गेल्या दोन तीन वर्षांत कोरोना,डेल्टा, आणि ओमिक्राॅन या विषाणूंमुळे जगभरात सर्वच थरात भय निर्माण झाले होते, माणूस माणसापासून दूर गेला होता.अनेकांचे जवळचे नातेवाईक, आप्त, मित्र, शेजारी यांच्यापैकी दुर्दैवाने या साथीत बळी पडले गेले. कोरोंनामुळे रुग्णशय्येवर कोरोन्टाईन झालेले रुग्ण आणि त्यांच्या हलाखीच्या बातम्या किंवा अफवा ऐकून सर्वसामान्य माणूस घाबरून व हडबडून गेला होता, त्यामुळे समाजात औदासिन्य आणि नैराश्यता यांचे प्रमाण प्रचंड वाढले होते. त्यातून मनोरुग्णांची संख्या ही कमालीची वाढली होती. वृत्तपत्रांतील तसेच दूरदर्शनवरील व समाज माध्यमातून कोरोनाच्या बातम्या आणि दृश्ये यामुळे सर्वसामान्य माणसाचे मन सैरभर झाले होते. त्यामुळे समाजमनाची एकाग्रता भंग पावली होती. रूग्णालयात जाणे अनेकांना भितीदायक झाले होते. पूर्वीच्या काळी डॉक्टर म्हणजे देवदूत वाटायचा, पण अलिकडच्या काळात डॉक्टर म्हणजे पेशंटकडून वाट्टेल तसे आणि हवे तेवढे पैसे उखळणारा लुटारू वाटू लागला आहे. त्यामुळे दवाखान्यात दाखल होणे म्हणजे सर्वसामान्य जनतेला महाभयंकर संकट वाटत आहे. त्यातच हे मानवनिर्मित संकट असून जागतिक जैविक युद्घाची नांदी आहे की काय असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात मोठ्या प्रमाणावर उभा राहिलेला होता. चीनने पुकारलेले हे जैविक युद्ध आहे, व चीन सर्व जगावर आपले अधिराज्य गाजवू पाहतोय,तो आपल्या देशाचा एक नंबरचा शत्रू आहे,असे माध्यमातून ऐ्कल्यापासून तर सर्वसामान्य माणूस मोठ्या प्रमाणावर घाबरून औदासिन्याच्या आणि नैराश्याच्या गर्तेत जावू लागला होता.
खरं तर शरीराचे आरोग्य म्हणजेच संपत्ती आहे. ही संपत्ती मिळण्याकरिता प्रत्येक माणसाला एकाग्रता जरूरीची असते. स्वास्थ्य म्हणजे तरी काय ? ज्याचे चित्त 'स्व' मध्येच राहते तो स्वस्थ. आपले चित्त स्वभावतः 'स्व' कडून इतरत्र जात असते. कोठूनही आवाज आला की आपण तिकडे लक्ष देऊ लागतो. समाजात काही अघटीत घडले की एकाग्रता भंग पावते. एखादे आकर्षक दृश्य समोर आले की आपली नजर तिथे खिळते. अर्थात या झाल्या शरीराच्या बाहेरच्या गोष्टी. शरीरात कुठे दुखले-खुपले की आपले लक्ष शरीराच्या त्या-त्या भागाकडे जाते. मनाविरूद्ध काही घडले की, आपला अपमान झाला असे वाटते. मग त्याच विचाराने पुन्हा पुन्हा आपले मन त्रस्त होते. आपले आर्थिक नुकसान झाले, किंवा प्रिय व्यक्तीचा वियोग झाला, तर भावनेचे उमाळे वारंवार येऊ लागतात. तसेच, काही सामाजिक घटनांची स्मृती आपल्याला छळत राहते. या सर्वांमुळे आपले शारीरिक, मानसिक अथवा सामाजिक स्वास्थ्य बिघडते व आपण अस्वस्थ होतो. आपल्या मनाला नैराश्य येऊ लागते. गेल्या दीड दोन वर्षात कोरोनाच्या संकटांमुळे अनेकांचे स्वास्थ्य पूर्णपणे बिघडले आहे.
जागतिक आरोग्य संस्थेने स्वास्थ्याची व्याख्या केली आहे. स्वास्थ्य म्हणजे केवळ आजार अथवा अपंगत्व यांचा अभाव एवढेच नसून शारीरिक, मानसिक व सामाजिक सुस्थिती म्हणजेच स्वास्थ्य. अशी ही व्याख्या आहे. या पार्श्वभूमीवर स्थिर पद्धतीचे व्यायाम म्हणजे जीममध्ये जाऊन वेटलिफ्टींग, स्प्रिंग एक्झरसायझेसन,तर चल पद्धतीचे व्यायाम म्हणजे चालणे,धावणे, पोहणे, सायकल चालविणे, तसेच तोल सांभाळता येणे यासारखी विशिष्ट कवायती, लवचिकता येण्यासाठी योगासने व सूर्यनमस्कार यांची सवय करावी. यामुळे स्नायूंचा व सांध्यांचा कडकपणा कमी होऊ शकतो. अर्थातच प्रकृती स्वस्थ राहण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मनाची प्रसन्नता!
जागतिकीकरणाच्या रेट्यात जो तो ऐहिक सुखाच्या मागे लागला आहे.तो स्वहिताच्या पलिकडे काहीही बघायला तयार नाही. प्रत्येक जण ऐहिक सुखाच्या मागे पळतो आहे. "पळा पळा कोण पुढे पळे तो" अशी सध्याची प्रत्येक माणसाची अवस्था झाली आहे,जीवनातील अति धावपळीमुळे किंवा अतिप्रमाणांत असलेल्या - इच्छा,हाव किंवा वासनांमागे पळण्यांत माणसाची शक्ती मोठ्या प्रमाणात खर्च होते, अर्थात त्यामुळे मनुष्य आपले स्वास्थ्य हरवून बसला आहे, शिवाय गेल्या दोन अडीच वर्षांपासून कोरोनामुळे माणसाचे पळणेच बंद झाले आहे. सर्वच ठिकाणी मंदीचे व निराशेचे वातावरण आहे. त्यामुळे त्याला काही साध्य करता येत नाही. ज्या क्षेत्रात आपणास कर्तृत्व गाजवायचे आहे; त्याबद्दल स्वतःलाच जर प्रतिकूल परिस्थितीमुळे आत्मविश्वास वाटत नसेल तर माणसाला मोठ्या प्रमाणावर नैराश्य येते. तो स्वतःला कमी समजून पुरता खचला जातो. अर्थात काही करावेसे न वाटणे, म्हणजे चलनवलनांत आलेला अडथळा, बसल्या जागेवरून उठावेसे न वाटणे, डोळे मिटून पडावेसे वाटणे, कोणाशी बोलू नये असे वाटणे, माझी इच्छा नाही, मला काही नको- अशा तऱ्हेची प्रतिक्रिया देणे, कुठल्याही कामात लक्ष न लागणे, मनाला निरूत्साह वाटत रहाणे हे सर्व प्रकार किंवा लक्षणे ही नैराश्यातून औदासीन्य कडे नेणारे आहेत. अशी परिस्थिती लॉकडाऊनच्या काळात सर्वत्र सर्वांना अनुभवाला मिळाली. नकारात्मक असणारे सतत येणारे डोक्यातले विचार थांबतच नाहीत व डोके भणभणायला लागते व यांतून नैराश्यता वाढीला लागते.
आपण कुठल्याही कामात रस न दाखवता नुसताच बसून वेळ वाया घालवतो आहे. या विचारांमुळे, बर्याच लोकांना औदासिन्य आले आहे, नेहमीच त्यांना उदास उदास वाटते, उत्साह,जोम,ताकद हरवले आहे की काय असे वाटू लागते. पण लक्षात घ्या की काहीही न करण्याची एक कला आहे. तीला समजून घेणे आवश्यक आहे.म्हणजे पहा मजा म्हणून, फन म्हणून काहीतरी मनाला आवडेल ते करायचे, कामात व्यग्र नाही म्हणून निराश होऊ नका. ‘क्या बडा तो दम बडा', ही म्हण लक्षात घ्या. नैराश्य किंवा औदासिन्य हे काही आज नवं नाही. अनेकदा अनेक जण या परिस्थितीतून गेलेले आहेत, त्यातून ते सही सलामत बाहेर पडले आहेत. यांचे अनुभव जाणून घ्यावेत. जीवनातील चढउतार सर्वांच्या परिचयाचे असतात. परिस्थितीनुसार, कधी आनंदित होणे, कधी दु:खी होणे, कधी चिंतित होणे स्वाभाविक होय. पण जगण्यांत स्वास्थ्य उरले नाही. स्वतःहून काही करण्याची इच्छाच नाही. जीवनांत रस उरला नाही असे सतत वाटू लागले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, ही भावना दीर्घ काळपर्यंत तशीच राहिली किंवा पुन्हा पुन्हा जाणवू लागली तर ते अधिक हानीकारक आहे, जणू तो एक प्रकारच्या रोगाची लागण झालेल्या आहे.असे पुन्हा पुन्हा वाटत राहते.त्यामुळे झोप कमी किंवा खूपच जास्त येणे, मन एकाग्र न होणे, जी गोष्ट सहज करता येत असे,ती आत्ता जमेनाशी होणे, छोट्या, छोट्या गोष्टींचा राग येणे, स्वत:वर नियंत्रण ठेवता न येणे, अन्नावरची वासना एकदम उडणे, जगण्याचा कंटाळा येणे, शारीरिक पातळीवर थकवा वाटत राहणे, मानसिक पातळीवर गोंधळ उडणे, निर्णय घेणे अवघड होणे, असुरक्षित वाटणे, धडाडीने काही करावे अशी इच्छाच न होणे आदी लक्षणे ही केवळ भीतीमुळे निर्माण झालेली समस्या आहे. एक प्रकारचा तो भयगंड आहे, हा भयगंड घालविण्यासाठी प्रत्येक माणसाला समुपदेशनाची मोठी गरज आहे. कुठे तरी आपल्या परिस्थितीला व्यक्त व्हायला देणे अत्यावश्यक असते.त्यासाठी स्वतः प्रयत्नशील होणे गरजेचे आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीला आपल्या सर्व परिस्थितीची कल्पना द्यायला हवी. पूर्वी समाजातील जाणत्या नागरिकांकडून, नात्यातील ज्येष्ठांकडून अशा प्रतिकूल परिस्थितीत आधार दिला जायचा. मानसिक स्वास्थ्यासाठी जवळच्या माणसाचा आधार महत्त्वाचा असतो,अशा औदासिन्यतेच्या कठीण काळात समाजातील जाणत्या व्यक्ती कडून समुपदेशन यांची मुख्यतः गरज असते. अनेकदा अशा समुपदेशनाच्या पहिल्या फेरीतच त्या व्यक्तीला उत्साही वाटू लागते, अगदी पहिल्या भेटीतच अनेकांना बरं वाटून नैराश्यातून बाहेर पडले असल्याचे अनुभव आहेत, तेंव्हा कुठलाही न्युनगंड न ठेवता या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपली इच्छाशक्ती वापरून समुपदेशनाची मदत घ्यायला हरकत नसावी.
- सुनीलकुमार सरनाईक
कोल्हापूर
संपर्क - 9420351352
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित आहेत)
Post a Comment