. 

माणूस तेव्हाच समाजउपयोगी होवू शकतो जेव्हा त्याचे मन शुद्ध असेल. वाईट मनःस्थिती असणारे लोक समाजासाठी हानीकारक असतात. रमजानचा महिना मानसिक शुद्धी प्राप्त करण्याची सुवर्ण संधी आपल्यासोबत घेऊन येतो. म्हणून या महिन्याचे महत्त्व हे हा महिना येण्यापूर्वीच जाणून घेणे आवश्यक ठरते. नसता हा महिना फक्त डायटिंगचा महिना ठरण्याची भीती असते. जे लोक चंगळवादामध्ये गळ्यापर्यंत रूतलेले आहेत त्यांच्या मनावर चांगल्या गोष्टींचा परिणाम फार कमी होतो. कुरआनच्या मार्गदर्शनाप्रमाणे मुस्लिमांनी स्वतः वागून आपले उदाहरण इतर समाजासमोर ठेवले तर त्याचा नक्कीच प्रभाव बहुसंख्य समाजावर होईल. मात्र अडचण येथेच आहे. बहुसंख्य मुस्लिमांचा कुरआनशी संपर्क अक्षरशः तुटलेला आहे. ज्यांचा संपर्क त्याच्याशी जुळालेला आहे तो फक्त त्याचे वाचन (तिलावत) करण्यापुरता आहे. जे कुरआनला समजून वाचतात त्यांच्यामध्ये कुरआनच्या आदेशांची अंमलबजावणी आपल्या जीवनात व कुटुंबात करावी याचे धाडस नाही. सध्याच्या चंगळवादी जीवन शैलीमध्ये कुरआनच्या आदेशाप्रमाणे जीवन जगणे त्यांना अनाकर्षक वाटते. परंतु त्यातच शांती, स्थैर्य आणि समाधान आहे. यावर विश्वास एक तर त्यांना नाही किंवा त्याबाबतीत त्यांना संशय आहे. ज्यांचा कुरआनिक जीवनशैलीवर ठाम विश्वास आहे व त्याप्रमाणे ते वागतही आहेत, अशांची संख्या तुलनेने अत्यल्प आहे. जोपर्यंत यांची संख्या वाढणार नाही व कुरआनी जीवनशैलीप्रमाणे जीवन जगणारे मुसलमान मोठ्या प्रमाणात सर्वांना डोळ्यासमोर दिसणार नाहीत तोपर्यंत मुसलमानांची जी प्रतीमा मुद्दामहून बनविण्यात आलेली आहे त्यापासून मुक्ती मिळणे शक्य नाही.

अल्पसंख्यांक मुस्लिम आणि बहुसंख्यांक हिंदू बांधवांच्या संंबंधांची व्याख्या करताना जमाअते इस्लामी हिंदचे संस्थापक सय्यद अबुल आला मौदूदी रहे. म्हणतात, ’’बिगर मुस्लिम कौमों के साथ मुस्लिम कौम के तआल्लुकात की दो हैसियते हैं. एक हैसियत तो ये है के, इन्सान होने के नाते हम और वो एकसां हैं. दूसरी हैसियत ये है के, इस्लाम और कुफ्र के इख्तेलाफ ने हमें उनसे जुदा कर दिया है. पहिली हैसियत से हम उनके साथ हमदर्दी, फय्याजी, रवादारी और शफक्कत का हर वो सुलूक करेंगे जो इन्सानियत का तकाजा है. और अगर वो दुश्मने इस्लाम न हों तो उनसे दोस्ती मसलेहत और मसालेहत भी कर लेंगे और मुश्तरका मकासिद के लिए तआव्वुन में भी दरेग (मुद्दामहून सहकार्य न करने) न करेंगे. मगर किसी भी तरह का मआद्दी और दुनियावी इश्तेराक हमको इस तौर से जमा नहीं कर सकता के हम और वो मिलकर एक कौम बन जाएं. और इस्लामी कौमियत को छोडकर कोई मुश्तरका हिंदी, चिनी, मिस्त्री कौमियत की तरह कोई कौमियत कुबुल कर लें. क्यूं की हमारी दुसरी हैसियत इस किस्म के इज्तमा में मानेअ है. और कुफ्र और इस्लाम का मिलकर एक कौम बन जाना कतअन मुहाल (अशक्य) है.’’ (संदर्भ : मसला-ए-कौमियत पान क्र . 36).

म्हणजे आपले स्वतंत्र अस्तित्व जपत आपण बहुसंख्य बांधवांशी जेवढे चांगले संबंध ठेवणे शक्य असतील तेवढे ठेवणे अपेक्षित आहे व असे संबंध देशभरात आहेत, परंतु असे संबंध जेव्हा सामान्य स्थितीमध्ये असतात तेव्हाच आपल्या नैतिक वर्तनाने बहुसंख्य बांधवांना प्रभावित करण्याची व इस्लामचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची संधी आपण वाया घालवतो व त्यामुळे आपण त्यांना वेगळे वाटतो. हा वेगळेपणा जर बहुसंख्य बांधवांना पावलो पावली उपयोगी ठरत असेल तर ते त्याचा विरोध करणार नाहीत. अडचण अशी आहे की, साधारणपणे आपण स्वतःच तसे नैतिक जीवन जगत नाही जसे की कुरआनला अपेक्षित आहे. मग दुसऱ्यांसमोर ते कसे मांडणार? 

लोकशाहीमध्ये अल्पसंख्यांक लोकांनी कितीही आरडाओरडा केला तरीही ते बहुसंख्यांकांसमोर आव्हान उभे करू शकत नाहीत. म्हणून जीभेचा कमी वापर करून प्रत्यक्षात चांगले काम करणे, योजनाबद्ध पद्धतीने स्वतःला देशासाठी उपयोगी बनविणे, याशिवाय आपल्यासमोर दूसरा मार्ग नाही. यासाठी ’लंबा इतंजार’  करण्याची हिम्मत आणि ’खामोशी से काम’ करण्याची गरज आहे. प्रत्यक्षात कुरआनशी संपर्क नसल्यामुळे छोट्या-छोट्या घटनांमधून तात्काळ संतप्त प्रतिक्रिया देण्याची खाज आपण दाबू शकत नाही. मुस्कान खानच्या हिजाबच्या घटनेवरून हे पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे. 

इस्लामचा उद्देश लोकांना नैतिक दृष्टिने श्रेष्ठ बनविणे आहे. हे जोपर्यंत बहुसंख्य मुस्लिमांच्या लक्षात येणार नाही तोपर्यंत परिस्थितीच काहीच फरक पडणार नाही. 

खामोशी की तह में छुपा लिजिए सारी उलझनें 

शोर कभी मुश्किलों को आसां नहीं करता

म्हणून अत्यंत संयमाने देशात वाढत असलेल्या सांप्रदायिक परिस्थितीला धैर्यपूर्वक तोंड देण्याशिवाय, आपल्या समोर पर्याय नाही. कारण ही परिस्थिती इथपर्यंत चिघळू देण्यासाठी आपणही तेवढेच जबाबदार आहोत जेवढे की परिस्थिती चिघळवणारी आहे. आर्मी मध्ये एक म्हण प्रसिद्ध आहे की, ’शांततेच्या काळात सैन्य जेवढा जास्त घाम गाळेल युद्धाच्या काळात त्याला तेवढेच कमी रक्त गाळावे लागते.’ हीच गोष्ट मुस्लिमांसाठी लागू होते. शांततेच्या काळामध्ये आपल्या वाणी,  लेखणी आणि वर्तनातून मुस्लिम समाज जेवढे इस्लामी आचरण करेल तेवढाच अशा सांप्रदायिक तेढ निर्माण झालेल्या परिस्थितीत कमी रक्त सांडेल.

रमजानचा महिना सोपा नसतो. कडकडीत उन्हात उपवास ठेवणे पोरखळ नव्हे. म्हणून अनेक धडधाकट मुस्लिम लोक हा बा-बरकत महिना लाभूनही रोजे ठेवत नाहीत. त्यांची अवस्था त्या पालत्या घागरीसारखी असते जिच्यावर कितीही पाणी ओता, आत काहीच जात नाही. त्यांना रमजानचीच काय इस्लामची मुलभूत शिकवण काय आहे? याचीही माहिती नसते. दुर्दैवाने अशाच मुस्लिमांची संख्या जास्त असल्यामुळे सध्या देशात मुस्लिम विरोधी वातावरण तापविणे सहज शक्य होत आहे. यावर एकच उपाय आहे तो म्हणजे इस्लामचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी अहोरात्र सांघिक प्रयत्न करणे. शेवटी ईश्वराकडे दुआ करतो की, ’’ऐ अल्लाह! माझ्या या प्रिय देशामध्ये हे जातीय तेढीचे वातावरण जे लोक निर्माण करत आहेत त्यांना सद्बुद्धी दे. त्यांना कळत नाही के ते देशाचे किती मोठे नुकसान करत आहेत आणि आम्हाला इस्लामच्या शांततेचा संदेश बहुसंख्य बांधवांपर्यंत पोहोचविण्याची समज, शक्ती दे.’’ (आमीन. )


