Halloween Costume ideas 2015

मक्केतल्या आर्थिक शोषणाविरोधात मुहम्मदी विद्रोह

इस्लाम धर्मातला पवित्र रमजान महिना सध्या सुरू आहे. कधीतरी मक्केला जाण्याचा प्रत्येक मुस्लिम व्यक्तीचं स्वप्न असतं. पण पूर्वी व्यापारी केंद्र असलेल्या याच मक्केत  अराजकता माजली होती. अंधश्रद्धा, बुवाबाजी आणि आर्थिक शोषण यांचा बोलबाला होता. इस्लामिक क्रांतीमुळे परिस्थिती बदलली. त्या मुहम्मदी विद्रोहावर टाकलेला हा प्रकाश..

इस्लामचा अभ्यास धर्म म्हणून करणाऱ्या सर्वच विद्वानांनी त्याच्या जन्माच्या मुळाशी असणाऱ्या आर्थिक कारणांची चर्चा अभावानेच केली. मक्का शहरातल्या उत्पादन व्यवस्थेत  इस्लामोत्तर झालेले बदल हा विषय अभावानेच धर्मवादी अभ्यासकांना आकर्षित करु शकला. त्यामुळे इस्लामच्या पूर्वीही प्रेषितांनी ‘हिल्फुल फुदुल’ कराराच्या माध्यमातून आर्थिक  शोषणाच्या विरोधात दिलेला लढा हा इस्लामी इतिहासातून दुर्लक्षित राहिलाय.

मक्का शहरातली इस्लामी अर्थक्रांती
मक्का शहरात प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जन्मापूर्वी आर्थिक  विषमतेने समाजव्यवस्थेला पोखरुन काढलं होतं. मक्का शहराचा हा प्रेषितपूर्व इतिहास मांडताना धर्माचे अभ्यासक त्या काळाला ‘दौर ए जाहिली’ म्हणजे ‘अज्ञानाचा काळ’ संबोधून पुढे  सरकतात. त्यावर चर्चा केलीच तर ते अंधश्रध्दा, रुढी आणि कर्मकांडांची करतात. शहरातल्या आर्थिक शोषणाच्या इतिहासाला त्यांच्या लिखाणात स्थान नसतं. फिलीप के हित्ती सारख्या  आधुनिक इतिहासकारांनी मक्का शहराचा प्रेषितपूर्व इतिहास मांडण्यासाठी मोठे परिश्रम घेतले. त्यांचा ‘हिस्ट्री ऑफ अरब’ हा ग्रंथ सामाजिक कारणांचा शोध घेऊन तिथे घडलेल्या  ‘मोहम्मदी परिवर्तनाची’ व्याख्या करतो. मॅक्झिम रॅडीन्सन ‘कॅपिटलिझम अँड इस्लाम’मधे इस्लामी अर्थक्रांतीच्या मुळाशी असणारी परिस्थिती कथन करतानाही हित्ती यांच्यासारखी  सुरवात करतात. मात्र त्यांच्या मांडणीचा हेतू, आशय आणि सूत्रं वेगळी असल्याने ते लिखाण ‘इस्लामी इकॉनॉमिक सोशिओ रिव्हेल्युशन’ला अधोरेखित करतं.

स्वातत्र्याचं स्वैराचारात रुपांतर झालं
मक्का शहर कधीच कोणत्याही राजाच्या अधिपत्याखाली राहिलं नाही. समाजाच्या सर्व घटकांवर नियंत्रण मिळवणारी दंडव्यवस्था तिथे कधीच  नव्हती. मक्का शहर बेदुईन या अरबस्तानातल्या मूळनिवासी नागरिकांचं शहर. स्वातंत्र्य हा बेदुईनांचा श्वास होता. या स्वातंत्र्याला कोणतेही निर्बंध नव्हते. त्यामुळे त्याची जागा  स्वैराचाराने घेणं साहजिक होतं. स्वैराचारातून शोषण अशा क्रमाने मक्केतल्या उत्पादनव्यवस्थेत अराजकता शिरली.
मक्का शहरात झालेल्या इस्लामी आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनाची ही पार्श्वभूमी होती. या मोहम्मदी क्रांतीला कारणीभूत ठरलेल्या घटकांची माहिती इब्ने खल्दून यांनी दिलीय. ते  लिहितात, ‘कायद्यात, लोकांना वाईट कृत्यापासून रोखण्यात, इतरांकडून होणारे दुर्बलांवरील अन्याय रोखण्यात त्यांना कोणताही रस नव्हता. त्यांना फक्त नफा हवा होता. त्यासाठी ते  लूटमार आणि धोकेबाजी करत.’

मजुरांचं आर्थिक शोषण झालं
इस्लामच्या अभ्यासकांना मक्का शहराच्या इतिहासाचीही माहिती घ्यावी लागते. इतिहासाची संपूर्ण व्याख्या त्याच्या पार्श्वभूमीच्या आकलनाशिवाय करता येत नाही. मक्का हे शहर व्यापारी केंद्र होतं. आंतरराष्ट्रीय मसाला मार्गावर वसलेलं हे शहर अरबांची सांस्कृतिक राजधानी म्हणून इतिहासात ओळखलं जातं. व्यापारासाठी भटकणाऱ्या मक्कावासीयांना भटकंतीमुळे  आणि शहरात येणाऱ्या अन्य रोमन व्यापाऱ्यांमुळे उर्वरीत जगातल्या सांस्कृतिक घडामोडी ज्ञात होत्या.
मक्केतल्या काही व्यापाऱ्यांकडे भांडवलाचं केंद्रीकरण झालं होतं. ते त्यांच्या हिताची व्यवस्था लहान व्यापाऱ्यांना वेठीस धरून जन्माला घालत. त्यामुळे कित्येक व्यापारी भिकेला लागले.  शहरात श्रीमंत आणि गरीब अशी दरी निर्माण झाली. व्यापारी मार्गावरचं शहर म्हणून बाहेरचे अनेक उद्योजक मक्केत यायचे. नव्या उद्योगांची सुरवात करायचे. तिथल्या कनिष्ठ  वर्गीय मजुरांमुळे आणि भिकेला लागलेल्या लहान व्यापाऱ्यांमुळे मजुरांची संख्या मोठी होती.

तरुणांचा शोषणाविरुद्ध एल्गार
व्यापारी तांड्यासोबत हे मजूर शेकडो मैल चालून जात. आर्थिक शोषणातून मजुरांची स्थिती दयनीय होती. त्यात व्यापाऱ्यांना अर्थसाहाय्य करणाऱ्या व्याजखोर सावकरांनी आर्थिक  शोषणाची सीमा ओलांडली. शोषणाचं हे चक्र मक्का शहराच्या अर्थव्यवस्थेला वेठीस धरत होतं. आर्थिक शोषण सामाजिक अराजकतेला आमंत्रण देतं. त्यातून अरबांच्या प्राचीन धर्मक्षेत्र  असणाऱ्या ‘काबा’ला मूर्तिकेंद्राचं स्वरुप प्राप्त झालं.
अर्थकारणाने अनेक देवता जन्माला घातल्या. काबागृहातील देवता धर्मप्रेरीत अर्थव्यवस्थेचा आधार होत्या. धर्मप्रेरीत भांडवली अधिसत्ता मक्का शहरावर निर्माण झाली. अरबांना प्रिय  असणाऱ्या मक्का शहरात ही अराजकता अरबी मनाला अस्वस्थ करणारी होती. म्हणून कालांतराने ‘हिल्फुल फुदुल’सारखे करार करुन अरबी युवकांनी आर्थिक शोषणाच्या विरोधात  एल्गार केला. तारुण्यात प्रेषित मुहम्मद (स.) हे त्या करारातले एक महत्त्वाचा दुवा होते.
प्रेषित्वाची घोषणा केल्यानंतरही प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आयुष्यात कधीही ‘हिल्फुल फुदुल’सारख्या सामंजस्य करारात सहभागी होण्याची संधी मिळाली, तर आपण त्यासाठी सिध्द  असल्याचं अनेकवेळा सांगितलं.

इस्लामचं अर्थकारण आकर्षित करणारं
इस्लामच्या मुळाशी प्रेषितांच्या आर्थिक बदलाची भावना होती. आर्थिक हितसंबंध गुंतलेल्या भांडवली घटकांना अर्थव्यवस्थेविरोधातलं आव्हान नको होते. एच. आर. गिब या मताची पुष्टी  करताना म्हणतात, ‘मक्कावाल्यांचा विरोध त्यांच्या रुढींना इस्लामने आव्हान दिलं म्हणून नव्हता किंवा त्यांच्या धार्मिक अंधश्रद्धेमुळेदेखील तो विरोध नव्हता. मात्र त्यांच्या मुळाशी  आर्थिक आणि राजकीय कारणं होती.
त्यांना भीती होती की, मुहम्मद (स.) प्रणित समाजक्रांती त्यांच्या आर्थिक समृद्धीला प्रभावित करण्याची शक्यता अधिक होती. त्यांच्या मंदिरप्रणित अर्थव्यवस्थेला प्रेषितप्रणित  एकेश्वरवाद उद्ध्वस्त करू पाहत होते. प्रेषितांनी अर्थव्यवस्थेत सांगितलेले बदल अरबांच्या नफेखोरीला, शोषणाला रोखत होते. ते गरीबांचे अधिकार आणि सामान्य व्यापाऱ्यांच्या  हितसंबंधांना जपण्याचं तत्त्व सांगत होते. ज्या व्यापारी गटाचे हितसंबंध उच्चवर्गीयांच्या हितांशी बांधील असणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे दुखावले, त्यांना मात्र इस्लामी अर्थव्यवस्थेची नवी  तत्त्वं आकर्षक वाटत होती.

नवस्थापित इस्लाम, हे तरुणांचं आंदोलन
धर्मप्रेरीत भांडवली सत्तेला इस्लाममुळे मिळालेलं आव्हान मक्का शहरातल्या कनिष्ठ आणि मध्यमवर्गीयांना आकर्षित करत होतं. त्यातही युवकांना इस्लामी परिवर्तनाने आपल्या  बाजूला वळवलं. असगर अली इंजिनियर युवकांच्या सहभागाविषयी माहिती देताना म्हणातात, सुरवातीच्या काळात इस्लामी आंदोलनं समाजातल्या दुर्बल आणि पीडित व्यक्तींच्या  विचारांना अभिव्यक्त करत. त्यामुळेच हे संशोधन रुचीपूर्ण ठरेल की, इस्लामचे आरंभीचे समर्थक कोण होते? अब्दुल मुतअल अस्सईदी नावाच्या एका इजिप्शीयन लेखकाने याविषयी  संशोधन केलंय.
ते म्हणतात, 'नवस्थापित इस्लाम मुळात तरुणांचं आंदोलन होतं. ज्या लोकांच्या वयांची नोंद आढळते. त्यामधे हिजरतच्या वेळी मक्केतून मदीनेत स्थलांतर करणाऱ्यांत ४० पेक्षा कमी  वयाच्या व्यक्तींची मोठी संख्या होती. त्यांनी आठ ते दहा वर्षांपूर्वी इस्लामचा स्वीकार केला. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी मक्केतल्या भांडवलदारांना इशारा दिला की, त्यांनी साठेबाजी  करू नये, श्रीमंतीचा अहंकारी अभिमान बाळगू नये. हेच पीडित, गुलाम आणि अनाथांना आधिक आकर्षक वाटत होतं.’

प्रेषितांकडून इस्लामी धर्मक्रांतीचं नेतृत्व
कारण इस्लामच्या तत्त्वज्ञानाने मक्का शहरातल्या सामाजिक तणावांच्या पार्श्वभूमीवर श्रीमंताच्या संपत्तीत गरीबांचा अधिकार सांगितला होता. जकात हा कर संपत्तीवर आकारला.   त्यातून गरीबांना हातभार देण्याची सामाजिक आर्थिक समतेची भूमिका मांडण्यात आली. मक्का शहरात दोन टोकाचे विचार एकमेकांना भिडले. एक धर्मप्रेरीत अर्थव्यवस्था ज्यामधे  भांडवली वर्गाचे हितसंबंध गुंतले होते. तर दुसरीकडे गरीबांकडे लक्ष देण्यासाठी श्रीमंतांना इशारा देणारी विचारधारा अशा दोन टोकाच्या भूमिका होत्या. प्रेषित मुहम्मद (स.) फक्त  अर्थव्यवस्था आणि उत्पादनव्यवस्थेतल्या हितसंबंधांना आव्हान देऊन थांबले नाहीत.
त्यांनी सावकारी अर्थकारणाला धुडकावलं. आर्थिक शोषणाचे आणि श्रीमंताना मिळणाऱ्या लाभाच्या प्रमुख स्रोतावर आघात केला. व्याज निषिद्ध ठरवण्यात आलं. कनिष्ठ वर्गीयांविषयीची  सामाजिक संहिता ठरवण्यात आली. गरीबांना साहाय्य करण्याला फक्त सामाजिक नाही तर मूलभूत धार्मिक कर्तव्यात स्थान देण्यात आलं. प्रेषित क्रांतीची ही सामाजिक फलश्रुती होती.  त्यामुळेच प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यानंतर इस्लामने युनानी तत्त्वज्ञानानेच आव्हान स्वीकारलं.

प्रेषित अर्थक्रांतीचे कृतीशील तत्त्वज्ञ
प्रख्यात इस्लामी विचारवंत इब्ने रश्द यांनी इस्लामच्या भौतिक विचारधारेची आध्यात्मिक वस्तुनिष्ठ मांडणी केली. त्यांनी युनानी तत्त्वज्ञानाच्या मुलाधाराला आव्हान देऊन भौतिकाला  आध्यात्मिक समीक्षेच्या कक्षेत आणलं. इस्लामी भौतिकवाद नावाची संकल्पना आकाराला आली. कालांतराने इब्ने खल्दून सारखा समाजशास्त्राचा जनक मुसलमानांमधे निर्माण झाला.  खल्दून यांचा मुकद्दीमा त्यांनी अर्थव्यवस्थेच्या अनेक अंगावर इस्लामी मुल्यांच्या परिप्रेक्ष्यात भाष्य केलं.
इस्लामी तत्त्वज्ञानावर कोणत्या अंगाने चर्चा करावी याचा पाठच त्यांनी घालून दिला. इस्लामने जी धर्मक्रांती केली त्याच्या मुळाशी आर्थिक कारणं होती. अर्थव्यवस्थेला धर्ममूल्यांच्या  कक्षेत बांधलं. निषिद्ध, अनिषिद्ध ही संकल्पना प्रथमच अरबी समाजात अवतरली. अन्यथा स्वैराचाराने सारे अनिषिध्द ठरवलं होतं. सामाजिक नैतिकतेची संकल्पना देखील अरबांमधे  नव्हती. मुहम्मदी सामाजिक, आर्थिक, धार्मिक क्रांतीने या सर्व संकल्पना अरबांच्या गळी उतरवल्या. गरीबांच्या हक्कांसाठीचा हा लढा प्रेषितांच्या नेतृत्त्वाखाली लढला गेला. कोणत्याही  तत्त्वज्ञापेक्षा प्रेषित मुहम्मद (स.) यांना मिळालेले यश आधिक आहे. त्यामुळे प्रेषित अर्थक्रांतीचे कृतीशील तत्त्वज्ञ ठरतात.

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget