आज समाजातील गुन्हेगारीचा ग्राफ झपाट्याने वाढत आहे, लहान शाळकरी मुले, महाविद्यालयीन युवक देखील गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेले दिसतात, संस्कार आणि सभ्यतेची सर्रास राखरांगोळी केली जाते, शिक्षणात व्यापारीकरण दिसून येत आहे. आजच्या आधुनिक काळात शहर आणि महानगरांमध्ये शाळेचे नाव एक ब्रँड बनले आहे, आता प्रत्येकाला आपल्या मुलांना नामांकित खाजगी शाळांमध्येच शिकवायचे आहे, तर मग मुलांना बाहेर कोचिंग सेंटरमध्ये का पाठवले जाते? हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. मुलांचे शिक्षण चांगल्या शिक्षण संस्थेत होत असले तरी मुलांना सुरुवातीपासूनच बाहेर ट्युशनला पाठविणे आज गरजेचे मानले जाते. देशातील शिक्षण विभागातील घोटाळे काही नवीन नाहीत, सध्या महाराष्ट्रात टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) भ्रष्टाचारात गुंतलेल्या ७८०० शिक्षकांची नावे समोर आली असून, ज्यांचे पगार शासनाने थांबवले आहेत. या घोटाळ्यात समाजातील अनेक नामवंत लोकांचा सहभाग असल्याची खबरबात आहे. अन्याय आणि भ्रष्टाचार करून शिक्षक नोकरी मिळवत असेल, तर तो आपल्या पदाला न्याय कसा देणार? आणि आदर्श पिढीचा शिल्पकार कोणाला म्हणायचे? लोकसंख्येच्या बाबतीत आपला देश जगात दुस-या क्रमांकावर आणि सर्वाधिक शैक्षणिक संस्थांमध्ये तिस-या क्रमांकावर आहे, तरीही आपल्या देशातील लाखो विद्यार्थी दरवर्षी मोठ्या संख्येने परदेशात शिक्षणासाठी जातात, तसेच त्याकरिता मोठ्या प्रमाणात पैसा ही देशाबाहेर जातो. गुणवत्तेबाबत बोलायचे झाले तर जागतिक स्तरावरील सर्वोच्च शैक्षणिक संस्थांमध्ये भारताचे नाव नाही. युनेस्कोच्या शैक्षणिक अहवाल २०२१ नुसार, देशातील १ लाख शाळा केवळ १ शिक्षक चालवतात. देशातील शाळांमध्ये ११.१६ लाख जागा रिक्त आहेत, त्यापैकी ६९% ग्रामीण भागात आहेत.
या महागाईच्या काळात अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक रोजंदारी मजूरापेक्षाही कमी तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत, तर काही शिक्षकांना महिनोनमहिने वेतनाशिवाय कामाला लावले जाते, तर अनेक राज्यांमध्ये वर्षानुवर्षे शिक्षकांची नवीन भरती झालेली नाही. देशातील अनेक विद्यापीठे आणि सरकारी अनुदानित शैक्षणिक संस्था अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त करून शिक्षणाचे काम चालवत आहेत. केजी ते पीएचडीपर्यंतच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या कुशल शिक्षकांमध्ये देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. या वाढत्या बेरोजगारीच्या परिस्थितीमुळे शिक्षण क्षेत्रात संघर्ष शिगेला पोहोचला असून, त्यातून भेदभाव, भ्रष्टाचार, शिफारस यासारख्या समस्या निर्माण होत आहेत. या सगळ्यामुळे शिक्षक मिळेल ते काम करायला तयार असतात. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी केंद्र आणि राज्याकडून दर सहा महिन्यांनी यूजीसी नेट/सेट/स्लेट परीक्षा घेतली जाते. लाखो विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण होतात, पण शासन दर सहा महिन्यांनी लाखो सहायक प्राध्यापकांची भरती करत नाही. सरकारने या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. लोक २०-२० वर्षांपासून ही परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील आजही बेरोजगार आहेत. दुसरीकडे, आज देशात असे अनेक शिक्षक आहेत, ज्यांना स्वतःच्या विषयाचे ज्ञानही नाही, अनेकदा यासंबंधीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात आणि जर आज त्यांची योग्यता आणि गुणवत्तेवर आधारित चाचणी घेतली गेली तर ते कदाचित पूर्णपणे नियमबाह्य गेलेले सिद्ध होतील. शिक्षकाची छोटीशी चूक किंवा निष्काळजीपणा समाजासाठी घातक ठरू शकते. आज अनेक शिक्षकांना कामातून पटकन घरी परतायचे असते, पण जे शिक्षण विभागात फक्त वेळ घालवून निघतात ते कधीच शिक्षक नाही. प्रत्येक शिक्षकाचा कामाचे योग्य मूल्यमापन होणे अत्यंत आवश्यक आहे. चांगल्या कामाला प्रोत्साहन आणि वाईट कामाचा निषेध करणे खूप गरजेचं आहे.
खरा शिक्षक कामातून कधीच मुक्त होत नसतो, जोपर्यंत तो त्याच्या कामात पूर्ण समाधानी होत नाही तोपर्यंत तो आपल्या कामात सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतो. शिक्षक म्हणजे जो इतरांच्या हिताचा विचार प्रथम करतो. शिक्षक सारख्या पवित्र पदाला कलंक लावणाऱ्या अनेक बातम्या आजकाल पाहायला व ऐकायला मिळतात. जे मानवतेला लाजवतात. ते शिक्षक नाहीत, ते समाजाचे भक्षक आहेत, जे शिक्षकाच्या मूळ गुणांपासून अनभिज्ञ राहून शिक्षक पदाच्या प्रतिष्ठेला काळीमा फासतात. आजच्या वाढत्या सामाजिक समस्यांमध्ये भ्रष्टाचार, दिरंगाई, अत्याचार, गुन्हेगारी, स्वार्थ, अंमली पदार्थांचे सेवन, भेसळ, प्रदूषण, तस्करी, खोटे बोलणे, बनावटगिरी, संस्कृतीहीन वर्तन, या सर्व समस्यांचे मूळ कारण लोकांद्वारे नियमांची होणारी अवहेलना आणि निष्काळजीपणा आहे, जे त्या व्यक्तीच्या शिक्षण आणि संस्कृतीवर मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण करते. लहानपणापासून कोणीही गुन्हेगार म्हणून जन्माला येत नाही, मुलं ही कच्च्या मातीच्या मडक्या प्रमाणे असतात, शिक्षक जसे घडवतील तसे विद्यार्थी घडतील. मानले की समाजाचा आणि कुटुंबाचाही परिणाम मुलांवर होतो, पण मुख्य मार्गदर्शकाच्या भूमिकेत तर शिक्षकच असतो. शिक्षक आता समाजसुधारक च्या भूमिकेत दिसत नाही, असेही नाही. क्वचितच, पण अनेक शिक्षक आजही प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत खरे समाजसुधारक बनून समर्पणाच्या निस्वार्थ भावनेने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करण्याची धडपड करत आहेत.
आपला देश महान समाजसुधारक, संत, महात्मा, क्रांतिकारकांचा देश आहे, या देशात असंख्य महापुरुष होऊन गेले ज्यांनी लोकांच्या समस्या हीच आपली समस्या मानून देश आणि समाजाच्या सेवेसाठी आपले जीवन त्यागले, ज्यामध्ये शिक्षण क्षेत्र देखील ठळकपणे आहे. देशात महिलांच्या शिक्षणाची पहिली ज्योत प्रज्वलित करणाऱ्या थोर समाजसुधारक म्हणजे सावित्रीबाई ज्योतिबा फुले, यांना प्रचंड सामाजिक विरोधाला सामोरे जावे लागले व खूप संघर्ष करून स्त्री शिक्षण यशस्वी केले. लोक त्याच्यावर चिखल, दगड, शेण फेकायचे, शिव्याशाप करायचे, टीका करायचे, त्याच्याकडे तुच्छतेने आणि तिरस्काराने बघायचे. इतक्या असह्य अत्याचारानंतरही त्यांनी ज्योतिबा फुले यांच्या मदतीने मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली. आज आपल्या समाजात असे किती कष्टाळू शिक्षक आहेत जे आपल्या निस्वार्थ कर्तव्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी समाजाच्या वाईटाशी लढू शकतात आणि जे लढू शकतात, अशा खऱ्या समाजसुधारक सारख्या शिक्षकांची आज देशाला खूप गरज आहे.
- डॉ. प्रितम भी. गेडाम
भ्रमणध्वनी क्र.- 82374 17041
Post a Comment