- एम. आय. शेख


2 एप्रिल 2022 रोजी संध्याकाळी राजस्थानच्या करोलीमध्ये हिंदू नववर्षानिमित्त एक शोभायात्रा काढली होती. ज्या दरम्यान, जातीय दंगल भडकली. राजस्थानचे पोलीस महासंचालक मोहनलाल लाठेर यांनी प्रेसला दिलेल्या माहितीनुसार ’’दंगलीचे कारण रॅली दरम्यान, लावण्यात आलेल्या आपत्तीजनक घोषणा होत्या.’’ 

मुळात ही रॅली मुस्लिम बहुल इलाक्यामधून मोटर सायकलला जाण्याची परवानगीच का देण्यात आली आणि विना परवानगी रॅली त्या भागात केली तर पोलीस काय करत होते? इत्यादी प्रश्नाचे उत्तर पोलीस महासंचालकांनी दिलेले नाही. या घटनेचे व्हिडीओ एव्हाना सर्वत्र व्हायरल झालेले आहेत. त्यात स्पष्ट दिसून येते की, अगोदर मुस्लिम 

धर्मियांच्या दुकानांची ओळख पटविली गेली आणि त्यानंतर त्यांना पेटवून देण्यात आले. मुख्य बाजारातील 60 पेक्षा जास्त अल्पसंख्यांकांच्या दुकानांना पेटवून देण्यात आले. जे आगीत अक्षरशः भस्म झाले. अनेक लोक भाजून जखमी झाले. याच बाजारातील जनरल स्टोअर चालविणारे संजय गुप्ता यांनी सांगितले की, आम्ही आमच्या दुकानात होतो.रॅली हाटवडा मार्केटकडे गेली आणि अचानक पळापळ सुरू झाली. आम्ही सर्व पटापट दुकाने बंद केली.मला शंका आहे हा सर्व काही नियोजित घटनाक्रम होता.

’’ संजय गुप्तांचे दुकान जसेच्या तसे आहे. परंतु, त्यांच्या समोरील एका अल्पसंख्यांक बांगडी विक्रेत्याचे दुकान जळून भस्म झाले. प्रत्यक्ष दर्शींच्या मते मोहल्ल्यातून रॅलीवर दगडफेक करण्यात आली. हे जरी खरे आहे असे ग्रहित धरले तरी मुळात रॅली त्या भागात गेलीच कशी आणि त्यात सामील लोकांनी प्रक्षोभक घोषणा दिल्याच कशा, यावर कोणीही चकार शब्द काढत नाही. बांगडी बाजारमधील जफरच्या अनेक दुकाने आहेत. त्या सर्व जाळून टाकण्यात आल्या. मुस्लिम समाजाच्या दुकाणांना चिटकून असलेले काही हिंदू बांधवांची दुकानेही या आगीत जळून भस्म झाली. त्यात हेमंत अग्रवाल या स्टोअर चालकाचे दुकानही भस्म झाले. त्यात त्याचे 15 ते 20 लाखांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे हे सर्व काँग्रेस शासीत झाले. याचे आश्चर्य वाटते.  



एकेश्वरवादा वरील दृढ विश्वास व मृत्यू पश्चात आपल्या कर्माचा हिशेब द्यावयाचा आहे या संकल्पनेने प्रेरित मनुष्य जेव्हा रोजा धारण करतो तेव्हा तो स्वतःला आपल्या इच्छेच्या ताब्यात देत नाही तर त्याच्या इच्छा, आकांक्षा आणि लालसा त्याच्या ताब्यात येतात. 

‘‘इन्नल्लजी खलक़ल मौता वल हयाता लियबलुवकुम अय्युकुम अहसनु अमला‘‘(सुरे मुल्क - आ.क्र.2) ज्याचा भावार्थ असा की, ’’ईश्वराने मृत्यु आणि जीवन यांची निर्मिती केली यासाठी की तुमची परीक्षा घ्यावी की तुमच्यापैकी कोण उत्कृष्ट अर्थात श्रेष्ठ सत्कर्म करतो.) मनुष्य या भुतलावार ईश्वराद्वारे निर्माण केल्या गेलेल्या सृष्टीच्या निर्मीतीत सर्वात श्रेष्ठ निर्मिती आहे. ‘‘ व कर्रमना बनी  आदम‘‘ (आणि आदमच्या संततीला आम्ही सर्वात श्रेष्ठ ठरविले.) परंतु तो किती लाचार आहे की आपल्या मर्जीने तो जन्माला येऊ शकत नाही त्याला कोणी विचारत ही नाही की बाबा या धर्तीवर जन्म घेतो किंवा नाही! तसेच कुणाकडे आणि संपूर्ण जगात कोठे जन्म घेऊ इच्छीतो. इतकेच नव्हे तर नैसर्गिक मृत्युही आमच्या अख्तियारीत नाही. तो कुठे केव्हा आणि कसा येईल हे कोणीही सांगू शकत नाही. मृत्यु अटळ आहे हे मात्र आम्ही ठामपणे सांगू शकतो. कारण अल्लाहने पवित्र कुरआनमध्ये तसे स्पष्ट केले आहे की, ‘‘कुल्लु नफ्सीन ज़ाईकतुल मौत ‘‘ (प्रत्येक सजीवाला मृत्युची चव चाखावीच लागेल.)

जीवन व मृत्युचा निर्मीक अल्लाहच आहे याचे आम्ही ज्ञान बाळगतो. निर्मीकच सांगतो की, जन्मानंतर मृत्यू पर्यंतचा काळ हा तुमच्या जीवनाची प्रश्नपत्रिका सोडविण्याचा काळ आहे. या परिक्षेसाठीच त्याने मानवाला ज्ञान, बुध्दी, विचार करण्याची शक्ती, बोलण्याची व कर्म करण्याची शक्ती देऊन स्वातंत्र्य दिले की त्याने स्वत: ठरवावे -(उर्वरित पान 7 वर)

की सत्य-सरळ मार्ग कोणता? सन्मार्गावर  आचरण करुन जगात शांती व समता स्थापित करावयाची आहे की स्वातंत्र्याचा दुरुपयोग करुन उपद्रव निर्माण करावयाचा आहे? विश्वयुध्दाच्या उंबरठयावर आज आम्ही उभे आहोत. रशिया व युक्रेनमध्ये होणारा विध्वंस बघून पवित्र कुरआनचे हे कथन आठवते की, ज्याचा भावार्थ असा की, भू-तलावर आणि समुद्रात उपद्रव माजला मानवाच्या हाताच्या कर्तृत्वामुळे‘‘ मनुष्याचा ‘‘मी‘‘ अर्थात त्याच्या इच्छा, आकांक्षा, वासना या त्याच्या आधीन नसून तो त्यांच्या  आधीन आहे. मानवाची लगाम त्याच्या वासनेच्या हातात असल्यामुळे स्वतःचे वर्चस्व केंद्रस्थानी विराजमान आहे. आपले वर्चस्व स्थापित करण्यासाठी कितीही निष्पाप लोकांची कत्तल झाली तरी त्याला दुःख होता नाही. भु-तळावर न्याय समानता आणि शांती स्थापण्यास मानवाला श्रेष्ठत्व प्रदान करुन अल्लाहने त्याच्या प्रशिक्षाणाचा बंदोबस्त ही केला आहे. जेणेकरुन इच्छा वासना त्याच्या ताब्यात येतील. रोजा याचसाठी अनिवार्य करण्यात आला की ‘मी‘ वर मनुष्याने काबिज व्हावे. पवित्र कुरआनचे अवतरण यासाठीच झाले की मानवाच्या वर्चस्वाची ही इच्छा उपद्रव न माजवता शांती स्थापित करेल. पवित्र कुरआन ने यासाठी मनुष्याला या भू-तलावर त्याची स्थिती आणि त्याच्या जिवनाचा उद्देश्य जो त्याच्या निर्मिकाने सांगितला आहे तो स्पष्ट केलेला आहे. अमानवीय सामाजिक बेड्यात जखडलेल्या मानवाला त्याच्या जीवनाचा उद्देश्य मुळात माहीत नाही. तो हेच जाणत नाही की त्याला या भुतळावर मर्यादित काळासाठी कुणी पाठवले? का पाठवले? अर्थात पाठवणारच सांगेल की, या मागे काय उद्देश्य आहे. प्रश्न केवळ वैचारिक अगर तात्वीक नाही तर कार्यात्मक जीवनाशी त्याचा दृढ संबंध आहे. या प्रश्नाच्या अचुक उत्तरावरच मानवीय जीवनाची यशस्वीता अवलंबून आहे. पवित्र कुरआन ने मानवाच्या या मुलभूत समस्येचे निरसनच केले नाही तर त्याला इहलोक व परलोकात यशस्वी होण्याचा ईश मार्गही दाखविला आहे. पवित्र कुरआन ने अगदी सुरुवातीलाच घोषणा केली आहे की, हा ग्रंथ जगाच्या निर्मिकाने समस्त विश्वाच्या मानवासाठी मार्गदर्शन म्हणून अवतरित केलेला आहे. अर्थात यावर कोणत्याची विशिष्ट समाजाची, जातीची अगर विशीष्ट भौगोलिक भुभागाची मक्तेदारी नाही. अशा या अप्रतिम ग्रंथाचे अवतरण रमजानच्या महिन्यात सुरू झाले. म्हणूनच रमजानला विशिष्ट असे महत्व प्राप्त झाले आहे. पवित्र कुरआन ने अंधारात आणि अमानवीय सामाजिक बेडयात जखडलेल्या मानवाला सत्य मार्ग दाखवून अंधःविश्वासातून ज्ञानाच्या प्रकाशात आणले. भुतलावार शांती, समता व बंधुत्व आणि न्यायाच्या स्थापनेसाठी अल्लाहच्या निर्मितीत श्रेष्ठत्व प्रदान केले व सांगितले की, मनुष्य या भुतलावर अल्लाहचा खलीफा (प्रतिनिधी) आहे. त्याचे कर्तव्य आहे की या भुतळावर त्याने शांती व समता स्थापित करावी. यासाठी अल्लाहने मार्गदर्शर्न करणारे ग्रंथ अवतरित केले. पवित्र कुरआन हा त्यातील अंतिम ग्रंथ होय. ज्यात केवळ मार्गदर्शनच केलेले नाही तर त्यावर आचरण करण्यास आवश्यक अशा गुणांना निर्माण करण्यासाठी वर्षातून एकदा तब्बल 30 दिवसाचे प्रशिक्षण शिबीरही अनिवार्य केले आहे. पवित्र कुरआन सांगतो ‘‘ऐ  श्रध्दावंतांनो ! तुमच्यावर रोजे अनिवार्य करण्यात आले आहे. जसे यापुर्वीच्या ईशग्रंथ धारकांवर अनिवार्य केले होते.‘‘ 

उपरोक्त कथन अगदी स्पष्ट करते की रोजे काही नविन नाहीत आणि पवित्र कुरआन ही काही नविन ग्रंथ नाही तर या पूर्वीच्या भिन्न-भिन्न भाषेतील ईशग्रंथाचा समापक ग्रंथ होय. मनुष्य हा इच्छा, आकांक्षा आणि लालसेचा पुतळा आहे. त्याचा ‘‘मी‘‘ जेव्हा त्याच्यावर काबीज होतो तेव्हा उपद्रव व विध्वंस उदयास येते. हा ‘मी‘च वर्चस्वाची भावना निर्माण करतो. वर्चस्वाचीच ही भावना त्याला उच्च-नीच या कप्प्यात विभाजीत करते. 

वर्चस्वाच्या याच भावनेनेच रशिया व युक्रेनमध्ये विध्वंस माजवित आहे. रोजा मनुष्याच्या या ‘मी‘ ला ताब्यात ठेवतो. अल्लाह सांगतो एकमेव अल्लाहने तुम्हा सर्वांना एकाच स्त्री व पुरुषापासुन निर्माण केले या अनुषंगाने तुम्ही आपसात भाऊ-भाऊ आहात. तुमचे हे जीवन क्षणभंगूर आहे जे केवळ तुमची परिक्षा घेण्यास देण्यात आले आहे. ही मुलभूत संकल्पना मानवाच्या मनावर बिंबविण्यासाठी त्याचे प्रशिक्षण केले जाते. रोजांद्वारे आपल्या लालसा व वासनेवर ताबा मिळविण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. यामुळे वर्चस्वाची भावना व लालसा मानवाच्या नियंत्रणात येते. याचा उपयोग शांती स्थापनेच्या प्रक्रियेत होतो. वर्चस्वाच्या  याच लालसेमुळे रशिया व युक्रेन दरम्यान युध्द सुरू आहे. एकेश्वरवादा वरील दृढ विश्वास व मृत्यू पश्चात आपल्या कर्माचा हिशेब द्यावयाचा आहे या संकल्पनेने प्रेरित मनुष्य जेव्हा रोजा धारण करतो तेव्हा तो स्वतःला आपल्या इच्छेच्या ताब्यात देत नाही तर त्याच्या इच्छा, आकांक्षा आणि लालसा त्याच्या ताब्यात येतात. दुसऱ्या शब्दात आकांक्षा आणि वासनारुपी घोडयाची लगाम त्याचा हातात येते. तो या घोडयाला मनसोक्तपणे समाजात धुमाकुळ घालू देत नाही. याच वासनारुपी घोडयावरील बंधन माणसामध्ये तक़वा (ईश्वराच्या भीतीतून निर्माण होणारे चांगले चारित्र्य) निर्माण करते. येथूनच सुविचार आणि ईशपरायणता आरंभ होते. हाच उद्देश्य रोजा मागे आहे आणि यासाठीच अल्लाहने रोजे कुरआनच्या अवतरण्यापूर्वीही अनिवार्य केले होते. वेगवेगळ्या धर्मांमध्ये माणसांमध्ये ईशपारायणता निर्माण करण्यासाठी भक्तिच्या वेगवेगळया प्रथांना प्रोत्साहन मिळाले जसे सन्यास, संसार त्यागून जंगलात भक्ती करणे, शरीराला अवास्तव आणि असाह्य त्रास देऊन आपल्या मनावर ताबा प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे इत्यादी. आपल्या निर्मीक अल्लाहने पवित्र कुरआनच्या माध्यमातून पुन्हा एकदा आणि अगदी शेवटची संधी म्हणून आपल्यासमोर रमजानचे रोजे प्रदान केलेले आहेत.   

मित्रांनो ! चालू रमजानची संधी साधून आपल्या षड्रिपूवर नियंत्रण मिळवून आपल्या सर्वांच्या निर्मिकाचा संदेश जाणून घेऊया आणि त्यावर आचरण करुन शांती समता व न्याय स्थापित करुया. कारण आपण सर्व एकच आई-बाबाची संतती आहोत हे नका हो विसरू. (संदर्भ  : सुरे युनूस 19) ‘‘ अधी सर्व मानव एकच समुदाय होते. वेगवेगळया श्रध्दा आणि पंथ त्यांनी नंतर निर्माण केले‘‘ पवित्र कुरआन सांगतो ‘‘तो अल्लाहच आहे त्याच्या व्यतिरिक्त कोणी उपास्य नाही‘‘ तो बादशाह आहे अत्यंत पवित्र सर्वस्वी शांती अभयदान करणारा ‘‘तो पवित्र आहे लोकांच्या अवास्तव व अनेकेश्वर वादाच्या कल्पने पासून‘‘ ‘‘ त्याची मुर्ति प्रतिमा किंवा विशीष्ट भौगोलिक क्षेत्र नाही‘‘ तो रब्बुल आलमीन (समस्त विश्वाचा एकमेव स्वामी व पालनहार) आहे. तरी सर्वांनी या रमजानची संधी साधून चारित्र्य संवर्धनाकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करून थांबतो. 

- डॉ. यु.म. कहाळे, 

अकोला




आमच्या पैकी ज्या कोणाला हा पवित्र रमजान महिना मिळाला तर त्याला पाहिजे की या महिन्याचे रोजे (उपवास) ठेवावे.’’ (2:185). सर्वप्रथम सर्व भारतीय बांधवांना पवित्र रमजानच्या शुभेच्छा ! कारण हा महिना सर्व मानवजातीकरिता आहे. परंतु काहीच लोक आहेत जे या महिन्याचा लाभ घेतात तर . काही लोकांना या महिन्याचे विषयी कुतुहल असते की काय असते रमजान?, रोजे कसे व का ठेवतात? या आपल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या लेखात देण्याचा प्रयत्न करेन...

रमजान कुरआन अवतरणाचा महिना. कुरआन इस्लामचा आधार आहे. इस्लामची तत्वे, नीतिमूल्ये, उपासना, इमान, आदेश आणि उपदेश तसेच अन्य शिकवणीचा स्त्रोत असणारा ग्रंथ आहे. इस्लामचे अंतिम प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्यावर या ग्रंथाचे अवतरण रमजान महिन्यात सुरू झाले. पुढील 23 वर्षे या ग्रंथाचे अवतरण होत राहिले. मात्र सुरुवात रमजान महिन्यात झाली म्हणून या महिन्याला इस्लाम धर्मात अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. किंबहुना हे महत्व अल्लाहतर्फेच निर्धारित करण्यात आले आहे.

रमजान महिन्यात कुरआनच्या अवतरणासंदर्भात कुरआनात आलेली आयत अशी आहे की, ’’रमजान तो महिना आहे, ज्यामध्ये कुरआन अवतरीत केले गेले; जे मार्गदर्शक आहे समस्त मानवजातीसाठी. ज्यात मार्गदर्शनाचे स्पष्ट प्रमाण आणि सत्य-असत्यादरम्यान फरक करणारे निकष आहेत. तेव्हा तुमच्यापैकी जो कोणी या महिन्याला  प्राप्त करेल, त्याने रोजांचे पालन करावे. (सुरह बकरा : आयत 185)

वरील आयाती मध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की, हा कुरआन संपूर्ण मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी अवतरीत करण्यात आला आहे फक्त मुस्लिम लोकांसाठी  नाही, परंतु आमचे दुर्दैव हे की, आम्ही कुरआन ला फक्त मुस्लिमांचा धर्मग्रंथ समजून बसलो आहोत. त्यामुळे कुरआन कधीच आपण वाचले नाही.

अध्यात्मिक दृष्टिकोनातून हा महिना अत्यंत महत्वाचा ठरतो. दिवसाच्या ठराविक वेळेचे काही लाभ असतात. सकाळी केलेले व्यायाम शरीरासाठी अन्य वेळी केलेल्या व्यायामापेक्षा लाभदायक ठरते. रात्रीच्या झोपेचे लाभ दिवसाच्या कोणत्याही वेळची झोप घेऊन प्राप्त केले जाऊ शकत नाहीत. तसेच अध्यात्मिक दृष्टिकोनातून हा महिना आत्मशुद्धीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या महिन्यातून प्राप्त होणारा अध्यात्मिक लाभ अन्य कोणत्याही महिन्यात प्राप्त केला जाऊ शकत नाही. म्हणूनच अल्लाहतर्फे या महिन्याची निवड विशेष उपासनेसाठी करण्यात आली. ’रोजा’ अल्लाहची विशेष उपासना आहे. अल्लाहप्रती कृतज्ञताभाव व्यक्त करण्यासाठी ही उपासना केली जाते. एखादी व्यक्ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मनःपूर्वक या महिन्याच्या उपासनाविधी पार पाडते, तेव्हा अभूतपूर्व आत्मिक शुद्धी अनुभवते.

तरावीह (रात्रीत थांबून नमजपठण)

या महिन्यात जगभरात मुस्लिमांतर्फे महिनाभर रोजांचे पालन केले जाते. विशेषतः नमाज ’तरावीह’ च्या माध्यमातून महिन्याभरातून संपूर्ण कुरआनचे पठन केले जाते. रोजा आणि तरावीहची विशेष नमाज या महिन्यातील उपासनेचे अत्यंत महत्वाचे अंग आहेत. या व्यतिरिक्त रमजानच्या महिन्यात मोठ्या प्रमाणात दानकार्य केले जाते. प्रेषित मुहम्मद (सल्ल.) या महिन्यात वेगवान वाहणाऱ्या वाऱ्यापेक्षा जास्त दानशूरता दाखवीत असत. म्हणून धर्माचरण करणारे मुस्लिम अनुयायी जगभरात मोठ्याप्रमाणात दानकार्य करतात. सदका, खैरात, फित्रा आणि जकात सारख्या अनेक स्वरूपात गरजूंना आणि वंचितांना आर्थिक सहाय्य दिले जाते.

नातेवाईकां सोबत सदव्यव्हार

या महिन्यात नातेवाईकांवर विशेष लक्ष देण्यात येते.तसेच आपल्या शेजाऱ्यांना उपवासाच्या पूर्वी घरचे जेवण देवाण घेवाण करतात. तसेच लहान मुलांनी रोजा ठेवला तर त्याला रोजा खुलाई म्हणतात आणि त्याला सर्व परिसरातील बांधव पैसे आणि कपडे बनवितात त्यामुळे लहान मुलांना खूप मजा वाटते. 

दया व करुणा

तसेच हा महिना प्रेम आणि वात्सल्याचा आहे. जर कोणत्या बांधवाला कोणीही कर्ज दिले असेल आणि त्याला देण्याची ऐपत नसेल तर त्याला सवलत दिली जाते आणि कोणी-कोणी तर माफ सुद्धा करून टाकतात. आणि सहानुभूतीने वागतात.

आत्मचिंतन

रमजान महिन्यात श्रद्धा आणि चिंतन मनन सोबत जर कोणी रोजे ठेवले तर त्याचे मागील पाप माफ करण्यात येतात. त्यामुळे या महिन्यात सर्व इमानधारक मागील वर्षात कोणत्या चुका केल्या किती वाईट आणि चांगले कार्य केले याचे चिंतन, मनन करीत असतात आणि आपल्या वाईट कृत्या वर अल्लाह समोर दया याचना करून पापाचे प्रायश्चित्त करून घेतात. म्हणूनच तुम्ही पहाल की जो 11 महिने काही वाईट कृत्य करीत असेल तर या महिन्यात ते करत नाही कारण त्याला रोजा असतो तर रमजानचे हेच उद्देश आहे. 

मुस्लिमांना 11 महिन्यांसाठी अश्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते की त्यांनी वर्षभर अशाच प्रकारे आपले जीवन इमानदारीने अल्लाहचे भय बाळगून जगावे आणि एक समाजउपयोगी मनुष्य निर्माण व्हावा हा रमजानचा उद्देश आहे.

मागे झालेल्या वाईटकृत्यांची क्षमायाचना

माणूस हा एक चुकीचा पुतळा आहे. कळत नकळत त्याच्या हाताने अनेक चुका होत असतात आणि त्या स्वाभाविक आहेत. परंतु चुकीला चुक समजणे हा सुद्धा एक नैतिकगुण आहे. म्हणूनच पवित्र रमजान महिन्यात प्रत्येक रोजा धारण करणारा इमानधारक बांधव आपल्या मागील कृत्यावर चिंतन करून त्याची अल्लाहसमोर उभे राहून क्षमायाचना करतो. रात्रीला उठून आपण केलेल्या वाईट कृत्यांवर पश्चाताप करून समोर असं वाईट कृत्य न करण्याचा निर्धार करतो. त्यामुळे त्याला एक नैतिक सकारात्मक बल प्राप्त होते आणि रोजांचा उद्देश सुद्धा हाच आहे की मानवाला नैतिकता शिकवून आदर्श समाज निर्माण करणे. जो की कोणत्याही कृत्याचा जाब द्यायचा आहे या भीतीने पुढील 11 महिने आपले जीवन जगावेत.

माझ्या बंधूंनो! अल्लाह कडून आपल्या सर्वांना हा महिना मिळाला आहे त्याचे खूप मोठे उपकार आहेत. असेही होऊ शकते की, पुढचा रमजान आपल्यातील काही लोकांना मिळणारसुद्धा नाही. त्यामुळे या मिळालेल्या संधीचा उपयोग करून याच महिन्यात पवित्र कुरआन आपल्या भाषेत वाचण्याचा निश्चय करा आणि या महिन्यातच आपल्या मराठी भाषेत कुरआन वाचा जर मराठी/हिंदी/इंग्रजी भाषेत कुरआन वाचण्याची ईच्छा असेल तर आम्ही तुम्हाला मोफत घरपोच कुरआन पोहोचवू त्यासाठी माझ्या वरील नंबरवर पत्यासह एक मॅसेज करावा किंवा कॉल करावा.

धन्यवाद....!


- प्रा. सलमान सय्यद, 

पुसद.,9158949409


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget