तुमचं नशीब तुम्ही घडवू शकता; कारण ते तुमच्या हातात आहे."करले दुनिया मुठ्ठी मे" अशी एक स्लोगन मागे खूपच लोकप्रिय झाली होती.बहुधा रीलायन्स कंपनी ने मोबाईल निर्मिती क्षेत्रात जेव्हा पदार्पण केले, तेव्हा ही स्लोगनची जाहीरात सर्व माध्यमातून प्रसारित करण्यात आली होती. अर्थात तुमचा तुमच्या कर्तुत्वावर ठाम विश्वास असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता; याकरिता तुम्ही ज्या प्रश्नांविषयी अनेकदा विचार करून ही उत्तर सापडत नाही, असे प्रश्न, समस्या किंवा शंका यांना “जाऊ दे” म्हणत सोडून दिल्या पाहिजेत, या करिता जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या "तुका म्हणे उगी रहावे, वेळ येईल तेव्हा पहावे" या अभंगातील ओवी महत्वाची संदेश देते.
आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर आपण आपल्या स्वकार्यांत तल्लीन झाले पाहिजे. भूतकाळातील सर्व कटू स्मृती विसरून जायला हवे, भूत काळ जसा जाणीवपूर्वक विसरला पाहिजे, तसेच भविष्यातही रमायला नको, वर्तमान आपल्या हातात आहे. अशा वर्तमान काळावर लक्ष केंद्रीत करायला हवे.
आपल्या अंगिकृत कार्यात जीव ओतून मग्न झालात की, मनात कोणताही नकारात्मक विकार उत्पन्न होत नाही. मनाची शक्ती प्रचंड असते: मनोबलावर विश्वास असू द्या, मनाच्या दृढ निश्चयाने प्रचंड मोठी कार्ये पार पाडली आहेत. मनाच्या या अगाध आणि प्रचंड शक्तीच्या बळावर तुम्ही येणार्या कुठल्याही संकटाला तोंड देऊ शकता, आणि
त्यातून तुम्ही सहीसलामत यशस्वी होऊ शकता, याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे; प्रत्येकाने मनाची प्रचंड शक्ती ओळखून सकारात्मक विचारांची पेरणी काय चमत्कार करू शकते, यांचा अनुभव अनेकांना आला आहे. जगद्गुरु संत तुकोबारायांच्या "निश्चयाचे बळ। तुका म्हणे हेचि फळ॥" या अभंगातील कठोर निश्चयाचे महत्त्व सांगणारी ओवी खूप काही सांगून जाते.म्हणूनच आता उठा, आता या क्षणापासून यशस्वी होण्याचा दृढनिश्चय करा.
“माणूस आधी नातून मरतो, मग प्रत्यक्षात मरतो! असे म्हणतात, आपल्या सर्वांना अजून खूप जगायचे असेल, तर मरणाचा विचार करून उपयोग नाही.”अलिकडेच हे ‘लिव्ह इन विथ कोरोना’ या मथळ्याच्या लेखातील डॉ. निलेश मोहिते यांचे विचार सुध्दा महत्वाचा संदेश देऊन जातात, डॉ.मोहिते यांना भेटलेल्या 108 वर्षांच्या माणसाचे अनुभवही वाचनात आले, अलिकडच्या काळात अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित अस्मानी संकटात माणूस प्रचंड भयग्रस्त झाला आहे, अशा भयग्रस्ततेला दूर्मीळ दिलासा देणारा हा अनुभव मनाला उभारी देतो. वास्तविक यापूर्वीही अशा नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांवर अनेकांनी विजय मिळविला आहे. अशा लोकांच्यामध्ये विजय मिळविण्यासाठी जे गूण लागतात; त्याच गुणांची जोपासणा करून पराक्रमी होऊन संकटांवर मात केली पाहिजे.
संकटांना संधी समजून धैर्याने वाटचाल. करायला हवे. ज्या व्यक्ती निर्णय घेण्यात तत्पर असतात, त्या व्यक्ती आपल्या जीवनातील अर्धी लढाई आधीच जिंकलेल्या असतात.धैर्य व चिकाटीमुळे ते स्वत: कामाला लागतात व इतरांना कार्याचा नकाशाच काढून देतात. इतरांना ही अशा व्यक्ती प्रेरणादायी ठरतात.
नेहमीच पुढाकार घेणे, सकारात्मकपणे आशावादी होऊन कार्यात इंटरेस्ट निर्माण करणे, सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाणे हे ज्यांना जमलेले असते. त्यांच्या रक्तांत नेतृत्वगुण पुरेपूर भरलेले असतात. मनाची एकाग्रता हा गुण सुध्दा यशस्वी होण्यासाठी फार महत्त्वाचा व आवश्यक गुण आहे. मन एकाग्र करण्याची सवय प्रयत्नपूर्वक आपण लावून घेतली पाहिजे, जो वेळ पाळतो तो आपल्या ध्येयाकडे अगदी वेळेत पोहोचतो, त्यामुळे आपल्या जीवनात वेळेची किंमत जाणण्याची सवय लावून घ्यायला हवी., आपण ज्या हेतूने काम हाती घेतलेले आहे,त्या हेतूकडे लक्ष देऊन उत्साहाने, चिकाटीने, स्वेच्छेने कार्यारंभ करायला हवा. यश मिळविण्याची धमक आपल्या प्रत्येक हालचालीत उघड उघड दिसत असते,ती धमक, ती उमेद, तो कामाचा झपाटा नेहमीच एक वेगळीच ऊर्जा देऊन जातात.
यशस्वी होण्यासाठी संबंधित कार्यातला जोम, जिवंतपणा रसरसून झोकून देऊन काम करण्याची वृत्ती आपल्या वाटचालीत दिसायला हवी. जीवनामध्ये जर खरं काही लागत असेल तर ते म्हणजे निरोगी व्यक्तिमत्त्व असे व्यक्तिमत्त्व तयार करणे आपल्या हातात असते. “मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्घीचे कारण” असे ही संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांनी फार पूर्वी सांगितलेच आहेच.मन प्रसन्न, प्रफुल्लित ठेवणे ही सुद्धा एक कला आहे, ती प्रयत्नपूर्वक बाणली पाहिजे.
आत्मविश्वास हा यशस्वी माणसाचा प्राण आहे, तो प्रत्येकाने आत्मविश्वास अंगी बाणवला पाहिजे. समोरच्या माणसांबद्दल श्रध्दा व विश्वास अढळ पाहिजे. प्रत्येकाकडे पूर्वग्रहदूषित मनोवृत्तीने पहायला नको. अशा यशस्वी व्यक्तीकडे “कर्तुम्-अकर्तुम-अन्यथा कर्तु” अशी सत्ता त्यांच्या ठायीठायी दिसते. यशस्वी माणसांचा मनावर प्रचंड ताबा असतो. भावना व सवयी त्यांच्या मुठीत असतात. सर्व बाजू विचारात घेण्याचा संयम त्यांच्याकडे असतो. व्यक्ती जितक्या समर्थपणे लोकांकरिता किंवा लोकांच्या सोयींकरिता, सुविधांकरिता किंवा समाज कारणाकरिता तनमनधन अर्पण करतात, तितक्याच समर्थपणे लोक त्या व्यक्तींना सलाम करतात. समाज अशाच व्यक्तींना स्विकारतो.
व्यवहारज्ञान माणसाला शहाणे करते आणि माणूस म्हणूनच ओळखते. तेव्हा तुम्ही तुमच्यातला माणूस जागवा. तुमची प्रज्ञा, तुमची बुद्धिमत्ता विनोदी झाली पाहिजे.
तुम्ही आज जे कुणी तपस्वी आहात ते तुमच्या आजुबाजूच्या सर्व तुम्ही इतिहास पुरुषांकडून, घराण्यातील पूर्वसुरींकडून स्त्रीदेवतांकडून, गुरुंकडून, पारंपारिक व नवनवीन साहित्यातून, विज्ञानातून शिकलेले व समजून घेतलेले आहात म्हणूनच! हे लक्षात असू द्या. आणि उद्या जे कुणी तुम्ही होणार आहात, ते सर्व तुमच्या कालच्या, आजच्या सेवेवर, वर्तणुकीवर अवलंबून आहे. म्हणून तुम्हाला जे काही द्यायचे आहे ते देऊन टाका. दान हे सर्व यशाचे गमक आहे. “देणार्यांने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे,घेता घेता घेणाऱ्यांने देणाऱ्याचे हात घ्यावेत." या काव्यपंक्ती फार मोलाचा उपदेश आपल्याला देऊन जातात.
भगवदगीतेत सांगितलं आहे की, "कर्मण्येवाधिकारस्तू मा फलेशू कदाचन" तुम्ही तुमचं आयुष्य सार्थकी लावू शकता पण कसल्याही अपेक्षा ठेवू नका. पदभार हा जितका गोंडस तितकाच कुचकामी असतो. निरपेक्ष प्रेम म्हणजेच सुखसमाधान होय. अपक्षाविरहीत केलेल्या कार्याचे फळ नक्कीच कधीतरी मिळतेच मिळते.
शारीरिक आपत्तीचा संभव सांगता येत नाही. कुणाला माहीत, कधी काय होईल. पण विवेक सतत आचरणात आणला तर मनावर ताबा ठेवता येईल. मनावर ताबा ठेवला की, यश तुमच्या मुठीत येते.
आपलं नशीब घडवण्याची कला आपण कौशल्याने शिकू शकता; हे कौशल्य साधले की,तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता; मनाची शक्ती प्रचंड अद्भुत आणि अगाध असते: मनोबलावर विश्वास असू द्या, मनाच्या दृढ निश्चयाने समाजातील प्रचंड मोठी कार्ये लिलया पार पाडली आहेत. प्रत्येकाने मनाची शक्ती ओळखून सकारात्मक विचारांची पेरणी करायला सुरुवात करा! उठा, आता या क्षणापासून यशस्वी होण्याचा दृढनिश्चय करा.
- सुनीलकुमार सरनाईक
भ्रमणध्वनी : 9420351352
(लेखक भारतसरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने व आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून ‘करवीर काशी’चे संपादक आहेत.)
Post a Comment