प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले की अत्याचार करू नका. कयामतच्या दिवशी ते तुम्हाला कष्टात टाकणार आहे. त्याचबरोबर लालसा करू नका. कारण यामुळेच तुमच्या पूर्वीचे लोक नष्ट झाले आहेत. यामुळेच लोकांनी रक्तपात केला आणि जीवित व वित्तहानी केली आहे. यामुळेच लोक गुन्हेगारी जीवन जगत होते. (जाबिर (र.), मुस्लिम)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले की पाच गोष्टी अशा आहेत की जर यामध्ये तुम्ही लिप्त झाला तर फार वाईट ठरेल. मी अल्लाहकडे प्रार्थना करतो की या गोष्टी तुमच्यामध्ये पसरू नयेत.
(१) व्यभिचार जर कोणत्या समाजात उघडपणे होत असेल तर त्यांना अशा प्रकारचे रोग जडतील जे तुमच्या पूर्वीच्या लोकांना झाले नव्हते.
(२) माप आणि तोलात कमी ही दुष्प्रवृत्ती जर लोकांमध्ये रुजली तर त्यांना दुष्काळासारख्या परिस्थितीशी तोंड द्यावे लागते.
(३) जकात न देणे. जर लोकांनी जकात देणे बंद केले तर त्यांच्यावर आकाशातून पाऊस पडत नाही. जर पशूपक्षी नसतील तर कधीच पाऊस पडणार नाही.
(४) अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांशी गद्दारी ज्यांच्यामध्ये ही दुष्प्रवृत्ती निर्माण होते, अल्लाह त्यांना बिगर मुस्लिम शत्रूच्या हवाली करतो, जे त्यांच्यापासून बरेच काही हिरावून घेतील.
(५) जर मुस्लिम शासक अल्लाहच्या ग्रंथानुसार शासन करत नसतील तर अल्लाह मुस्लिम समुदायात फूट पाडतो आणि ते आपसात रक्तपात करू लागतात.
(अब्दुल्लाह इब्ने उमर (र.), बैहकी, इब्ने माजा)
ह. उमर बिन खत्ताब (र.) म्हणतात की मी प्रेषित मुहम्मद (स.) यांना विचारलं की सर्वांत चांगलं कर्म कोणतं? प्रेषितांनी उत्तर दिलं, "एखाद्या मुस्लिमाला हार्दिक आनंद पोहोचवा. तो जर उपाशी असेल तर त्याला जेवण द्या, त्याच्याकडे कपडे नसतील तर कपडे द्या. किंवा त्याला कशाची गरज पडली असेल तर ती पूर्ण करा."
(तरगीब व तरहीब, तिबरानी)
जर एका व्यक्तीने दुसऱ्या माणसास एखादे नेक कर्म करायला सांगितले असेल तर त्यालासुद्धा तसाच मोबदला मिळतो जसा नेक कर्म करणाऱ्याला मिळणार आहे. अल्लाहला ही गोष्ट आवडते की जर कुणी संकटात सापडलेला असेल, मग ती व्यक्ती कोणत्याही धर्माची का असेना, तिला मदत केली जावी. (तरगीब व तरहीब)
ह. अबू बकर (र.) म्हणतात की प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले की अशी व्यक्ती जन्नत मध्ये जाणार नाही, जी आपल्या अधिकाराचा गैरवापर करते, नोकर-चाकर आणि गुलामांशी वाईट वागते.
लोकांनी विचारले की हे अल्लाहचे प्रेषित (स.) आपण आम्हाला असे सांगितले होते की दुसऱ्या समुदायांपेक्षा या समुदायात अनाथ आणि गुलाम जास्त प्रमाणात असतील.
प्रेषितांनी उत्तर दिले की हो, मी असे म्हणालो होतो. तुम्ही अशा अनाथांशी आणि गुलामांशी तसाच व्यवहार करा जसा तुम्ही आपल्या मुलाबाळांशी करता. त्यांना खायला तेच द्या जे तुम्ही खाता. (तरगीब व तरहीब, संदर्भ- इब्ने माजा, तिर्मिजी)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले की तुम्ही आपल्या सेवकांशी जितका सौम्य व्यवहार कराल तेवढाच जास्त मोबदला तुमच्या कर्मांचा दिला जाईल.
संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment